Friday 26 July 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (३)… रेखा ….

अभिनेता जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्लीची ही काळी, बेढब, जाडजूड मुलगी भानुरेखा येत्या १० ऑक्टोबरला साठीत जाईल आणि तिचा कायापालट करणारा दुस-या दिवशी ७१ वर्षाचा होईल. सावन भादो, रामपूर का लक्ष्मण मध्ये ती काळी, बोजड आणि मठठ दिसते. नमक हराम,  दो अंजाने, खून पसीना, गंगा की  सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, मि.नटवरलाल आणि शेवटचा सिलसिला. मोजून आठ चित्रपट आहेत त्याच्याबरोबर आणि केवळ त्याच्या बरोबर प्रेमाचे संवाद एकटीने का होईना पण म्हणता येतील म्हणून आखरी रास्ता मधे तिने श्रीदेवीला दिलेला उसना आवाज.  

पु.लं.च्या फुलराणी मधे (पिग्मालिअनचं हे रुपांतर कुठे आणि देव आनंदचा मनपसंद कुठे) तो प्रोफेसर जसा त्या खेडवळ अशिक्षित मुलीचा कायापालट घडवतो तशी बदलली रेखा. एका शिल्पकाराला विचारलं  गेलं, कशी बनवलीत एवढी सुंदर मूर्ती? तो म्हणाला, ती त्या दगडातच होती, मी फक्तं  अनावश्यक भाग काढून टाकला. रेखाबद्दल 'तो' असच  म्हणत असेल का? त्याचं आधीच लग्नं झालेलं होतं हे तिचं दुर्दैवं. तशी ती त्या बाबतीत कमनशिबीच पण. विनोद मेहरा, किरण कुमार, तो आणि दुस-याच दिवशी आत्महत्या करणारा नवरा मुकेश अगरवाल कुणीच लाभलं नाही तिला. (अशीच कमनशिबी लीना चंदावरकर होती, लग्नाच्या दुस-याच दिवशी तिचा नव-याला - सिद्धार्थ बांदोडकरला - गोळ्या घातल्या होत्या.)




घर मधल्या सगळ्या गाण्यात (तेरे बिना जिया जाये ना चा बिट आणि चाल रेखा एवढीच सुरेख होती), इजाजत मधल्या खाली हाथ शाम आयी है (आर. डी. नी हे गाणं वडिलांच्याच अभिमान मधल्या नदिया किनारे वरून घेतलय अस नाही वाटत?) मधे ती काय अप्रतिम दिसली आहे. गायला ढीग लता, आशा आहेत पण चेहरा त्या गाण्याच्या अर्थाप्रमाणे हलायला हवा ना. इथे रेखा सगळ्यात सुंदर दिसते. नाटक काय चित्रपट काय दोन कलाकार जेंव्हा समोर समोर असतात तेंव्हा एकाच्या अभिनयाचं प्रतिबिंब प्रतिक्रिया म्हणून दुस-याच्या चेह-यावर उमटायला लागत तेंव्हाच तो सीन जास्तं परिणामकारक होतो. सलामे इष्क ला तो उठून गायला लागतो तेंव्हा रेखा मद्दडासारखी उभी रहात नाही तर त्याच्या ओळींचा अर्थ तिच्या चेह-यावर दिसतो. गाणं संपल्यानंतरच तिचं भारावलेपण बघण्यासारखं होतं.

