Saturday, 26 March 2016

नमूने (२)…


नमूने (२)…

मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे तो हयात नाही आता त्यामुळे नाव सांगणार नाही. ९१ ला एका नोकरीत असताना तो भेटला मला. माझ्यापेक्षा वयानी मोठा पण सगळे करायचे म्हणून मी पण त्याला अरेतुरेच करायचो. पाचेक फुट उंची, काळा म्हटलं तर वाईट दिसतं म्हणून सावळा म्हणतात तसा रंग, उजव्या कपाळावर लाटा काढल्यासारखा तेल लावलेल्या केसाचा भांग आणि अत्यंत मिस्किल चेहरा. तोंड उघडलं की कळायचं तो किती अवली आहे ते, एरवी त्याच्याकडे लक्ष जाईल असं काहीही त्याच्यात नव्हतं. आधी अकाउंट्सला होता तो मग स्टोअरकीपर झाला. अत्यंत प्रामाणिक, हजरजबाबी, कामात चोख आणि तेवढाच कोकणी फटकळपणा असलेला. समोर मालक आहे का ज्युनिअर याचा विधिनिषेध न बाळगता तो मनात असेल ते स्पष्टं बोलू शकायचा. कपट नसलेला माणूस होता तो. 

तेंव्हा हेडक्लार्क म्हणजे अकाउंट्सचा वाघ असायचा. सगळे टरकून असायचे. तिथेही एक हेडक्लार्क होते. एकदम सगळं काम नियमात. मेमो काढायची प्रचंड हौस त्यांना. ऑफिस पहिल्या मजल्यावर होतं. सगळ्यांनी नऊला हजर असायलाच हवं असं त्यांना वाटायचं आणि हा कधीच वेळेत यायचा नाही. अर्थात संध्याकाळी पण तो काट्यावर निघायचा नाही, एकूणच निवांत कारभार पण वरचे सगळे गुण असलेला. हेडक्लार्क सांगून थकले पण याच्यात काही बदल नाही. एकदा ते जिन्याच्या वरच्या टोकाला उभे राहिले, नेहमीप्रमाणे याला उशीर. नियमाप्रमाणे ऑलरेडी तीन लेट झालेले (रोज पाच दहा मिनिट लेट हा लेट नसतोच यावर त्याचा ठाम विश्वास होता). हा जिन्याच्या खालच्या पायरीवर. दोघांनी एकमेकाचा अंदाज घेतला. मेमो काढावा की घरी हाकलावा की सगळ्यांसमोर झोडावा असा हिशोब वरच्या पायरीवर, खालच्या पायरीवर मेंदू कारण शोधण्यात गुंतलेला. तोंड फुटलंच शेवटी. 'किती वाजले? कितीदा सांगायचं वेळेत ये?' खालून जो फ्लिपर आला ना फास्ट तो अनप्लेएबल होता. 'हाफ डे टाकायला आलोय, त्यासाठी वेळेत कशाला यायला हवंय'. हार्डनिंग करताना कसं गरम लोखंडावर एकदम पाणी ओतल्यावर जसा आवाज येतो आणि ते लोखंड एकदम गार पडतं तसा हेडक्लार्क जागेवर विझला. मग रीतसर वीसेक मिनिट झोडकाम करून कामाला लागले दोघंही. 

तो टायपिंग पण करायचा. एकदा नेहमीचा टायपिस्ट नव्हता म्हणून स्वत:चा मेमो त्यानी स्वत:च टाईप केला. त्यांची सही व्हायच्या अगोदर यानी ऑफिस कॉपीवर रिसीव्हडच्या ठिकाणी स्वत:ची सही करूनच मेमो त्यांच्यापुढे सहीला ठेवला. परत एकदा यथेच्छ वीसेक मिनिट झोडकाम. त्याचा निर्लज्जपणा किती पराकोटीचा आहे हे त्यांना ठसवायचं होतं आणि 'मलाच मिळणार आहे तर मी आधी सही केली म्हणून एवढं काय चुकलंय त्यात' असा त्याचा निरागस प्रश्नं. त्याला मिळालेला तो शेवटचा मेमो. शिक्षा ही भीती बसावी, परत चूक करू नये म्हणून असते, हे याला लागूच होत नसल्यामुळे मेमो देण्यात काय अर्थ होता सांगा. अत्यंत सरळ चेहरा ठेऊन तो गुगली वन लायनर भन्नाट टाकायचा. सगळ्यांना समजल्यावर होणारा डिलेड हास्यस्फोट नेहमी जास्ती असतो. तसा तो झाला की त्याचा चेहरा पावती मिळाल्याच्या आनंदात फुलायचा अगदी. 

तेंव्हा पगार तो कितीसा असणार. स्टेपल्ड पाकिटातून रोख मिळायचा पगार. ऑफिसचं एक पाकीट याला जाताजाता पोस्टात टाकायला दिलेलं. यानी पगाराचं पाकीट पोस्टात टाकलं आणि पोस्टायचं घरी घेऊन गेला. घरी गेला, पाकिट रीतसर बायकोच्या ताब्यात दिलं देवापुढे ठेवायला. तिनंही देवापुढे ठेऊन नमस्कार करून मग ते फोडलं तर आतून पत्रं. मग घरी नेहमीप्रमाणे यथेच्छ झोडकाम झालं वेंधळेपणावरून. कुणीतरी याला सांगीतलं सकाळी सातला उघडतात ती पेटी. हा सहा वाजल्यापासून पेटीशेजारी उभा. पोस्टमन आठला आला, पेटी उघडली, सगळी पाकीट तीन तीनदा शोधली याचं पाकीट नव्हतं. संध्याकाळी पण एकदा उघडते म्हणाले पेटी. हा डेक्कन पोस्टऑफिसला पण नाहीच मिळालं त्याचं पाकीट. ऑफिसमधे येउन त्यानी पराक्रम जगजाहीर केला. मला पूर्ण पगार परत द्या आणि पाच महिन्यात कापा हे त्यानी ऑर्डर वजा विनंती या स्वरुपात सांगून पैसे घेतले पण. स्वत:च्या बावळटपणाचा, बायकोनी कसा झोडला, घरातल्यांनी कसा धुतला याचा किस्सा लोक त्याच्या तोंडून वर्षानुवर्षे ऐकत होते असा रंगवून सांगायचा तो स्वत:च. 

सकाळी बॉयलर पेटवायला तो यायचा. तीनेकशे रुपये मिळायचे त्याचे त्याला. सगळं मिळून विसेक मिनिटांचं काम. एकदा अजून का पेटत नाही म्हणून यानी वाकून बघितलं आणि खालून आगीचा लोळ वर आला. भरीताच्या होरपळलेल्या वांग्यासारखा झाला होता चेहरा. पण त्याची विनोदबुद्धी मात्रं अफाट. मालकांना म्हणाला, आत्तापर्यंत या कामाचे जेवढे मिळाले तेवढे तोंडाला औषध लावण्यातच गेले त्यामुळे आता मी ते काम करणार नाही. 'जयंता, डॉक्टरला सांगितलंय, ते क्रीम दिलंय त्यात गोरं व्हायचं काहीतरी मिसळून द्या म्हणजे त्यासाठी वेगळा खर्च नको.' दोनेक महिन्यांनी म्हणाला, 'कात टाकल्यासारखा दिसतोय का रे चेहरा माझा?' आणि हसत सुटला. हा आणि असे अनेक किस्से तो असे काही सांगायचा की नविन माणसाच्या डोळ्यापुढे चित्रं उभं रहावं आणि त्यानी खदखदून हसावं. 

आपण हजार सोडा अगदी शंभर गेले तरी किती तळतळ करतो, ज्याला मिळाले असतील त्याच्या पिढ्यांना तप केलेल्या ऋषीसारखे श्राप देतो पण सतत आनंदी रहाणारा, स्वत:च्या चुकांवर हसणारा, पूर्ण पगार गेल्यावरसुद्धा ज्या कुणी अज्ञात पोस्टमननी तो घेतला असेल त्याच्याबद्दल एकही वाईट शब्द न बोलणारा, 'जाऊ दे रे त्याच्या नशिबात लॉटरी होती ती, मिळाली त्याला' असं काळजाला हात घालणारं निरागस बोलणारा माझा हा दोस्तं वेगळाच होता. माझे कधी असे पैसे गेले की मी त्याच्यासारखा अख्खा पगार तर नाही ना गेला असं म्हणून हसतो आणि समाधान मानतो. आता तो नाही, तसा अकालीच गेला तो. पण मित्रा, काहीतरी साधं पण जगायला महत्वाचं असं शिकवून गेलास एवढं खरं.

जयंत विद्वांस 

 

Friday, 25 March 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१३)… शशी कपूर…

सत्तर एमएम चे आप्तं (१३)… शशी कपूर…

 
थोरामोठ्यांच्या घरात जन्माला येणं हा शाप जास्ती आणि फायदे कमी असा प्रकार आहे. लोक तुमच्या पूर्वजांना तुमच्यामध्ये शोधतात, तुलना करतात, यशापयश लगेच मोजायला सुरवात होते, तुमच्यावर बारीक लक्ष असतं. ब्रॅडमनच्या मुलानी 'तू ब्रॅडमनचा मुलगा का?' या प्रश्नाला कंटाळून काही काळ ब्रॅडसन आडनाव केलं होतं. त्यामुळे स्वत:चं वेगळेपण दाखवून स्थिरस्थावर होणं हे खायचं काम नाही. मुळात मळलेल्या वाटेवरून चालायला सोप्पं असलं तरी रिस्की पण असतं. त्याचे वडील पृथ्वीराज शरीराप्रमाणेच भारदस्त नाव आणि आब राखून होते नाटक आणि चित्रपटसृष्टीत. काका त्रिलोक कपूर देवांच्या (शंकर स्पेशालिस्ट) भूमिकेत फेमस होता. भाऊ रणबीर'राज' आणि शमशेरराज उर्फ शम्मी आपापला किल्ला राखून होते. राजकपूर दिग्दर्शक पण होता आणि तिघात जास्ती देखणा होता. बलबीरराज उर्फ शशी कपूरचं अवघडच होतं.  शम्मीचा धसमुसळेपणा नाही, राजचा (कावेबाज पण) भोळसट चेहरा नाही. या अठरा मार्चला अठ्ठ्याहत्तर पूर्ण झालेला तो आता पृथ्वीराजच्या आकाराचा आणि चेह-याचा झालाय पण आधी तो सगळ्यात स्लिम कपूर होता.  

एकूणच तो सुखी माणूस होता पण. जेफ्री केंडालची शेक्सपिअरिन नाटक कंपनी आणि पृथ्वी थेटर यांची कलकत्त्यात गाठ पडली आणि शशी कपूर वयाच्या अठराव्या वर्षीच जेफ्रीच्या मुलीच्या, जेनिफरच्या, प्रेमात पडला. घराणी झाली की नियम तयार होतात, कायदेकानून असतात. आधी विरोध झाला पण वहिनी गीताबालीच्या पाठींब्यावर तो विसाव्व्या वर्षीच बोहल्यावर चढला. खाण्यापिण्यातली इंग्लिश शिस्त आचरणात आणायला लागल्यामुळे शशी कपूर स्लिम ट्रिम आणि फिट होता. लग्नं झाल्यावर सव्वीस वर्षांनी ती कर्करोगानी गेली आणि शशी कपूर खचला. संपूर्ण इंग्लिश चेहरा घेऊन आलेला करण कपूर मॉडेल झाला मग जुही चावला बरोबर 'लोहा' मध्ये आला आणि तिथेच संपला. तो आता लंडन मध्ये स्थायिक झालाय आणि नामवंत फोटोग्राफर आहे. कुणाल मात्रं भारतीय चेह-याचा होता. त्याचा 'विजेता' वेगळ्या विषयावरचा आणि करमुक्त असूनही फार चालला नाही. तो रमेश सिप्पीचा जावई आहे आणि जाहिरातीच्या फिल्म्स बनवतो. 'हिरो हिरालाल' मधून नसिरुद्दीन बरोबर आलेली थोडीशी किशोरी शहाणे सारखी दिसणारी संजना कपूर आली आणि गेली लगेच. आईकडून आलेला थेटरचा वारसा ती सांभाळतीये. हाच का तो असं वाटावं इतका आता तो फुगलाय. व्हीलचेअरवर बसलेला, हवा भरल्यासारखा दिसणारा, पृथ्वीराज कपूरच्या तोंडावळ्याचा शशी कपूर दिसतो मात्रं अजूनही प्रसन्न.    


त्यानी सगळ्यात जास्ती काम नंदा (८ चित्रपट) राखी, शर्मिला (९ चित्रपट), झीनत, हेमा (१० चित्रपट) आणि अमिताभ (१२ चित्रपट) बरोबर केलंय. त्यातला फक्तं 'ईमान धरम' मी पाहिलेला नाही आणि 'अजूबा' बघायची इच्छा नाही. पण तो यशस्वी होता. सभ्यं, चारचौघांसारखा गोरा गोमटा चेहरा आणि येतंय तेवढं मनापासून करणं एवढ्या मोजक्या गुणांवर तो टिकून राहिला. संवादफेकीसाठी तगडा आवाज नाही, मारामारीला शोभेल असा तगडा देह नाही, उंची फार नाही, बुटकाही नाही, विनोद उत्तम जमतोय असंही नाही, फक्तं नाचासाठी बघायला येतील असंही नाही. पण अमोल पालेकर सारखं काहीतरी सरळमार्गी, आपल्यातला वाटणारं त्याच्यात होतं. ६१ सोलो आणि ५५ मल्टीस्टारर असं संतुलन साधण्याचं कसब त्याच्यात आणि त्याचा पुतण्या ऋषी कपूर मधे होतं. 'आवारा' मधे तो राजकपूरचं बालपण होता, 'प्यार हुआ इकरार हुआ' मधे तो भावंडांना हाताला धरून घेऊन जाणारा होता. बबिता आणि नीतू या सुनांचा तो हिरो होता. संन्यास घेतल्यावर त्याच्या शब्दाखातर नंदा कुणाल कपूरच्या 'आहिस्ता आहिस्ता' मधे आली होती. ती त्याची आणि तो तिचा फेव्हरीट होता. 

'जब जब फुल खिले' मधे 'एक था गुल' म्हणणारा, 'ये समा' म्हणणा-या नंदाकडे चोरून बघणारा, 'शर्मिली'मध्ये 'खिलते है गुल यहां' आणि 'ओ मेरी शर्मिली' म्हणणारा, 'दिवार' मध्ये 'कह दु तुम्हे', 'फकीरा'त 'तोता मैनाकी कहानी', 'चोर मचाये शोर'मध्ये 'ले जायेंगे, ले जायेंगे', 'कन्यादान मध्ये 'लिख्खे जो खत तुझे' म्हणणारा शशी कपूर वेगळा आणि 'कलयुग' '३६ चौरंगी लेन' 'जुनून' 'विजेता' 'काली घटा' 'उत्सव'चा शशीकपूर वेगळा. पैसा, प्रसिद्धी मिळते माणूस त्यात खुशही होतो पण कुठेतरी न्यून जाणवतं. म्हणून पैसे बुडणार हे माहित असूनही आरके 'जागते रहो' काढतो. शशी कपूरनी पण 'कलयुग' 'जुनून' 'विजेता' '३६ चौरंगी लेन'' 'उत्सव' असे वेगळे सिनेमे काढले. 'अजूबा' त्यानी काढला आणि दिग्दर्शित पण केला होता. त्याच्याच 'प्यार किये जा' वरून काढलेल्या 'धुमधडाका'मधून वर आलेल्या महेश कोठारेने मात्रं एकापेक्षा एक रद्दड चित्रपट ईमाने इतबारे काढले अर्थात अजूनही 'जय मल्हार'च्या पैशातून तो वेगळा विषय, चित्रपट काढेल याची सुतराम शक्यता नाही. फार तर अजून एक रद्दड पण यशस्वी, टीआरपी असलेली मालिका मात्रं काढेल. इथे तर तोटा म्हणजे काय तर थोडे पैसे कमी होतील एवढंच तर आहे. पण मुळात ती खाज हवी तोटा सहन करून वेगळं काहीतरी करण्याची, शशीकपूर कडे होती, कोठारेकडे नाहीये.   

लार्जर द्यान लाईफ लिहिलेल्या व्यक्तिरेखेसमोर तो 'दिवार'मध्ये साधेपणाने पण ताकदीने उभा राहिला. चेहरा बोलतो त्याचा, गोळी घातल्यावर त्या मुलाच्या हातात सापडलेले पाव बघून झालेला त्याचा चेहरा बघा. त्याला मिळालेलं केमेव फिल्मफेअर (सहाय्यक अभिनेता). अर्थात फिल्मफेअर मिळालं म्हणजे अभिनय येतो असं नाही. 'मृच्छकटिक'वरून काढलेल्या 'उत्सव'मध्ये त्यानी केलेली भूमिका तोच निर्माता म्हणून केलेली नाहीये. अमिताभ करणार होता पण 'कुली'च्या अपघातामुळे त्याला ती करावी लागली. त्याच्या शब्दावर अमिताभला 'रोटी कपडा और मकान' मिळाला होता. शम्मी सोडून बाकी सगळ्या कपूरांना (पृथ्वीराज, राज आणि शशी) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. शशीकपूरला निदान मरायच्या आधी बरेच वर्ष दिला हे त्याचं भाग्यं. मरणोत्तर किंवा गलितगात्र अवस्थेत असलेल्या माणसाला देण्यात काय आनंद मिळतो, माहित नाही.  

पुरस्कार मिळोत न मिळोत माझ्या लक्षात तो एक सज्जन, सभ्यं, देखणा, पाय जमिनीवर असलेला, मर्यादेत रहाणारा, प्रसन्न चेह-याचा माणूस म्हणून आणि समोर कोण का असेना, संयत आवाजात, गुंडाशी बोलत असलो तरी मोठ्या भावाशी बोलतोय याची जाण ठेवून चीड दाबलेल्या आवाजात 'भाय, तुम साईन करोगे या नही' विचारणारा 'रवि वर्मा', म्हणून राहीलय, एवढं खरं.

जयंत विद्वांस 

Thursday, 24 March 2016

सुखाची कल्पना…

सुखाची कल्पना… 

तसं मला सणांचं कौतुक पहिल्यापासून कमीच आहे त्यामुळे मी हिरीरीनी होळीची तयारी, गुढी उभारणे, संध्याकाळी ती काढणे, दस-याला गाडी धुऊन हार घालणे, दिवाळीत पणत्या लावणे वगैरे कामं करत नाही. अगदीच टोमणे जास्ती झाले तर मी नाईलाजाने करतोही पण शक्यतो ती कामं उरकली जाण्याची वाट बघतो, आळशी माणसाकडे पेशंस असतोच पण कुणाला त्याचं कौतुक नसतं. काम करावसं वाटतंय पण ती उर्मी दाबून पडून रहाणे हा पेशंसचा भाग आहे. पण होळी जरा वेगळाच प्रकार आहे. लहान असताना आग लावण्याची सामाजिक परवानगी यामुळे तो जास्ती आवडायचा. ती टिमकी दिवसरात्र वाजवायची, सारखी होळीत गोलगोल  फिरवून कडक करायची आणि नुसती बडवायची या पलीकडे उद्योग नसायचा. त्यावर तोडगा म्हणून त्या बदल्यात आम्हांला पिक्चर बघायला मिळायचा. वर्षभरात दोघांच्या वाढदिवसाचे दोन आणि होळीचा एक असा बिपीएल कार्डधारक शिधा मिळायचा. एकवर्षी आम्ही 'एक बार मुस्कुरा दो' पाहिलेला. हिंदी अफाट होतं, पाचवी सहावीत असू. भाऊ म्हणाला, सिनेमाच्या नावाचा अर्थ काय?  लाज कुठे काढून घ्या माहित नाही सांगून, म्हटलं 'बार एक आणि मुस्कुरा दोन' (तनुजा एक, देव आणि जॉय मुखर्जी दोन). मोठा झाल्यावर त्यानी माझ्याबरोबर सिनेमे बघायचं सोडलं. 

तर होळी. आई सकाळीच पोळ्या करायची. ते नैवेद्य वगैरे नाटक काही वर्ष होतं. मग 'घरातल्या पोराला दूध नाही आणि पिंडीवर अभिषेक' वाचण्यात आलं आणि प्रथा मोडली गेली. पुरण खाल्लेलं चालतं मग पोळी खाल्ली आधी तर काय होतं याचं समर्पक उत्तर तिच्याकडे नसल्यामुळे झाल्याझाल्या एका ताटलीत घ्यायची, त्यावर तुपाचा गोळा टाकायचा, छोट्या वाटीत दूध, त्याच्या कडेनी पाण्याचा गोल फिरवला की चेपायचं. गावभर वाटून चारपाच दिवस पुरतील एवढ्या करायची पद्धत आईपासून आहे ती आजतागायत. माझ्या नशिबानी बायको गुळाची आणि पुरणाची पोळी आणि एकूणच सगळं अप्रतिम करते. तूरडाळ आणि गूळ रटरट शिजत असताना जो एक आवाज येतो, घरभर वास सुटतो ना त्याला तोड नाही. ते त्या मिक्सर मधून काढायचं काम मात्रं फार चिकट, किचकट आहे. भांड्यात खाली तो पिवळसर, स्पर्शाला समुद्रावरच्या मऊ रेतीसारखा ढिग गोळा होतो तो बघत रहावं. लाटताना फ्लेक्झिबल कणकेत तो पिवळसर गोळा सावल्या पसराव्यात तसा पोळीभर पसरतो ना त्याचं वर्णन कसं करावं? 

सरकारी योजना जशा शेवटपर्यंत पोचत नाहीत त्याप्रमाणे ब-याच जणींच्या पोळीत पुरण कडेपर्यंत येतंच नाही, तिथे त्या वातड लागतात आणि मजा जाते, काहींच्या मी खाक-यासारख्या पातळ पोळ्या पाहिल्यात, तिथे कशाला हवीये करीना फिगर. कणकेत हळद टाकून पिवळ्या झालेल्या पोळ्यांना मी हात पण लावत नाही, लोक पोळी अगोड करून गुळवणीत बुडवून का खातात हे मला कोडं आहे. पोळी कशी नरमसूत, फरीदा जलालच्या गालासारखी गुबगुबीत हवी. कणिक अशी तिंबलेली असावी की तिच्या फिलामेंटसारख्या जाडीतून पुरणाचा पिवळा रंग दिसावा. पिवळसर, तांबूस, चटका जास्ती बसलेल्या ठिकाणी काळपट तांबड्या रंगाचे ब्युटीस्पॉट असावेत. या पोळीच्या पण स्टेजेस असतात. तव्यावरून काढल्या काढल्या गरम पोळी खायला फार आवडत नाही मला , एक तर तूप चटकन विरघळतं आणि चव समजत नाही. केलेला दिवस आणि पुढचे निदान दोन दिवस चव, रंग, अवस्था बदलत जाते, ते टिपण्यात पण मजा आहे. 

पहिल्या दिवशी ती मुमताजसारखी गच्च आणि फुगीर असते. दुस-या दिवशी तीची स्किन जरा लूज पडते, तिस-या दिवशी मात्रं ती मोडकळीला येते. मोहमायेतून सुटावं तसं पुरण वेगळं होतं. पिंजरा मधे संध्या 'अटकर बांधा, गोरा गोरा खांदा' म्हणताना जसा तो गोरा खांदा बाहेर काढते तसं घडी घातली की पुरण बाहेर येतं. अर्थात चवीत कमतरता येत नाही तर वाढ होते. केमिकली चेंजेस होत असतील का तीन दिवस झाल्यामुळे? अज्ञानात सुख असतं हेच खरं. कारण माहित झालं तरी चवीत काय फरक पडणार आहे म्हणा.

तर बाहेर ऊन तापलंय, दुपारचा दिडेक वाजलाय. मस्तं वाडगा घ्यावा. त्यात किमान दोन अडीच पोळ्या घ्याव्यात. वरती दोन घट्ट तुपाचे पिवळे धम्मक स्कूप टाकावेत, साय ओतावी, दूध घालावं, सोबतीला मिरचीचा खार किंवा लोणच्याची फोड असावी. मग मांडी घालून चावण्याचे फार कष्ट नसलेला तो ऐवज तोंडात भरत रहावं. अशावेळी कुणीही काही बोललं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नं केला तरी तोंडातून अनाकलनीय आवाज यावेत इतका तोबरा भरलेला हवा. शेवटचे चारेक घास राहिल्यावर अत्यंत दु:खं व्हावं आणि मग उर्वरित भाग मायेनी खावा, तुपाचा ओशटपणा, सायीचा तुकडा त्यात अडकलेलं पुरण यापेक्षा जगात सुळसुळीत, मऊ काहीही नाही, याची खात्री पटावी. वर थंडगार पौणेक तांब्या पाणी प्यावं आणि वाट काढत ढेकर स्प्रिंगसारखी वर यावी. उगाच एवढं पाणी प्यायलो, अजून अर्धी गेली असती या विचारानी तीव्र की काय ते दु:खं व्हावं. वर बनारस एकसोबीसतीनसो, नवरतन, पक्का सुपारी भुगा दाढेखाली घेऊन पंख्याखाली दहाएक मिनिट बसावं. ग्लानी येऊ लागली की बेडरूमात जाऊन पडदे लावून अंधार करावा, पंखा फुलस्पीडला लावून पात्तळ चादर अंगावर घेऊन झोपावं. उठल्यावर आज वार काय, आत्ता सकाळचे उठलोय की संध्याकाळचे? असा प्रश्नं पडेल अशी झोप लागावी. रात्रं व्हायची वाट बघत आळसात वेळ काढावा आणि दुपारच्या निदान निम्मा तरी ऐवज फस्तं करावा आणि परत सुखनैव झोपावं, निदान माझी तरी सुखाची कल्पना इतकी साधी सोप्पी आहे.

पण वय वाढत गेलं की या अशा रग्गड पुरणपोळ्या चेपण्यात खरी मजा नाही. कुणीतरी आपल्यासाठी बाजूला काढून ठेवलेली, शेवटची अर्धी मुर्धी, गलितगात्र, मोडकळीला आलेली पोळी खाण्यात जास्ती मजा असते. त्याच्या बरोबर खार लागत नाही चवीला, थोडासा खारटपणा प्रत्येक घासाला चवीसाठी मिसळला जातो आपोआप. कुणाच्या तरी आठवणीनी घास अडकावा आणि आपण तो पाण्याच्या घोटाबरोबर खाली सरकवावा यात त्या पोळीचा दोष नसतो. त्या आठवणीतल्या सुखाची कल्पना गोड नसते मात्रं.  


जयंत विद्वांस 



  

Thursday, 10 March 2016

पळावं की न पळावं…

पळावं की न पळावं…

विजय गुल्ल्या भिंतीला टेकून बसला होता. लाईट लावावा अशी सुद्धा इच्छा त्याला होत नाही. बायको सुरेखा, मुलगा सिद्धू आणि दोन्ही मुली त्यानी गावाकडे पाठवल्या होत्या. काय करावं हा मोठ्ठा प्रश्नं त्याच्यापुढे आ वासून होता. अती दारू, मांसाहार यामुळे त्याला मूळव्याधीचा त्रास होताच. चार वर्षामागची गोष्टं, त्याला फिशर्सचा पण त्रास चालू झाला होता. ती रेघ एवढी मोठी होती की डॉक्टर गंमतीने त्याला किंग'फ़िशर्स' म्हणायचे. गरीबाची काय हो, सगळेच टर उडवतात. ज्याचं दु:खं त्याला माहित. मूळव्याधीच्या ऑपरेशनकरता त्याला पैसे हवे होते. कुणी मदत करेना. एक तर शब्दश: अवघड जागचं दुखणं त्यात आर्थिक अडचण. मग त्याचा एक मित्रं होता इस्टेट बँक ऑफ इंडियात. तो ऐनवेळी पुढे आला.

आजारपणाच्या खर्चासाठी लोन देण्याची आपल्याकडे पद्धत नाही एक तर, काय करावं गरीब माणसांनी मग. इथे खोटेपणा चालू होतो बघा. नुसत्या आजारपणाच्या ख-या कारणासाठी लोन मिळणार नाही म्हणाला म्यानेजर. बरं या बिचा-याकडे गहाण ठेवायला काही नाही, आता आली का पंचाईत. तळपायाची आणि पार्श्वभागाची अशा दोन आगी विज्जूला अस्वस्थ करत होत्या. मग त्यानी म्यानेजरला घरी बोलावलं. त्याला पार्टी दिली. दारू पिता पिता म्यानेजर, विज्या आणि त्याचा राजकारणातला मित्रं यांच्या गप्पा लोनच्या मुद्द्यावर आल्या. म्यानेजर म्हणाला 'शेतजमीन आहे का? 'आहे, थोडी?' 'राहतं घर मालकीचं आहे का?' होय' माझंच आहे'. विज्याचा मित्रं म्हणाला 'अरे मग दे की लेका ते तारण म्हणून आणि घे पैसे'. म्यानेजर दारू सांडेपर्यंत हसला. 'अरे ते दिवस गेले आता, तुझ्याकडे असं काही आहे का की जे जप्तं झालं तरी तुला फरक पडणार नाही, अशा गोष्टी दे तारण म्हणून'.


शेवटी माळ्यावर सिद्धूसाठी तो लहान असताना आणलेली दोन बोईंग विमानं, पंचवीस वर्षापासून साठवलेला चावट क्यालेंडर्सचा गठ्ठा आणि साधारण दोन ट्रक भरतील एवढ्या मागच्या अंगणात पडलेल्या बिअरच्या बाटल्या यावर कर्ज द्यायचं ठरलं. साधारण लाखभर रुपये मिळाले त्याला नको असताना. विजू नको म्हणत होता एवढे खरंतर, ऑपरेशनला दहा पंधरा खूप होणार होते. पण नेत्यानी वीस घेतले, म्यानेजरनी वीस घेतले. 'व्याज भर काही वर्ष फक्तं, मुद्दल कशाला फेडतोयेस, आम्ही बघू एंडला' असा भक्कम निर्वाळा दोघांनी त्याला दिला. आता दोघांनी हात वर केले होते. म्यानेजर रिटायर्ड झाला होता आणि नेता मोठा मंत्री. कागदावर विजूची सगळी इस्टेट गहाण. चार महिने झाले बँकेची पत्रं येतायेत, अजून नऊ हजार भरायचे बाकी होते. दोघांना गेलेल्या चाळीसचा हिशोब त्यानी बोंबलून सांगितला पण कागदोपत्री पुरावा काहीही नव्हता त्यामुळे विजू अगदी हतबल झाला होता. 

शेवटी त्यानी म्यानेजरला फोन लावला. त्यानी त्याला आयडिया दिली. 'हे बघ, आमची हद्द कोल्हापूरपर्यंत आहे. तू पळून क-हाडला जा. तिथे तुझी इस्टेट आहे त्याला आम्ही हात लावू शकत नाही. एवढं काय मनावर घेतोयेस. चार दिवस पेपरात येईल मग लोक विसरतील सगळं आपोआप. काही दिवसांनी तू सुद्धा विसरशील की तुझ्यावर कर्ज होतं. मी बोललोय मंत्र्याशी, त्यानी काय तुझ्या एकट्याच्या लोन मधला वाटा घेतलेला नाहीये, त्यामुळे काळजी करू नकोस. संसदेत सरकार मदत जाहीर करेल इस्टेट बँक ऑफ इंडियाला पुढच्या आठवड्यात. त्यात तुझं कर्ज राईट ऑफ होऊन जाईल. नोटीस परवा निघेल, तू उद्याच्या पहिल्या एसटीनी निघ क-हाडला. माणूसच नाही जागेवर तर नोटीस कुणाला देईल कोर्टाचा माणूस, फार फार तर दारावर चिकटवेल, रात्रीत दार गायब करतो बघ. न रहेगा दरवाजा, न रहेगी नोटीस'. 

