Monday 19 May 2014

लल्याची पत्रं (१०) … 'एक धागा सुखाचा...'

 
लल्यास,
 
सध्या नवीन काय ऐकलंस? मी काहीही नाही. जुनंच अजून इतकं राहिलंय ना आणि परत परत ऐकायचा मोह होतो तो वेगळाच. नवं वाईट आणि जुनं तेच चांगलं असं अजिबात नाही. पण जुनी गाणी तोंडपाठ का आणि नविन का नाहीत? अर्थात नव्या पिढीला आहेत ती तोंडपाठ हा भाग आहेच. काळानुसार आवड बदलते पण आता ऱ्हिदमला जुळणारे शब्दं असतात, अर्थ नसेना का काही मग त्यात. सगळीच गाणी तशी असतात असं नाही पण संख्या कमीच. असो, मागच्या पत्रात मी तुला 'छोटीसी ये दुनिया….' बद्दल लिहिलं होतं. 
 
आज मी तुला सांगणार आहे ते मराठी गाण्याबद्दल. ते गाणं ऐकलं की स्मशानवैराग्यं आल्यासारखं होतं बघ. मूड नसेल चांगला तर हे गाणं अजिबात ऐकू नये इतके प्रभावी आणि अर्थपूर्ण शब्दं लिहिलेले आहेत. ग.दि.मा. आणि बाबूजींनी दिलेल्या अनेक अजरामर गाण्यांपैकी ते एक आहे. 'एक धागा सुखाचा…'  राजा परांजपे आणि सचिनच्या 'जगाच्या पाठीवर' मधलं. तिसरी चौथीत असताना शाळेत पाहिला होता मी तो. शब्दांचे अर्थ कळण्याइतपत अक्कलही नव्हती पण जे पाहिलं ते कोरलं गेलं. हातमागावर बसलेले राजाभाऊ, बाबूजींचा हळवा आवाज आणि  ग.दि.मां. चे शब्दं वैराग्यं,  विषण्णता आणतात अगदी.  
 
थोरांची वचनं वगैरे वाचली की कसा हुरूप येतो आपल्याला, त्याच ताकदीचं गाणं आहे हे जीवनाचा अर्थ सांगणारं. माणूस सगळ्यात कशाला घाबरत असेल ना तर तो वार्धक्याला आणि नंतर सगळ्यांनाच अटळ असणा-या मरणाला घाबरतो. आपण आता नसणार, आपल्यावाचून कुणाचं अडणार नाही, ह्या रंगीबेरंगी दुनियेचं परत दर्शन नाही, कुठे जातोय माहित नाही. मग आपण इतके दिवस जगलो ते चूक की बरोबर असा प्रश्नं पडतो. खरं तर किती क्षण खरे जगलो? माया, लोभ, मी, माझं, पैसा, स्थावरजंगम काही काही उपयोगाचं नाही याची हतबलता ग.दि.मांच्या शब्दातून अंगावर कोसळते. खरंय, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे असतानाही का जगतो आपण? नाईलाज म्हणून की हतबलता म्हणून? काय गम्मत आहे बघ, सुखाचा धागा सोनेरी असल्याने ते नकोसे वस्त्रं सुद्धा जरतारी होऊन जाते.  सुख म्हणजे नेमकं काय? हे व्यक्तीसापेक्ष आहे, मानण्यावर आहे. आहे त्यात सुख मानायचं हा हतबलतेने स्वीकारलेला मार्ग सगळेच जण चालतात. आशा मोठी वाईट चीज आहे बघ.  उद्या सुखाचा दिवस येऊही शकतो, काय सांगावं? या स्वप्नातंच आपण हे वस्त्रं विणत रहातो. शंभर कापसाच्या धाग्यात एक जरीचा धागा काय रेशो आहे बघ. 
 

काय लिहिलंय गं भन्नाट. किती जपतो न आपण बाह्यरुपाला. आपण कसे दिसतो, काय वापरतोय,  त्याची किंमत किती. आतला माणूस कवडीमोल असला तरी तसा विचार येत नाही.  ग.दि.मा. नागडं सत्यं सांगतात, 'पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी, उघडा कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे'. देवानी हे सगळं इथेच ठेवून यायला लावलंय ते एक बरं आहे. नाहीतर तो ही वेडा झाला असता बरोबरच्या लगेजनी. मोह, माया, सोस सुटत नाही. काही जणांनी आपल्याला आवडणारी, काहींनी सूड म्हणून माणसं सुद्धा बरोबर नेली असती आणि त्याची मोठी पंचाईत केली असती. 

'मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे'. शैलेन्द्रनी  'मेरा नाम जोकर' मधे काय वेगळं सांगितलं होतं? तो म्हणाला होता, 'हाँ बाबू, ये सर्कस है, शो तीन घंटे का, पहला घंटा बचपन है, दूसरा जवानी है, तीसरा बुढ़ापा है'. ही लोकं म्हणून मोठी असतात बघ. दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकसारखं वाटतं, सुचतं म्हणून ते मोठे असतात. ग.दि.मांबद्दल काय बोलणार? लायकी पण नाही, शब्दं कसे हात जोडून उभे, यमक जुळवण्याची खटपट नाही, पर्यायी शब्दं शोधायचा त्रास नाही, मनातून, डोक्यातून कागदावर थेट लिहायचं ते ही तालबद्ध, लयबद्ध. (मीराबाईच्या 'मैने मोल लियो घनश्याम' वरून त्यांनी 'बाई, मी विकत घेतला शाम' लिहिलं पण ते भाषांतर नव्हतं फक्तं विचार उसना होता). माणसाला धीर नसतो बघ. बालपणी वाटतं कधी एकदा मोठे  होतोय. तारुण्यात जबाबदा-या, भविष्याची चिंता यांनी तो हतबल होतो, खचतो. वाटतं, हीच कष्टाची वेळ आहे, उर्वरित आयुष्यं तरी सुखात घालवू. जेंव्हा तो काळ येतो तेंव्हा  सगळंच बदललेलं असतं. थकलेली गात्रं, क्वचित सुटलेली साथ, निर्धन अवस्था, आजारपण आणि मग उरतं ते वाट पाहणं. गतदिनांची आठवण काढणं आणि त्यातच रमणं. छे, अगदी अवघड परिस्थिती असणार.        

माणसाला सगळ्यात राग कधी येतो माहितीये? त्याला दोष ठेवायला, जाब विचारायला कुणी सापडलं नाही की. 'शोले'मधला ए.के.हंगलचा 'आज पुछुंगा उस खुदासे…' संवाद असाच आहे. हतबलता आहे ती. का? माझ्या बाबतीतच का आणि असे अनंत प्रश्नं आपल्याला विचारायचे असतात. पण कुणाला? तो माणूस(?) माहित नाही. त्याला कुणीच पाहिलेलं नाही. ग.दि.मा.म्हणतात 'या वस्‍त्राते विणतो कोण? एक सारखी नसती दोन, कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे!'. खरंय, प्रत्येक वस्त्राचा पोत निराळा, रंग निराळा. जगरहाटी चालूच राहील. अनेक जीव जन्माला येतील, हसतील, रडतील, ओरडतील, रागावतील, भांडतील, प्रेम करतील आणि त्या विणका-याला वाटलं की जगातून नाहीसे होतील. म्हणून 'त्या'ला वाटायच्या आत जेवढं जगता येईल तेवढं जगून घ्यावं. 
 
चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय.    
 
जयंत विद्वांस

1 comment:

  1. त्या वेळी बँक ऑफ महारास्ट्र चे पटवर्धन साहेब राजा परांजपे, सुधीर फडके ,ग दी मा यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले सिनेमाला अर्थपुरवठा केला म्हणून या सुन्दर कलाकृति रसिकंसमोर आल्या

    ReplyDelete