उमराव जान, उत्सव आणि इजाजत रेखाचे म्हणूनच ओळखले जातील इतकं तिनी अफाट काम केलं आहे. उत्सव मध्ये तर ती रती भासते, अंगावरचे  सगळे दागिने एकाचवेळी काढण्यासाठी ती कंचुकीतली क्लिप काढताना ती शेखर सुमनकडे जे बघते ना त्यात तू अजून बच्चा आहेस हे न बोललेलं वाक्य ऐकायला येतं.खुबसुरत मधे दोन वेण्या घातलेली, बसेरा मध्ये बहिणीच्या संसारात रमलेली (एन्डला राखी भाव खाऊन जाते पण), खून भारी मांग मधे आधीची बावळट आणि नंतर कायापालट झालेली, अगर तुम न होते मधली सोशिक बायको या सगळ्यात ती रेखा न वाटता ते पात्रच वाटली हेच रेखा सुंदर दिसण्यामागचं कारण होतं. सुषमा शिरोमणीच्या कुठं कुठं जायाचं हनिमूनला मधे नऊवारीत ती जबरा दिसली होती. ती असली तर ठिकाण कुठलही चाललं असतं अशी. ती परिणीता मधल्या कैसी पहेली है ये जिन्दगानी मधे आणि झुबेदा मधे करिष्मा कपूर पेक्षा सरस दिसते. 

कारकीर्दीच्या उतरत्या काळात तिनी भ्रष्टाचार, फुल बने अंगारे, आस्था, बुलंदी, खिलाडीयोंका का खिलाडी असे काही भिकार सिनेमेही केले पण तिच दर्शन सुसह्य होतं. केस मोकळे सोडलेली किंवा मानेपर्यंत सैल सोडून एक शेपटा घातलेली साडीतली रेखा भन्नाटच दिसते. क्रिश-३ मधे पण ती आहे असं ऐकलय. प्रीती झिंटाची सासू आणि प्रियांका चोप्राची आजे सासू सुंदरच हवी ना?

क्रिकेट मधे गोलंदाजी किंवा फलंदाजी करताना काही जोडया जमून जातात आणि एकत्रं गाजतात तसच काहीसं तिच होतं त्याच्या बरोबर. मुकद्दर का सिकंदर तर असा चटकन उरकायचा, उल्लेख करून पुढे जायचा विषय नाहीचे मुळी. संपूर्ण चित्रपटात ती अप्रतिम दिसते. तो रोल तिचाच होता. इजाजत, उमराव जानचं जेवढ कौतुक झालं तेवढा जोहराच नाही झालं असा मला वाटतं. त्याच्या प्रभावामुळे ती ग्रेसफुल, रिस्पेक्टेबल झाली. इम्रानखानला आदर्श पत्नी कशी असावी असं विचारलं होत. तो म्हणाला भारतात वहिदा रेहमान म्हणून एक नटी आहे तशी हवी. काही काळानी विचारल असतं तर तो रेखा निश्चित म्हणाला असता. 

साड्यांच्या जाहिरातीतल्या कपडे वाळत घालायच्या काठ्या बघितल्या की वाटतं यांना रेखाचे दर परवडत नसावेत. साडीमधे ती परिपूर्ण सुंदर स्त्री दिसते. (स्मिता पाटील, वहिदा आणि आत्ताची विद्या बालन पण). खरं पहायला गेलं तर ती का सुंदर वाटली हे पटकन नाही सांगता येणार, चंदावरकर गोड होती, परवीन सुरेख होती, जयाप्रदाला तर भारतीय पडद्यावरची सर्वात सुंदर स्त्री असं प्रशस्तिपत्रही मिळालं  होतं, तस रेखात काय आहे खरं तर? ते सांगता येत नाही त्यापेक्षा ती सुंदर आहे हे मान्य करण जास्तं सोप्पं आहे. गौतम राजाध्यक्ष म्हणाले होते तिचे फोटो काढताना क्यामेरा सेट करायची गरज नसते, कुठल्याही कोनातून ती सुंदरच दिसते. सर्वसाधारण दिसणा-या माणसाला सुंदर करणारा माणूस हे म्हणतोय मग आपण काय बोलायचं अजून?

काही लोक जन्माला येताना फुटक नशीब घेऊन येतात किंवा कुठलातरी शाप घेऊन येतात. रेखा त्यातलीच एक. एकटेपणाचा शाप घेऊन आलेली. प्रसिद्धी, पैसा, मानमरातब सगळं काही बक्कळ मिळालं पण लौकिक अर्थानं मात्रं ती सुखी होऊ शकली नाही. 

जयंत विद्वांस

1 comment: