Saturday 21 February 2015

स्पर्शात्मा.....


माणूस हरवलेल्या क्षणांना शोधू लागला की तो हळवा होतो. संगीत ही नेहमी आनंददायक गोष्टं आहे. त्याचा आस्वाद घेताना वय, शिक्षण, जात, धर्म आड येत नाही. शास्त्रीय संगीत सगळ्यांनाच कळतं असं नाही पण तरीही कुठल्यातरी दैवी अनुभूतीने माना डोलतात, चित्तं प्रसन्न होतं, आनंद मिळतो, तो मनात रेंगाळतो. माणसाला सुख मिळालं की त्याला त्याच्या पुनरावृत्तीची ओढ लागते. मग ते शारीरिक, बौद्धिक वा मानसिक सुख असो. संगीत हे असं एकमेव सुख असावं की ज्यात शरीर थकल्यानी ते भोगताना अटकाव येत नाही (बहिरा असेल तर? हा न्युसंस व्हयाल्यूचा प्रश्नं धरावा). देव जसा दाखवता येत नाही पण त्याचं अस्तित्व आपण मान्य करतो तसंच संगीत. एखाद्या गायकाच्या अमुक एक गाण्यात या जागी मला २०० मिलीग्राम आनंद मिळाला असं नाही दाखवता येत. अव्यक्तं आनंद, सदिच्छा, आशीर्वाद नेहमी ताकदवान आणि अमर्याद असतात. प्रत्येक पिढीच्या आवडीनुसार संगीतातल्या थोर व्यक्ति बदलत जातात. पण भीमसेन, किशोरीताई, शोभा गुर्टू, जसराज, अभिषेकी, मन्सूर आणि असे बरेच काही चिरंतन आहेत.

मागे एका मासिकात की पुस्तकात वाचलेलं. १९७७ ला अमेरिकेनी एक यान अवकाशात परग्रहावरची जीवसृष्टी शोधण्यासाठी सोडून दिलं, जे परत येणार नाही. पृथ्वीवरचे काही सुमधुर आवाज त्यांनी रेकॉर्ड करून त्यात ठेवलेत. ज्याला कुणाला सापडेल आणि ते जर प्रगत असतील तर ते कसे ऐकायचे हे त्यांना कळेल किंवा ते शोध लावतील. भारताच्या केसरबाई केरकरांची भैरवी त्यात घेतलीये. त्यांच्या कल्पना शक्तीला सलाम आहे. मला एक सत्यात नं येणारं स्वप्नं पडतं. जर ते यान देवलोकात पोचलं तर? कुणीतरी ती रेकॉर्ड लावेल आणि ती भैरवी ऐकून अल्लादियाखां पटकन म्हणतील ए केसर, तुझं गाणं लागलंय बघ, मी तुला कायम म्हणतो ना तुझ्या कोमल रिषभात आणि गंधारात डोळ्यात पाणी आणायची ताकद आहे त्याचा हा पुरावा आहे.

संगीताला भाषेची गरज नसते हेच खरं. जो कुणी परग्रहवासी असेल तो जर ते ऐकू शकला तर त्याला काही देणंघेणं नसेल, भाषा कुठली, राग कुठला, स्केल कोणती आहे, कुठल्या देशातला किंवा कुठल्या ग्रहावरचा आहे. यातली काहीही माहिती नसताना तो जर डोलू लागला, भारावला, आतून मोहरून गेला तर काय सांगावं. कुठून आले हे स्वर? शोध घेतलाच पाहिजे म्हणून ते आपल्यापेक्षा प्रगत असतील तर निघतील पण शोधायला. राहतील इथेच, इथलं चांगलं काही घेऊन जातील, त्यांचं आणतील. आपल्याला अज्ञात असलेलं त्यांच्याकडे असू शकतं. डोळे मिटेपर्यंत हे असलं काही होणार नाही पण कल्पना करायला काय हरकत आहे. 


सकाळी सकाळी एखादं गाणं किंवा ओळ कानावर पडते आणि दिवसभर आपण  गुणगुणत रहातो. ज्योतिषशास्त्रानुसार नेपच्यून ग्रह आपल्या राशीत असेल तर तसं होतं असं वाचलंय. तो सदानकदा माझ्या राशीत असावा असंच मला वाटतं. पण खरं सांगू का नेपच्यून असो नसो, आपल्याला कधी प्रसन्न वाटलं, कुठूनशा आलेल्या सुरांनी आठवणी जाग्या झाल्या, अंगावर काटा आला, डोळ्यात ओल आली तर समजायचं कुण्या दिग्गजाचा आत्मा रियाझ करता करता आपल्याला स्पर्शून गेलाय असं.   

(व्हाटसप वर खर्डेघाशी ग्रुपवर मुकुंद भोकरकरांची पोस्ट होती आणि त्यावर शैलेश कुलकर्णींची दमदार कॉमेंट होती, त्यावरून सुचलं हे)
--जयंत विद्वांस




No comments:

Post a Comment