Tuesday 30 July 2013

मला सुंदर दिसलेल्या ललना (४)…स्मिता पाटील….


स्मिता पाटील….

फक्तं ३१ वर्षाचं तुटपुंजं आयुष्यं घेऊन ती आली होती. १०० वर्ष जगून जेवढं काम करता येणार नाही तेवढं ती या मोजक्या कालावधीत करून गेली.  दूरदर्शन वर बातम्या देताना स्वच्छ, शुद्धं मराठी वाचणारी (भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर, चारुशीला आपटे या सुद्धा) निवेदिका ते अप्रतिम, ठसा उमटवणारी अभिनेत्री असा कायच्या काय पल्ला तिनी अल्पावधीत गाठला. ज्या वयात लोकांना कुठल्या साईडला जावं हे ठरवता येत नाही त्या वयात ती तिच्या पेक्षा जास्त वयाच्या पात्रांना साकारत होती. काय घाई होती काय माहित तिला. 
'सामना' मधे या टोपीखाली दडलंय काय मधे तीची कमळी निसटतं दर्शन देऊन गेली, अगदी गोड पोरगी. ती सगळ्यात जास्तं आवडली ती 'उंबरठा' मधे. तो चित्रपट जमूनच गेला होतं सगळा. अभिनय, गाणी, विषय, दिग्दर्शन सगळच सुंदर, नेटकं. किती कमी बोलते ती संपूर्ण चित्रपटात. आपलं संसारातलं स्थान कळल्यावर ती त्रागा करत नाही. तिची खंबीरता संपूर्ण चित्रपटात तिच्या चेह-यावर, देहबोलीत आणि शांत बोलण्यात दिसते. संपूर्ण चित्रपटात ती तिच्या स्वभावा सारख्या कॉटनच्या कडक साड्या नेसते आणि त्यात ती दिसते पण सुरेख (वहिदाजी, रेखा आणि स्मिता यांना साडीत बघा - साडीत पण छान दिसता येतं हे कळेल मग).     
  

'त्रिदेव' नंतर नसिरुद्दीन शहा म्हणाला होता, आर्ट फिल्मला चिकटून बसलो ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ('जलवा' मधे त्याने केला होता चांगला प्रयत्नं पण लोकांनी हाणून पाडला). मलाही स्मिता पाटील बद्दल तीच खंत वाटते. तिला मिळाले नाहीत की तिनी स्वीकारले नाहीत हा तपशील काही माहित नाही पण ती लोकप्रिय चित्रपटात कमी आली. 'इजाजत' काय तिला झेपला नसता? 'कोंडुरा', 'निशांत', 'मंथन' किती जणांनी पाहिला असेल? 'अर्धसत्य'चं क्रेडीट ओम पुरीला मिळालं. महेश भटनी त्याच्या आणि परवीन बाबीच्या सत्यकथेवर आधारलेला 'अर्थ' मधे तिनी छान काम केलं, तिचं त्यातलं ते व्हायलंट होणं अंगावर येतं. मराठीत तिनी 'जैत रे जैत', 'सर्वसाक्षी' आणि 'उंबरठा' असे इन मीन तीन चित्रपट केले. 'जैत रे जैत' मधे ती कातक-यासारखेच डोंगर चढते,  उतरते आणि दिसतेही.

