Tuesday 27 May 2014

लल्याची पत्रं (११) …'गीत गाता हु मैं…'

काय गम्मत असते बघ, मागे तुला म्हटलं तसं, गाणं लक्षात राहतं चित्रपट मात्रं अज्जिबात नाही. 'लाल पत्थर' मी बालपणी दूरदर्शनला बघितला होता. काहीही आठवत नाही. त्यातलं 'गीत गाता हु मैं…' मात्रं आठवतं, अर्थात नंतर ही ते खूपवेळा बघितलंय त्यामुळेही असेल. देव कोहलीचं पहिलं हिट गाणं हे आणि शंकर जयकिशनचं कितवंतरी. आरामखुर्चीत बसलेला पाईप ओढणारा विक्षिप्तं राजकुमार, मागे डोक्यावर पदर घेऊन उभी राहिलेली डोळ्यात राग असलेली हेमा मालिनी, गोल गोबरी पण अभागी राखी आणि पियानोवर बसलेला तरणा विनोद मेहरा (याची आणि फारुख शेखची हेअर स्टाईल मात्रं मस्तंच होती).

राखीवर त्याचं प्रेम आहे पण आता ती राजकुमारची बायको आहे, हेमा मालिनीला मान आहे पण पत्नीपद नाही या सगळ्या अडलेल्या, अडकलेल्या, अडकवलेल्या माणसांचा सूत्रधार आहे राजकुमार. संपूर्ण गाण्यात त्याच्या चेह-याची रेष हलत नाही. एवढ सुंदर गाणं तो निर्विकारपणे ऐकतो. मला तरी ती अभिनयशून्यता न वाटता तो अभिनय आहे असं वाटतं. माणसाकडे सत्ता, संपत्ती आली की त्याला उद्दामपणा आपोआप येतो. साहित्यिक भाषा, काव्यं, नाजूक भावना या गोष्टी चेष्टेचा विषय होतात मग त्यांच्यासाठी. जो काय तुमचं कलाविष्कार चाललाय तो मी विकत घेऊ शकतो, पैशांनी काय विकत घेता येत नाही? सौंदर्य, स्तुतिपाठक, सर्व इंद्रियांच्या वासना क्षमाविण्यासाठी लागणा-या गोष्टी मग त्यात स्त्री अथवा पुरुष ह्या ही त्याच पठडीत बसतात.

एका बाजूला हा सत्तेचा, पैशाचा माज एका बाजूला हळवा प्रेमवीर. मला काही संगीतातलं एवढं कळत नाही पण किशोर काही गाण्यांना जर वेगळाच आवाज लावतो असं माझं मत आहे. हे त्यातलंच एक. आतून खूप काहीतरी तुटत असल्यासारखं वाटतं हे गाणं ऐकताना. कधीतरी कुणालातरी हसतमुख राहण्याची दिलेली शपथ तो अजून सांभाळून आहे. दु:ख लपविण्याचा ज्याचा त्याचा मार्ग निराळा, कुणी रडतं, कुणी  घुसमटतं, कुणी कुढून उर्वरित आयुष्यं काढतं, कुणी ती जखमेची जागा सतत जिवंत ठेवून हस-या चेह-यानी जगतं. हे सगळं ऐकायला, वाचायला सोप्पं आहे, ज्याच्या नशिबी येतं त्याचं त्यालाच माहिती बघ.
तो म्हणतो, प्रेमाचे हे क्षण किती अनमोल आहेत. खरंय, वस्तू हरविल्याशिवाय किंवा दुर्मिळ झाल्याशिवाय तिचं मोल कळत नाही. कसंय, हरवली तर मिळण्याच्या आशेवर तरी माणूस जगतो पण समोर आहे आणि आता ती आपली नाहीये याचं वर्णन काय करावं? त्याच्या शब्दांना पण कुसुमाची मृदुलता आहे तो कसा दुखावणार कुणाला. भेटेल त्याला हसतमुखानी शब्दाफुलांचे हार घालायचे एवढंच त्याच्या हातात आहे, अर्थात नाईलाजानी, तरणोपाय नाहीचे नाहीतरी.  

         
आपले ना प्रत्येक माणसाबाबतचे आडाखे ठरलेले असतात. कोण कुठल्या प्रसंगात काय वागणार याचा आपल्याला थोडा अंदाज असतो. नेमके तिथे अंदाज चुकले की माणूस चकीत होतो. स्तब्ध होतो, वेडा होतो. तो म्हणतो, एवढा प्रकाश? चकीत झालाय तो. मनाचा आरसा कसा लख्खं झाला, आधीचं काही त्यात शिल्लक नाही आता, कुणीही डोकावून बघा, आरशासारखं झालाय अगदी. प्रेमभंगाच्या कवितांमधून गाण्यांमधून जे सांगतात त्याच्या नेमकी उलट वस्तुस्थिती असते. असो!


तात्पर्य, हे गाणं कधीही ऐकायला मला आवडतं, ते ऐकतानाही मला डोळ्यापुढे दिसतं. चल, पुढच्या गाण्यापर्यंत, सॉरी, पत्रापर्यंत बाय.


--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment