Thursday 24 March 2016

सुखाची कल्पना…

सुखाची कल्पना… 

तसं मला सणांचं कौतुक पहिल्यापासून कमीच आहे त्यामुळे मी हिरीरीनी होळीची तयारी, गुढी उभारणे, संध्याकाळी ती काढणे, दस-याला गाडी धुऊन हार घालणे, दिवाळीत पणत्या लावणे वगैरे कामं करत नाही. अगदीच टोमणे जास्ती झाले तर मी नाईलाजाने करतोही पण शक्यतो ती कामं उरकली जाण्याची वाट बघतो, आळशी माणसाकडे पेशंस असतोच पण कुणाला त्याचं कौतुक नसतं. काम करावसं वाटतंय पण ती उर्मी दाबून पडून रहाणे हा पेशंसचा भाग आहे. पण होळी जरा वेगळाच प्रकार आहे. लहान असताना आग लावण्याची सामाजिक परवानगी यामुळे तो जास्ती आवडायचा. ती टिमकी दिवसरात्र वाजवायची, सारखी होळीत गोलगोल  फिरवून कडक करायची आणि नुसती बडवायची या पलीकडे उद्योग नसायचा. त्यावर तोडगा म्हणून त्या बदल्यात आम्हांला पिक्चर बघायला मिळायचा. वर्षभरात दोघांच्या वाढदिवसाचे दोन आणि होळीचा एक असा बिपीएल कार्डधारक शिधा मिळायचा. एकवर्षी आम्ही 'एक बार मुस्कुरा दो' पाहिलेला. हिंदी अफाट होतं, पाचवी सहावीत असू. भाऊ म्हणाला, सिनेमाच्या नावाचा अर्थ काय?  लाज कुठे काढून घ्या माहित नाही सांगून, म्हटलं 'बार एक आणि मुस्कुरा दोन' (तनुजा एक, देव आणि जॉय मुखर्जी दोन). मोठा झाल्यावर त्यानी माझ्याबरोबर सिनेमे बघायचं सोडलं. 

तर होळी. आई सकाळीच पोळ्या करायची. ते नैवेद्य वगैरे नाटक काही वर्ष होतं. मग 'घरातल्या पोराला दूध नाही आणि पिंडीवर अभिषेक' वाचण्यात आलं आणि प्रथा मोडली गेली. पुरण खाल्लेलं चालतं मग पोळी खाल्ली आधी तर काय होतं याचं समर्पक उत्तर तिच्याकडे नसल्यामुळे झाल्याझाल्या एका ताटलीत घ्यायची, त्यावर तुपाचा गोळा टाकायचा, छोट्या वाटीत दूध, त्याच्या कडेनी पाण्याचा गोल फिरवला की चेपायचं. गावभर वाटून चारपाच दिवस पुरतील एवढ्या करायची पद्धत आईपासून आहे ती आजतागायत. माझ्या नशिबानी बायको गुळाची आणि पुरणाची पोळी आणि एकूणच सगळं अप्रतिम करते. तूरडाळ आणि गूळ रटरट शिजत असताना जो एक आवाज येतो, घरभर वास सुटतो ना त्याला तोड नाही. ते त्या मिक्सर मधून काढायचं काम मात्रं फार चिकट, किचकट आहे. भांड्यात खाली तो पिवळसर, स्पर्शाला समुद्रावरच्या मऊ रेतीसारखा ढिग गोळा होतो तो बघत रहावं. लाटताना फ्लेक्झिबल कणकेत तो पिवळसर गोळा सावल्या पसराव्यात तसा पोळीभर पसरतो ना त्याचं वर्णन कसं करावं? 

सरकारी योजना जशा शेवटपर्यंत पोचत नाहीत त्याप्रमाणे ब-याच जणींच्या पोळीत पुरण कडेपर्यंत येतंच नाही, तिथे त्या वातड लागतात आणि मजा जाते, काहींच्या मी खाक-यासारख्या पातळ पोळ्या पाहिल्यात, तिथे कशाला हवीये करीना फिगर. कणकेत हळद टाकून पिवळ्या झालेल्या पोळ्यांना मी हात पण लावत नाही, लोक पोळी अगोड करून गुळवणीत बुडवून का खातात हे मला कोडं आहे. पोळी कशी नरमसूत, फरीदा जलालच्या गालासारखी गुबगुबीत हवी. कणिक अशी तिंबलेली असावी की तिच्या फिलामेंटसारख्या जाडीतून पुरणाचा पिवळा रंग दिसावा. पिवळसर, तांबूस, चटका जास्ती बसलेल्या ठिकाणी काळपट तांबड्या रंगाचे ब्युटीस्पॉट असावेत. या पोळीच्या पण स्टेजेस असतात. तव्यावरून काढल्या काढल्या गरम पोळी खायला फार आवडत नाही मला , एक तर तूप चटकन विरघळतं आणि चव समजत नाही. केलेला दिवस आणि पुढचे निदान दोन दिवस चव, रंग, अवस्था बदलत जाते, ते टिपण्यात पण मजा आहे. 

पहिल्या दिवशी ती मुमताजसारखी गच्च आणि फुगीर असते. दुस-या दिवशी तीची स्किन जरा लूज पडते, तिस-या दिवशी मात्रं ती मोडकळीला येते. मोहमायेतून सुटावं तसं पुरण वेगळं होतं. पिंजरा मधे संध्या 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा' म्हणताना जसा तो गोरा खांदा बाहेर काढते तसं घडी घातली की पुरण बाहेर येतं. अर्थात चवीत कमतरता येत नाही तर वाढ होते. केमिकली चेंजेस होत असतील का तीन दिवस झाल्यामुळे? अज्ञानात सुख असतं हेच खरं. कारण माहित झालं तरी चवीत काय फरक पडणार आहे म्हणा.

तर बाहेर ऊन तापलंय, दुपारचा दिडेक वाजलाय. मस्तं वाडगा घ्यावा. त्यात किमान दोन अडीच पोळ्या घ्याव्यात. वरती दोन घट्ट तुपाचे पिवळे धम्मक स्कूप टाकावेत, साय ओतावी, दूध घालावं, सोबतीला मिरचीचा खार किंवा लोणच्याची फोड असावी. मग मांडी घालून चावण्याचे फार कष्ट नसलेला तो ऐवज तोंडात भरत रहावं. अशावेळी कुणीही काही बोललं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नं केला तरी तोंडातून अनाकलनीय आवाज यावेत इतका तोबरा भरलेला हवा. शेवटचे चारेक घास राहिल्यावर अत्यंत दु:खं व्हावं आणि मग उर्वरित भाग मायेनी खावा, तुपाचा ओशटपणा, सायीचा तुकडा त्यात अडकलेलं पुरण यापेक्षा जगात सुळसुळीत, मऊ काहीही नाही, याची खात्री पटावी. वर थंडगार पौणेक तांब्या पाणी प्यावं आणि वाट काढत ढेकर स्प्रिंगसारखी वर यावी. उगाच एवढं पाणी प्यायलो, अजून अर्धी गेली असती या विचारानी तीव्र की काय ते दु:खं व्हावं. वर बनारस एकसोबीसतीनसो, नवरतन, पक्का सुपारी भुगा दाढेखाली घेऊन पंख्याखाली दहाएक मिनिट बसावं. ग्लानी येऊ लागली की बेडरूमात जाऊन पडदे लावून अंधार करावा, पंखा फुलस्पीडला लावून पात्तळ चादर अंगावर घेऊन झोपावं. उठल्यावर आज वार काय, आत्ता सकाळचे उठलोय की संध्याकाळचे? असा प्रश्नं पडेल अशी झोप लागावी. रात्रं व्हायची वाट बघत आळसात वेळ काढावा आणि दुपारच्या निदान निम्मा तरी ऐवज फस्तं करावा आणि परत सुखनैव झोपावं, निदान माझी तरी सुखाची कल्पना इतकी साधी सोप्पी आहे.

पण वय वाढत गेलं की या अशा रग्गड पुरणपोळ्या चेपण्यात खरी मजा नाही. कुणीतरी आपल्यासाठी बाजूला काढून ठेवलेली, शेवटची अर्धी मुर्धी, गलितगात्र, मोडकळीला आलेली पोळी खाण्यात जास्ती मजा असते. त्याच्या बरोबर खार लागत नाही चवीला, थोडासा खारटपणा प्रत्येक घासाला चवीसाठी मिसळला जातो आपोआप. कुणाच्या तरी आठवणीनी घास अडकावा आणि आपण तो पाण्याच्या घोटाबरोबर खाली सरकवावा यात त्या पोळीचा दोष नसतो. त्या आठवणीतल्या सुखाची कल्पना गोड नसते मात्रं.  


जयंत विद्वांस 



  

No comments:

Post a Comment