विनोद, नाच या बाबतीत मात्रं तिची बोंब होती. मराठी 'फटाकडी' वरून काढलेला विनोदी 'चटपटी' फ्लॉप झाला. ती भूमिका तिची नव्हतीच. 'शक्ती' मधल्या 'हमने सनमको' मधे सुरवातीला ती जे काही हातवारे करते त्यात तिचं कृत्रिमपणा जाणवतोच. त्यातल्याच 'जाने कैसे कब कहा' मधे ती पोपटी हिरव्या साडीत बागेत जी चालते ना ते मात्रं एकदम रॉयल होतं. 'नमकहलाल', 'शक्ती' एवढे दोनच चित्रपट तिच्या वाट्याला आले अमिताभ बरोबर. 'आज रपट जाये' मधे पण ती भाव खाऊन गेली आहे. राजेश खन्ना बरोबरच 'आखिर क्यो?' पण मस्तं  होता. 'दुश्मन न करे दोस्तं ने वो काम किया है' मधे ती बेफाट दिसलीये. त्या चित्रपटात टीना मुनीम कडे ती ज्या जळजळीत नजरेने बघते ना ते फक्तं बघत राहावं, शब्दांची गरजच नाही. टीनाची राकेश रोशन जवळ वाढत चाललेली जवळीक लक्षात आल्यावर जो चेहरा तिनी केलाय ना त्यासाठी शब्दं नाहीत.

मार्टिना आणि ख्रिस एव्हर्ट जशा आळीपाळीनी विम्बल्डन जिंकायच्या तसं ती आणि शबाना पुरस्कार घ्यायच्या. मला स्वत:ला स्मिता तिच्यापेक्षा सरस आहे असं वाटत आलय. एकतर तिच्या फिल्म्स कमी आहेत (यात शबानाचा काही दोष नाही म्हणा) आणि शबाना कुठल्याही भूमिकेत शबानाच वाटते मला. 'जैत रे जैत' मधे कातकरीण शोभेल का ती? दोघींच्यात एका बाबतीत मात्रं साम्य आहे. दोघींनीही आधीची मुलं असलेल्या घटस्फोटीत माणसाशी लग्नं केलं. पण जावेद  अख्तर आणि राज बब्बर यांची तुलनाच होऊ शकत नाही. तिच्या लग्नाबद्दल बरीच टीका झाल्याने ती दु:खी झाली होती. तिच्या बहिणीकडे ती म्हणाली होती, लोक माहित नसलेल्या गोष्टींवर का बोलतात? त्याचा घटस्फोट आधीच झालेला आहे, मी त्यासाठी कारण नाहीये. 


खरंय, माणसं माहित असलेल्या गोष्टींवर कमीच बोलतात. पण तिचा तो निर्णय मात्रं अतर्क्य होता. अभिनय आवडला म्हणावं तर तो दुर्गुण त्याच्याकडे  कधीच नव्हता. मुलगाही नेमका वडिलांचा तोच दुर्गुण घेऊन आलाय. स्मिता नाहीये ते बरंच आहे एका अर्थी. शिरीष कणेकरांनी त्यांच्या आई वर लिहिलेलं मी परत परत वाचलंय आणि प्रत्येक वेळेला रडलोय. तसंच जन्मं दिल्यावर दोन आठवड्यात ती मुलाला सोडून गेली. किती घोटाळला असेल हो जीव तिचा.

मधुबाला लवकर गेली ते बरंच झालं, उतारवयातलं तिचं ओसरलेलं सौंदर्य पाहून हळहळ तरी नाही वाटणार असं एक दु:ख्खात सुख मानणारं विधान मी वाचलं होतं (मी सहमत नाही हा भाग वेगळा, ती म्हातारी सुद्धा सुंदरच दिसली असती. अर्थात साधना, वैजयंतीमाला पाहून ते विधानही डळमळीत झालंय, नंदा, वहिदा आणि चिरतरुण हेमा मालिनी मात्रं अजूनही ग्रेसफूल  दिसतात). स्मिताच्या बाबतीत मात्रं असं नाही म्हणता येणार. ती लवकर गेली आणि अभिनयाचे विविध आविष्कार बघायला मात्रं आपण मुकलो, हे आपलं दुर्दैव.

देवाघरची ही माणसं आपल्या आयुष्यातले चार क्षण सोन्याचे करून गेली. त्यांचे उपकार कसे फेडायचे? त्यांच्या गुणांची, कर्तुत्वाची उजळणी करण  फक्त आपल्या हातात आहे, तेवढं  निमुटपणे करत रहायचं. 

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment