Friday 25 March 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१३)… शशी कपूर…

सत्तर एमएम चे आप्तं (१३)… शशी कपूर…

 
थोरामोठ्यांच्या घरात जन्माला येणं हा शाप जास्ती आणि फायदे कमी असा प्रकार आहे. लोक तुमच्या पूर्वजांना तुमच्यामध्ये शोधतात, तुलना करतात, यशापयश लगेच मोजायला सुरवात होते, तुमच्यावर बारीक लक्ष असतं. ब्रॅडमनच्या मुलानी 'तू ब्रॅडमनचा मुलगा का?' या प्रश्नाला कंटाळून काही काळ ब्रॅडसन आडनाव केलं होतं. त्यामुळे स्वत:चं वेगळेपण दाखवून स्थिरस्थावर होणं हे खायचं काम नाही. मुळात मळलेल्या वाटेवरून चालायला सोप्पं असलं तरी रिस्की पण असतं. त्याचे वडील पृथ्वीराज शरीराप्रमाणेच भारदस्त नाव आणि आब राखून होते नाटक आणि चित्रपटसृष्टीत. काका त्रिलोक कपूर देवांच्या (शंकर स्पेशालिस्ट) भूमिकेत फेमस होता. भाऊ रणबीर'राज' आणि शमशेरराज उर्फ शम्मी आपापला किल्ला राखून होते. राजकपूर दिग्दर्शक पण होता आणि तिघात जास्ती देखणा होता. बलबीरराज उर्फ शशी कपूरचं अवघडच होतं.  शम्मीचा धसमुसळेपणा नाही, राजचा (कावेबाज पण) भोळसट चेहरा नाही. या अठरा मार्चला अठ्ठ्याहत्तर पूर्ण झालेला तो आता पृथ्वीराजच्या आकाराचा आणि चेह-याचा झालाय पण आधी तो सगळ्यात स्लिम कपूर होता.  

एकूणच तो सुखी माणूस होता पण. जेफ्री केंडालची शेक्सपिअरिन नाटक कंपनी आणि पृथ्वी थेटर यांची कलकत्त्यात गाठ पडली आणि शशी कपूर वयाच्या अठराव्या वर्षीच जेफ्रीच्या मुलीच्या, जेनिफरच्या, प्रेमात पडला. घराणी झाली की नियम तयार होतात, कायदेकानून असतात. आधी विरोध झाला पण वहिनी गीताबालीच्या पाठींब्यावर तो विसाव्व्या वर्षीच बोहल्यावर चढला. खाण्यापिण्यातली इंग्लिश शिस्त आचरणात आणायला लागल्यामुळे शशी कपूर स्लिम ट्रिम आणि फिट होता. लग्नं झाल्यावर सव्वीस वर्षांनी ती कर्करोगानी गेली आणि शशी कपूर खचला. संपूर्ण इंग्लिश चेहरा घेऊन आलेला करण कपूर मॉडेल झाला मग जुही चावला बरोबर 'लोहा' मध्ये आला आणि तिथेच संपला. तो आता लंडन मध्ये स्थायिक झालाय आणि नामवंत फोटोग्राफर आहे. कुणाल मात्रं भारतीय चेह-याचा होता. त्याचा 'विजेता' वेगळ्या विषयावरचा आणि करमुक्त असूनही फार चालला नाही. तो रमेश सिप्पीचा जावई आहे आणि जाहिरातीच्या फिल्म्स बनवतो. 'हिरो हिरालाल' मधून नसिरुद्दीन बरोबर आलेली थोडीशी किशोरी शहाणे सारखी दिसणारी संजना कपूर आली आणि गेली लगेच. आईकडून आलेला थेटरचा वारसा ती सांभाळतीये. हाच का तो असं वाटावं इतका आता तो फुगलाय. व्हीलचेअरवर बसलेला, हवा भरल्यासारखा दिसणारा, पृथ्वीराज कपूरच्या तोंडावळ्याचा शशी कपूर दिसतो मात्रं अजूनही प्रसन्न.    


त्यानी सगळ्यात जास्ती काम नंदा (८ चित्रपट) राखी, शर्मिला (९ चित्रपट), झीनत, हेमा (१० चित्रपट) आणि अमिताभ (१२ चित्रपट) बरोबर केलंय. त्यातला फक्तं 'ईमान धरम' मी पाहिलेला नाही आणि 'अजूबा' बघायची इच्छा नाही. पण तो यशस्वी होता. सभ्यं, चारचौघांसारखा गोरा गोमटा चेहरा आणि येतंय तेवढं मनापासून करणं एवढ्या मोजक्या गुणांवर तो टिकून राहिला. संवादफेकीसाठी तगडा आवाज नाही, मारामारीला शोभेल असा तगडा देह नाही, उंची फार नाही, बुटकाही नाही, विनोद उत्तम जमतोय असंही नाही, फक्तं नाचासाठी बघायला येतील असंही नाही. पण अमोल पालेकर सारखं काहीतरी सरळमार्गी, आपल्यातला वाटणारं त्याच्यात होतं. ६१ सोलो आणि ५५ मल्टीस्टारर असं संतुलन साधण्याचं कसब त्याच्यात आणि त्याचा पुतण्या ऋषी कपूर मधे होतं. 'आवारा' मधे तो राजकपूरचं बालपण होता, 'प्यार हुआ इकरार हुआ' मधे तो भावंडांना हाताला धरून घेऊन जाणारा होता. बबिता आणि नीतू या सुनांचा तो हिरो होता. संन्यास घेतल्यावर त्याच्या शब्दाखातर नंदा कुणाल कपूरच्या 'आहिस्ता आहिस्ता' मधे आली होती. ती त्याची आणि तो तिचा फेव्हरीट होता. 

'जब जब फुल खिले' मधे 'एक था गुल' म्हणणारा, 'ये समा' म्हणणा-या नंदाकडे चोरून बघणारा, 'शर्मिली'मध्ये 'खिलते है गुल यहां' आणि 'ओ मेरी शर्मिली' म्हणणारा, 'दिवार' मध्ये 'कह दु तुम्हे', 'फकीरा'त 'तोता मैनाकी कहानी', 'चोर मचाये शोर'मध्ये 'ले जायेंगे, ले जायेंगे', 'कन्यादान मध्ये 'लिख्खे जो खत तुझे' म्हणणारा शशी कपूर वेगळा आणि 'कलयुग' '३६ चौरंगी लेन' 'जुनून' 'विजेता' 'काली घटा' 'उत्सव'चा शशीकपूर वेगळा. पैसा, प्रसिद्धी मिळते माणूस त्यात खुशही होतो पण कुठेतरी न्यून जाणवतं. म्हणून पैसे बुडणार हे माहित असूनही आरके 'जागते रहो' काढतो. शशी कपूरनी पण 'कलयुग' 'जुनून' 'विजेता' '३६ चौरंगी लेन'' 'उत्सव' असे वेगळे सिनेमे काढले. 'अजूबा' त्यानी काढला आणि दिग्दर्शित पण केला होता. त्याच्याच 'प्यार किये जा' वरून काढलेल्या 'धुमधडाका'मधून वर आलेल्या महेश कोठारेने मात्रं एकापेक्षा एक रद्दड चित्रपट ईमाने इतबारे काढले अर्थात अजूनही 'जय मल्हार'च्या पैशातून तो वेगळा विषय, चित्रपट काढेल याची सुतराम शक्यता नाही. फार तर अजून एक रद्दड पण यशस्वी, टीआरपी असलेली मालिका मात्रं काढेल. इथे तर तोटा म्हणजे काय तर थोडे पैसे कमी होतील एवढंच तर आहे. पण मुळात ती खाज हवी तोटा सहन करून वेगळं काहीतरी करण्याची, शशीकपूर कडे होती, कोठारेकडे नाहीये.   

लार्जर द्यान लाईफ लिहिलेल्या व्यक्तिरेखेसमोर तो 'दिवार'मध्ये साधेपणाने पण ताकदीने उभा राहिला. चेहरा बोलतो त्याचा, गोळी घातल्यावर त्या मुलाच्या हातात सापडलेले पाव बघून झालेला त्याचा चेहरा बघा. त्याला मिळालेलं केमेव फिल्मफेअर (सहाय्यक अभिनेता). अर्थात फिल्मफेअर मिळालं म्हणजे अभिनय येतो असं नाही. 'मृच्छकटिक'वरून काढलेल्या 'उत्सव'मध्ये त्यानी केलेली भूमिका तोच निर्माता म्हणून केलेली नाहीये. अमिताभ करणार होता पण 'कुली'च्या अपघातामुळे त्याला ती करावी लागली. त्याच्या शब्दावर अमिताभला 'रोटी कपडा और मकान' मिळाला होता. शम्मी सोडून बाकी सगळ्या कपूरांना (पृथ्वीराज, राज आणि शशी) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. शशीकपूरला निदान मरायच्या आधी बरेच वर्ष दिला हे त्याचं भाग्यं. मरणोत्तर किंवा गलितगात्र अवस्थेत असलेल्या माणसाला देण्यात काय आनंद मिळतो, माहित नाही.  

पुरस्कार मिळोत न मिळोत माझ्या लक्षात तो एक सज्जन, सभ्यं, देखणा, पाय जमिनीवर असलेला, मर्यादेत रहाणारा, प्रसन्न चेह-याचा माणूस म्हणून आणि समोर कोण का असेना, संयत आवाजात, गुंडाशी बोलत असलो तरी मोठ्या भावाशी बोलतोय याची जाण ठेवून चीड दाबलेल्या आवाजात 'भाय, तुम साईन करोगे या नही' विचारणारा 'रवि वर्मा', म्हणून राहीलय, एवढं खरं.

जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment