Wednesday 17 February 2016

काय ले...

काय ले...

काही काही माणसांचा सेन्स ऑफ ह्यूमर अफाट असतो. असं काहीतरी पटकन बोलतात की हसू येतंच आपोआप. हजरजबाबीपणा स्वभावात उपजत असतो, फार फार तर चौफेर वाचन, निरीक्षणशक्ती, सामान्यज्ञान याच्या जोरावर तो पॉलिश्ड होऊ शकतो. पुण्यात जन्मखूण असावी ना तसा कुचकेपणा, उपरोध, उपहास, हजरजबाबीपणा यातला एखादा 'गुण' जन्माला घालताना देव शरीरात टोचूनच पाठवत असावा. प्रत्येक बाबतीत मत यासाठी वेगळी सुई असावी अर्थात, पुण्यात पाठवायचा असेल तर देवाला पोलिओसारखी ती प्रत्येकाला टोचावीच लागते.  

प्रत्येक शहराची काही घाऊक स्थित्यंतरं असतात. शहर पुणे, कधी काळी टांग्याचं मग सायकलींच, मग टू व्हिलर्सचं असं बदलत गेलं. मुंबईची ट्राम, लोकलची गर्दी, समुद्र हे पुण्याच्या भाग्यात नाही. इथे रहदारीचे नियम पाळले तर अपघात होईल अशी परिस्थिती आहे. इंडिकेटर एक तर दाखवण्यासाठी नसतोच मुळी, बरं समजा चुकून दाखवला तर त्या बाजूला वळायलाच पाहिजे अशी बोत आमच्यात नसते. स्मार्ट सिटीचं खूळ आलंय खरं पण जी कुठली संस्था ती राबवेल ना त्यांचे कन्सेप्ट बदलून जातील असं पब्लिक आहे इथे. असो!

तर कोणे एके काळी पुण्यात सायकली इतर कुठल्याही वाहनांपेक्षा जास्ती होत्या तेंव्हाची गोष्टं. तेंव्हा उदय रानडे नामक अनेक पैकी एक महान व्यक्तिमत्व भांडारकर रोडला राहायचं आणि आबासाहेब गरवारे कॉलेजात जायचं. एक्स्प्रेसवे, फ्री वे प्रकार पुण्यात पहिल्यापासून आहेत. कुठल्याही रस्त्यावरून (त्यात नो एंट्री पण आली) 'फ्री'ली जायचं, 'एक्स्प्रेस'वेगानी जायचं असा त्याचा अर्थ आहे. भांडारकर रोड ते गरवारे कॉलेज, चालत जाऊ शकेल एवढं अंतर आहे प्रभात रोडच्या गल्ल्यातून अगदी रमतगमत गेलं तर. पुण्यात तेंव्हा सायकल आता टू व्हीलरचा उल्लेख करताना गाडी लावून येतो, तुझी गाडी कुठे आहे असा फोर व्हिलर सारखा करण्याची प्रथा आहे. तर उदय सायकल घेऊन जायचा कॉलेजला. एका पायावर गिरकी घेऊन टर्न मारणे, कॅरिअरवर बसून चालविणे, एकावेळी चार जण बसवणे, हात सोडून चालवणे, थांबल्यावर पायानीच स्ट्याण्डवर लावून उतरणे, तिरकी करून सीटवर डायरेक्ट बसणे वगैरे प्रथमा, द्वितीया त्यानी कधीच उत्तीर्ण केल्या होत्या. 

दीड दोनची वेळ असेल दुपारची. बाळासाहेब कॉलेजातून दमून निघाले. तेंव्हा दुपारीही आत्ता पहाटे असते तेवढीच वाहतूक असायची. भूमितीत रेषाखंडावर लंब टाकतात तसा उदय तीरासारखा मेन गेट मधून सुसाट बाहेर आला. त्याला रेषाखंड समजून लकडीपुलाकडून आलेली बस त्याला छेदायला गेली. दोघंही स्पीडात पण ज्याचं वाहन मोठं त्या बिचा-याला थांबावच लागतं. तर अचानक आलेला उदय क्रॉस करून गेला अर्थात बसड्रायव्हरनी अतोनात प्रयत्नं करून अपघात टाळल्यामुळे. 

रस्त्यावरचं तुरळक पब्लिक, कॉलेजची मुलं श्वास रोखून बघतायेत. उदयच्या कपाळात, छाती लोहाराच्या भात्यासारखी, अशुभाच्या कल्पनेनी अंगाला थरकाप. बसड्रायव्हर मान बाहेर काढून चार उपदेशाचे शब्दं सांगायची संधी घ्यायचा विचार करतोय. कुमार उदय आधीच तोतरा होता. त्यानी सायकलची मान वळवून घेतली पळायच्या किंवा घराच्या दिशेने म्हणूयात आणि रानडे बोलते झाले. ऐकून पब्लिक सोडा, बसड्रायव्हर, अख्खी बस हसायला लागली. आणि रानडे सायकल मारत, दात काढत आपल्या घरी रवाना झाले. 

'काय ले, मलायचंय का सायकलखाली सापलून' 

म्हटलं ना, वरून येतानाच ते इंजेक्ट होऊन येतं म्हणून. 

जयंत विद्वांस



1 comment: