Wednesday 10 September 2014

नंदुशेठ.....


 त्याची आणि माझी फार काही ओळख नाही. काही मुक्तछंद मी टाकले होते मराठी कविता समूहावर, त्यातला एक जरा बरा होता (मी काय म्हणते….) तो नंदुशेठनी शेअर केला, मग काहीवेळा बोलणं झालं (फेसबुकवर होतं ना, तसंच, फार काही भारी बिरी नाही). नंदुशेठ गझल लिहितो? नाही, तो लिहितो ती गझलच असते. माणसानी नेहमी चांगलं वाचत राहावं म्हणजे आपल्याला काय काय येत नाही ते कळतं. मला झाडाखाली न बसता हे ज्ञान प्राप्तं झालं आणि कविता हा आपला प्रांत नाही (गझल तर कोहिनूर समान आहे मला, दुर्मिळ, अप्राप्य, अशक्यं) याची जाणीव झाली.



शिंक कशी सहज येते तसं नंदू सहज लिहितो. कुठलाही आवेश, अविर्भाव मला त्याच्या लिहिण्यात दिसलेला नाही. त्याच्या इंग्रजी लिखाणावर तर मी आता न बोलणे उत्तम कारण माझे शब्दं कमी पडतात (वर्णन करण्यासाठी, इंग्लिशचे आहेतच कमी). मोहाच्या फुलांचा वास घेतला की कसं गरगरल्या सारखं होतं, तसं होतं. शब्दांनी संमोहित करायची जादू त्याच्या इंग्रजीत आहे. शेवटापर्यंत तो तुम्हांला वाचायला भाग पाडतो (कुण्या एकाची भ्रमणगाथा, तुंबाडचे खोत वाचताना तसं झालं होतं मला). एंड काय आहे, पुढे काय घडणार आहे का वेगळं, असल्या गोष्टींची गरज त्याच्या इंग्रजीला पडत नाही. लोक साध्या गोष्टींवर का लिहित नाहीत कारण त्यात काही चमकदार नसतं. नंदू शब्दसंग्रह आणि वाक्यरचनेच्या जोरावर साधी गोष्टं पण चमकदार करतो (मोटारसायकल-एक वेडा पोस्ट अभ्यासूंनी वाचावी). हाताला चव असते म्हणतात तशी त्याच्या लिखाणाला चव आहे.

दाद देणे, कुणी लिहिलंय यापेक्षा काय लिहिलंय ते वाचणे आणि त्याची पोच देणे हे त्याचे मोट्ठे गुण आहेत. 'जे जे आपणांसी ठावे…' च्या धर्तीवर तो 'जे जे चांगले आपणांसी ठावे…' ते सगळ्यांना सांगावे, हे सुद्धा स्वभावात लागतं. त्याचा गझलरंग मी आजवर दोनवेळा पाहिलाय. वाचन करताना कान योग्यं जागी दाद येतीये की नाही ह्यासाठी टवकारलेले असतात. पण छप्परतोड दाद आली तरी त्याचा शर्ट फार फुगत नाही. छातीशी हात लावून तो मान झुकवतो, पुढे सरकतो. शब्दांचे योग्यं (मूळ) आणि अभिप्रेत असलेले अर्थ तो वाचण्यातून बरोब्बर पोचवतो. अभिप्रेत अर्थाला आलेली दाद त्याला  सुखावून जाते (ऐका : … ही वेळ नाही). मग त्याच्या ब्रौन्झ चेह-यावर मस्तं तकाकी येते. कार्यक्रम सुरू असताना आपलं झालं की तो टिवल्या बावल्या करत नाही. दुस-याचं पण कान देऊन, लक्ष देऊन ऐकतो, कुणी काही जबरा बोलून गेलं की तो उठून टाळ्याही वाजवतो. ज्यातलं आपल्याला येत नाही त्या क्षेत्रातल्या माणसाचं कौतुक करतोच आपण, ज्यातलं आपल्यालाही येतं त्यात कुणाचं तरी कौतुक करणं यासाठी मोठं मन लागतं. त्याच्याकडे संकुचितपणा नाही.

पाच फुटाच्या आसपासचा नंदू असाच रहावा, नाव मोठं होईलच अजून. पाय हवेत गेले की भौतिक उंची वाढल्यासारखं वाटतं, नंदूची भौतिक उंची त्याच्या गुणांच्या, प्रसिद्धीच्या, लेखनाच्या दर्जाशी व्यस्त प्रमाणात राहो, ही सदिच्छा. मला जे दिसलं ते सांगितलं, कुणाला त्याचे अवगुणही माहित असतील पण मला त्याचाशी काही कर्तव्यं नाही. कुणाकडून घेता आलं तर चांगलं घ्यावं या मताचा मी आहे. वाईट गुण दुस-याचे कशाला घ्यायचे, आपल्या स्वत:कडे ते असतातच भरपूर. त्याचंही क्रेडिट का उगाच लोकाला द्या. असो! नंदुशेठ, तुम ऐसाच लिखता रहो!  




--जयंत विद्वांस

1 comment:

  1. तू एक प्रामाणिक लेखक आहेस हे आज परत एकदा जाणवलं .
    हा माणूस , नंदू शेठ , मला सुद्धा फार परिचयाचा नाही, पण जेव्हढा परिचय आहे तो नेमका असाच आहे

    ReplyDelete