Thursday 10 March 2016

पळावं की न पळावं…

पळावं की न पळावं…

विजय गुल्ल्या भिंतीला टेकून बसला होता. लाईट लावावा अशी सुद्धा इच्छा त्याला होत नाही. बायको सुरेखा, मुलगा सिद्धू आणि दोन्ही मुली त्यानी गावाकडे पाठवल्या होत्या. काय करावं हा मोठ्ठा प्रश्नं त्याच्यापुढे आ वासून होता. अती दारू, मांसाहार यामुळे त्याला मूळव्याधीचा त्रास होताच. चार वर्षामागची गोष्टं, त्याला फिशर्सचा पण त्रास चालू झाला होता. ती रेघ एवढी मोठी होती की डॉक्टर गंमतीने त्याला किंग'फ़िशर्स' म्हणायचे. गरीबाची काय हो, सगळेच टर उडवतात. ज्याचं दु:खं त्याला माहित. मूळव्याधीच्या ऑपरेशनकरता त्याला पैसे हवे होते. कुणी मदत करेना. एक तर शब्दश: अवघड जागचं दुखणं त्यात आर्थिक अडचण. मग त्याचा एक मित्रं होता इस्टेट बँक ऑफ इंडियात. तो ऐनवेळी पुढे आला.

आजारपणाच्या खर्चासाठी लोन देण्याची आपल्याकडे पद्धत नाही एक तर, काय करावं गरीब माणसांनी मग. इथे खोटेपणा चालू होतो बघा. नुसत्या आजारपणाच्या ख-या कारणासाठी लोन मिळणार नाही म्हणाला म्यानेजर. बरं या बिचा-याकडे गहाण ठेवायला काही नाही, आता आली का पंचाईत. तळपायाची आणि पार्श्वभागाची अशा दोन आगी विज्जूला अस्वस्थ करत होत्या. मग त्यानी म्यानेजरला घरी बोलावलं. त्याला पार्टी दिली. दारू पिता पिता म्यानेजर, विज्या आणि त्याचा राजकारणातला मित्रं यांच्या गप्पा लोनच्या मुद्द्यावर आल्या. म्यानेजर म्हणाला 'शेतजमीन आहे का? 'आहे, थोडी?' 'राहतं घर मालकीचं आहे का?' होय' माझंच आहे'. विज्याचा मित्रं म्हणाला 'अरे मग दे की लेका ते तारण म्हणून आणि घे पैसे'. म्यानेजर दारू सांडेपर्यंत हसला. 'अरे ते दिवस गेले आता, तुझ्याकडे असं काही आहे का की जे जप्तं झालं तरी तुला फरक पडणार नाही, अशा गोष्टी दे तारण म्हणून'.


शेवटी माळ्यावर सिद्धूसाठी तो लहान असताना आणलेली दोन बोईंग विमानं, पंचवीस वर्षापासून साठवलेला चावट क्यालेंडर्सचा गठ्ठा आणि साधारण दोन ट्रक भरतील एवढ्या मागच्या अंगणात पडलेल्या बिअरच्या बाटल्या यावर कर्ज द्यायचं ठरलं. साधारण लाखभर रुपये मिळाले त्याला नको असताना. विजू नको म्हणत होता एवढे खरंतर, ऑपरेशनला दहा पंधरा खूप होणार होते. पण नेत्यानी वीस घेतले, म्यानेजरनी वीस घेतले. 'व्याज भर काही वर्ष फक्तं, मुद्दल कशाला फेडतोयेस, आम्ही बघू एंडला' असा भक्कम निर्वाळा दोघांनी त्याला दिला. आता दोघांनी हात वर केले होते. म्यानेजर रिटायर्ड झाला होता आणि नेता मोठा मंत्री. कागदावर विजूची सगळी इस्टेट गहाण. चार महिने झाले बँकेची पत्रं येतायेत, अजून नऊ हजार भरायचे बाकी होते. दोघांना गेलेल्या चाळीसचा हिशोब त्यानी बोंबलून सांगितला पण कागदोपत्री पुरावा काहीही नव्हता त्यामुळे विजू अगदी हतबल झाला होता. 

शेवटी त्यानी म्यानेजरला फोन लावला. त्यानी त्याला आयडिया दिली. 'हे बघ, आमची हद्द कोल्हापूरपर्यंत आहे. तू पळून क-हाडला जा. तिथे तुझी इस्टेट आहे त्याला आम्ही हात लावू शकत नाही. एवढं काय मनावर घेतोयेस. चार दिवस पेपरात येईल मग लोक विसरतील सगळं आपोआप. काही दिवसांनी तू सुद्धा विसरशील की तुझ्यावर कर्ज होतं. मी बोललोय मंत्र्याशी, त्यानी काय तुझ्या एकट्याच्या लोन मधला वाटा घेतलेला नाहीये, त्यामुळे काळजी करू नकोस. संसदेत सरकार मदत जाहीर करेल इस्टेट बँक ऑफ इंडियाला पुढच्या आठवड्यात. त्यात तुझं कर्ज राईट ऑफ होऊन जाईल. नोटीस परवा निघेल, तू उद्याच्या पहिल्या एसटीनी निघ क-हाडला. माणूसच नाही जागेवर तर नोटीस कुणाला देईल कोर्टाचा माणूस, फार फार तर दारावर चिकटवेल, रात्रीत दार गायब करतो बघ. न रहेगा दरवाजा, न रहेगी नोटीस'. 

विजूनी उठून लाईट लावला. किडूक मिडूक पिशवीत भरलं. भरल्या डोळ्यांनी त्यानी ती दोन विमानं, रिकाम्या बाटल्यांचा खच आणि क्यालेंडर्सचे गठ्ठे याकडे बघून घेतलं. एक अस्फुट हुंदका फुटला, क्षणभर त्याला पाय जडावल्यासारखं वाटलं. पिशवी काखेत मारून तो पहाटेच्या अंधारात निघाला. बुलककार्ट रेसिंग मधे तो उतरवायचा ती गाडी दाराशीच होती. तिच्यावरून त्यानी मायेने शेवटचा हात फिरवला. आता मात्रं त्याचा बांध फुटला. पळावं की न पळावं हा एकंच प्रश्नं कालपासून त्याला सतावत होता. पण आयुष्याची अखेर उगाच कशाला कायद्याच्या कचाट्यात काढायची हा विचार प्रबळ झाला. सगळ्या खिशातून चाचपून त्यानी तिकीटापुरती रक्कम आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि पहाटेच्या अंधारात तो स्टयांडकडे निघाला.  
     
जयंत विद्वांस

1 comment: