Wednesday 10 September 2014

मुक्ताबाई…

तिसरीत असेन, पंचाहत्तरच्या सुमारास आम्ही पर्वती दर्शनला चाळीत रहायला आलो. पूरग्रस्त वसाहत. घरात फरशी नाही, आधीच्या माणसानी बिल भरलं नसल्यामुळे लाईट नाही, चार बि-हाडात एक संडास (त्यात आमच्या चौघांचा होता त्याचं भांड फुटल्यामुळे तो बंद, दुस-याकडे किल्ली मागावी लागायची), पाणी मागे नळ कोंडाळ्यावर भरावं लागे अशी सगळी परिस्थिती. संपूर्ण पर्वती दर्शनमधे चार ते पाच ब्राम्हण कुटुंब. समान धागा एकंच, सगळ्यांची आर्थिक परिस्थिती एकसारखीच. शेजारी एकाबाजूला ओगले आणि दुस-या बाजूला मारणे.

माझ्या आईला ताई नाव तिथेच पडलं. तिच्या अर्ज करण्यामुळे संडास रिपेअर झाला. त्यामुळे वट वाढला. जातीमुळे मान आपोआपच मिळू लागला, चांगलं सांगणारं शेजार लाभल्याचा त्यांना आनंद झाला. मारण्यांची स्टोरी  फारच अवघड होती, तीन मुली, एक मुलगा, घरात लाईट नाही, नोकरी नाही. आंधळी सासू, परत आलेली मेव्हणी आणि ही सहा माणसं. कचकचून भांडायचे, सोप्पा उपाय दारू पिणे, मारणे पिऊन यायचे आणि कुणाला तरी एकाला रगडायचे, स्पेसिफिक असं कुणी नाही, जो पहिला हातात सापडेल तो. मुक्ताबाई त्यांची बायको. साडेचार फूट उंची, नऊवारी, मोठ्ठ कुंकू आणि चार वाक्यानंतर 'म्हणून म्हणलं' असं पालुपद.

त्यांची बहिण चार घरी कामं करायची, आमचं पाणी भरायच्या. मग मुक्ताबाई आमची धुणीभांडी करू लागल्या. जवळजवळ सत्तावीस वर्ष. बाबा दुकानात होते. तिथेच मारणे कामाला लागले मग मुक्ताबाई जाऊ लागल्या धान्यं निवडायला. लिहिता वाचता काही यायचं नाही, म्हटलं, बस कशी कळते, म्हणायच्या ४ चा आकार पाठ झालाय तो दिसला की आपली बस. प्रचंड कष्टाळू बाई. काम स्वच्छ, चोख, बसून दिवसात दोन दोन पोती धान्यं, डाळी निवडायच्या दुकानात. बसनी ये जा, आयुष्यात छत्री, रेनकोट, स्वेटर असली कुठलीही ऐश नाही, अगदीच उठवत नाही असं वाटलं तर डॉ.मेहंदळे बाईंना (यांच्यावर पण लिहिणार आहे) दर्शन द्यायच्या.

कधी दांडी नाही, खोटी कारणं नाहीत. त्यांच्या एवढं हंसासारखा शुभ्रं धुतलेला बनियन मी पाहिलेला नाही. आमचे कपडे खूप काळ टिकण्यात त्यांचाही वाटा आहे, पितळ्याचे डबे, भांडी अशा घासायच्या की खराब होतील या भीतीने हात लावायला लाज वाटली पाहिजे. कधीही कपड्याला, भांड्याला साबण, पावडर राहिलीये असं चुक्कून नाही. स्वच्छपणा, टापटीप, काम आपलं समजून करणे या गोष्टी मुळात स्वभावात लागतात, तिथे शिक्षणाचा संबंध काही नाही. एक पितळ्याचा कडीकोयंडा असलेला डबा आहे आमच्याकडे (ते डबे कसे आले त्याची स्टोरी परत कधीतरी), कधीही त्या कोयंड्याच्या कडेनी, कपाचे, कढइचे कान -   हिरवं राहिलेलं किंवा काळपटपणा पाहिलेला नाही. फरशी अशी पुसायच्या की संगमरवरावरून फिरतोय असं वाटावं.
 
अनेक वर्ष पगार घेतलाच नाही हातात. मुलींची काळजी, आईच्या नावावर रिकरिंग काढायच्या. तिन्ही मुलींची लग्नं त्या बाईनी एकटीच्या हिमतीवर केली, पुढे नव-यानी माळ घातली. तो त्रास संपला. त्यांचे दोनेक लाख आईच्या नावावर होते. दोन वर्षामागे आई एकदा त्यांनी म्हणाली, अहो तुमचे पैसे तुमच्या नावावर ठेवा, उद्या मला काही झालं तर तुमचे पैसे आहेत हे कुणाला माहित नाही, बुडतील तुमचे. त्या जे म्हणाल्या ते आपण नाही म्हणू शकत. भाबडेपणाला पण यश असतं जगात. म्हणाल्या, आयुष्यं तुमच्या मदतीनी चांगलं गेलं, अन्नाला, नोकरीला लावलंत, अडीअडचणीला उभे राहिलात मागे कायम, मुलींची लग्नं झाली, सुखात आहे, तुमच्या मुलांना मिळाले म्हणून मला वाईट नाही वाटणार.

चार वर्षामागे मारणे गेले. मुक्ताबाई दोन आठवड्यापूर्वीच घरी येउन गेल्या. कमरेत वाकल्यात, बोळकं झालंय, केस पांढरे झालेत, चेह-याचं अगदी पिंपळपान झालंय. माझ्या मुलीला त्यांनीच आंघोळ घातलीये. आर्या म्हणायची, या आज्जींचे हात एवढे खरखरीत कसे? म्हटलं आपल्या भांड्यांवरून हात फिरव, त्यांचे हात खरखरीत आहेत म्हणून ते डबे अजून स्मूथ लागतायेत हाताला. अजून कुठे पांढरं स्वच्छ काही नजरेला पडलं की मुक्ताबाई डोळ्यापुढे येतात, येत रहातील.



--जयंत विद्वांस  

  

No comments:

Post a Comment