Friday 7 March 2014

लल्याची पत्रं (१)…. प्यार हुआ इकरार हुआ

लल्यास….
आपण बरेच वेळा एखादं गाणं ऐकलं, आठवलं की बोललोय. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळेच प्रसंग घडतात असं काही नाही,  मग आपण जे घडलेलं नाही ते घडायला, अनुभवायला हवं होतं या अतृप्तं इच्छेला पुस्तकात, गाण्यात समान प्रसंग आला की रिलेट करतो. आज अशाच एका अजरामर गाण्याबद्दल बोलणार आहे तुझ्याशी.
गाणं तुला, मला काय सगळ्यांनाच मधल्या म्युझिक पिसेस सकट पाठ आहे. त्यामुळे शब्दं मी तुला सांगायची गरज नाही. तर गाणं आहे 'प्यार हुआ, इकरार हुआ'. फाटका राज कपूर, पडद्यावर आणि पडद्याबाहेर पण त्याच्या प्रेमात बुडालेली नर्गिस. केमिस्ट्री की काय म्हणतात ना ती या गाण्यात दिसते बघ. काय प्रेमानी ओथंबलेल्या चेह-यानी बघते ती संपूर्ण गाण्यात आर.के. कडे. स्त्रीची लाजरी, घाबरी मानसिकता आणि पुरुषाची बेफिकिरी शैलेंद्र काय सहज लिहून जातो.

मन्ना डे म्हणतो
प्रेम झालं, होकार झाला,  मग कशाला घाबरतेस? लता लाज-या आवाजात म्हणते, खरं आहे सगळं पण मन सावध आहे, ते बजावतंय, निघालीयेस खरी पण रस्ता अवघड आहे, जे स्वप्नं पहातीयेस ते अजून किती लांब आहे काय माहित. तो म्हणतो, आपलं प्रेमाचं  गाणं कधी  बदलणार नाही, म्हण असं तू. (किती लबाड जात आहे बघ, तिच्याकडून वचन हवं). मग ती ही म्हणते, तू पण म्हण, की शेवटपर्यंत सोबत हीच राहील. ती पण किती भाबडी आहे बघ , साथ सुटली, प्रेम संपलं तर चंद्र निस्तेज होईल म्हणते. दोघांच्या भावना एकच माणूस लिहितोय बघ. तुला गंमत सांगतो, जगात सोप्पं लिहिणं सगळ्यात अवघड आहे. शैलेंद्र ते सतत करायचा.   

प्रत्येक आईला आपलं मूल, डायरेक्टरला आपला चित्रपट आणि युगुलाला आपलं प्रेम हे नेहमीच सुंदर, जगावेगळं, हटके वाटतं. ती म्हणते, दाही दिशांना आपलीच कहाणी असेल. तो तिच्या एक पाऊल पुढे,  दिशा काय,  वेडे, पुढच्या तरुण पिढ्या आपलं गुणगान गातील म्हणतो.
लहान भावंडाचा हात धरून जाणारा शशी कपूर आणि त्या वेळच्या चपखल ओळी - मै ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेगी निशानियॉं.
हया गाण्यातला पाउस टिपलाय राघू कर्मकारनी, ब्लॅक/व्हाईट मधला सगळ्यात सुंदर पाउस (मोहे अंग लग जा बालमा चा मादक रंगीत पाऊस पण त्यांनीच टिपलाय), तो स्टुडिओ मधे टिपलाय हे सांगूनही खरं वाटत नाही इतका सुंदर. भाबडा राजकपूर (बनेल असून पण भाबडा वाटणारा) आणि चारचौघींसारखी आणि म्हणूनच आपली वाटणारी नर्गिस. त्यांच्याकडे निर्व्याज प्रेमानी, कौतुकानी बघणारा तो मिशाळ चहावाला,
सगळच् कसं न विसरण्यासारखं. शैलेंद्र नेहमीच साधं आणि म्हणूनच अतिशय गोड, आपल्या मनातलं लिहायचा. सोबतीला शंकर जयकिशन आणि गायला लता आणि मन्ना डे - दैवी कॉम्बिनेशन सगळं.

पावसात भिजवून नटीचं अंग दाखवणं गरजेचं आहे हे जेंव्हा राज कपूरला जरूरी वाटत नव्हतं तेंव्हाचं हे गाणं आणि कदाचित त्या मुळेच् अजरामर. भावी आयुष्याची स्वप्नं, तो आनंद, ती हूरहूर, साशंक मन या गाण्यात नर्गिसच्या चेह-यावर स्पष्टं दिसतं आणि सोबत अर्थवाही शब्दं. याला अभिनय म्हणतात, तो करावा लागत नाही. तो आनंदासारखा आतून चेह-यावर उमटतो. कितीही बोललो तरी उणंच रहाणार अशी ही गाणी.
आपली लिस्ट मोठ्ठी आहे, चल, पुढच्या गाण्यापर्यंत हेच गाणं म्हणायचं आता. तोपर्यंत बाय.

….....
जयंत विद्वांस 


1 comment:

  1. गाण्याच्या रेकोर्डिंग च्या वेळी राजकपूर यांना सारखे वाटत होते की गाण्यात काहीतरी कमी आहे .मग त्यांनी एक छत्री मागवली परत टेक सुरु झाला .फेमस च्या रेकोर्डिंग बूथच्या काचेतून मन्ना डे यांनी समोर पहिले तर राजकपूर पडद्या वर हे गाणे कसे सादर होईल याचा अभिनय करून दाखवीत होते आणि इथे मन्ना दे यांना आलाप सुचला आणि एक सुंदर गीत रेकोर्ड झाले .गाणे चित्रीट करायच्या वेळी नर्गिस ने संगील्यामुळे राजकपूर यांची तिन्ही मुले या गाण्यात दिसतात . त्या दिवशी मुलांना आनद कश्याच्या झाला होता माहित आहे तर शूटिंग मध्ये घेतले म्हणून नाही तर नवीन रेनकोट मिळाले होते .

    ReplyDelete