Wednesday 9 March 2016

नमूने (१)…

नमूने (१)… 

प्रत्येक माणसात एक विक्षिप्तं माणूस दडलेला असतो असं माझं मत आहे. प्रत्येकजण तो विक्षिप्तपणा चारचौघात दाखवतोच असं नाही. काहीजण लोकांना काय वाटेल वगैरे विचार करून ती उर्मी दाबतात, काहीजण सहनेबल झालं नाही की तसं वागतात, काहीजण रेग्युलर तसं वागतात. माणसाला अंदाज आला की आपला त-हेवाईकपणा खपतोय की मग अशांना अजून चेव येतो. पण जे न ठरवता तसं वागतात ते लोक मला प्रिय असतात किंवा समानधर्मी असतील म्हणून आवडत असतील पण हे लोक मजा आणतात. 

मी रस्टनला असताना दोनेकशे पोरं होती अप्रेंटीस म्हणून. त्यात पण ज्युनिअर, सिनिअर प्रकार होताच. ते प्रकरण संपून सुद्धा २९ वर्ष झाली. क्वचित कुणाची भेट होते. सगळी नावं काही आता लक्षात नाहीत पण काही अर्क डोक्यात नावानिशी लक्षात आहेत. आम्हांला सिनिअर एक नरेंद्र आगाशे म्हणून वल्ली होता. पराकोटीचं घाणेरडं, अचकट विचकट बोलण्यात त्याचं तोंड कुणीही धरू शकणार नाही, असा होता. सणसणीत सहा फूट उंची, गोरापान, सुदृढ, हसरा तोंडावळा, हुशार पण येड्याचा आव आणणारा. जेवण, बोलणं, वागणं एकूणच आचरट प्रकार. त्याच्या अचाट कल्पना मी इथे देऊ शकत नाही इतकं बीभत्स, अश्लील सुचायचं त्याला. उदा : समजा तोंड नाकाच्या खाली ऐवजी बेंबीच्या खाली असतं तर काय झालं असतं? असल्या विषयांवर चर्चा. मग अगदी सरस्वती जिभेवर नाचायची त्याच्या. त्यात माझी सोबत म्हणजे दोन आचरट प्रवक्ते एकत्रं आल्यावर उडतो तसा धुरळा चालू असायचा. पण कुणी काही बौद्धिक, सिरिअस बोलत असलं तर मात्रं न-याचा वेगळा चेहरा दिसायचा.

अभ्यासात तो हुशार होता पण दाखवायचा नाही तसं. युनिव्हर्सिटीच्या मागे आम्ही क्रिकेटायला जायचो सायकल हाणत, तिथे यायचा तो आमच्याबरोबर खेळायला. अत्यंत हजरजबाबी, मदतीला तत्पर, फटकळपणाचा, आचरटपणाचा मुखवटा लावलेला न-या. इतक्या वर्षात कधीही साधा रस्त्यात सुद्धा दिसलेला नाही. आता अवचित कुठे बायकापोरांबरोबर भेटला तर उपयोग नाही, रस्त्यात त्यांच्या समोर सभ्यंपणा दाखवायला त्याची होणारी कुचंबणा मला बघवणार नाही. 


अजून एक सिनिअर होता औरंगाबाद की मराठवाड्याकडचा, मुळे त्याचं आडनाव. एरवी अतिशय विनोदी बोलणार, चेष्टा मस्करी करणार पण त्याचं काही बिनसलेलं असलं की समोर उभा रहाणार 'आजपासून दोस्ती खतम आपली' एवढं बोलून निघून जाणार. त्याला का? वगैरे विचारायचं नाही. त्याचा मूड जागेवर आला की तो बोलायचा. परवा आपण काय बोललो हे त्याच्या लक्षात पण नसायचं. आठवण करून दिली तरी 'ते मरू दे रे, बोलू का नको बोलू सांग आत्ता' असा चिडायचा.

मी, मिलिंद घाणेकर आणि ड्यानिअल असे जेवायला बसायचो काही महिने एकत्रं. दोघेही मला सिनिअर. ड्यानिअलएवढा थंड रक्ताचा प्राणी मी आजतागायत बघितलेला नाही. भरताचं करपलेलं वांगंसुद्धा उजळ दिसेल इतका तो काळा जांभळा होता. पण काळ्या रंगाला एक मस्तं तुकतुकी असते तसा होता तो आणी चेहरा कायम हसतमुख. मी आणि घाणेकर दोघांना एकावेळी त्यानी हाणला असता आरामात पण त्याला मी कधीही चिडलेला पाहिला नाही. प्रत्येकजण त्याला त्याच्या रंगावरून चिडवायचा, टोमणे मारायचा पण हा हसरा बर्फ. नंतर नंतर सगळं आपोआप कमी झालं कारण तो चिडायचाच नाही. पब्लिक ज्या हेतूनी त्याला बोलायचं तो ते साध्यंच होऊ द्यायचा नाही. त्याला ती बुद्धी सतराअठराव्या वर्षीच होती, जी आमच्याकडे नव्हती. अर्थात हा सगळा प्रकार त्याच्या लहानपणापासूनच असणार पण तरीही राग येउन द्यायचा नाही, हे अवघड होतं. 


माणसं आयुष्यात येतात, भेटतात, सोबत रहातात, काही दुरावतात, नाहीशी होतात, खोडरबरनी खोडावीत अशी पुसली जातात स्मृतीतून, काही उगाच लक्षात रहातात, काही कारणांनी लक्षात रहातात. त्या 'अनुरोध' मधल्या गाण्यात आनंद बक्षीनी हे सगळं सुंदर लिहिलंय 'आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे, कभी कभी इत्तेफ़ाक से, कितने अनजान लोग मिल जाते हैं, उन में से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं! माझ्या पोतडीत असे असंख्य नमुने आहेत. सगळेच चांगले नव्हते तसंच सगळे वाईटही नव्हते. त्यांना चांगलं वाईट आपण आपल्या मतलबानुसार, सोयीनुसार ठरवतो नाहीतरी. कुठेतरी कुणीतरी स्वत:चा उल्लेख इथे वाचेल, कदाचित मी अंधुकसा आठवेनही त्यांना, माहित नाही, मुळात लिहिण्याचा हेतू तो नाही. सरलेल्या काळातले आता जे आपण करत नाही ते उद्योग, गप्पा, प्रसंग आठवतात, मग ती माणसं आठवतात, एवढंच.

जयंत विद्वांस 



No comments:

Post a Comment