विजूनी उठून लाईट लावला. किडूक मिडूक पिशवीत भरलं. भरल्या डोळ्यांनी त्यानी ती दोन विमानं, रिकाम्या बाटल्यांचा खच आणि क्यालेंडर्सचे गठ्ठे याकडे बघून घेतलं. एक अस्फुट हुंदका फुटला, क्षणभर त्याला पाय जडावल्यासारखं वाटलं. पिशवी काखेत मारून तो पहाटेच्या अंधारात निघाला. बुलककार्ट रेसिंग मधे तो उतरवायचा ती गाडी दाराशीच होती. तिच्यावरून त्यानी मायेने शेवटचा हात फिरवला. आता मात्रं त्याचा बांध फुटला. पळावं की न पळावं हा एकंच प्रश्नं कालपासून त्याला सतावत होता. पण आयुष्याची अखेर उगाच कशाला कायद्याच्या कचाट्यात काढायची हा विचार प्रबळ झाला. सगळ्या खिशातून चाचपून त्यानी तिकीटापुरती रक्कम आहे की नाही याची खात्री करून घेतली आणि पहाटेच्या अंधारात तो स्टयांडकडे निघाला.  
     
जयंत विद्वांस

'विजयची काशी' : दिग्दर्शक परेश मोकाशी...

'विजयची काशी' : दिग्दर्शक परेश मोकाशी... 

एलिझाबेथ एकादशी वर १६ ११ १४ ला लिहिताना मी लिहिलं होतं....

<<यात पंढरपुरच्या गल्ल्या आहेत, टेरेसवर रहाणारं, कर्जाच्या दलदलीत बुडालेलं कुटुंब आहे, परिस्थितीमुळे चेह-यावरचं हसणं पुसलं न गेलेली  मुलं, नव-याच्या मागे संसारगाडा ओढताना त्यांची कातावलेली आई आणि हताश आजी आहे,  मुलांना मदत करणारी त्यांची मित्रमंडळी आहेत. मुंगीला मुताचा पूर अशी एक म्हण आहे त्याचा खरा अर्थ आज जास्ती कळला. निटिंग मशिनचं पाच हजार रुपयांचं कर्ज फेडायचंय इतकी क्षुल्लक बाब आहे. भांडी विकून आलेले पाचशे, कामाचे येऊ घातलेले पाचशे, स्कालरशिपचे पाचशे आणि घरातले असे मिळून तीनची सोय आहे. एलिझाबेथ विकून दोन असं पाचचं गणित बसतंय.

आईला मदत म्हणून पोरं उद्योग करतात कारण एलिझाबेथ विकायची नाहीये, ती त्याच्या वडिलांनी घरी बनवलीये. सगळी स्वप्नं कुठे खरी  होतात म्हणा. देवाच्या गावात पोरांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. बघताना जीव गलबलतो.  खूप राग आला, दु:खं झालं की माणूस शांत बसतो.  त्रागा करण्याची त्याची शारीरिक, मानसिक ताकद संपते. आहेत ते तीन हजार पण गेल्यामुळे कोप-यात बसलेली आई, फुरंगटून झोपलेली पोरं ओरखडा काढतात. जगात चांगुलपणा दिसत नसला तरी तो शिल्लक असावा अशी शंका यायला अजूनही वाव आहे असं सांगणारा शेवट मोकाशी करतात. तसं गेलं तर ही छोट्या मुलांची दुनियादारी आहे. हिशोबी मदत करत नाहीत लहान मुलं.

पोरांची ग्यांग, आई, मित्राची गणिका आई सगळी पात्रं सरस, त्यांची निवड सरस. मुलांचे ढगळ कपडे, रंग उडालेलं घर, मानेची हाडं दिसणारी, साध्या साड्यातली तेलकट चेह-याची कातावलेली नंदिता धुरी पटते. खूप दिवसात निर्मळ निरागस हसला नसाल, छातीत डाव्या बाजूला हलल्यासारखं वाटलं नसेल, डोळ्यात काहीही गेलेलं नसताना डोळे पुसावेसे वाटत असतील, कंठमणी गहिवरानी हलला नसेल तर एलिझाबेथ बघाच एकदा.>>

परेश मोकाशी नवीन सिनेमा काढावा लागेल तुला आता. काय ते दळीद्री विचार तुझे. पाच हजार कर्ज? फक्तं? त्यावर सिनेमा? आग लागो तुझ्या कल्पना शक्तीला. तसाही सध्या चरित्रपटाचा ट्रेंड आहे. उगाच ते इंग्लिश नाव नको आणि, 'विजयची काशी' असं नाव सुचतंय.

परीक्षण लिहून तयार आहे, तू चित्रपट रिलीज करायच्या आधी व्हायरल करतो बघ, बक्कळ कमावशील, त्यालाच घे मेन रोलात म्हणजे गरिबाला मदत पण होईल.

१४ ११ १६

यात पॅरिसच्या गल्ल्या आहेत, टेरेसवर दारू प्यायला बसणारं, कर्जाच्या दलदलीत बुडालेलं कुटुंब आहे, परिस्थितीमुळे चेह-यावरचं हसणं पुसलं न गेलेली मुलं, नोटीशींना उत्तरं देताना त्यांचा कातावलेला वकील आणि हताश सी.ए.आहे, विज्जूला मदत करणारी त्याची मित्र नेतेमंडळी आहेत. मुंगीला मुताचा पूर अशी एक म्हण आहे त्याचा खरा अर्थ आज जास्ती कळला. एवढ्या मोठया व्यापाचं सात हजार कोटी रुपयांचं कर्ज फेडायचंय इतकी क्षुल्लक बाब आहे. शेअर विकून आलेले पाचशे, येऊ घातलेले पंधराशे, विमानं विकून येतील ते दोन हजार पाचशे, बिअर आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या विकून येतील ते बाराशे आणि घरातले दागिने, शेअर्स, अनेक घरं, मालकीच्या टीमा, कॅलेंडरचे गठ्ठे विकून येतील ते असे मिळून सहाची सोय आहे.

विजूला मदत म्हणून पोरं उद्योग करतात कारण किंगफिशर विकायची नाहीये, ती त्याच्या वडिलांनी घरी बनवलीये. सगळी स्वप्नं कुठे खरी होतात म्हणा. लाचखोरीच्या गावात विजूच्या स्वप्नांचा चुराडा होतो. बघताना जीव गलबलतो.  खूप राग आला, दु:खं झालं की माणूस शांत बसतो. त्रागा करण्याची त्याची शारीरिक, मानसिक ताकद संपते. आहेत ते सहा हजार कोटी पण द्यावे लागतात की काय या भीतीने कोप-यात बसलेला विजू, फुरंगटून झोपलेली पोरं ओरखडा काढतात. जगात चांगुलपणा दिसत नसला तरी तो शिल्लक असावा अशी शंका यायला अजूनही वाव आहे असं सांगणारा शेवट मोकाशी करतात. सगळ्या इस्टेटीवर पाणी सोडून स्वतःच्याच मालकीच्या विमानात बसून पळून जाणारा विजू बघून गलबलायला होतं.

वकिलांची ग्यांग, कॅलेंडरच्या मॉडेल्स सगळी पात्रं सरस, त्यांची निवड सरस. मॉडेल्स मदत म्हणून त्यांचे कपडे काढून लिलाव करतात पण मुळातच अपुरे कपडे असल्यामुळे नगण्य रक्कम येते तेंव्हा डोळ्यात पाणी येतं. मानेची हाडं दिसणारी, बिन कपड्यातली मॉडेल्स बघताना लोक थेटरात डोळे पटापट पुसून आ वासून बघतात, ते केवळ अविस्मरणीय दृश्यं.

खूप दिवसात पॅरिसच्या गल्ल्या, रेसिंग कार्स, आयपीएलच्या टीमचा लिलाव पाहिला नसेल, कंडा मॉडेल्स बघून छातीत डाव्या बाजूला हलल्यासारखं वाटलं नसेल, डोळ्यात काहीही गेलेलं नसताना डोळे पुसावेसे वाटत असतील आणि पडद्यावरची पुष्ट ललना बघून कंठमणी हलला नसेल तर 'विजयची काशी' बघाच एकदा.

जयंत विद्वांस




Wednesday, 9 March 2016

नमूने (१)…

नमूने (१)… 

प्रत्येक माणसात एक विक्षिप्तं माणूस दडलेला असतो असं माझं मत आहे. प्रत्येकजण तो विक्षिप्तपणा चारचौघात दाखवतोच असं नाही. काहीजण लोकांना काय वाटेल वगैरे विचार करून ती उर्मी दाबतात, काहीजण सहनेबल झालं नाही की तसं वागतात, काहीजण रेग्युलर तसं वागतात. माणसाला अंदाज आला की आपला त-हेवाईकपणा खपतोय की मग अशांना अजून चेव येतो. पण जे न ठरवता तसं वागतात ते लोक मला प्रिय असतात किंवा समानधर्मी असतील म्हणून आवडत असतील पण हे लोक मजा आणतात. 

मी रस्टनला असताना दोनेकशे पोरं होती अप्रेंटीस म्हणून. त्यात पण ज्युनिअर, सिनिअर प्रकार होताच. ते प्रकरण संपून सुद्धा २९ वर्ष झाली. क्वचित कुणाची भेट होते. सगळी नावं काही आता लक्षात नाहीत पण काही अर्क डोक्यात नावानिशी लक्षात आहेत. आम्हांला सिनिअर एक नरेंद्र आगाशे म्हणून वल्ली होता. पराकोटीचं घाणेरडं, अचकट विचकट बोलण्यात त्याचं तोंड कुणीही धरू शकणार नाही, असा होता. सणसणीत सहा फूट उंची, गोरापान, सुदृढ, हसरा तोंडावळा, हुशार पण येड्याचा आव आणणारा. जेवण, बोलणं, वागणं एकूणच आचरट प्रकार. त्याच्या अचाट कल्पना मी इथे देऊ शकत नाही इतकं बीभत्स, अश्लील सुचायचं त्याला. उदा : समजा तोंड नाकाच्या खाली ऐवजी बेंबीच्या खाली असतं तर काय झालं असतं? असल्या विषयांवर चर्चा. मग अगदी सरस्वती जिभेवर नाचायची त्याच्या. त्यात माझी सोबत म्हणजे दोन आचरट प्रवक्ते एकत्रं आल्यावर उडतो तसा धुरळा चालू असायचा. पण कुणी काही बौद्धिक, सिरिअस बोलत असलं तर मात्रं न-याचा वेगळा चेहरा दिसायचा.

अभ्यासात तो हुशार होता पण दाखवायचा नाही तसं. युनिव्हर्सिटीच्या मागे आम्ही क्रिकेटायला जायचो सायकल हाणत, तिथे यायचा तो आमच्याबरोबर खेळायला. अत्यंत हजरजबाबी, मदतीला तत्पर, फटकळपणाचा, आचरटपणाचा मुखवटा लावलेला न-या. इतक्या वर्षात कधीही साधा रस्त्यात सुद्धा दिसलेला नाही. आता अवचित कुठे बायकापोरांबरोबर भेटला तर उपयोग नाही, रस्त्यात त्यांच्या समोर सभ्यंपणा दाखवायला त्याची होणारी कुचंबणा मला बघवणार नाही. 


अजून एक सिनिअर होता औरंगाबाद की मराठवाड्याकडचा, मुळे त्याचं आडनाव. एरवी अतिशय विनोदी बोलणार, चेष्टा मस्करी करणार पण त्याचं काही बिनसलेलं असलं की समोर उभा रहाणार 'आजपासून दोस्ती खतम आपली' एवढं बोलून निघून जाणार. त्याला का? वगैरे विचारायचं नाही. त्याचा मूड जागेवर आला की तो बोलायचा. परवा आपण काय बोललो हे त्याच्या लक्षात पण नसायचं. आठवण करून दिली तरी 'ते मरू दे रे, बोलू का नको बोलू सांग आत्ता' असा चिडायचा.

मी, मिलिंद घाणेकर आणि ड्यानिअल असे जेवायला बसायचो काही महिने एकत्रं. दोघेही मला सिनिअर. ड्यानिअलएवढा थंड रक्ताचा प्राणी मी आजतागायत बघितलेला नाही. भरताचं करपलेलं वांगंसुद्धा उजळ दिसेल इतका तो काळा जांभळा होता. पण काळ्या रंगाला एक मस्तं तुकतुकी असते तसा होता तो आणी चेहरा कायम हसतमुख. मी आणि घाणेकर दोघांना एकावेळी त्यानी हाणला असता आरामात पण त्याला मी कधीही चिडलेला पाहिला नाही. प्रत्येकजण त्याला त्याच्या रंगावरून चिडवायचा, टोमणे मारायचा पण हा हसरा बर्फ. नंतर नंतर सगळं आपोआप कमी झालं कारण तो चिडायचाच नाही. पब्लिक ज्या हेतूनी त्याला बोलायचं तो ते साध्यंच होऊ द्यायचा नाही. त्याला ती बुद्धी सतराअठराव्या वर्षीच होती, जी आमच्याकडे नव्हती. अर्थात हा सगळा प्रकार त्याच्या लहानपणापासूनच असणार पण तरीही राग येउन द्यायचा नाही, हे अवघड होतं. 


माणसं आयुष्यात येतात, भेटतात, सोबत रहातात, काही दुरावतात, नाहीशी होतात, खोडरबरनी खोडावीत अशी पुसली जातात स्मृतीतून, काही उगाच लक्षात रहातात, काही कारणांनी लक्षात रहातात. त्या 'अनुरोध' मधल्या गाण्यात आनंद बक्षीनी हे सगळं सुंदर लिहिलंय 'आते जाते खूबसूरत आवारा सड़कों पे, कभी कभी इत्तेफ़ाक से, कितने अनजान लोग मिल जाते हैं, उन में से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं! माझ्या पोतडीत असे असंख्य नमुने आहेत. सगळेच चांगले नव्हते तसंच सगळे वाईटही नव्हते. त्यांना चांगलं वाईट आपण आपल्या मतलबानुसार, सोयीनुसार ठरवतो नाहीतरी. कुठेतरी कुणीतरी स्वत:चा उल्लेख इथे वाचेल, कदाचित मी अंधुकसा आठवेनही त्यांना, माहित नाही, मुळात लिहिण्याचा हेतू तो नाही. सरलेल्या काळातले आता जे आपण करत नाही ते उद्योग, गप्पा, प्रसंग आठवतात, मग ती माणसं आठवतात, एवढंच.

जयंत विद्वांस 



सहृदयी लोकांस आवाहन....

सहृदयी लोकांस आवाहन....

थोर सद्गृहस्थ श्री.विजय मल्ल्या सध्या खूप अडचणीत आहेत. त्यांच्याविरुद्ध पासपोर्ट जप्ती, बँकेतून पैसे काढण्यास अटकाव, अटक करणे वगैरे अत्यंत निर्दयी उपाय करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे अशी अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बातमी वाचली.

या सद्गृहस्थाने पैशेवाल्या लोकांसाठी हवेत उडण्याची सोय केली आणि जोडीने कमी खर्चात गरीबांसाठीही हवेत तरंगण्याची व्यवस्था केली याची सरकारला जाण नसली तरी सामान्य माणसाला हवी. इतकी वर्ष व्याज भरूनसुद्धा क्षुल्लक मुद्दलासाठी बँकेने सरकार, न्यायालयाकरवी मागे लागणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे.

