तर
विषय होता फ्यानी, फेंगडा पळणारा, वाकड्या नाकाचा फ्यानी, मला तो जाम
आवडायचा आणि राग पण यायचा कारण तो तेंडुलकरला मस्तं गंडवायचा. जेमतेम अठरा
टेस्ट आणि त्र्याऐंशी वनडे खेळला तो. आकड्यांमधून मोठा दिसणारा हा माणूस
नव्हे. तर एक हरहुन्नरी माणूस. फलंदाजाला फसवून आउट करणारा. तो सैन्यात
होता. त्या दरम्यान एकदा बॉम्बची चाचणी चालू होती. बॉम्ब याच्या जवळच
फुटला. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली, थोडासा बहिराही झाला आणि नाकाला
जखम झाली. तरीपण पठ्ठा खेळला बराच. नंतर दृष्टीवर परिणाम व्हायला लागल्यानी
तो रिटायर्ड झाला. परवाच एबी डिव्हीलिअर्स कसा चतुरस्त्र आहे याचा
मेसेज वाचलेला. फ्यानीनी शालेय जीवनात आफ्रिकेचं भालाफेकीसाठी प्रतिनिधित्व
केलेलं आहे. नवीन काहीतरी किंवा अजून काहीतरी करून बघायचं हा तिकडच्या
लोकांचा गुणधर्मच आहे. झिम्बाब्वेचा कीपर डेव्ह हौटन हा त्यांच्या
देशाच्या हॉकी टीमचा गोलकीपर होता आणि त्या टीम मधले ५-६ जण हॉकी टीमचा
भाग होते. फ्यानी ९५ च्या मिस वर्ल्डला जज होता, त्याचा भाऊ आणि मुलगी
दोघंही बहिरे होते. बही-या लोकांच्या संस्थेसाठी त्यानी केपटाऊन ते
प्रिटोरिया सायकलिंग करून आफ्रिकन चलनातले ८ लाख जमवले.
सिडनीला
ऑस्ट्रेलियाला जिंकायला एकशेसतरा हव्या होत्या फक्तं. आफ्रिकेत जन्मलेला,
इंग्लंडकडून खेळलेला आणि ऑस्ट्रेलियात रहाणा-या टोनी ग्रेगनी (कॉमेंट्री
सुरेख करायचा, २००३ च्या वर्ल्डकपला त्यांनी फायनलला भारत का जिंकू शकत
नाही याचं केलेलं विश्लेषण, भावनिक नव्हतं ते, अभ्यासपूर्ण होतं आणि
शारजातल्या तेंडूलकरच्या ऐतिहासिक म्याचेसची कॉमेंट्री मला अजून लक्षात
आहे) खेळाच्या आधी आफ्रिकेला विजयाची संधी १००:१ आहे असं सांगितलेलं.
ऑस्ट्रेलिया पाच रननी हरली. फ्यानीनी त्या डावात ६/४३ काढल्या आणि म्याच
मधे १०/१२३. म्यान ऑफ द म्याच स्विकारताना त्यानी त्याच्यापेक्षा चार इंच
उंच असलेल्या टोनी ग्रेगला बाउन्सर टाकला. त्याला त्याच्या १००:१ या
वाक्याची आठवण करून देत म्हणाला "You know South Africans; we never
give up."
फ्यानी, तू लेका फार कमी काळ खेळलास. तुला भेटणं काही शक्यं नाही त्यामुळे इथूनच तुझ्या कर्तुत्वाला सलाम.
--जयंत विद्वांस
No comments:
Post a Comment