Friday 12 July 2013

जीव की प्राण ......




जीव की प्राण....

प्राण सिकंद, कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता धडकी भरवणारा खलनायक. प्रेमनाथ, शक्ती कपूर, कादरखान सारखा त्याचा खलनायक आचरट,  विकृत, ओंगळ  कधीच नव्हता. जो काय हलकटपणा दाखवायचाय त्यासाठी  चेहरा, डोळे, एखादी लकब, छद्मी हसण पुरायचं त्याला. उपकारच्या मलंगचाचा नंतर तो पालटला आणि चरित्रं भूमिकांमध्ये स्थिरावला. गुलशन ग्रोवर आत्ता आला, प्राणने गेटप आणि वेगवेगळे हावभाव खूप आधी आणले. खलनायकी ज्या जोशात करायचा तशाच सहृदय भूनिका पण तेवढ्याच ताकदीने करायचा.
 

काही चित्रपट प्राण करता लक्षात राहिलेत माझ्या, मजबूर मधला घायाळ मायकेल, मधुमती मधला दिलीपकुमार आणि जयंत पुढे तेवढ्याच ठामपणे उभा रहाणारा उग्रनारायण, अमर अकबर अंथोनी मधला किशनलाल, उपकार मधला मलंग चाचा, डॉन मधला दोरीवर चालणारा लंगडा सर्कसपटू, ब्रम्हचारीत तर तो मला शम्मी पेक्षा पण जास्तं आवडला होता. जंजीरचा उल्लेख वेगळा करावा लागेल, अमिताभचं नवखेपण जाणवत त्यात, पण प्राणनी कुठेही कुरघोडी केलेली नाही. त्याचा दिलेर शेरखान केवळ अविस्मरणीय. जॉनी मेरा नाम मधे देव आनंदचा बिछ्डलेला भाऊ होता तो. शेवटच्या मारामारीच्या देव आनंद बरोबरच्या अत्यंत हास्यास्पद प्रसंगात प्राण भाव खावून गेलाय. अशोकुमार बरोबरचे नर्म विनोदी विक्टोरिया नं.२०३, राजा और राणा, जंगल मे मंगल मधला रिटायर्ड कर्नल, परिचय मधला कडक आजोबा, अंधा कानून मधला अंथोनी, लाखो मे एक मधला मेहमूदला सांभाळून घेणारा शेरसिंग, शराबी मधला हताश श्रीमंत बाप, बॉबी मधला पैशाची मस्ती असलेला बाप.

धर्माच्या कव्वालीनंतर त्यालाही गाणी मिळू लागली. मुळात तो एक अत्यंत सहृदयी, सज्जन माणूस पण मिळेल ती भूमिका तो उत्तम वठवायचा, तो गरीब वाटायचा, श्रीमंत पण, क्रूर, मग्रूर वाटायचा तसाच दयाळू पण, खुनशी, घातकी वाटायचा तेवढाच दिलदार पण, हेच त्याचं वैशिष्ठ्य म्हणाव लागेल, समोर दिग्गज असो नाहीतर नवखा, आपलं  काम करताना  कुरघोड्या वगैरे करण्याच्या फंदात पडायची  त्याला जरूरच नव्हती, त्यासाठी त्याचा  सशक्त अभिनय पुरेसा होता. खलनायकी प्रभावी होण्यासाठी वास्तवात पण तसच वागायला हवं  असला उच्च गैरसमज त्याच्याकडे नव्हता. पडद्यावरच्या प्रतिमेची भरपाई केल्यासारखा तो वास्तवात सज्जन होता. दुसरं खणखणीत उदाहरण म्हणजे स्व.अमरिश पुरी.  पडद्यावर आणि वास्तवात दोन्हीकडे त्यानं स्वत:चा आब शेवट पर्यंत राखला हे मात्रं मानायलाच हवं.
      

प्राणनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, कुठल्याही आई बापानी आपल्या मुलाचं नाव कौतुकानी प्राण ठेवल्याचं ऐकिवात नाही इतका त्याचा खलनायक जबरदस्त होता. मुलगा सुनील सिकंदला हिरो करण्यासाठी त्यानी एक पिक्चरही काढला होता पण तो चालला नाही. खलनायकाचा मुलगा ना, बापाची दुष्कीर्ती आड आली असावी. दादासाहेब फाळके पुरस्कार बहुतेक ती व्यक्ती मरायला टेकल्याशिवाय द्यायचा नाही असा कदाचित नियम असावा. त्या मानानी  प्राणला लवकर दिला असच म्हणावं लागेल.

लोकांना सिनेमा पहाताना टायटल मोठ्यांदा वाचायची फार हौस असते, सगळी नावं संपली की AND PRAN असं वाचायची सवय झाली होती, आता ती ही कन्फर्म संपली.


--जयंत विद्वांस 


No comments:

Post a Comment