Saturday 26 March 2016

नमूने (२)…


नमूने (२)…

मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे तो हयात नाही आता त्यामुळे नाव सांगणार नाही. ९१ ला एका नोकरीत असताना तो भेटला मला. माझ्यापेक्षा वयानी मोठा पण सगळे करायचे म्हणून मी पण त्याला अरेतुरेच करायचो. पाचेक फुट उंची, काळा म्हटलं तर वाईट दिसतं म्हणून सावळा म्हणतात तसा रंग, उजव्या कपाळावर लाटा काढल्यासारखा तेल लावलेल्या केसाचा भांग आणि अत्यंत मिस्किल चेहरा. तोंड उघडलं की कळायचं तो किती अवली आहे ते, एरवी त्याच्याकडे लक्ष जाईल असं काहीही त्याच्यात नव्हतं. आधी अकाउंट्सला होता तो मग स्टोअरकीपर झाला. अत्यंत प्रामाणिक, हजरजबाबी, कामात चोख आणि तेवढाच कोकणी फटकळपणा असलेला. समोर मालक आहे का ज्युनिअर याचा विधिनिषेध न बाळगता तो मनात असेल ते स्पष्टं बोलू शकायचा. कपट नसलेला माणूस होता तो. 

तेंव्हा हेडक्लार्क म्हणजे अकाउंट्सचा वाघ असायचा. सगळे टरकून असायचे. तिथेही एक हेडक्लार्क होते. एकदम सगळं काम नियमात. मेमो काढायची प्रचंड हौस त्यांना. ऑफिस पहिल्या मजल्यावर होतं. सगळ्यांनी नऊला हजर असायलाच हवं असं त्यांना वाटायचं आणि हा कधीच वेळेत यायचा नाही. अर्थात संध्याकाळी पण तो काट्यावर निघायचा नाही, एकूणच निवांत कारभार पण वरचे सगळे गुण असलेला. हेडक्लार्क सांगून थकले पण याच्यात काही बदल नाही. एकदा ते जिन्याच्या वरच्या टोकाला उभे राहिले, नेहमीप्रमाणे याला उशीर. नियमाप्रमाणे ऑलरेडी तीन लेट झालेले (रोज पाच दहा मिनिट लेट हा लेट नसतोच यावर त्याचा ठाम विश्वास होता). हा जिन्याच्या खालच्या पायरीवर. दोघांनी एकमेकाचा अंदाज घेतला. मेमो काढावा की घरी हाकलावा की सगळ्यांसमोर झोडावा असा हिशोब वरच्या पायरीवर, खालच्या पायरीवर मेंदू कारण शोधण्यात गुंतलेला. तोंड फुटलंच शेवटी. 'किती वाजले? कितीदा सांगायचं वेळेत ये?' खालून जो फ्लिपर आला ना फास्ट तो अनप्लेएबल होता. 'हाफ डे टाकायला आलोय, त्यासाठी वेळेत कशाला यायला हवंय'. हार्डनिंग करताना कसं गरम लोखंडावर एकदम पाणी ओतल्यावर जसा आवाज येतो आणि ते लोखंड एकदम गार पडतं तसा हेडक्लार्क जागेवर विझला. मग रीतसर वीसेक मिनिट झोडकाम करून कामाला लागले दोघंही. 

तो टायपिंग पण करायचा. एकदा नेहमीचा टायपिस्ट नव्हता म्हणून स्वत:चा मेमो त्यानी स्वत:च टाईप केला. त्यांची सही व्हायच्या अगोदर यानी ऑफिस कॉपीवर रिसीव्हडच्या ठिकाणी स्वत:ची सही करूनच मेमो त्यांच्यापुढे सहीला ठेवला. परत एकदा यथेच्छ वीसेक मिनिट झोडकाम. त्याचा निर्लज्जपणा किती पराकोटीचा आहे हे त्यांना ठसवायचं होतं आणि 'मलाच मिळणार आहे तर मी आधी सही केली म्हणून एवढं काय चुकलंय त्यात' असा त्याचा निरागस प्रश्नं. त्याला मिळालेला तो शेवटचा मेमो. शिक्षा ही भीती बसावी, परत चूक करू नये म्हणून असते, हे याला लागूच होत नसल्यामुळे मेमो देण्यात काय अर्थ होता सांगा. अत्यंत सरळ चेहरा ठेऊन तो गुगली वन लायनर भन्नाट टाकायचा. सगळ्यांना समजल्यावर होणारा डिलेड हास्यस्फोट नेहमी जास्ती असतो. तसा तो झाला की त्याचा चेहरा पावती मिळाल्याच्या आनंदात फुलायचा अगदी. 

तेंव्हा पगार तो कितीसा असणार. स्टेपल्ड पाकिटातून रोख मिळायचा पगार. ऑफिसचं एक पाकीट याला जाताजाता पोस्टात टाकायला दिलेलं. यानी पगाराचं पाकीट पोस्टात टाकलं आणि पोस्टायचं घरी घेऊन गेला. घरी गेला, पाकिट रीतसर बायकोच्या ताब्यात दिलं देवापुढे ठेवायला. तिनंही देवापुढे ठेऊन नमस्कार करून मग ते फोडलं तर आतून पत्रं. मग घरी नेहमीप्रमाणे यथेच्छ झोडकाम झालं वेंधळेपणावरून. कुणीतरी याला सांगीतलं सकाळी सातला उघडतात ती पेटी. हा सहा वाजल्यापासून पेटीशेजारी उभा. पोस्टमन आठला आला, पेटी उघडली, सगळी पाकीट तीन तीनदा शोधली याचं पाकीट नव्हतं. संध्याकाळी पण एकदा उघडते म्हणाले पेटी. हा डेक्कन पोस्टऑफिसला पण नाहीच मिळालं त्याचं पाकीट. ऑफिसमधे येउन त्यानी पराक्रम जगजाहीर केला. मला पूर्ण पगार परत द्या आणि पाच महिन्यात कापा हे त्यानी ऑर्डर वजा विनंती या स्वरुपात सांगून पैसे घेतले पण. स्वत:च्या बावळटपणाचा, बायकोनी कसा झोडला, घरातल्यांनी कसा धुतला याचा किस्सा लोक त्याच्या तोंडून वर्षानुवर्षे ऐकत होते असा रंगवून सांगायचा तो स्वत:च. 

सकाळी बॉयलर पेटवायला तो यायचा. तीनेकशे रुपये मिळायचे त्याचे त्याला. सगळं मिळून विसेक मिनिटांचं काम. एकदा अजून का पेटत नाही म्हणून यानी वाकून बघितलं आणि खालून आगीचा लोळ वर आला. भरीताच्या होरपळलेल्या वांग्यासारखा झाला होता चेहरा. पण त्याची विनोदबुद्धी मात्रं अफाट. मालकांना म्हणाला, आत्तापर्यंत या कामाचे जेवढे मिळाले तेवढे तोंडाला औषध लावण्यातच गेले त्यामुळे आता मी ते काम करणार नाही. 'जयंता, डॉक्टरला सांगितलंय, ते क्रीम दिलंय त्यात गोरं व्हायचं काहीतरी मिसळून द्या म्हणजे त्यासाठी वेगळा खर्च नको.' दोनेक महिन्यांनी म्हणाला, 'कात टाकल्यासारखा दिसतोय का रे चेहरा माझा?' आणि हसत सुटला. हा आणि असे अनेक किस्से तो असे काही सांगायचा की नविन माणसाच्या डोळ्यापुढे चित्रं उभं रहावं आणि त्यानी खदखदून हसावं. 

आपण हजार सोडा अगदी शंभर गेले तरी किती तळतळ करतो, ज्याला मिळाले असतील त्याच्या पिढ्यांना तप केलेल्या ऋषीसारखे श्राप देतो पण सतत आनंदी रहाणारा, स्वत:च्या चुकांवर हसणारा, पूर्ण पगार गेल्यावरसुद्धा ज्या कुणी अज्ञात पोस्टमननी तो घेतला असेल त्याच्याबद्दल एकही वाईट शब्द न बोलणारा, 'जाऊ दे रे त्याच्या नशिबात लॉटरी होती ती, मिळाली त्याला' असं काळजाला हात घालणारं निरागस बोलणारा माझा हा दोस्तं वेगळाच होता. माझे कधी असे पैसे गेले की मी त्याच्यासारखा अख्खा पगार तर नाही ना गेला असं म्हणून हसतो आणि समाधान मानतो. आता तो नाही, तसा अकालीच गेला तो. पण मित्रा, काहीतरी साधं पण जगायला महत्वाचं असं शिकवून गेलास एवढं खरं.

जयंत विद्वांस 

 

1 comment:

  1. व.पु. काळे यांची कथा वाचल्याचा छान फिल आला बर्‍याच दिवसांनी.

    ReplyDelete