Thursday 19 February 2015

वन्स अपॉन अ टाईम (९).....

वन्स अपॉन अ टाईम (८) मधे उल्लेख केलेला दुसरा हरहुन्नरी माणूस म्हणजे लान्स क्लुजनर. काहीवेळेस आपल्याला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू डोक्यात बसतात किंवा काही आवडूनही जातात. क्लुजनर दुस-या कॅटेगरीतला.  हा देखणा अष्टपैलू मला जाम आवडायचा. माणूस रेकॉर्ड करता खेळतोय की स्वत: आनंद लुटतोय वर दुस-यालाही देतोय हे बघणा-याला कळतं. आपल्या पिढीनी बघितलेल्या दिग्गजांमध्ये रिचर्डस, लारा, गॉवर, इम्रानखान, वाल्श, अम्ब्रोज, अरविंदा डिसिल्वा, गिलख्रिस्ट आणि असे अनेक या कॅटेगरीत होते. क्लुजनर त्यापैकी एक. गोरापान, सहा फुटाच्या आसपास आणि खेळाडूची शरीरयष्टी असलेला तो एक देखणा खेळाडू होता. काही हिरोइनस आणि क्रिकेटियर यांच्यात मला नेहमी एक गंमतीशीर साम्यं आढळलंय. काही जण फिगरनी (आकड्यांनी) ओळखले जातात काहीजण प्रेझेन्सचा किती आनंद देतात यावरून.

भारतात कलकत्त्याला झालेला सामना मला आठवतोय. त्याला अझहरनी धुतला होता, सलग पाच बाऊन्ड्री मारलेल्या त्याला. एक तर माझ्या अजून लक्षात आहे. लेगवर अल्मोस्ट यॉर्कर, अझहर खेळता खेळता कोलमडला पण फाईन लेगला चौकार गेला हे कळायला फार उशीर झाला होता. त्याच्या वेगाचा अंदाज आला त्यामुळे. पण तो काही जन्मत:च पडलेल्या चेह-याचा भारतीय गोलंदाज नव्हता (श्रीनाथ, प्रसाद आठवतात? प्रदीपकुमार, भारत भूषणच हे क्रिकेटचे, कायम मख्ख) त्यामुळे सर्वस्वं लुटलं गेल्यासारखा, जवळचा जिवाभावाचा माणूस गेल्यासारखा, आता सगळं संपलं असा चेहरा वगैरे नव्हता झाला त्याचा. जेन्युईन फास्ट बोलर कोण? ज्याला मार पडल्यावर जो चेहरा टाकत नाही, शिव्याही देत नाही पण कपाळावरची नस फुगलीये, डोळ्यात खुन्नस आणि जो पुढचा चेंडू अजून त्वेषानी टाकतो, अनप्लेएबल किंवा बोटं फुटतील असा मुळाशी घाव घातल्यासारखा हुकमी यॉर्कर टाकतो तो. तुम्ही स्टेनला बघा, परफेक्ट माणूस (याच्यावर परत कधीतरी). लान्स तसा होता. जिगरबाज, दुस-या डावात ८/६४ काढणारा.     

माणसाला कितीही यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली तरी एखादी गोष्टं राहून जातेच. त्याच्या यशोगाथेपेक्षा ती चुटपूट लावणारी गोष्टं त्याच्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करणा-या माणसांच्या चिरंतन लक्षात रहाते. ब्रॅडमनला शेवटच्या डावात चार धावा काढता आल्या असत्या तर? अपुर्णतेत मजा असते म्हणतात. न वाजलेल्या सुरावटी वाजणा -या सुरावटींपेक्षा जास्ती आर्त असतात.मरेपर्यंत विसरू शकणार नाही अशा गोष्टी घडून जातात ( चेतन शर्मा, गोलकीपर नेगी यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे, आपण सुजाण प्रेक्षक नसून अजूनही अडाणी प्रेक्षकच आहोत). क्लुजनरच्या बाबतीत असंच झालं.

नव्व्याण्णवच्या वर्ल्डकपला आफ्रिकेच्या नऊ पैकी जिंकलेल्या सलग चार सामन्यात तो म्यान ऑफ द म्याच होता. ऑस्ट्रेलियाशी सेमीत गाठ पडली त्यांची. आत्ताच्या क्षणाला हसू येईल इतकं कमी टार्गेट होतं. ५० ओव्हरमधे २१४. पंचेचाळीसाव्या ओव्हरला ६-१७५ असताना क्लुजनर खेळायला आला. ९-२०५ एकोणपन्नासाव्या ओव्हरला. शेवटच्या सहा चेंडूत नऊ धावा हव्यात. डेमियन फ्लेमिंगला पहिल्या दोन चेंडूंवर त्यानी सीमापार पोच केलं. चार चेंडूत फक्त एक धाव हवी होती. समोर डोनाल्ड. तिसरा चेंडू निर्धाव गेला, चौथा चेंडू मिस हिट, मिडविकेटला मार्क वा कडे गेला.क्लुजनरचा धीर सुटला, त्या क्षणावर सटवीनी दुर्दैव स्वत:च्या बोटांनी लिहिलं होतं. क्लुजनर समोर पोचला तरी मोरू डोनाल्ड चेंडूकडे बघत होता, पळाला तो शेवटी पण उसेन बोल्टचा स्पीड असता तरी तो आउटच होणार होता. सामना टाय झाला आणि साखळीत आफ्रिकेला हरवलं असल्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयी झाली आणि त्यांनी कपही जिंकला.

हातातोंडाशी आलेला घास जाणं म्हणजे काय, जाणून घ्यायचंय? भेटा अथवा लिहा - लान्स क्लुजनर, मु.पो.द.आफ्रिका. मेरा नाम जोकर मधे ऋषीकपूरला बेस्ट म्यानच्या नावाखाली जसं सिम्मी ग्रेवालला चुम्बायला मिळतं तसं लान्स क्लुजनरला त्या वर्ल्डकप मधे 'प्लेअर ऑफ द सिरीज' गौरवण्यात आलं. दुधाची तहान ताकावर, कमनशिबी लेकाचा.

--जयंत विद्वांस     

No comments:

Post a Comment