अशा उपायांनी अनेक भावी उद्योगपती उद्योगवाढीसाठी कर्ज घेण्यास कचरतील. कर्ज काय कुणी बुडवण्यासाठी घेतो का? धंदा बुडू शकतो. त्यामुळे परतफेड शक्य नसते, इतका साधा विचार सरकार का करत नाहीये याचा अचंबा वाटल्याशिवाय रहात नाही. ज्या मालमत्तेच्या तारणावर कर्ज दिले ती मालमत्ता बँकेने ताब्यात घ्यावी. किंगफिशर या नावाच्या गुडविलवर काही शे कोटी दिले यात विजयभाऊंची काय चूक? हवं तर खुशाल बँकेने ते नाव जप्त करावं पण त्यांच्या उतारवयात त्यांना या मानहानीकारक यातना देऊ नयेत.

सहाराचा सुब्रतो एकटा पडलाय आत हे कारण सयुक्तिक वाटत नाही यासाठी. संजूला शिक्षा झाली म्हणून सल्लूला का नाही असं विचारण्यासारखं आहे हे. आधीच शेतकरी आत्महत्या करत आहेत आता उद्योगपतींना करायला लावू नका अशी सरकारला विनंती आहे. 

दिवस काय कुणाचे रहात नाहीत. आपण सर्व सामान्य माणसांनी विजयकाकांच्या उत्पादनाची जोरदार खरेदी करूयात, जेणेकरून त्यांची कंपनी नफ्यात जाईल आणि त्यांना कर्जफेड शक्यं होईल. बँकेत स्पेशल काउंटर उघडून तिथे किंगफिशर आणि त्यांची इतर उत्पादनं कर्जफेड सेस लावून विक्रीसाठी ठेवण्यात यावीत. हाहा म्हणता कर्ज संपेल. मग परत एकदा The Thief will be King of good times.

जयंत विद्वांस 



Tuesday, 23 February 2016

लल्याची पत्रं (२७)…. 'अनहोनी को होनी…'

लल्याची पत्रं (२७)…. 'अनहोनी को होनी…'

लल्यास,

भारतीय चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा घटक, सेन, रॉय, अदूर, बेनेगल, निहलानी, के.असिफ, गुरुदत्त, खोसला, आरके, घई, मणीरत्नम ही आणि अशी इतर अनेक नावं लोकांना चटचट आठवतील पण मनमोहन देसाईचं नाव थोडं मागेच राहील. असंभवनीय योगायोग असलेली कथानकं, अनंत हास्यास्पद गोष्टी पण श्रवणीय गाणी, अमिताभ, रंजक असे अनेक विरोधाभास एकाच ठिकाणी असलेले चित्रपट त्यानी काढले. 'देशप्रेमी', 'मर्द'पासून सुरु झालेला -हास 'गंगा जमना सरस्वती', 'तुफान' (केतन देसाई) मधे पूर्णत्वाला गेला. पण त्याची गाणी श्रवणीय असायची. छलिया, ब्लफ़मास्टर, किस्मत, सच्चा झूठा, रामपूर का लक्ष्मण, आ गले लग जा, रोटी. धरमवीर असे अमिताभ नसलेले त्याचे हिट सिनिमेही आहेत. ७७ सालात परवरीश, धरमवीर, चाचा भतीजा आणि अमर अकबर असे चार चित्रपट त्यानी दिले, तिथून ८९ पर्यंत तो आणि अमिताभ अशीच जोडी राहिली. 

अमर अकबर….  मी आयुष्यात पाहिलेला पहिला लास्ट शो. तिसरीत असेन. फार भारी वाटलेलं तेंव्हा, आईवडिलांशिवाय रात्री साडेबाराला घरी यायचं म्हटल्यावर. त्या पिक्चरचा ठसा जो उमटला तो आजतागायत आहे. त्या वयात सिनेमा बघताना जो भाबडेपणा होता तो आता नाही. व्हिलनला मारलं की टाळ्या वाजायच्या थेटरात, आता हसतील. मुळात आता व्हिलन सेपरेट हवाच असं नाही, हिरोसुद्धा व्हिलन असतो आता. तर मूळ मुद्दा गाणं. आनंद बक्षी यमक जुळवणे (स्टेशनसे गाडी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है) , बोलगाणी लिहिणे (अच्छा तो हम चलते है), चित्रपटातला प्रसंग गाण्यातून लिहिणे (एक हसीना थी - कर्ज) यात मास्टर होता. त्याची आणि एलपीची जोडी होती. अनेक तात्कालिक हिट, कायमस्वरूपी हिट, गुणगुणायला सोप्पी अशी गाणी त्यांनी सतत दिली. अमर अकबरची सगळी गाणी हिट होती. पण टायटल सॉंग मला जाम आवडत आलं आहे त्याचं. 

म्हटलं ना, एमडी म्हणजे निष्पाप विरोधाभास, इकडे ओळख पटू नये म्हणून तिघं वेषांतर करून आलेत आणि स्वत:ची नावं बोंबलून सांगतायेत. ते गाणं सुरु व्हायच्या आधी जीवन 'रॉबर्ट' फोन करत असतो तेंव्हा त्याला ऋषीकपूर जे पिडतो ना त्याला तोड नाही. आर्या आणि मी अजूनही लोटपोट हसतो त्या शॉटला. माणूस चिडावा आणि त्यानी दोन वाजवाव्यात इतका त्यात छळवाद आहे. आधीच 'किशनलाल' प्राणचा धोका आहे, स्मगलर असला तरी मुलगी अशी चीज आहे की माणूस हळवा होतो. तिचं धर्माप्रमाणे रीतसर लग्नं लावावं ही बापाची इच्छा आहे. फोन झाल्या झाल्या पाद्री आणि मेनी इन वन वाद्यवृंद हजर आहे. गाण्याची ओळख करून देण्यासाठी आधी जीवन आणि 'झेबिस्को' युसुफखान अडचणींचा पाढा वाचतात. मग हिरो लोक आश्वासित करतात, इट्स पॉसिबल. मग तो म्हणतो,' ये तो अनहोनी है'. मग अकॉर्डीयन सुरु होतो. हे एक वाद्यं मला जाम आवडतं ('आजा सनम' मधे ती एक जी घसरगुंडी वाजवलीये ना, ती वाजवायला बोटाला क्राम्प येत असणार. 'गुलाबी आंखे जो तेरी देखी' (आनंद बक्षी - असे डोळे सापडल्यास कळव) मधे 'दिल में मेरे' च्या नंतर, 'ख़्वाब तेरे'च्या नंतर आणि 'तस्वीरें जैसे हों दीवार पे' यानंतर वाजलेलं अकॉर्डीयन ऐकंच, जसच्या तसं परत ऐकायचं असेल तर 'दिलवाले दुल्हनिया' मधलं गाणं ऐक). अतिशय सुरेल आणि वाजवायला तेवढंच अवघड वाद्यं.

यमक असलं की गाणं ऐकायला एक वेगळीच मजा येते बघ. यावेळेस होनी, रोनी आणि सलोनी, बरात, रात, मेहमानोको आणि दिवानोंको इतका सोप्पा प्रकार होता. माझ्या अल्पंज्ञानाप्रमाणे हे गाणं भैरवीत असावं म्हणून चाल एवढी गोड असेल. नसलं समजा तरी माझ्या आवडण्यात काही अडचण नाहीये म्हणा. दोन्ही कडव्यांची पहिली ओळ सेम आहे, हा एकमेव प्रकार असावा. 'कैसे बात मतलब की समझाऊ दीवानो को' यावेळी किशोरनी आणि बच्चननी धमाल केली आहे. अमिताभचं ते दाढी काढून चिकटवणं, परवीनचा ओळख पटल्यावर झालेला चेहरा, शबाना, नितुसिंघचे फुललेले चेहरेआणि बाहेर येताना एकदम फॅमिली पिक्चर, तीन जोडपी आणि सपन सलोने ले के आई है ये रात सलोनी. त्या वयात खूप आनंद झाला होता दुष्टं लोकांपासून यांची आता सुटका होणार म्हणून. नंतरच्या मारामारीला पण हीच ट्यून वाजते. अमर अकबर कधीही बघण्याचं हे गाणं हे ही एक कारण पुरतं मला.

'अनहोनी को होनी, कर दे होनी को अनहोनी' या ओळीचा 'होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं' हा अर्थ आपल्याला आयुष्यात वारंवार अनुभवायला मिळतो. कुठेच आशेचा किरण नसताना कुणीतरी मागे उभं रहावं, यातून बाहेर काढावं असं प्रत्येकाला वाटतं. खड्ड्यात पडल्यावर हात देऊन बाहेर काढणारा असा कुणी मिळणं हा नशिबाचा भाग, नाहीतर मग ज्याला पाहीलं नाही अशा देवानी ते काम पार पाडावं अशी आशा आपण धरतो. अशक्यं, अकल्पित ते घडणं आणि हातात आलेलं, खात्री असलेलं निसटून जाणं, इसीका नाम तो जिंदगी है. चल पुढच्या गाण्यापर्यंत अनहोनी काही होणार नाही अशी आशा करूयात. :)         


जयंत विद्वांस     

अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी..
एक जगह जब जमा हो तीनो अमर अकबर अन्थोनी
अनहोनी को होनी ...

एक एक से भले दो, दो से भले तीन
दूल्हा दुल्हन साथ नही बाजा है बरात नही
अरे कुछ डरने की बात नही
ये मिलन की रैना है कोई गम की रात नही
यारो हसो बना रखी है क्यो ये सूरत रोनी..
एक जगह जब जमा ...

एक एक से भले दो, दो से भले तीन
शम्मा के परवानो को इस घर के मेहमानो को..
पहचानो अनजानो को
कैसे बात मतलब की समझाऊ दीवानो को
सपन सलोने ले के आई है ये रात सलोनी..
एक जगह जब जमा ...


(१९७७ - अमर अकबर अंथोनी, आनंद बक्षी, एलपी, किशोर, महेंद्र कपूर, शैलेंद्रसिंह)

Wednesday, 17 February 2016

काय ले...

काय ले...

काही काही माणसांचा सेन्स ऑफ ह्यूमर अफाट असतो. असं काहीतरी पटकन बोलतात की हसू येतंच आपोआप. हजरजबाबीपणा स्वभावात उपजत असतो, फार फार तर चौफेर वाचन, निरीक्षणशक्ती, सामान्यज्ञान याच्या जोरावर तो पॉलिश्ड होऊ शकतो. पुण्यात जन्मखूण असावी ना तसा कुचकेपणा, उपरोध, उपहास, हजरजबाबीपणा यातला एखादा 'गुण' जन्माला घालताना देव शरीरात टोचूनच पाठवत असावा. प्रत्येक बाबतीत मत यासाठी वेगळी सुई असावी अर्थात, पुण्यात पाठवायचा असेल तर देवाला पोलिओसारखी ती प्रत्येकाला टोचावीच लागते.  

प्रत्येक शहराची काही घाऊक स्थित्यंतरं असतात. शहर पुणे, कधी काळी टांग्याचं मग सायकलींच, मग टू व्हिलर्सचं असं बदलत गेलं. मुंबईची ट्राम, लोकलची गर्दी, समुद्र हे पुण्याच्या भाग्यात नाही. इथे रहदारीचे नियम पाळले तर अपघात होईल अशी परिस्थिती आहे. इंडिकेटर एक तर दाखवण्यासाठी नसतोच मुळी, बरं समजा चुकून दाखवला तर त्या बाजूला वळायलाच पाहिजे अशी बोत आमच्यात नसते. स्मार्ट सिटीचं खूळ आलंय खरं पण जी कुठली संस्था ती राबवेल ना त्यांचे कन्सेप्ट बदलून जातील असं पब्लिक आहे इथे. असो!

तर कोणे एके काळी पुण्यात सायकली इतर कुठल्याही वाहनांपेक्षा जास्ती होत्या तेंव्हाची गोष्टं. तेंव्हा उदय रानडे नामक अनेक पैकी एक महान व्यक्तिमत्व भांडारकर रोडला राहायचं आणि आबासाहेब गरवारे कॉलेजात जायचं. एक्स्प्रेसवे, फ्री वे प्रकार पुण्यात पहिल्यापासून आहेत. कुठल्याही रस्त्यावरून (त्यात नो एंट्री पण आली) 'फ्री'ली जायचं, 'एक्स्प्रेस'वेगानी जायचं असा त्याचा अर्थ आहे. भांडारकर रोड ते गरवारे कॉलेज, चालत जाऊ शकेल एवढं अंतर आहे प्रभात रोडच्या गल्ल्यातून अगदी रमतगमत गेलं तर. पुण्यात तेंव्हा सायकल आता टू व्हीलरचा उल्लेख करताना गाडी लावून येतो, तुझी गाडी कुठे आहे असा फोर व्हिलर सारखा करण्याची प्रथा आहे. तर उदय सायकल घेऊन जायचा कॉलेजला. एका पायावर गिरकी घेऊन टर्न मारणे, कॅरिअरवर बसून चालविणे, एकावेळी चार जण बसवणे, हात सोडून चालवणे, थांबल्यावर पायानीच स्ट्याण्डवर लावून उतरणे, तिरकी करून सीटवर डायरेक्ट बसणे वगैरे प्रथमा, द्वितीया त्यानी कधीच उत्तीर्ण केल्या होत्या. 

दीड दोनची वेळ असेल दुपारची. बाळासाहेब कॉलेजातून दमून निघाले. तेंव्हा दुपारीही आत्ता पहाटे असते तेवढीच वाहतूक असायची. भूमितीत रेषाखंडावर लंब टाकतात तसा उदय तीरासारखा मेन गेट मधून सुसाट बाहेर आला. त्याला रेषाखंड समजून लकडीपुलाकडून आलेली बस त्याला छेदायला गेली. दोघंही स्पीडात पण ज्याचं वाहन मोठं त्या बिचा-याला थांबावच लागतं. तर अचानक आलेला उदय क्रॉस करून गेला अर्थात बसड्रायव्हरनी अतोनात प्रयत्नं करून अपघात टाळल्यामुळे. 

रस्त्यावरचं तुरळक पब्लिक, कॉलेजची मुलं श्वास रोखून बघतायेत. उदयच्या कपाळात, छाती लोहाराच्या भात्यासारखी, अशुभाच्या कल्पनेनी अंगाला थरकाप. बसड्रायव्हर मान बाहेर काढून चार उपदेशाचे शब्दं सांगायची संधी घ्यायचा विचार करतोय. कुमार उदय आधीच तोतरा होता. त्यानी सायकलची मान वळवून घेतली पळायच्या किंवा घराच्या दिशेने म्हणूयात आणि रानडे बोलते झाले. ऐकून पब्लिक सोडा, बसड्रायव्हर, अख्खी बस हसायला लागली. आणि रानडे सायकल मारत, दात काढत आपल्या घरी रवाना झाले. 

'काय ले, मलायचंय का सायकलखाली सापलून' 

म्हटलं ना, वरून येतानाच ते इंजेक्ट होऊन येतं म्हणून. 

जयंत विद्वांस



Monday, 15 February 2016

लल्याची पत्रं (२६)…. 'मार्गारिटा - एल्व्हिस प्रिसले…'

लल्याची पत्रं (२६)…. 'मार्गारिटा - एल्व्हिस प्रिसले…'

ब-याच दिवसांनी पत्रं. इंग्लिश गाणी ऐकायचा फार योग येत नाही त्यापेक्षा त्यात चांगलं काय वगैरे घोर अज्ञान आहे कारण भाषा, उच्चारण, अर्थ पटकन समजत नाही. इंग्रजी चित्रपट बघताना सबटायटल्स असतात त्यामुळे माझ्यासारख्याला बराच फायदा होतो. भाषेच्या आडकाठीमुळे खूप चांगल्या गोष्टी कळायच्या राहून जातात याची मला कायम खंत आहे. इंग्लिश असं नाही, एकूणच इतर भाषातलं ही भाषेच्या अडचणीमुळे वाचलं, ऐकलं जात नाही. अनुवाद असतात पण माझ्या मते त्यात अनुवाद करणा-याची भाषा, शैली उतरते. मूळ लिहिलेलं वाचण्यात मजा असते. जेम्स ह्याड्ली चेसच्या पुस्तकांचं भाषांतर वाच कधी, कोल्हापूरचं प्रकाशन आहे (भानू शिरधनकर यांनी केलेलं वेगळं, त्यांनी Vulture is a patient Bird चं केलेलं 'गिधाडांची जातंच चिवट' वाचूनच तर मी चेसचा भक्तं झालो), चेसनी अनुवादकर्त्याकडून स्वत:ची बोट ठेचून घेतली असती आणि रंकाळ्यात जाऊन उडी मारली असती असलं भीषण भाषांतर आहे. 

आपल्या संगीतकारांनी मात्रं खरंच खूप उपकार केले आहेत. माझ्यासारख्या सामान्य किंवा अगदी शिक्षणाचा गंध नसलेल्या किंवा ओरिजिनल इंग्लिश किंवा इतर परदेशी भाषातलं गाणं ऐकायचा योग येण्याची सुतराम शक्यता नाही त्याच्यासाठी ते बाहेरच्या चांगल्या चालीत आपले शब्दं बसवतात आणि सादर करतात. कधी चुकून ओरिजिनल ऐकायचा योग आला तर मजा येते. एकंच शंका किंवा प्रश्नं आहे - 'आपल्या संगीतकारांची चाल कुणी परदेशी माणसानी चोरून हिट केली असेल का?' असं माझ्या तरी ऐकिवात नाही. आपल्याकडे चोरण्यासारख्या सुंदर चाली आहेत की. का ते लोक आपलं ऐकतच नाहीत? खूपवेळा आपण वाचलेल्या माहितीवर बोलतो. 'बाजे पायल छमछम' मरे गुडविनची आहे, 'नजरे मिली दिल धडका' 'कम सप्टेंबर' आहे. 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' आणि 'नीले नीले जिंदे शामियाने के तले' मोझार्ट आहे, 'मैने प्यार किया' I Just Want to say, I love you आहे, 'सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा' Egyptian Walk आहे, 'हरी ओम हरी' One Way Ticket  आहे. पण यातल्या आपण सगळ्याच ओरिजिनल ऐकलेल्या असतात असं नाही.       

आपल्याला कळणा-या भाषेतली गाणी ऐकताना आनंद व्हायची, आवडायची अनेक कारणं असतात. चाल, आवाज, एखादं आवडीचं वाद्य, त्यावेळचा पडद्यावरचा प्रसंग, आवडता नट/नटी, गायक/गायिका, शब्दं, अर्थ आणि भाषेची गंमत, यमक अशी अनेक कारणं असू शकतात. E.A.Robinson ची 'Richard Cory' वाचताना, Alfred Lord Tennyson ची 'Home they brought her warrior dead' किंवा Mary Gilmore ची 'Never Admit the Pain' वाचताना मला सगळ्यात पहिल्यांदा काय जाणवलेलं असेल तर की त्यातलं यमक किती सुंदर आहे, वाचताना त्यामुळे आपोआप लय येते (मी या सगळ्यांचं मराठी करताना एकदाही मला त्यातलं यमक जुळवता आलं नाही, हा  भाग वेगळा, सूडच एकप्रकारचा, मी स्वैरानुवाद या नावाखाली पळ काढला). तर एवढं सांगायचं कारण काय तर एल्व्हिस प्रिसलेचं मार्गारिटा. माझा मित्रं रव्या उटगीकरनी 'काय अप्पा'वर परवा मला त्याचा व्हिडिओ दिला. मी प्रिस्ले हे नाव फक्तं ऐकून होतो.

पुढेमागे त्याची अजून गाणी मी ऐकेन, वाचेन त्याच्यावर पण आत्ता तरी मला त्याच्या या गाण्यानी मोहून टाकलंय. त्याचे लिरिक्स खाली दिलेत, ते वाचता वाचता गाणं ऐकलं की अजून मजा येते. Rapture, Intoxicates सारखे शब्दं किती सुरेल म्हणतोय तो, Moth in the flame च्या वेळचा त्याचा आवाज एकदम खतरा आलाय. तुला खाली लिंक दिलीये व्हिडिओची. त्यात ती डाव्या कोप-यात जी पोरगी बसलीये ना हातात चिपळ्या घेऊन, तिचे हात बघ, किती -हिदमिक हलतात ते. ६३ सालचं गाणं आहे हे. ती पोरगी पण साठीची असेल आता. प्रिस्लेला किंग म्हणायचे. जिवंत असेतोवर ती सांगेल मी प्रिस्लेच्या एका गाण्यात आहे म्हणून. मला शम्मी आठवला अनेक गाण्यातला, प्रिस्लेपेक्षा तो बोद्ल्या होता एवढंच बाकी ते बघणं वगैरे सेम आहे. 

एवढं सगळं नमनाला तेल खर्ची घालून नेमकं सांगायचं तेच राहून जाईल. शंकर जयकिशनचा 'झुक गया आसमां' ६८ सालचा. जीपमध्ये बसून राजेंद्रकुमार रफीच्या आवाजात म्हणतो ते 'कोन है जो सपनोमे आया' ऐकताना मला आता 'मार्गारिटा' आठवत रहाणार. पहिल्या तीन ओळीत 'Who Makes' आहे म्हणून 'कौन है' आलं आपल्या दोन ओळीत, तिस-यात चित्रपटाचं नाव घेतलं असावं मुद्दाम टायटल सॉंग साठी. 'ओ प्रिया' 'मार्गारिटा'च्या जागी. अर्थात त्यानी फरक काही पडत नाही. शंकर जयकिशनच्या नावावर अनेक सुरेल आणि ओरिजिनल चाली आहेत त्यामुळे उगाच कशी चोरी सापडली वगैरे म्हणायला तो काही अन्नू, बप्पी नाही. तर श्रवणीय आणि प्रेक्षणीय गाणं असा योग आहे हा. तर मार्गारिटा, वाच, बघ, ऐक आणि सांग. चल पुढच्या पत्रा पर्यंत बाय. 

जयंत विद्वांस

"Marguerita"


Who makes my heart beat like thunder?
Who makes my temperature rise?
Who makes me tremble with wonderful rapture
With one burning glance, from her eyes

Marguerita...

Once I was free as a gypsy
A creature too wild to tame
Then suddenly I saw, Marguerita
And I was caught, like a moth in the flame

Marguerita...is her name

Marguerita...

Her lips have made me her prisoner
A slave to her every command
She captivates me, and intoxicates me
With one little touch of her hand

Marguerita....

Sweet...Marguerita...sweet, sweet Marguerita....

https://www.youtube.com/watch?v=ApjA9OfAUk4






Saturday, 30 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…

सत्तर एमएम चे आप्तं (१२)… केश्तो मुखर्जी…
 
सुंदर निखळ विनोद करणं मोठं अवघड काम असतं, तो जमला नाही तर हसू येत नाही, हसं होतं. अनेक विनोदवीर होऊन गेले. कुणी शब्दं खेळ करून हसवलं, कुणी आचरटपणा करून हसवलं (राजेंद्रनाथला तोड नाही यात), कुणी अंगविक्षेप न करता हसवलं (उत्पल दत्त, देवेन वर्मा, सुधीर जोशी), कुणी टायमिंगवर हसवलं (अशोक सराफ नं १ ते १०, परेश रावल, अर्शद वारसी), कुणी आवाजाच्या लकबीवर हसवलं (जॉनीवॉकर, ओमप्रकाश) आणि ज्यांना पाहिलं की मला हसू येतं असे म्हणजे राजपाल यादव, जगदीप, केश्तो मुखर्जी. जुही चावला, फरीदा जलाल, आगा हे मला त्यांच्या भन्नाट सेंस ऑफ ह्यूमर साठी आवडत आलेत. यांच्या चेह-यावर आगामी विनोदाची जी हालचाल होते ना ती मोठी बघणीय असते. दिग्दर्शक चांगला असेल तर काहीजण उत्तम विनोद करू शकतात (सुनील आणि अक्षय - हेरा फेरी आणि फिर हेराफेरी).  अशी यादी देत बसलो तर संपणार नाही.

तर काही काही रोलवर काही काही माणसांचे ठसे असतात, नाच्या म्हटलं की गणपत पाटील तसं दारुडा म्हटलं की दारूचा एकही थेंब आयुष्यात न पिता अट्टल दारुड्याचं काम करणारा केश्तो मुखर्जी. केश्तोचे फार सिनेमे मी पाहिलेले नाहीत किंवा पाहिले असतीलही पण लक्षात नाहीत. 'शोले'तला हरिराम नाई, 'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा, 'पडोसन' मधला किशोरचा दोस्त, 'इन्कार'मधला साब, पानीमें आग, आगमें पानी' म्हणणारा दारुडा आणि 'जंजीर'मधे अमिताभला लटकावणारा गंगू - हे मात्रं मी विसरू शकत नाही. काटकोळी शरीरयष्टी, कायम नशा न उतरलेला चेहरा, चाप्लीनसारखी मिशी आणि लेट करंट असल्यासारखं त्याचं ते मंद माणसासारखं बघणं, ते डोळे फिरवणं, खालचा ओठ दाबत ते मान तिरकी करून लाचार बघणं याची कॉपी नाही झाली कधी कारण ते सगळं ओरिजिनल होतं. त्याला हशा निर्मितीसाठी बोलायची गरज नव्हती. त्यानी डोळे उघडले तरी लोक हसायचे. 


रवीना टंडनचा मामा म्याकमोहन उर्फ सांभा नाराज होता सिप्पीवर, रोल कट केला म्हणून. सिप्पीनी त्याला सांगितलं होतं, रिलीज होऊ दे मग सांग. त्यातला अंग्रेजोके जमानेका जेलर असरानी आणि खब-या हरिराम नाई केश्तो पाच दहा मिनिटच असतील एकूण पडद्यावर पण त्यांनी धमाल केलीये. बच्चन धर्मेंद्रला प्लान सांगतो पिलरच्या आड, तेंव्हा चोरून ऐकताना केश्तोच्या चेह-यावर जे उमटलंय ते बघाच, त्याची ती बिरबलची अर्धवट दाढी ठेवून जेलरकडे जाण्याची टिपिकल चुगलखोर माणसाची असते तशी घाई, तिथे खबर देताना चेह-यावर असलेली मतलबी लाचारी, असरानी राउंड घेतो तेंव्हा आता कसे पकडले जाणार याचा आनंद त्याच्या चेह-यावर बघावा, तो केश्तोपाशी थांबतो तेंव्हा डोळ्याने कडेच्या माणसाकडे खुणावणं, आपलं बिंग उघडं पडेल याची भीती. अनंत वेळा शोले बघताना काय घडणार हे माहित असूनही मला कायम हसू फुटलेलं आहे.

'बॉम्बे टू गोवा' मधला झोपलेला दारुडा म्हणजे विनोदाचा 'मूक'प्रकार होता. बसला धक्का मारताना तो हवेत हात टेकवून ढकलत असतो. बसमध्ये काय काय घडत असतं पण हा पठ्ठा सदानकदा झोपलेला. सतत बेअरिंग सांभाळणं मोठं अवघड काम आहे. 'परिचय'मधला ज्याला मुलं पळवून लावतात तो मास्तर होता तो. 'इन्कार'मधे मासे पकडायला बसलेला असतो तो. विडी पेटवून पाण्यात टाकलेल्या काडीनी आग लागल्यावर केश्तोच्या चेह-यावर कपाळात गेल्याचा भाव आहे. तो पळत जातो आणि चौकीत जे असंबंद्ध बडबडतो ते हसू फुटणारंच आहे. 'पडोसन'मधल्या 'मेरे सामनेवाले खिडकी'ला खराट्यावर कंगवा फिरवणारा केश्तो, किशोरचा मित्रं होता. त्याचं ते ओठ दाबून बघणं, ती डोक्यावर उभी असलेली बट, हसू आणते.  


'जंजीर'मधला गंगू त्या मानानी मोठा होता. त्याचं ते अमिताभला 'आईये ना' म्हणणं अगदी गळ्यात पडणारं होतं, गरीबाच्या घरी कुणी मोठा माणूस येत असला की त्याची एक वेगळीच लगबग असते. आपलं दारिद्र्य त्याला दिसू नये म्हणून मोठा पाहुणचार करतात मग ते, तशी त्याची लगबग बघावी त्यात. त्याला पकडून दिल्यावर त्याची ती शरमेने खाली गेलेली मान शॉटमधे जे कदाचित लिहिलेलं नसावं आणि असलं तर ते त्यानी ते शंभर टक्के पोचवलंय. प्राण बरोबर ट्रेनमधून जाताना त्याच्या चेह-यावरची भीती बघा. असल्या अभिनयाला बक्षीस नाही मिळत हे दुर्दैवं. क्रिकेटमधे फोर सिक्स मारणारे जास्ती फेमस असतात पण इमाने इतबारे धावा करणारे यशपाल शर्मा, ख्रिस हरीस, गेव्हीन लार्सन, रहाणे मागे पडतात तसंच असतं या लोकांचं. कमीतकमी वेळात चमकीतला हिरा चमकावा तसे चमकून जातात पण त्यांचं अस्तित्व मोठा उजेड पडला की काजव्यासारखं पटकन संपतं.  

त्याचा मुलगा बबलू मुखर्जी काही मालिका आणि चित्रपटातून चमकला पण तो देखणा, गोलमटोल होता. केश्तोला कायम आर्थिक चणचण असायची असं वाचलं होतं. फुटकळ भूमिकातून किती पैसे मिळणार म्हणा. दिग्गज बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटकच्या मर्जीतला होता तो, त्यामुळे त्याच्या चित्रपटात छोटा पण महत्वाचा रोल त्याला मिळायचाच. ८१ ला मरायच्या एक वर्ष आधी त्याला बेस्ट कॉमेडीयनचं फिल्मफेअर पण मिळालं, एवढंच काय ते बक्षीस.  

दारू पिणारे बिचारे आपण शुद्धीत आहोत हे दाखवण्यासाठी किती खटाटोप करतात आणि तरीही पितळ उघडं पडायचं ते पडतंच, इकडे हा आणि 'जॉनीवॉकर' बद्रुद्दिन काझी मात्रं थेंबाला स्पर्श न करता अट्टल दारुडा उभा करतात. अभिनय म्हणजे वेगळं काय असतं, जे आपण वास्तवात नाही ते पात्रातून उभं करणं. केश्तो, जबतक शोले और जंजीर देखुंगा तबतक तेरा हरिराम नाई और गंगू भूलुंगा नही! हसता हसता कृतज्ञेतेने डोळ्यात पाणी येईल एवढं निश्चित. 
 
जयंत विद्वांस 
 

Friday, 29 January 2016

वर्तुळ...

वर्तुळ... 

नव्यानीच हौशी नाटक, सिनेमात काम करणा-या किंवा त्यासंबंधित क्षेत्रात काम करणा-या, गायक, वादक, नट लोकांची एक वेगळीच भाषा असते, त्यात नुसती मौखिक भाषा नाही तर देहबोली पण आली. त्याचं नाव झालेलं नसतं, त्यांना त्यांचा ग्रूप सोडून फार कुणी ओळखत नसतं आणि प्रसिद्धीची हौस तर तुंबलेली असते. आपल्याच क्षेत्रातला दुसरा माणूस हजर नसेल तर उपस्थित माणसांसमोर ते जास्ती खुलतात. त्यांना श्रोते हवे असतात. ते पण अचंबित होणारे, 'फार बाबा ओळख तुझी' अशा अर्थाचं कौतुकाने बघणारे, उगाच टाचणी लावून स्वप्नं फुगा फोडणारे श्रोते पुढच्यावेळी टाळले जातात. आपण काय करतो आणि मनात 'काय करता आलं असतं अजून' याची सरमिसळ झालेली असते त्याला वाचा फुटते अशा वेळी. सगळ्यांमध्ये एक साम्यं काय तर 'आपण इतरांपेक्षा किंवा अमुकतमुकपेक्षा कसे वेगळे आहोत' हे ठसवणं.

नाटकाच्या इंटरव्हलला या गप्पा ऐकाव्यात. एखाद्या प्रामाणिक माणसानी त्याला जे वाटतंय ते समजा प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा, नाटक छान आहे, की त्याचा पार भुगा करतात हे लोक. 'यापेक्षा आम्ही सरस करतो', 'किती घाईत उरकलंय', 'तिची एंट्री तर धावत आल्यासारखी झाली, तिला सांगा रे कुणीतरी बालनाट्यात काम कर म्हणाव आधी', 'छ्या, त्यापेक्षा त्या ह्याला गेलो असतो तर बरं झालं असतं'. बरं, हे लोक अर्ध्यात निघून जात नाहीत, उरलेला भाग संपूर्ण बघतात. मनातून जे चाललंय ते आवडलेलं असतं पण पहिल्या भूमिकेशी ठाम राहायचं हे ठरलेलं असतं. मी एकदा विचारलेलं एकाला, 'का रे भंगार होतं तर थांबलास कशाला?' त्या बेडकानी मला चीतपट करणारं उत्तर दिलं होतं, 'नाटक कसं करायचं नाही याचा पण अभ्यास असतो रे, तुला नाही कळणार'. 

फलाणा नट, नटी, दिग्दर्शक किती जवळचा आहे हे सांगण्याची पण एक स्टाईल असते. मी एका बरोबर गप्पा मारत होतो एकदा, असेल साल ९४-९५. माणूस हौशी नाटकात काम करायचा म्हणजे असं त्यानीच सांगितलेलं. 'काय रे दिसला नाही बरेच दिवस?' 'अरे, xxxx करतोय सध्या त्यामुळे वेळ नाही, आत्ता पण लकीली भेट झाली. सवितानी सांगितलंय, 'भरत'ला येच, ब-याच दिवसात भेटलो नाहीये आपण, नऊला ये डॉट, तिकडेच निघालोय'. मी घरी आलो नी पेपर बघितला, 'भरत'ला 'चार दिवस प्रेमाचे होतं सहा वाजता. मला खात्री होती की सविता प्रभुणेनी याला अजिबात बोलावलं नसणार. एखाद्या नाटकाच्या वेळेस दोनचार शब्दं बोलली असेल एवढंच. छान काम करतोस एवढं म्हणाली असेल फार फार तर. पण मला दिपवून टाकण्यासाठी ते बोलणं त्याच्या दृष्टीने गरजेचं असावं. खरंतर नंतर 'काय म्हणाली सविता' किंवा त्याच वेळी 'मी पण येऊ का, सही घ्यायचीये फक्तं' असं बोलायचं असतं मला पण जीभ रेटत नाही माझी. मला खरं वाटावं हा त्याचा हेतू असफल झाला असता, कुणाचं स्वप्नं तोडायचं पाप नको उगाच. 

एकजण 'पंतां'च्या संस्थेत होता. कधीही बघा, माणूस 'लखोबा लोखंडे' तोच करत असल्यासारखा सगळा भाव असायचा. आतल्या स्टो-या, किस्से ऐकून आम्ही गपगार व्हायचो. हा गेला नाही तर प्रयोग होणार नाही असं आम्हांला वाटायचं. एवढं असून पण कधी पेपरातल्या जाहिरातीत नाव का येत नाही असा भाबडा आणि सहानुभूती वाटणारा प्रश्नं पडायचा. अनेक वर्ष मी बघत होतो. त्यांची अनेक नविन नाटकं आली सगळ्या नाटकात पण याचं नाव कधी जाहिरातीत नाही आलं. नंतर समजलं की पोस्टमन, नटीचा भाऊ, दीर, निरोप्या, नुसता बसणारा, एखाद दोन वाक्यं बोलणारा जज्ज अशीच कामं असायची. पण त्याचा जीव रमायचा एवढं खरं. खरंतर माझ्यासारख्या माणसाला त्या तालमीच्या प्रोसेसचं फार आकर्षण आहे. स्टेजवरच्या नाटकापेक्षा ते उमलत जाणारं नाटक बघण्यात जास्ती मजा आहे. ती प्रोसेस त्याला पण आवडायची म्हणूनच तो जायचा पण आपण काय असायला हवे होतो हे तो आम्हांला तो ते आहे असं सांगायचा. त्याचा जीव रमायचा हेच खरं.  

खरा अभ्यास करणारा माणूस विरळ असतो. अफाट वाचन वगैरे लांबच्या गोष्टी. ऐकीव माहितीवर आधारित स्वत:ची चार वाक्यं घालून हे लोक बोलतात मात्रं स्टायलिश. त्यांच्यापेक्षा बुद्धिमान माणूस आला तर हे म्यूट होतात. तो माणूस एकदा गेला की मग त्याची निंदा करण्यात वेळ घालवतात. 'नशीब आहे रे त्याचं', 'लाळघोटेपणा करत नाही ना आम्ही म्हणून मागे आहोत', 'एकदा स्टेजवर आला पाहिजे समोर, परत काम नाही करणार, मी असलो की', वगैरे हेडलाईन्स स्क्रोल होतात. त्यातला फोलपणा बोलणारा आणि ऐकणारा दोघांना जाणवत असतो. यांच्या नशिबात त्यांना कुणीतरी आदर्श मानेल असाही ही एक स्तर असतो. तुमची लिडरशीप, विधानं करण्याची पात्रता, दाखवायचा बिनधास्तपणा, आपल्याला काही फरक पडत नाही यावर भक्तगणसंख्या अवलंबून असते. हळूहळू डबकं तयार होतं, मग तोच समुद्र वाटायला लागतो हे वाईट आहे.

बिचारे जागरणं करतात, फुकट राबतात, दाढ्या वाढवतात, त्यांचा कुठला तरी आदर्श ओढतो ती आणि तशी सिग्रेट ओढतात, तंबाखूचे बार भरतात, दारवा पितात. खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवतात, डोळे उघडे ठेऊन बुर्ज खलिफा एवढ्या उंचीची  स्वप्नं बघतात. हळूहळू वास्तव कळायला लागतं. कुणी पॅराशुट लावून अलगद जमिनीवर येतात, कुणी दाणकन आदळतात. काहीजण स्विकारतात, काहीजण स्वप्नातच रमतात. प्रत्येक नव्या प्रयोगाला अंकुर फुटतो, नविन पिढी मागे रेटत असते. वयामुळे कुणी फटकन बोलत नाही तरी हे अक्कल शिकवायला जातात, अपमानित होतात पण मागे हटत नाहीत. तिथलाच त्यांच्याइतकाच नवखा, स्वप्नाळू जमाव शोधतात आणि त्यांना 'पुरुषोत्तम'ला काय काय केलंय, कुणी कुणी कौतुक केलं होतं, नंतर आपल्याला संधी कशी मिळाली नाही, आपल्यावर अन्याय कसा झाला अशा स्टो-या सांगायला सुरवात करतात. ते भाबडे लोक ऐकतात, हळहळतात. याला तेवढंच बरं वाटतं. त्याला त्यानी जिथून सुरवात केली तो दिवस आठवतो आणि एक वर्तुळ पूर्ण होतं.  

जयंत विद्वांस

Friday, 22 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…

सत्तर एमएम चे आप्तं (११)… सी.रामचंद्र…


प्रत्येक चित्रपटसृष्टीचा एक विशेष असतो. हॉलीवूडला गाण्यांचा दुष्काळ तर आपल्याकडे गरज नसली तर कोंबतील. आपल्याकडेही परत अनंत प्रकार आहेत. साउथकडे पैलवान हिरोईनी, अतर्क्य फाईट सीन्स, भन्नाट डान्स स्टेप्स, लाउड अभिनय (यांचे रिमेक जास्ती चांगले वाटतात), मराठीत दोन टोकं, काहीवेळेस बांधेसूद पटकथा, उत्तम अभिनय तर कधी अश्रुधूराचा बाँब फोडतात नाहीतर मग हसू न येणारे विनोदी चित्रपट. पण हा झाला आत्ताचा काळ. साठ ते नव्वदच्या दरम्यान संगीत हा प्राण होता चित्रपटाचा, मराठी असो की हिंदी. हिरो पंजाबी गोरा, देखणा, हिरोईन साउथकडची चांगली डान्सर, चरित्र भूमिकेला मराठी लोक, गायला लता, आशा, संगीत बंगाली मॉब जास्ती (एसडी, हेमंतकुमार, सलील चौधरी, अनिल विश्वास) की झाला चांगला हिंदी चित्रपट. या सगळ्यात एक मराठी माणूस वेगळेपण  टिकवून राहिला - सी.रामचंद्र.

पुणतांब्याला १२ जानेवारी १९१८ ला जन्माला आलेला आणि ५ जानेवारी १९८२ ला स्वत:च्याच नावातला राम म्हटलेला हा रामचंद्र नरहर चितळकर नावाचा बेफाट, हुन्नरी आणि देखणा माणूस जगला असता तर आत्ता अठ्ठ्याणव वर्षांचा असता. मोठी गंमत असते. आपण ठरवतो ते आयुष्यात होतंच असं नाही किंबहुना न ठरवलेलं जास्ती होतं. आधी त्यांनी चित्रपटात केलं, मग तमिळ चित्रपटात संगीतकार झाले, अण्णासाहेब, राम चितळकर, शामू आणि सी.रामचंद्र अशी चार नावं लावून संगीत दिलं, मराठी चित्रपटात आर.एन.चितळकर असं नाव लावून कामं केली, गाणी म्हटली, चित्रपट काढले, 'माझ्या जीवनाची सरगम' नावाचं आत्मचरित्रं लिहिलं आणि या सगळ्याला बाजूला सारून लक्षात रहातील अशा अजरामर चाली दिल्या.

'अपलम चपलम, चपलाई रे' हे मी त्यांचं सगळ्यात पहिलं ऐकलेलं गाणं. संगीतकार, गीतकार, गायक कोण वगैरे काहीही कळायचं वय नव्हतं तेंव्हा ऐकलेलं. पुढे कळलं की या माणसाचं नाव सी.रामचंद्र. न कळत्या वयात मी त्यांचं आत्मचरित्र वाचलं होतं. भिकारदास मारुतीपाशी गोवित्रीकरांची लायब्ररी होती. त्यांच्याकडून घेऊन मामानी दिलं होतं. खूप वर्ष मी ते शोधतोय, मिळत नाहीये. 'आम्ही चौपाटीच्या वाळूवर रत झालो' असं काहीतरी वाक्यं त्यात होतं. 'रत' शब्दाचा अर्थ विचारल्यावर मामा म्हणाला होता, मोठा झालास की कळेल आपोआप. वयानी मोठा झालो आणि आणि जगण्यातले तोटे लक्षात येऊ लागले, तो तोट्यातला धंदा अजूनही चालूच आहे, अर्थ समजले, अज्ञानातली मजा गेली. माणूस मोठा कलाकार, हुन्नरबाज, असामान्य असला की वादग्रस्त असतो की वादग्रस्त माणसात हुनर असतो, हा मला कायमस्वरूपी पडलेला प्रश्नं आहे. आपण चांगलं ते बघावं, उचलावं, अनुकरण करावं. उगाच गुडघ्यावर शाल टाकून गायला बसलं म्हणजे कुणी भीमसेन होत नाही. आपण सोप्पं ते उचलतो. आज्जी म्हणायची, 'अरे, शेणसुद्धा रस्त्यावर पडलं तर उठताना माती घेऊन उठतं, आपण जिथे जातो तिथल्या माणसात चांगला गुण असेल तर चिकटवून घ्यावा'.

लोकांना त्यांची चांगली गाणी आठवणार नाहीत पण 'ए मेरे वतन के लोगो'ची स्टोरी पदरची चार वाक्यं घालून बोलतील. सत्यं हे मोहरी शोधण्यासारखं असतं, कोण कष्ट घेणार. मी वाचलंय एका ठिकाणी - नेहरू रडले वगैरे सगळं सपशेल खोटं आहे. ते रडले हे गाणं चांगलं असण्याचं सर्टिफिकेट आहे का? समजा ते रडले नसते तर आपल्याला आवडलं नसतं का? पण आपल्याला कुणा मोठ्या माणसाच्या नावाचा टेकू लागतोच. मुळात अचानक सादर करायला सांगितलेलं हे गाणं होतं म्हणे. प्रदीपनी या गाण्याची शंभर कडवी लिहीली होती म्हणे. अर्धवट माहितीवर छातीठोकपणे बोलण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागत नाही. त्यामुळे शहाण्या माणसांनी ऐकावं सगळं पण ते पुढे पोचवताना तारतम्य ठेवावं ही पोच आपल्याला कधी येणार काय माहित. माणूस गेला की तो आरोपांना उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे नंतर केलेले आरोप मूर्खपणाचे असतात. मोठ्ठी माणसं अशावेळी मौन धारण करतात आणि तेलपाणी घालतात, ज्यांना सत्यं माहित असतं ते घाबरून गप्पं बसतात. 'ये जिंदगी उसीकी है' 'मूर्तिमंत भीती उभी' वरून बेतलय हे स्वत: चितळकरांनी सांगितलं होतं, मग कशाला चिखलफेक हवी होती. पण शेवटी मातीचेच पाय असतात सगळ्यांचे. कसलातरी राग कुठेतरी काढत असावेत. त्यावर आधारित आहे म्हणून त्याची गोडी कमी होत नाही आणि मुळात त्यांनी ते लपवलेलंही नाही. अनेक चीजांपासून स्वत: गाणी बनवली की ती क्रिएटीव्हिटी आणि दुस-यांनी बनवली की ती चोरी असते. आरोप प्रथितयश माणसांनी केला की साला त्याला सुद्धा वजन असतं कारण लोक बोलतात पण दबक्या आवाजात, तिथे फावतं. असो!

अर्थहीन पण उच्चाराला -हिदम लटकलेले शब्दं चालीत बसवणं हे काम सी.रामचंद्रनी सुरु केलं असावं. 'आशा' मधलं 'इना मीना डिका' त्याची सुरवात होती. 'शिनाशिनाकी बुबला बू' अशा नावाचा चित्रपट पण त्यांनी केला होता. त्यांची सगळी गाणी मी काही ऐकलेली नाहीत. पण जी ऐकली आहेत ती अफाट आहेत. त्यांचा आझाद, नवरंग, अलबेला, अनारकली पुरेसे आहेत मला. राधा ना बोले ना बोले, तलत न आल्यामुळे म्हटलेलं 'कितना हसीं ही मौसम', जा री जा री ओ कारी बदरिया, अपलम चपलम - आझाद (आधी नौशाद कडे गेला होता 'आझाद' पण तीस दिवसात दहा गाणी पाहिजे म्हटल्यावर त्यांनी 'हे काय वाण्याचं दुकान आहे का' म्हणून निर्माता नायडूला हाकललं होतं), जा रे हट नटखट, आधा है चंद्रमा, कारी कारी अंधियारी, श्यामल श्यामल वरन, तू छूपी है कहा  - नवरंग, धीरेसे आ जारी अखियनमें , शोला जो भडके, शाम ढले खिडकी तले, किस्मत की हवा कभी नरम आणि एव्हरग्रीन भोली सुरत दिलके खोटे - अलबेला, जागे दर्द इश्क जाग, मोहब्बत ऐसी धडकन है, आजा अब तो आ जा आणि 'मूर्तिमंत भीती उभी' या नाट्यसंगीतावरून घेतलेलं 'ये जिंदगी उसीकी है' - अनारकली, निगार सुलतान आणि गोप वर चित्रित झालेलं सी.रामचंद्रनीच म्हटलेलं 'मेरे पिया गये रंगून'.


मला काही गाण्यातलं एवढं कळत नाही पण ' जा री जा री ओ कारी बदरिया' मधे दोन्ही 'ग' आहेत असा माझा समज आहे (चुकीचा असला तर असो बापडा) पण ती चाल बदलते ना तिथे आणि कडव्याच्या शेवटी शब्द आणि सुरांना अस्तर लावल्यासारखा ठेका येतो तिथे जीव टाकावा असा प्रकार आहे अगदी. 'अपलम चपलम'चा ठेका ऐका, अवीट गोडीचं गाणं, कितीही वेळा ऐका. त्यात 'काहे को ये आग लगाई रे, लगाई रे, लगाई रे, 'रोए, रोए, जान गवाई रे, गवाई रे, गवाई रे' आणि 'सुदबूद सब बिसराई रे' नंतर जी धावपळ आहे ना ती आणि ती शब्दांची जी पुनरावृत्ती आहे नं ती मला अत्यंत आवडून गेलेली आहे. एके ठिकाणी मी वाचलं होतं ' गायकाला गाता ठेवेल असा हवा, वरचढ नको'. आताच्या गाण्यात ठेका ऐका फक्तं, शब्दं समजून घ्यायच्या भानगडीत पडू नका. मोजक्या वाद्यात मजा येतेच की पण आहे घरात, ठेवून खराब होईल अशा भीतीनी वाजवतात हल्ली सगळी वाद्यं. त्यांच्या 'ये जिंदगी उसी की है'ला फुफ्फुसं गळ्यापाशी येतील म्हणायला गेलो तर आणि 'मोहब्बत ऐसी धडकन है' ला मोरपीस फिरेल. सगळा 'नवरंग' घ्या, सुरेल श्रवणीय गंमत सगळी (महिपाल आणि संध्या - नाही काही बोलत). 'नवरंग'चा रिमेक व्हायला हवा. 

एका संगीतकारानी सांगितलं होतं, 'स्वर सातच आहेत पण तुम्ही कुठल्या स्वरानंतर कुठला घेताय, कितीवेळा घेताय, तिथे किती रेंगाळताय यावर चालीचं वेगळेपण ठरतं'. चाल म्हणजे सुरांची कुठल्यातरी क्रमाने मांडलेली आरास नव्हे तर तो फ्लो आहे, उतारावरून पाणी जसं लयीत खाली येतं तशी हवी चाल, न अडखळता आलेली, धाप न लागलेली, प्रवाह न तुटलेली, मधे आलेल्या खड्यांना किंवा खडड्यांना ओलांडताना ठेका समजून त्याच्याशी गुजगोष्टी करून पुढे जाणारी. आताचा गोंगाट ऐकला की जुन्याची किंमत कळते, मेलडी म्हणजे काय ते कळतं. अनेक शोध लागतील, नवनवीन वाद्य निघतील पण चाल, सुरेलता यंत्रातून येत नाही, नाहीतर चाली करायचं मशिन किंवा सॉफ्ट वेअर निघालं असतंच की.

जोपर्यंत गणशोत्सव आणि लग्नाची वरात आहे तोवर तीन गाणी अजरामर आहेत 'नाच रे मोरा', 'मुंगडा मुंगडा' आणि 'भोली सुरत दिल कॆ खोटे'. झोपडपट्टीत कुणाच्या तरी लग्नात बेंजो आणि ढोलक वर वाजलेली ट्यून त्यांच्या डोक्यात होती. त्यांनी आणि भगवानदादांनी त्याला बोलावून त्याच्याकडूनच ती वाजवून घेतली ती. ज्याला चाली चोरायच्यात तो माणूस असं कशाला करेल. शेवटी शेवटी ते रग्गड प्यायचे एवढीच गोष्टं लक्षात ठेवण्यासारखी आहे त्यांची?

चितळकर, हल्ली एका चित्रपटात दोन (खूप होतायेत ना) सुरेल, शब्दं समजतील, गुणगुणावीशी वाटतील अशी गाणी सापडणं हा दुर्मिळ योग आहे आणि तुम्ही एकाच सिनेमात सगळी गाणी हिट देण्याची करामत करत होतात. खरं खोटं एक तुम्हांला आणि एक हयात व्यक्तीला माहित, माझ्यासाठी 'आझाद', 'नवरंग', अलबेला', 'अनारकली' 'पतंगा'ही वस्तुस्थिती आहे, बाकी काय करायचंय मला.  
जयंत विद्वांस 







    

Monday, 18 January 2016

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

सत्तर एमएम चे आप्तं (१०)…बिंदू

आपल्याकडे वास्तवातील प्रतिमा चांगली असून चालत नाही, पडद्यावरची प्रतिमा पण चांगली लागते. वास्तवात चार माणसांना दारू पिऊन गाडीखाली चिरडा पण पडद्यावर निरागस, भोळा, मातृभक्तं, सगळ्यांवर 'प्रेम' करणारा अशी प्रतिमा असेल तर ती खरी धरली जाते. सौ.बिंदू झवेरी आणि अजून असे अनेक याच मानसिकतेचे बळी आहेत. बिंदू पडद्यावर दिसली की बुब्बुळं मोठी होतात, जीभ ओलसर होऊन बाहेर सटकते, हात शिवशिवतात अशी तिची प्रतिमा आहे. आता वास्तवात ही आत्ता चौसष्ठ वर्षांची आज्जीबाई समोर दिसली तर आपण तिला निदान वयाप्रमाणे नमस्कार करू? नाही, करणार. कारण तिची पडद्यावरची प्रतिमा आपल्याला जास्ती आवडते, आपण त्यावर स्वप्नं रंजन केलेलं असतं, तो ठसा पुसायला मन तयार होत नाही आणि त्या प्रतिमेच्या आपण पाया वगैरे पडत नाही, इतकंच. एखादा विनोदी नट अभ्यासपूर्ण, वैचारिक काही बोलला तर आपण किती गंभीरपणे ते ऐकतो? कारण त्यानी फक्तं विनोदी बोलायचं, करायचं, लिहायचं हे आमच्या डोक्यात ठरलेलं आहे.    

देमार चित्रपटांचा निर्माता नानूभाई देसाईची ही सर्वात मोठी मुलगी, वयाने आणि शरीराने पण. ती तीन वर्षाची असतानाच नानूभाईनी 'दि एंड'ची पाटी लावली आणि नकळत्या वयातच तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. धर्मेंद्रच्या 'अनपढ' मधे ती अकरा वर्षांची होती. मूळची सणसणीत शरीरयष्टी तिला वयापेक्षा मोठं दिसायला कामी आली. 'इत्तेफाक'मधे ती फक्तं अठरा वर्षांची होती (वाटत नाही ना). ती रूढार्थाने सुंदर नव्हती. 'गॉडझिला'च्या जाहिरातीत 'साईझ डज म्याटर' अशी ओळ होती. दारासिंह, झीनत आणि बिंदूला चेह-याची आवशक्यता नव्हती कारण काहीवेळेला 'साईझ डज म्याटर'. हसत हसत म्हटलेलं गाणं किंवा गाता गाता मधेच हसलेलं  'कटी पतंग'चं गाणं 'मेरा नाम शबनम' तिला यशाच्या हमरस्त्यावर घेऊन गेलं. पद्मा खन्ना 'हुस्नं के लाखो रंग' नी जेवढी प्रकाशझोतात आली तेवढी पुढे टिकली नाही. हेलन, बिंदू, अरुणा इराणी, काही प्रमाणात जयश्री टी असा मॉब होता तेंव्हा, व्ह्याम्प, डान्सर, बदचलन औरत, कुटील सहकारी यापुढे त्यांना काहीही जमणार नाही अशी पब्लिकला खात्री होती. त्यामुळे या सगळ्या वेगवेगळी नावं घेऊन त्याच त्याच भूमिका करत राहिल्या. 

त्यामानानी बिंदूला काही चित्रपट चांगले मिळाले. 'इत्तेफाक' मधली खन्नाची मेव्हणी, 'अभिमान' मधली बच्चनची मैत्रीण, 'अमर प्रेम'मधली विनोद मेहराची कुचकी, सावत्र आई, 'इम्तिहान'मधली विनोद खन्नावर एकतर्फी प्रेम करणारी कॉलेजकुमारी, 'लावारीस'मधली अमजदची दुसरी बायको, 'बिवी हो तो ऐसी'मधली फारूक शेखची कडक आई, 'किशनकन्हैया' मधली छळ करणारी सावत्र आई ('सीता और गीता'ची मनोरमा डोळ्यात सरस होती, काही म्हणा) आणि 'जंजीर' मधली अजितची मोना डार्लिंग. शब्बो आणि मोना म्हटलं की बिंदूच येणार डोळ्यासमोर, इतकी ती नावं तिला चिकटली. ललिता पवार आणि बिंदू अत्यंत विषारी बघायच्या. खलप्रवृत्ती दाखवण्यासाठी त्यांचं बघणंच पुरेसं होतं. त्यात बिंदू भारदस्त पण होती. मराठीत तिची तोड म्हणजे पद्मा चव्हाण. कमलाकर तोरणे दिग्दर्शित, मराठीतील प्रति शोले अशी विनोदी जाहिरात असलेल्या 'दरोडेखोर'च्या (यात वाळक्या अंगाची, गालफडं बसलेली रिमा भडभडे - लागू आहे) प्रिमिअरला मी त्यांना पाहिलं  होतं. न्यूनगंड वाटेल अशी देखणी आणि भारदस्त बाई.

तिनी बालपणापासून माहित असलेल्या, शेजारी रहाणा-या चंपकलाल झवेरीशीच लग्नं केलं. त्यानीही तिला चित्रपटात काम करायला प्रोत्साहन दिलं. स्किन कलरचं कापड लावून ती कायम वावरली. कुठल्याही फिल्मी पार्टीला ती नव-याशिवाय गेली नाही आणि शुटींग संपल्यावर स्वत:च्याच घरी गेली त्यामुळे तिच्याबाबत कुठलीही वावडी उठली नाही. पडदा आणि वास्तव यात तिनी जमीन आसमानचं अंतर ठेवलं. आपण कुणाला किती जवळ येउन द्यायचं हे एकदा ठरलं की त्रास होत नाही. ती एकदाच प्रेग्नंट राहिली पण मिसक्यारेज झालं, नंतर परत तिला मूलबाळ झालं नाही. 'हम आपके है कौन'मधे एका शॉटला अजित वाच्छानी तिला म्हणतो, 'इसलिये तुम्हारी गोद खाली है'. बिंदू आणि मी, दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. तिला ग्लिसरीन नसेलच लागलं त्या वाक्याला. 'जंजीर'मधे एक शॉट आहे. तेजा त्याचा बॉस पाटीलची तारीफ करत असतो. मोना त्याला म्हणते, पहिल्यांदाच तू कुणाचंतरी कौतुक करतोयेस. त्यावेळचा तिचा तो उत्कंठावर्धक चेहरा बघा, ती पुढे विचारते, पाटीलसाहेब कुठे असतात आता. तेजा थंडपणे त्यानीच त्याला मारल्याचं सांगतो, तेंव्हा धक्का बसलेला बिंदूचा चेहरा बघा. अभिनय काही फक्तं रेखा, शबाना, स्मिता, हेमाच नव्हत्या करत. 


फिल्मफेअरसाठी सात वेळा नामांकन मिळालं पण तिला ते कधीच मिळालं नाही. मुळात ते कुणाला मिळालंय याची कुणाला आठवण होत नाही इतका त्याचा दर्जा खालावला आहे. लक्ष्मी-प्यारे मधल्या लक्ष्मीकांत कुडाळकरची ती मेव्हणी. त्यांनी तिच्या बहिणीशी लग्नं केलं होतं. आता ती पुण्यातच कोरेगाव पार्कला रहाते. रेसकोर्सला दिसेल ती सिझनला, कुणाला बघायची हौस असेल तर. शेक्सपिअर म्हणून गेलाय, नावात काय आहे? काहीवेळेस खरंही आहे ते. शाई पडल्यावर ब्लॉटिंग पेपरनी टिपल्यावर त्या पेपरवर हा भला मोठा ठिपका पसरतो तशी होती बिंदू चंपकलाल झवेरी पण नाव मात्रं बिंदू. :D

जयंत विद्वांस 


 

   

Thursday, 14 January 2016

टेलीशॉपिंग…

टेलीशॉपिंग…
 
मी सिरिअल्स बघत नाही त्यामुळे टीव्ही बघितला तर इ.स.२००० पू.चा हिंदी सिनेमा, इंग्लिश मारधाड, जुनी गाणी किंवा म्याच असेल तरंच बघितला जातो. काहीच नसेल तर आधी बातम्या बघायचो, आता त्याही सोडल्या. त्यापेक्षा मग अर्धा एक तास टाईमपास म्हणून चोवीस तास टेलीशॉपिंगला वाहिलेले च्यानल्स बघतो. धमाल येते. ते च्यानल बघण्यात मला तर फायदे आणि मानले तर काही किरकोळ तोटे दिसत आलेत. फायदे बघा :

०१) बाजारात काही नवं असेल तर कळतं
०२) बाहेर विकत घ्यायचं असेल तर किंमतीचा साधारण अंदाज येतो
०३) भिकार वस्तूचं आकर्षक मार्केटिंग कसं करावं ते कळतं
०४) आपल्याला आपल्या जवळ असलेल्या वस्तूचा दुकानदार म्हणून किंमत सांगताना, त्या वस्तूचं कौतुक करताना न्यूनगंड वाटू शकेल अशी वस्तूसुद्धा विकणेबल आहे हे समजतं
०५) कुठलीही वस्तू विकत न घेता कल्पनेत आपण ती वापरली तर जगणं किती सुखकारक होईल या आनंदानी फील गुड की काय ते वाटू लागतं (एक दमडा खर्च न करता हे अतीव आनंदाचं, कारण जन्म पुणे)

काही काही प्रॉडक्ट मला पाठ झालीयेत कारण मी त्यांचा रेग्युलर(?) कस्टमर नसलो तरी रेग्युलर व्ह्यूअर आहे. पुलं म्हणाले होते तसं असतं यांचं सगळं, मुलगी धडधाकट आहे, घरातलं सगळं करते म्हणजे शिक्षण कमी (हे आपण ओळखून घ्यायचं असतं). तसे यांचे पोपट आणि पोपटीणी असतात. मूळ प्रॉडक्ट कसा उपयुक्त आहे असल्या क्षुल्लक गोष्टी सांगण्यात ते फार वेळ घालवत नाहीत. तुम्ही कधीही बघा, शेवटचे गिनेचूने नग राहिलेले असतात, त्वरा केली नाही तर इच्छुकांच्या पदरी किती घोर निराशा येत असेल या कल्पनेनीच मी कासावीस होतो. निकटच्या हजाराला एक रुपया कमी असलेली किंमत असते, हा शोध ज्यानी लावला तो मानसोपचार तज्ञ असणार. 'फक्तं', 'ONLY' या शब्दांचे अर्थ इथे पटकन कळतात. रुपये दहा हजार नऊशे नव्व्याण्णव फक्तं. नुसतं ऐकून पण मला खजील व्हायला होतं. मला मोठ्ठी वाटणारी रक्कम जगाला 'फक्तं' वाटतीये हे उमजून मी काळाच्या मागे आहे या बायको (माझ्या) आणि मुलीच्या मताला दुजोरा मिळतो आणि त्या दोघी आनंदी होतात.   

त्यांच्या काही प्रॉडक्टवर मात्रं माझा जीव जडलाय. एक ते रोटी मेकर. नुसती लाटी आत सारायची, झाकण दाबायचं, कंपास घेऊन मोजावी अशी गोल पोळी तयार, पलटी मारली की झाकण अलगद सोडायचं, भटू-यासारखी टम्म फुगलेली पोळी तयार. ते झाकण जे स्लो मोशनमधे वर येतं ना ते बघायला मला जाम आवडतं. दबावाविरुद्ध उफाळून येण्याचा गुणधर्म कणकीच्या गोळ्यात पण असतो हे ज्ञान मिळतं. बरं त्याच्या बरोबर पीठ मळायचं भांडं फुकट असतं. या सगळ्या जाहिरातीत सगळ्यात जास्ती जोर कशावर असेल तर तुमचे किती पैसे वाचतील, सोबत मोफत किती आणि काय काय आहे, तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडतील आणि तुम्ही कसे सुखी व्हाल यावर असतो. 


दुसरं एक ते सिक्स प्याक उर्फ पोटावर आयत बनवायचं मशिन. काय एकेक बायका असतात त्यात. त्या मशीनची गरज म्हणून पोट दाखवतात हे समजू शकतो पण अत्यंत कमी कपड्यात त्या मशिनवर व्यायाम करताना जे काही आळोखे पिळोखे देतात ना तेंव्हा त्यांच्या पोटाकडे लक्षच जात नाही आणि मग ती जाहिरात परत बघावी लागते. त्यात पण ते आधीचं भोपळा पोट आणि नंतरची पोटावरची शिल्पाकृती जेवढ्या सेकंदात दाखवतात न तेवढ्या सेकंदात जादू होणारं मशिन यायची मी वाट बघतोय. सगळे बाप्ये आणि बाया लोक हेवा वाटावा अशा कमावलेल्या शरीराचे असतात. माझ्या पोटाकडे बघून एवढं जादुकारी मशिन आपल्याकडे नाही याची खंत वाटते. समजा आणलं आणि झालो बिस्किटपोट्या तरी शेजारी जाहिरातीतल्या बाईएवढ्या कमी कपड्यात कुणीही उभं रहाणार नाहीये याची खात्री असल्यामुळे मी अजून त्याची ऑर्डर नोंदवलेली नाहीये.

याचाच एक उपप्रकार म्हणजे वजन कमी करणा-या प्रॉडक्टसच्या जाहिराती. फार मजेशीर प्रकार आहे तो सगळा. पोटाला अमूक एक तेल लावून गरम पाण्यानी शेका, संत्र्याची साल सोलावी तशी सहजरीत्या चरबी कमी होईल. अमका हर्बल टी प्या (एक्झरसाईजची गरज नाही हे वाक्यं रिपीट असतं त्यात, घेणारच की मग पब्लिक) आणि शेवग्याची शेंग व्हा. तुम्हांला पोटाशी, मांड्यांशी (चरबी जास्ती आहे तिथे, थोडक्यात) गदागदा हलवणारं एक मशिन असतं, पाच मिनिटात तुम्ही मुंबईच्या उन्हात उभे असल्यासारखे घामेजता. त्यामुळे मुंबईला एकही माणूस ओव्हरवेट नसणार असं मला वाटत आलंय. कुठलंही काम करताना ते वापरता येतं म्हणे. एका 'विशिष्ठ' क्रियेत कमरेला ते मशीन लावल्यावर त्याचं व्हायब्रेशन उपयोगी येईल का असा मला एक वात्रट प्रश्न पडलेला आहे. असो! याच्या उलट उंची, वजन वाढवायच्या भुकट्या आणि गोळ्या विक्रेते असतात. आयुष्यात वजन नाही म्हणून लग्नं ठरत नाहीत, मैत्रिणी हसतात, न्यूनगंड येतो वगैरे सगळे प्रॉब्लेम्स चार पाच हजारात सुटू शकतात. बरं ती भुकटी खाऊन नुसतं वजन नाही वाढत, मसल्स एकदम अर्नोल्ड लाजेल असे होतात. एकदा आणेन म्हणतोय ते. 

असे अनेक विनोदी प्रकार त्यावर आहेत. एक तो चायनीज की कोरियन टकला माणूस डोक्यावर पीक काढल्यासारखे केस उगवून दाखवतो (शेतक-यांनी ट्राय केलं तर मायंदाळ पीक येउन आत्महत्या तरी करणार नाहीत), रु.२४९९/- 'फक्तं' मधे दोन शूज, एक स्लीपर, एक गॉगल, एक घड्याळ, एक टी शर्ट, एक डफल ब्याग, रु.४९९९/- 'फक्तं' (कृपया हा शब्दं विसरू नये) मधे आयफोन स्वत: दगडावर जाउन स्क्रीन फोडून घेईल असे फिचर्स असलेला स्मार्टफोन असतो, घाण टाकायची आणि ती सेकंदात साफ करायचा मॉप असतो (तसं खरंच होत असेल तर मलासुद्धा साफसफाई जमेल या भीतीपोटी मी तो घेणार नाहीये), होलमधून हनुमान चालीसा वाचता येईल असा खास आपल्याकरिता तयार केलेला  मंतरलेला चांदीचा सर्वसंकटनाशक हनुमान असतो, घरात कुठेही भोक पाडू शकेल असं ड्रिल मशिन, ड्रिल, स्प्यानर, स्क्रू ड्रायव्हर सेट अत्यंत अल्पं किंमतीत असतो, ज्याच्यावरून ट्रक नेला तरी फरक पडत नाही असा हवा भरून तयार होणारा सोफा, बेड आहे, काठीला फडकं गुंडाळल्यासारख्या दिसणा-या बायका आणि जॉर्जेटच्या साड्या आहेत, डिनर सेट आहेत, भांडी कुंडी आहेत. एकूण सगळं 'अच्छे दिन आये' असं वाटायला लावणारं आहे.  

खरंतर या सगळ्यात खरोखर उपयोगी असणा-या किंवा काम हलकं करणा-या वस्तू फार कमी आहेत अस आपलं माझं मत आहे. जाहिरात ही कला आहे हे टेलीशॉपिंगचे च्यानल बघितलं की कळतं. सगळं दुष्टंचक्र आहे. न लागणा-या वस्तू विकत घ्या, पैसा असो नसो, क्रेडीट कार्ड आहे की. रक्कम फुगली की त्याचे हप्ते करून घ्या आणि तीस टक्क्यानी ते फेडा म्हणजे मूळ स्वस्तात मिळाली अशी वाटणारी वस्तू खरंच आपल्याला कितीला पडली हे कुणीच बघत नाहीये. नितांत गरज असताना बराच काल प्रतिक्षा करून वस्तू आली की ती प्राणप्रिय होते, वाटते. निर्जीव वस्तूवर पण माया जडते. आता वस्तू मुबलक झाल्या, वापरा, फेजून द्या, आवडल्या नविन किंवा अपग्रेडेड काही आलं तर तर जुन्या चांगल्या असतील तरी बाद करा, त्यात अडकून राहू नका असा मंत्र आहे आजचा. 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' ते आपण चुकीच्या विचारांना, प्रथांना लागू करत नाही, चांगल्या गोष्टींना मात्रं लगेच करतो.

एक बरंय त्यावर अजून सुख, आनंद विकायला नाहीये, तो आपला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत मिळवता येतोय, यायला हवा. त्यांची ती पोपटपंची, भलावण निर्हेतुकपणे ऐकणं, बघणं हा ही माझ्या छोट्या गोष्टीतून आनंदी होण्याच्या भागच आहे. बाकी आडिश (आमरणच्या धर्तीवर) ही करमणूक चालूच राहील.  

जयंत विद्वांस

Sunday, 3 January 2016

एकपात्री 'नटसम्राट'….


एकपात्री 'नटसम्राट'…. 
 
एकपात्री प्रयोग तसा सोप्पा नसतो. स्वत:च्या खांद्यावर सगळं पेलण्याची जबाबदारी असते, मोठी रिस्क असते, हसं होण्याचे चान्सेस असतात. पण अनेक पात्रं असतानाही एकपात्री करणं अजून अवघड असतं. नानानी एकपात्री केलाय 'नटसम्राट'. बाकीचे कलाकार कमी आहेत म्हणून तो ग्रेट वाटलाय असं आहे का? तसंही अजिबात नाहीये. सुनिल बर्वे, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे, परब सुसह्य आहेत, कामं चांगली केलीयेत.

थोड्या खटकलेल्या गोष्टींवर आधी  बोलून घेतो. मेधा मांजरेकरही वाईट नाही, ती खटकत नाही, दोन तीन प्रसंगात ती छान बोललीये (फक्तं पहिल्या शॉटमधे तिची नऊवारी रेडीमेड तिच्या मापाची असावी का अशी एक शंका येईल एवढी ती ऑकवर्ड दिसलीये). मूळ नाटकात नसलेला विक्रम गोखले आहे म्हणून खटकत नाही, नसता तरी अडलं नसतं. पण त्यानी वडिलांसारखं स्टेजवर नटसम्राट करायला हरकत नाही. काळ जुना दाखवलाय, नंबर प्लेट एमएलयू आहे, लग्नातली गाडी पण जुन्या काळातली आहे आणि चोरीचा संशय येतो ते पैसे पाचशेच्या हल्लीच्या पिवळ्या नोटांमध्ये आहेत. मध्यंतरापर्यंत जरा ढिल्ला वाटतो. नटसम्राट दारुडे होते की काय असं वाटेल नविन पिढीला असे प्रसंग आहेत. असो!


किरण यज्ञोपवीतचे संवाद अप्रतिम. कुसुमाग्रजांना लाज आणतील असं काहीही त्यात नाही. नाटकाचा सिनेमा मात्रं सुंदर केलाय. पटकथा प्रवाही आहे. मुळात मूळ कलाकृतीचं संचित पाठीशी आहे, त्यामुळे त्याचं बोट धरून जरी चाललं तरी प्रवास सुखकर होऊ शकेल असं असतानाही कुठे ताल सुटला तर सगळं चांगलं मातीत जाईल अशी भीतीही आहे. महेश मांजरेकरनी ती कसरत दोरीवर चालणा-या डोंबारणी सारखी छान पेलली आहे यात शंका नाही. डायरेक्टर डोकावतो तेंव्हा चित्रपट काही ठिकाणी अंगावर येतो. ५४ इंचीला सुद्धा बघण्यात मजा नाही, थेटरच पाहिजे असा सुंदर केलाय त्यानी. लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, मोहनदास सुखटणकर, राजा गोसावी, लक्ष्मण देशपांडे (द्विपात्री), गिरीश देशपांडे यांना ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी हा नटसम्राट बघावा.  

आता उरला नाना. त्याच्या कौतुकासाठी किती लिहावं हा प्रश्न पडलाय. तिरंगा, यशवंत, क्रांतिवीर, अंकुश, अब तक छप्पन आणि इतर कुठलाही नाना यात डोकावत नाही एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. नटाला ते पात्रं कळलं की त्यासारखी मजा नाही. तो त्या पात्राच्या प्रेमात पडायला हवा मग ते त्याला जमलं की तो स्वत:च्या प्रेमात पडतो आणि मग चालू होतो तो नट आणि त्या पात्राचा रोमांस. मग आजूबाजूला कुणी आहे, नाही याचं भान उरत नाही आणि तो ते पात्रं जगत जातो, आतून बाहेर काढतो आणि अजरामर करतो. मूळ नाटक नानासाहेब फाटकांना डोळ्यापुढे ठेऊन लिहिलं गेलं होतं कारण तो आवाजाचा बादशहा होता. संगीत नाटकात तीन सप्तकात फिरणारा गळा हवा असतो तसा गद्य नाटकातला तो तीन सप्तकात फिरणारा बुलंद आवाज होता असं ऐकलय. त्यांचं आत्मचरित्र वाचलंय मी, यातली स्वगतं त्यांच्या अनेक नाटकात केलेल्या भूमिका डोळ्यापुढे ठेऊन लिहिली गेलीयेत. 

मूळ नाटककाराला अभिप्रेत असणारा नटसम्राट कदाचित वेगळा असेल पण फाटक गेले आणि लागूंनी तो केला, त्यांनी पहिला केल्यामुळे नंतरच्या लोकांना तुलना नशिबी आली आणि त्यात गैर काहीही नाही. नाना बघायला जाण्याआधी तुमची पाटी कोरी असो नसो, त्याचं नाव लिहिण्यात तो यशस्वी झालाय. या अजरामर शोकांतिकेतले भाव त्यानी मेहनतीनी पोचवलेत. विषण्णता, हतबलता, उद्वेग, सात्विक संताप, चीड, हळवेपणा, कातरता, वैराग्यं, द्वेष, कटुतेच्या पलीकडे गेलेलं म्हातारपण, सरकार गेल्यावर सर्वस्वं हरवणं म्हणजे काय ते त्यानी अफाट दाखवलंय. त्याचं चालणं, पडलेले खांदे, प्रत्येक प्रसंगातली वेगळी देहबोली, डोळ्यांचा अप्रतिम वापर, त्याच्या चेह-यावर उमटणा-या प्रतिक्रिया परत परत पहाव्या अशा आहेत. 

मुलीला रागानी हाक मारताना लागलेला आवाज आणि ते स्वगत अंगावर काटा आणतं. राजा त्याला विचारतो 'नाटक पाहिलंय का कधी?' तेंव्हा, कावेरी म्हणते, 'ती सुया शोधत नव्हती', तेंव्हाचा त्याचा चेहरा बघा. नाटकावर तो पोटतिडीकीनी जितेंद्र जोशीला बोलतो तेंव्हाची त्याच्या आवाजातली तळमळ ऐका, त्याचं थेटरातलं स्वगत ऐका, जळलेल्या थेटरात त्याच्या अंगात शिरणा-या पात्रावर तो स्वार होतो तेंव्हाची त्याची तडफ आणि तो आवेग ओसरल्यावर गलितगात्र झालेला नाना बघा. वयानी आलेली हतबलता आणि वय विसरून आलेला राग क्षणात दाखवलेत, ते बघाच एकदा थेटरात जाउन. परत बघितला की परत लिहीन त्याच्यावर अजून.  नाना आणि विक्रम गोखलेंनी ते स्टेजवर करावं अशी एक वेडी इच्छा आहे. काय धाय मोकलून रडायचं राहिलंय ते एकदा  रडून घेईन, ती स्वगतं ऐकून मोहरून जाईन, तोंड फाटेस्तोवर किंवा समोरचा बंद करेस्तोवर त्यावर बोलेन आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवेन एकदा, इतक्या क्षुल्लक अपेक्षा आहेत माझ्या.  

काळ बदलेल, आपणही म्हातारे होऊ, मुलं विचारत नाहीत ही शोकांतिका वाटणार नाही अजून काही वर्षांनी, इतकं ते प्रथा असल्यासारखं घडत राहील, त्यामुळे आज घळाघळा पाणी आलं तेंव्हा तसं येईल न येईल माहित नाही, तेंव्हा नटसम्राटची कथा कालबाह्य होईलही पण ती स्वगतं रहातील, शेक्सपिअर राहील तसे शिरवाडकर पण रहातील. लागू रहातील, नाना राहील, नविन कुणीतरी बेलवलकर म्हणून उभाही राहील. तेंव्हा तो त्याच्या पद्धतीने करेल हे सगळं. एखादा माणूस सांगेल त्याला 'मागे विश्वनाथ पाटेकर नावाच्या बापमाणसानी सुंदर केलं होतं, ते बघ एकदा म्हणजे तुझं तुला नवीन काही सापडायचं राहिलं असेल ते सापडेलही'.

जयंत विद्वांस