Monday, 13 June 2016

भैरवी…

लहान असताना घरी कुणी नात्यातलं, ओळखीतलं आलेलं माणूस गाणं वगैरे म्हणणारं असेल तर त्याला म्हणायचा आग्रह व्हायचा. मोठ्या माणसांकडून शेवटी 'एक झकास भैरवी होऊ दे' असं म्हटलं जायचं. तो 'राग' आहे वगैरे गोष्टी काही ठाऊक नव्हत्या. चिमुकला मेंदू (अजूनही तेवढाच आहे, उत्क्रांती काहीही नाही) विविध शक्यता तपासात बसायचा. मागच्यावेळेला अभंग होता भैरवी म्हणून यावेळी वेगळंच गाणं कसं भैरवी म्हणून असे अज्ञानी प्रश्नं पडायचे. मैफिलीच्या शेवटी म्हटला जाणारा राग असं नंतर समजलं. मग आयुष्याच्या संध्याछायेला पण भैरवी म्हणायची वेळ आली वगैरे असं झालं. एकदा शिक्का बसला की बसला, तसं झालंय भैरवीचं. अपभ्रंश, अर्धवट माहितीवर आधारित पायंडे, कालबाह्य प्रथा सहसा बदलत नाहीत, उलट त्या नेमाने पाळल्या जातात. क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तरेला रहाणारे इंग्रज दक्षिण भागाला Behind the Bazar म्हणायचे त्याचं भेंडी बाजार झालं आणि तेच अधिकृत नाव झालं. भारतीय शास्त्रीय संगीतात जे घराणी आहेत त्यात हे भेंडीबझार घराणं पण आहे.

एका मासिकात मी वाचलं होतं. भैरवी हा सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणायचा राग. तेंव्हा मैफिली रात्रंभर चालायच्या आणि पहाटेला संपायच्या. सकाळी सांगता करताना भैरवी सकाळचा राग म्हणून गायला जायचा. नंतर ते भैरवी मैफिल संपताना म्हणतात असं रूढ झालं आणि ती प्रथा झाली. एरवी नियमात चालणारी घराणी यात कुठे आडवी आली नाहीत हे नशीब. मैफिल संध्याकाळी, रात्री जरी संपली तरी भैरवी आळवली जाऊ लागली. अतिशय गोड, चटकन ओळखता येईल असा हा राग आहे. ग, रे, ध, नी - सगळे कोमल स्वर आहेत. कठोर, तीव्र काहीही नाही म्हणून मी साने गुरुजी राग म्हणतो याला. मनाला अतिशय 'शांत' करणारा हा 'राग' आहे. त्याचे एखादा स्वर बदलून केलेले, नटभैरव, अहिरभैरव वगैरे प्रकार पण आहेत पण ते अचूक टिपता येण्याएवढी बुद्धी माझ्याकडे नाही. ती नाहीये तेच बरं आहे. स्वर रांग सोडून कधी बाहेर येतोय का यावर लक्ष ठेवणारे ट्राफिक पोलिस रसिकत्व करायचंय काय. एखादं गाणं आवडलं आणि ती भैरवी आहे हे मला समजलं नाही तरी मला त्याची खंत वगैरे वाटत नाही. त्या चालीनी दिलेला आनंद महत्वाचा, राग ओळखून चारचौघात मला फार कळतं हे दाखवणं एवढाच त्याचा उपयोग माझ्या दृष्टीने.

सिनेमाच्या गाण्यांचा अर्थ आपण आपल्या आयुष्यात घडलेल्या, घडाव्याश्या वाटणा-या घटनांशी जोडतो त्यामुळे त्यांच्या बरोबर लवकर मैत्र जुळत असावं. अतिशय अचूक शब्दं, चित्रपटातील सिच्युएशन, सुरेल गळा आणि भैरवी म्हणजे कातील प्रकरण. काळजाला हात घालतात अगदी ती गाणी. हे असं नुसतं सांगून ते डोळ्यापुढे येणार नाही. प्रत्येकाची आवडत्या गाण्यांची यादी असतेच तशी माझ्याकडे भैरवीची एका फोल्डरमध्ये आहेत. काही असतील इतरही जी भैरवी आहे हे माहितही नसेल पण अरे हा आपल्या गावचा असं कळल्यावर जशी त्या माणसाबद्दल आपल्याला जरा जास्ती आपुलकी वाटते तसं माझं भैरवी समजल्यावर होतं एवढंच. नौशादच्या दोन भैरव्या मला प्राणप्रिय आहेत, 'बैजू बावरा' मधलं 'तू गंगा की मौज मै' आणि 'गंगा जमना'चं 'दो हंसोका जोडा'. पहिल्यात ती वीसेक वर्षाची होडीत हाताच्या तळव्यात तोंड झाकून बसलेली देखणी मीनाकुमारी अतिशय मोहक आहे आणि दुसया गाण्यात आलेले ते सध्या दुर्मिळ झालेले मोरा, असुअन, भयो, रतिया हे शब्दं. बघा तुम्ही 'मेरा गोरा अंग ले ले' पेक्षा 'मोरा गोरा अंग लई ले' ला काय गोडवा आहे ते. लता 'गजब' 'जुलम' म्हणताना 'ज'चा उच्चार 'ज'हाजातला करत नाही तर 'ज'गातला करते, मुश्किल न म्हणता मुसकील म्हणते ते सगळं कानाला काय गोड लागतं, ऐका एकदा.  गाण्याच्या सुरवातीलाच सारंगी की व्हायोलीन जे काही वाजतं तेच इतकं करूण आहे की पुढे काय याची जाणीव व्हावी.  एखाद्याला तिच्या तळतळीचा शाप लागेल असं वाटायला लावणारी चाल आहे ती.

चिंगारी कोई भडके, जब दिल ही टूट गया तो, जा रे जा रे उड जा रे  पंछी, जिया जले जां जले, बेशक मंदिर मस्जिद तोडो, जो भजे हरी को सदा, मधुकर श्याम हमारे चोर, भोर भये पनघटपे, फूल गेंदवा न मारो, मै पिया तेरी (बासरी काय सुंदर वाजवलीये या गाण्यात), हमे तुमसे प्यार कितना (किशोर आणि परवीन, दोन्ही ऐकणीय), इस भरी दुनिया में, ये दिल ये पागल दिल मेरा, ज्योतसे ज्योत जगाते चलो, मिले जो कडी कडी, साकीया आज मुझे नींद नही आयेगी, आया है मुझे फिर याद वो जालीम, ये जिंदगीके मेले, दिल आज शायर है, जैसे राधाने माला जपी, दिल का खिलौना हाये टूट गया, किसी बात पे पर मैं, किसी नजरको तेरा इंतजार, मुझको इस रातकी तनहाईमें, तुम्हे और क्या दू मै - ही सगळी गाणी माझ्या माहितीप्रमाणे भैरवीत आहेत (नसेल समजा एखादं तरी मी फोल्डर काही बदलणार नाहीये). अवीट गोडी, कितीही वेळा ऐका. भैरवीत एकूणच आळवणी, तक्रार, साद घालणं, आठवण हे भाव जास्ती उमटतात असं माझं मत आहे. पोटतिडकीनं बोलताना जसा माणसाचा आवाज पोटातून येतो ना तशी भैरवीतली भावना खूप आतून कुठूनतरी खोलवरून येते. जिव्हारी लागाव्यात अशा काही चाली आणि त्यात गुंफलेले शब्दं आहेत. प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल इतकी सुंदर गाणी आहेत ही.

शंकर जयकिशन मधल्या शंकरचा हा अतिशय आवडीचा राग. 'संन्यासी' सिनेमाची सगळी गाणी म्हणे त्यांनी या एकाच रागात केली होती. पण एकूणच त्याची या रागातली अनेक सुरेख गाणी आहेत. बरीचशी अर्थात आरके साठीचीच आहेत. आवारा हु, छलिया मेरा नाम, कहता है जोकर, ऐ मेरे दिल कही और चल, कैसे जाऊ जमुनाके तीर, मेरा जूता है जपानी, प्यार हुआ इकरार हुआ, सब कुछ सिखा हमने, दोस्त दोस्त ना रहा, तेरा जाना दिलके अरमानोका, रमय्या वस्तावैया, बोल राधा बोल संगम, किसीने अपना बनके मुझको (याचा इंट्रो आणि इंटरल्यूड पिसेस इतके सुंदर आहेत की मी एकदा परत त्यासाठी हे ऐकतो), छोड गये बालम, दुनिया बनानेवाले, कैसे समझाउ बडे नासमझ हो - ही त्याची काही गाणी आहेत भैरवीतली. एसजेच्या ब-याच गाण्यांचे इंट्रो, इंटरल्यूड स्वतंत्र चाली होतील इतक्या सुरेख आहेत (आवारा हु, प्यार हुआ, रमय्या, ऐ मेरे ऐका एकदा परत)  पण त्याची भैरवीतली तीन गाणी अशी आहेत की त्यापुढे इतर काही नाही. बरसात में हमसे मिले तुम (ठेका, इंट्रो आणि सगळंच अप्रतिम, प्रत्येकी फक्तं दोनच कडवी असलेली दोन गाणी 'राजा की आयेगी बारात' (त्यात 'दिलपे लगेगी ठेस' नंतर जे वाजतं - बहुतेक मेंडोलीन आहे - ते भारी आहे एकदम) आणि अजरामर 'घर आया मेरा परदेसी'.

शशी कपूरने आर.के.ला विचारलं होता, 'परत करशील का असं सुंदर गाणं. तो म्हणाला, 'नर्गिस आण, करतो'. त्यातला ठेका वाजवण्यासाठी म्हणे त्याला तो ढोलकीवाला लाला हवा होता, तो सापडेपर्यंत त्यानी ते गाणं रेकॉर्ड केलं नव्हतं. त्यातलं ते खतरा मेंडोलीन आपल्या लक्ष्मी-प्यारेतल्या लक्ष्मीकांत कुडाळकरांनी वाजवलंय. त्यातलं 'आवारा हू' अख्ख्या रशियाला आणि चीनच्या माओला पण आवडायचं. तुर्कस्थानात त्याचा रिमेक पण निघाला होता. कम सप्टेंबर, फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर, घर आया, शोलेची ट्यून ह्या माझ्या कायमस्वरूपी आवडत्या रिंगटोन्स आहेत. 'घर आया'च्या सुरवातीचं ते मेंडोलीन आणि त्याला सोबत करणारा तो ठेका ऐकत रहातो मी अगदी. एकतर आधीच दोन कडवी आहेत फक्तं त्यामुळे आंबावडी लवकर संपल्याचं जसं दु:खं होतं तसा मला ते गाणं संपत आलं की होतं. कालातीत गाणी ही. सिनेमा कुठला, संगीतकार, गायक कोण हे माहित नसलं तरी ऐकणारा कान देऊन ऐकेल अशी ही गाणी.

अगदी अलीकडची आवडलेली आणि कायम ऐकावीशी  वाटणारी भैरवी म्हणजे 'चिन्मया सकल हृदया'. आनंदगंधर्व भाटे पोटातून  गातात अगदी. असे चित्रपट म्हणून थेटरात बघावेत. तो मोठा पडदा आणि ते आर्त स्वर. आत हलतं काहीतरी. मोकळ्या माळरानावर गाणारे बालगंधर्व आणि तो तापलेला, खणखणीत आवाज. तंतुवाद्यच ते गळ्यातलं. पोटातून निघून स्वरयंत्रापर्यंत ज्या नसा, शीरा जात असतील त्यावर घासून आलेला आवाज तो. मला कायम प्रश्नं पडत आलाय, एवढं सुंदर गाणं म्हटल्यावर त्यांचे शरीरातील अणुरेणु किती तापत असतील, त्यांच्या सुखाचा आलेख कुठल्यातरी यंत्रावर काढता यायला हवा. समागमानंतर येणा-या तोडीचा थकवा येत असावा. अशी भैरवी संपल्यानंतर कुणीही टाळ्या वाजवू नयेत खरंतर, निरव शांतता हवी. गायकाचा देहतंबोरा थांबलेला वाटला तरी त्या तारांची कंपनं चालूच रहात असतील काही काळ, त्यांना शांत व्हायला अवधी द्यायला हवा. अशा सुखाला सुद्धा चव असते. ती शांततेत चाखता येते. एक अनाम ठेवा मिळाल्याचा आनंद गायकाला होत असावाच पण आपल्याबरोबर श्रोत्यांनाही तो पोचवू शकलो हा दुप्पट आनंद मिळत असणार. अशी गाणी ऐकली की आपल्याला त्यातलं काही येत नाही याची मला खंत वाटते. स्वांतसुखाय आपण करतोच असतो, दुस-यालाही आनंद मिळेल अशी काही कला अंगात हवी.  

'जिव्हाळा' चित्रपटातली 'लळा जिव्हाळा शब्दच खोटे' ही एक कातर भैरवी आहे, गदिमांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात राम गबालेंना अर्जन्सी होती म्हणून लगेच कागद घेऊन त्यांनी झरझर लिहून दिलंय हे गाणं.    तेंव्हा त्यांनी 'कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया, सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही' असं जिव्हारी लागणारं लिहिलंय. परकायाप्रवेश अजून तो काय वेगळा असतो. लेखक, कवी, गीतकार, संगीतकार पडद्यावर नसतील येत पण त्या पात्राच्या भूमिकेत जाऊन त्याला काय वाटतंय हे किती परिणामकारकरीत्या दाखवू शकतात यावर त्या कलाकृतीचं आयुष्यं ठरतं. त्यातलं  बाबूजींच्या आवाजातलं 'कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही' ऐकताना आत कुठेतरी तूटणं म्हणजे काय ते कळतं. 'बाबुल मोरा'वर मी आधीही लिहिलंय त्यामुळे लांबी वाढवत नाही उगाच. हृदयनाथ, जगजितसिंघ, भीमसेन, सैगल सगळ्यांचं ऐकलंय पण पहिला ठसा सैगलचा, अमिट आहे तो. गळ्यात पेटी अडकवून जाणारा सैगल, लाईव्ह रेकॉर्डिंगसाठी त्याच्यामागे अंतर ठेऊन चालणारा वाद्यवृंद. चेहरे रडवेले करून, हुंदके काढून दु:खं पोचतंच असं नाही. उलट साधेपणानी बोललेलं पायात काटा रुतावा तसं रुततं.

आता मला कायमस्वरूपी आवडलेल्या शेवटच्या दोन भैरवी. दोन्हींचा संगीतकार एकंच. जिंगल्स, मालिका शिर्षक गीतांचे बादशाह अशोक पत्की. दूरदर्शनसाठी अतिशय घाईत अनेक भाषात, अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन केलेलं 'मिले सूर मेरा तुम्हारा', अनेक भाषातून एकाच रागातली एकंच भावना किती वेगवेगळी दिसते. ओपनर भीमसेन आणि स्लॉग ओव्हरला लता मंगेशकर. इतक्या वेळा ऐकून सुद्धा अजूनही लताबाईंचा आवाज आला त्यात की मला मोहरून गेल्यासारखं होतं. संपूर्ण अर्थ माहित नसताना हजारोंना पाठ असणारं हे गाणं असावं. त्यांची दुसरी भैरवी म्हणजे शांताराम नांदगावकरांनी लिहिलेलं 'सजल नयन नित धार बरसती'. हे गाणं कितीही वेळा मी ऐकू शकतो. कडकडे काही फार आवडीचे गायक नाहीत माझ्या. पण 'वद जाऊ कुणाला शरण' म्हणजे आशा खाडिलकर तसं हे गाणं त्यांचंच. त्यातल्या 'तुझ्याविना विषधारा  होती' मधला 'ष' कसा म्हटलाय ऐका एकदा. हृषीकेश बडवेनी पण सारेगमला छान म्हटलं होतं ते. निरव शांततेत ऐकावीत ही गाणी. हेडफोन असला तर समाधी अवस्था. आजूबाजूला कितीही गोंगाट असला तरी रस्त्यावर पडलेला दारुडा कसा निवांत, काळजी संपल्यासारखा झोपलेला असतो तशी शुद्ध हरपून गेल्यासारखं ऐकता यायला हवं.

अशी लक्षात न राहिलेली, माहित नसलेली त्या रागातली अनेक गाणी असतील. उल्लेख केलेली पण त्या रागात नसलेली ही गाणी असतील वरती. शब्दं लक्षात न राहिलेल्या यातल्या ठूम-या ऐकल्या आहेत. 'मी डोलकर डोलकर'ची मूळ पंजाबी चीज, माऊली गुरुमाउली, रसके भरे तोरे नैन, बोला अमृत बोला ऐकलंय. अजून कुणी कुणी माहित असलेली गाणी सांगेल, ती ही ऐकेन. मुळात ती अमक्या रागात आहेत म्हणून आवडलीत असं नाही. मूळ नुसरत फतेह अलीच्या गाण्यावरून घेतलेलं 'तू चीज बडी है मस्तं मस्तं' भीमपलास आहे हे कळलं म्हणून जास्ती आवडतं अशातला काही भाग नाही. फक्तं आडनाव 'दिक्षित' दिसलं तर आपण जरा उत्सुकतेने बघतो, त्यातलं आधी काहीतरी आवडलेलं असतं, एवढंच. :)

जयंत विद्वांस

Friday, 10 June 2016

फेसबूकीय साहित्य - कविता (१)…


श्री.मार्कराव झुकेरबर्गसाहेब यांच्यामुळे बाकी कुठल्या भाषेत नसेल इतका साहित्य प्रसव मराठी भाषेत फेसबुकावर झाला असावा हे माझं फार अभ्यास न करता मांडलेलं ठाम मत आहे. सातत्यानी फक्तं चांगलंच लिहिणारे पुलं, गदिमा, वपु, खेबुडकर वगैरे मंडळी आणि गांधारीसुद्धा लाजली असती इथला साहित्यप्रसूतीचा स्पीड बघून. सकाळी उठल्यापासून ब्याटरी संपल्यामुळे किंवा डोळे मिटल्यामुळे नाईलाजाने झोपेपर्यंत, सांडगे टाकतात तसं लोक, सॉरी, साहित्यिक इथे बादल्याच्या बादल्या अंगणात आणून ओतत असतात. सचैल स्नान घडतं, सदासर्वदा शंकराची पिंड जशी अभिषेक करून सतत ओली, ताजीतवानी दिसते तसं वाटतं अगदी. मला तर वेगळीच भीती वाटायला लागलीये. त्या मोबाईल गेम्स मध्ये आधीची लेव्हल नाही जमली तर तिला वगळून पुढच्या लेव्हलकडे जाताच येत नाही. झुक्यानी पेड बेसिसवर करावं तसं, अमक्या माणसाच्या पोस्टीला लाईक केल्याशिवाय एफबी वापरूच शकणार नाही तुम्ही. तसं काही फेबुवर झालं तर अकौंट बंद करावं लागेल.

कुठला म्हणून प्रांत इथल्या साहित्यिकांनी सोडला नाहीये. स्तिमित व्हायला होतं. एवढे साहित्यप्रकार चकटफू वाचायला कुठे मिळाले असते. कविता प्रांतात तर नुसती रेलचेल आहे. नुसत्या टिंबापासून, एकशब्दी, द्विशब्दी ते एकोळी, दोनोळी, तीन ओळीची हायकू, चारोळी, पाचोळीची लिमरिक, षडाक्ष-या, अष्टाक्ष-या, चौदा ओळीची सुनितं, ओव्या, आर्या, अभंग, भूपाळी, गवळण, वासुदेव, भारुड, मुक्तछंद (निबंध लिहून नंतर एंटर दाबून चारचार ओळींचे पॅराग्राफ केलेले मुक्तछंद वेगळे), अनेक वृत्तातल्या, वृत्तीतल्या कविता, विडंबन, विटंबन, दुर्बोध, विद्रोही, बालिश, बाष्कळ, चावट, निरर्थक कविता, गझला (रदीफ असलेल्या, नसलेल्या - राम नसलेल्याच्या धर्तीवर), हझला, सुट्टे शेर, मिसरे, अनुवाद, दुस-याच्या आपल्या नावावर खपवलेल्या (इथे घाम टिपलाय, टॉवेल पिळून वाळत घातलाय, नोंद असावी)  आणि अजून काही राहिले असतील तर ते, इतके वैविध्यपूर्ण प्रकार वाचायला मिळतील. यात दिग्गजांच्या कॉपी पेस्ट हा अजून वेगळा प्रकार. त्यावर आलेले उमाळे, मूळ आणि इथल्या स्वयंघोषित विद्वानांनी काढलेले अर्थ, रसग्रहण, नुसती गजबज आहे तुम्हांला सांगतो. यात सिझनल काव्यंप्रसव वेगळा. सणासुदीच्या शुभेच्छा, आठवणी, ऋतूबदल, थोरामोठ्यांच्या जयंत्या, निधन, सॉरी, महानिर्वाण हे वर्षभर पुरवलं जातं.

उन्हाळा आणि हिवाळा हे तसे तळागाळातले ऋतू. त्यांच्यावर फार कविता वगैरे होत नाहीत. एकात आहेत ते कपडे काढावे लागतात, एकात घालावे लागतात, यात वेळ जात असावा. मधल्या पावसाळ्याला मात्रं कायम कौतुक नशिबात आहे. पावसाळ्याची वाट शेतकरी आणि चातक पहात नाही इतकी कविवर्ग बघतो. पहिला थेंब, मातीचा वास कंटाळा येईपर्यंत हुंगावे लागतात. आधी वारा सुटला, लाईट गेले, गुरं हंबरू लागली की थोड्याच वेळात पाऊस येणार असं असायचं. परवा तर एकानी कविता लिहायला घेतो असा विचार केला तर ढग गोळा झाले होते म्हणे. एका कविमंडळात दुष्काळावर उपाय सुचविण्यात आला होता. एकानी केरळात जायचं. ढगाखाली उभं रहायचं आणि रिले किंवा दिंडी पद्धतीनी कविता करत इकडे महाराष्ट्रात यायचं म्हणजे पाऊस मागोमाग येईल आणि दुष्काळ कधीच पडणार नाही. नदीचं पाणी पळवतात तसं ढग पळवले म्हणून वाद होईल म्हणून ती योजना बारगळली. इतकी चांगली योजना अंमलात न आणता आल्यामुळे मंडळात झालेला अश्रुपात पावसापेक्षा जास्ती होता म्हणे. उघड्या जिलबीवर जश्या थव्यांनी माश्या बसतात ना तसे कवीलोक जथ्थ्यानी हिंडत असतात पावसात.

त्यात पण प्रकार आहेत, प्रत्येक गोष्टीवर कलाकुसर आहे - त्याची आठवण, विनवणी, वळीवाचा शिडकावा, तो आल्याचे स्वागत, थांबल्याचं कौतुक, मधेच गायब झाल्यावर झालेला विरह, न पडल्यावर किंवा अती पडल्यावर झालेल्या नुकसानीचा ताळेबंद, पाठवणीच्या विरहण्या. त्यात तुम्ही महाराष्ट्रात कुठे रहाता त्या प्रांतातला पाऊस त्यात वेगळा दिसला पाहिजे. बटाटे, आलं, भुईमुग, रताळी रोपाला जमिनीवर येतात की खाली असल्या किरकोळ गोष्टी माहित नसल्या तरी शेतक-यांची दु:खं ओसंडून वहात असतात शहरी कवितातून. किरकोळ पंधराएक हजार कर्ज असलेला शेतकरी कवितेतलं त्याचं दु:खं वाचून डिप्रेशन मध्ये जाईल इतकं मूलगामी दु:खं असतं त्यात. नात्यातल्या लग्नात एखादी आत्या, काकू, मामी जशी ट ला ट जोडून मंगलाष्टक लिहिते आणि गाते पण हौसेने तसं पावसाळ्यात असतं. पावसाचे प्रकार, रंगछटा पावसाला माहित नाहीत तेवढे कवींना माहित असतील. विणीचा हंगाम असतो पावसात कवितेसाठी. सुफला १५:१५:१५ आधीच टाकून ठेवलेलं असतं, त्यामुळे तुफान पीक येतं.

एकदा ते काव्यं पोर फेबूच्या भिंतीवर डकवलं की त्याचं संगोपन करावं लागतं. ते तुमच्या भिंतीवर किंवा कुठल्या ग्रुपात टाकलं असेल तर दुसरी प्रसूती होईपर्यंत त्याला तळागाळातून वर काढावं लागतं वरचेवर. काही धूर्त लोक कॉमेंटला चार दिवसांनी उत्तर देतात म्हणजे ते नव्यानी पावडर बिवडर लावून बोर्डावर येतं. त्यात तुम्ही कुणाच्या नावाच्या मुसक्या बांधत असाल पोस्टीत तर तेवढं कौतुक नक्की. काही विद्वान तर लोकाच्या पोस्टीत जे असतं त्या सदृश यांनी काही आधीच लिहिलेलं असतं ते फेवीक्विक लावून कामेंटीत चिकटवतात, काहीजण पोस्टीतल्याच चार ओळी टाकून पुढे अंगठा आणि शेजारच्या बोटाची सुंदर अशी आकृती काढतात. बाकी 'सुंदर, अप्रतिम, क्या बात है, मार डाला, चाबूक, कसं सुचतं हे असलं भन्नाट, लैच आवडलंय, तरल, जीव घेशील एक दिवस, …., ….!, या अगम्य खुणा सांस्कृतिक वारसा असलेला __/\__ आणि आवडली असल्यास, नसल्यास, कळली नसल्यास उगाच वाईटपणा नको म्हणून टाकलेल्या असंबद्ध स्मायलीज या झुक्यानी अधिकृत केलेल्या कॉमेंट्स आहेत असा समज होईल इतक्या प्रमाणात असतात. कुणी अमुक अमुक यांची तमुक तमुक कविता आठवली असा उल्लेख करून 'कॉपी असण्याची दाट शक्यता आहे' अशी गर्भित अर्थ असलेली कॉमेंट टाकून मज्जा बघतो. माझा कंटेंट कसा वेगळा आहे किंवा ग्रेट मेन थिंक अलाईक या चर्चेवर दोन दिवस आरामात निघू शकतात.

दुष्टंचक्रं आहे सगळं. हेरोइनची सुई एकदा टोचून घेतली की नंतर तरणोपाय नाही तसं होतं. एखादी संस्कृती नैसर्गिक कोपात जशी पृथ्वीच्या उदरात गडप होते (कालांतराने निरुद्योगी लोक ती खणून काढतात आणि वर्तमानात मुलांचा पुस्तकी इतिहास अवघड करतात) तसं जर उद्या फेबू बंद पडलं तर ही काव्यंसंस्कृती किंवा विकृती गडप होईल अशी मला भीती वाटते. एक धंदा बुडाला म्हणून माणूस अजून दुसरा धंदा करतो तसं दुसरं काहीतरी मिळेलच पण या लाईक, कॉमेंटच्या संख्येची झालेली सवय मोठी अवघड आहे लवकर सुटायला. पिंड ठेऊन कावळ्याची वाट बघतात तसे लोक पोस्टून वाट बघतात कुणी त्याला शिवण्याची, त्याची मोजदाद ठेवतात. सगळेच वाईट, टुकार आहेत असं अजिबात नाही. जे चांगले आहेत ते टिकतीलच. पण बदकांची संख्या वाढली की हंस एकटा पडतो तसं झालंय. वाचणारा पण राजहंस हवा, नीर वगळून क्षीर कुठलं ते त्याला समजायला हवं. फेबू म्हणजे वर्तमानपत्रं, उद्या शिळं होणारं. पाठोपाठ डिलीव्ह-या झाल्या की मूल अशक्तं होतं हा निसर्गनियम प्रतिभेला पण लागू आहे. अपवाद असणारच पण अपवाद विरळ असतो म्हणून तो अपवाद.

पद्य असो वा गद्य आतून आलं पाहिजे. मुद्दाम टोक करून टुचुक केलेलं वेगळं आणि अनपेक्षित काही टोचल्यावर जे लागतं यात फरक आहे. भावना कुठलीही असो, वेदना, आनंद, दु:खं, राग ती सहजतेने भिडली पाहिजे. आव न आणता लिहिलं की जमतं. लिहिणा-याचं नाव विस्मृतीत गेलं तरी लिहिलेलं 'अक्षर' पाहिजे, 'अ-क्षर' म्हणजे ज्याचा क्षय किंवा नाश होत नाही ते. शेकड्यात मोजल्या जाणा-या वर्षांपूर्वीचे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, मोरोपंत टिकून का राहिले? कुठलाही आव नाही, या मनातलं त्या मनात पोचेल, समजेल, पटेल इतक्या सोप्या भाषेत आणि मुळात उपजत लय, गेयता असलेलं त्यांनी लिहिलं म्हणून. शांता शेळके, इंदिरा संत, अनिल, बी, पाडगांवकर, विंदा, बोरकर, कुसुमाग्रज नाव विस्मृतीत जातील कदाचित पण कुठेतरी त्यांनी लिहिलेलं 'अ-क्षर'टिकून राहील.

जाऊन अठ्ठेचाळीस वर्ष झालेल्या तुकडोजी महाराजांची 'राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली' सारखं सोप्पं, 'अक्षर' कुणी लिहिलं आत्ता तर या झुक्याच्या पुस्तकाचा उपयोग होईल नाहीतर डंपिंग ग्राउंड आणि यात फरक तो काय राहील?

जयंत विद्वांस

Thursday, 9 June 2016

ट्रूथ इज अ शॉर्टकट... (४)

जयकांत शिक्रे २०११ च्या 'सिंघम'मध्ये म्हणाला 'कुछ भी करनेका लेकिन जयकांत शिक्रेका इगो हर्ट नही करनेका' पण जयंत शिक्रे ९२ लाच हे म्हणालाय. मोकळेपणानी कुणी मुलगी (तेंव्हा, आता बायका) बोलली की माझे डोळे लगेच गाभूळल्यासारखे वगैरे होत नाहीत, नो मनोरे, नो ड्रिम्स. एकतर मी स्वत: कुणाशी बोलायला जात नाही आणि माझ्याशी अवगुणांमुळे बोलायला येणा-या कमीच होत्या. आमच्या क्लासला एक गुज्जू आणि अजून एक आमच्याच वर्गातली पण होती. गुज्जू आणि मी जाम धमाल करायचो मागच्या बेंचवर. एकदम भोळसट. ए शम्मे, नीट बस, अंघोळ केलीस का अशी खेचाखेची सतत चालायची. ती दुसरी होती, ती एकदम अलका कुबल, आशा काळे मटेरीअल. डोक्यावर पदर घेऊन घरी नेली तर आईबाप आनंदाश्रू इंट्रप्ट करून 'मला अश्शीच सून हवी होती' असं म्हणून तिला जवळ घेणार आणि मीच नालायक जावई असल्यासारखे माझ्याकडे बघणार असला एकूण ऐवज तो. मी कधीच तिला काही बोललो नाही. तिला आम्ही ससा म्हणायचो. आत्ता पुढे कधीही पडू शकेल अशी चालायची ती. पोरगी छानच होती. गुब-या गालांची, गोरी, सज्जन एकदम. पण असं काही दिसली पोरगी की बसलं प्रेम असं होत नाही (यश चोप्रा काही का दाखवेना). काहीतरी हळूहळू क्लिक होत जातं.

तर ९१ ला मी परत पुण्याला आलो बदलापूरवरून, जानेवारी ९२ ला जाऊन अभ्यास करून टी.वाय.द्यायचं असा प्लान. एस.वाय.चा शेवटचा पेपर होता त्या दिवशी. कुठेही सतत गेलं की किंमत कमी होते म्हणून मी दोन वर्ष तसाही क्वचित गेलो कॉलेजला, परीक्षेला काय सलग गेलो असेन तेवढाच (त्या थापा आणि फी माफीच्या पैशांची गंमत परत कधीतरी). तर येताना शम्मी, हेमा आणि ती बरोबर होत्या ट्रेनला. अंबरनाथला शम्मी म्हणाली, 'प्लाटफॉर्मला थांब, तिरसटासारखा जाऊ नकोस लगेच, तुझ्याशी बोलायचंय'. ती सात मिनिट लई भारी होती. गुज्जू काय वाईट आहे, घरी काही म्हणणार नाहीत, मलाही आवडतेच, पण ती लई पैकेवाली आहे पण तीच तयार असेल तर आईबाप काही म्हणणार नाहीत अश्या पट्ट्या ब्रेकिंग न्यूज सतत दाखवतात तशा डोक्यात स्क्रोल होत होत्या. जर ती म्हणाली ILU तर आपण पण लगेच 'आय टू' म्हणायचं. ट्रूथ इज अ शॉर्टकट, स्पेलिंग चुकायला नको, जीभ चाचरायला नको, मोजकं बरं पडतं अशावेळी. बोलताना खांबाला धरून उभं रहायचं फक्तं. हेमा, शम्मी आणि ती थांबल्या. माझ्या पोटात लोणार सरोवराएवढा खड्डा. शम्मी आली, 'ती'ला तुझ्याशी बोलायचंय'. जलयुक्तं शिवार अभियानात एका वळवाच्या सरीत खड्डा भरावा तसं झालं, लोणार गायब.

ती घाबरत पुढे आली. खाली मान घालून म्हणाली, 'कधी बोलले नाही पण मला तू फार आवडतोस.' मला काय शब्दं फुटेना, उर्मट असलो तरी 'आय डोंट' एवढं मोजकं बोलणं काही बरोबर दिसणार नाही म्हणून गप्पं बसलो. 'उद्या मी पुण्याला चाललोय, तुला शक्यं असेल तर आपण संध्याकाळी भेटू आणि बोलू', 'चालेल, सहाला येते ब्यारेज रोडला', 'बाय'. संध्याकाळी मी आणि धना गेलो. माझ्यावर विनयभंगाचे चारपाच गुन्हे दाखल असल्यासारखी ती शम्मी आणि हेमाला घेऊन आली होती. (हेमा पोरांच्यावर गुटखा खायची, एकदम फटकळ). आम्ही आपले एका कट्ट्यावर बसलो बाकीचे पुढच्या कट्ट्यावर. प्रेम असं व्यक्तं करणं मला कधी जमलेलं नाही. कळतं ते आपोआप. 'आवडतो म्हणजे काय आवडतं नेमकं?' 'तुझी हुशारी, मला उंच मुलं आवडतात आणि तू दिसतोस ही छान (पिरेम आंधळं असतं किंवा ती माझं मन मोडू नये म्हणून म्हणाली असणार हे वाक्यं)'. मला पाल्हाळ जमत नाही. म्हटलं, 'तू छानच आहेस, कुणालाही आवडावी अशी आहेस पण मी तुझ्याकडे कधीही त्या नजरेने बघितलेलं नाही, त्यामुळे माझी ती मानसिक तयारीही नाही. उगाच तुला हो म्हणून, फिरवून नंतर नाही म्हणणं हे मला जमणार नाही, मी तसं कधीही केलेलं नाही, अजून माझं जॉबचं काही माहित नाही, त्यामुळे आपण इथेच थांबूयात. तू मोठ्या मनानी आधी विचारलंस त्याबद्दल आय रिस्पेक्ट यू पण कुठलाही वाईटपणा न घेता आपण चांगले मित्रं राहूयात'.

इगो हर्ट झाला की संपलं सगळं. खदखदून राग आला होता तिला. माणूस मग वाकड्यात शिरतो, भांडायचं म्हणून भांडतो. मुलगी विचारतीये आणि मुलगा नाही म्हणतोय, बहोत नाइंसाफी है वाली बात. 'मला एवढ्या जणींनी सांगितलं 'हा मुलगा चांगला नाहीये' तरीही मी तुला विचारलं याचं तुला काहीच नाही'. 'चांगला नाहीची व्याख्या काहीही असू शकते ना पण प्रत्येकाची, चांगला नाहीये म्हणजे नेमकं काय?' 'तू सिगरेट ओढतोस, तंबाखू खातोस, कॉलेजला येत नाहीस, उद्धट आहेस एवढं सगळं असून पण मी तुला विचारलं त्याची तुला किंमत नाही.' 'मी ते स्वकष्टार्जित पैशानी करतो (तेंव्हा मी इस्त्री करायचो दिन्याच्या लॉन्ड्रीत, पंधरा पैसे नग, तासाला वीस, असे आठ तासाचे साधारण पंचवीस रुपये मिळायचे), त्यामुळे मला कुणाच्या सर्टिफिकेटची, परवानगीची गरज नाही, ते चांगलं की वाईट हे मी ठरवेन आणि 'एवढं सगळं असून पण' या मेहेरबानीची गरज तर अजिबात नाही, बाय'. कवटी फुटल्यावर पाय ओढत निघतात तसे सगळे निघालो आणि चौकात वेगळे झालो. मी विसरून गेलो. तिनी पुढे बरेच उद्योग केले चिकाटीनी मी हो म्हणावं म्हणून पण माणूस एकदा उतरला की उतरला मनातून.

मी इकडे आल्यावर तिनी एकदा धनाला चौकात गाठून सांगितलं, जयंताचं पत्रं माझ्याकडे आहे, ते माझ्या भावाला सापडलंय आणि तो त्याला धरून मारणार आहे. धनानी सांगितलं, 'एक तर तो नाही म्हणालाय म्हणजे तो पत्रं लिहिणार नाही हे कन्फर्म, एक पानी पत्रं तर नाहीच, तो रेग्युलर पत्रं कमीतकमी वीसेक फुलस्केप लिहीतो (नो अतिशयोक्ती), तू पत्रं आणि भाऊ घेऊन ये, आधी मला मार, मग त्याचा पत्ता देतो'. पत्रं नव्हतंच. ती आलीच नाही. मग ती लोकं पण पुण्याला शिफ्ट झाली. 'हॉटेल रविराज'ला पत्ता शोधून ती, तिची एक मैत्रिण आणि दोन मुलं घेऊन आली होती. तू नाही म्हणालास तर ती मुलं काय करतील ते मी सांगू शकत नाही म्हणाली. म्हटलं दोघांनाही इथून बाहेर जाऊ देणार नाही, कसं करूयात. दोनेक तास ती आणि तिची मैत्रिण मला समजावत होत्या. मी नंतर सांगतो वगैरे घोळ घातलाच नाही. ट्रूथ इज अ शॉर्टकट. 'आय डोंट' म्हणालो. पंचाण्णवला ती सिंहगड रोडला भेटली होती मला. अर्धाएक तास गप्पा मारल्या मी रस्त्यातच. 'लग्नं झालं तुझं?' 'नाही अजून', 'माझंही नाही आणि अजूनही मला तू आवडतोस, आपण महिन्यातून एकदा फक्तं कॉफी प्यायला तरी भेटत जावूयात का?'.

'नको, भेटू परत कधी असेच रस्त्यात', असं म्हणून मी निघालो. यू नो, ट्रूथ इज अ शॉर्टकट.

जयंत विद्वांस

    

Wednesday, 8 June 2016

Truth is a shortcut... (३)

कुणाला कशावरून काय आठवेल आणि काय लक्षात राहील हे सांगता येत नाही. किल्लारीचा भूकंप तीस सप्टेंबर ९३ ला झाला हे लक्षात राहण्याचं माझं कारण वेगळंच आहे. एका बँकेत ट्रेनी म्हणून लागलो होतो सहा महिन्यांकरिता. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर, मोजून सहा महिने. स्टायपेंड भरभक्कम पाचशे रुपये महिना. आम्हांला भरावे लागले नाहीत शिकण्यासाठी हाच आनंद. कॉम्प्यूटर नव्हताच, सगळं म्यानूअली काम. परंपरागत लेजर्स. संचालक ओळखीचे होते. ते म्हणाले, एन्ट्रन्स पास झालास तर मला शब्दं टाकता येईल. त्यांची परिक्षा दिली. साडेचारशे मुलं होती परिक्षेला, म्हटलं आपलं काही होईलसं वाटत नाही पण दिली. माझा दुसरा नंबर आला असता तरी एकंच जागा होती हे त्यांना कारण झालं असतं. ग्रहयोग बलवत्तर असावेत. मी बोर्डावर रिझल्ट पहायला गेलो होतो वैकुठांत जातात त्याच उत्साहानी. चारशेएकोणपन्नास माझ्या नावाच्या खाली होते त्यामुळे बहुतेक नाईलाजानी त्यांना मला घ्यावं लागलं.  

सहा महिने चोख काम, एकही दांडी नाही, लेट मार्क नाही, हाफ डे सुद्धा नाही, एकही चूक नाही. मी 'करंट'ला बसलो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. माझा स्पीड बघून माझ्या सिनिअरला भवानी पेठ ब्रांचला माणसं कमी म्हणून तिकडे पाठवला पंधरा दिवसात. मी आणि मागचे ऑफिसर सोडून आजूबाजूला सगळ्या बायका. तिथे माझ्या बरोबरच जॉईन झालेली एक स्क्रोलला होती. (उसके बारेमें फिर कभी). तर सगळी बारा दणदणीत लेजर्स माझ्या उरावर टाकून सगळे निर्धास्त झाले. खातं ओव्हर झालं की लगेच व्याज काढणे, पान संपलं की व्याजाची टोटल मारणे वगैरे काम लगेच असायचं, पेंडिंग काही नाही. स्वत:च्या सबसिडीज लिहून झाल्या की 'सीसी'ला मदत करणे, 'डे बूक'चा घोळ काढणे, बंडलं मोजून देणे, फ्यासिट मशिनवर क्लिअरिंगच्या टोटल मारणे वगैरे कामं मी चकाट्या पिटत करायचो. हेतू हा की माहिती होते. रोजच्या कामवालीला पन्नास जास्ती देऊन बायका जशा पितळी भांडी, खिडक्या धुणे, जळमट काढणे, फरशी पुसणे, चादरी पिळून घेणे वगैरे जमतील तेवढी कामे उरकून घेतात तसा मी सहा महिने तिथे होतो. श्यामच्या आईनी श्यामला दुस-या मांडीवर ठेऊन मला दत्तक घेतलं असतं इतका गुणी. 

आमच्या व्याजाच्या आम्ही २९ लाच ३० ची तारीख टाकून एन्ट्रीज् केलेल्या. त्या सकाळी आल्यावर चेक करून सबसिडीज लिहून मी तासात मोकळा पण झालो. काही अशुभ घडलं की वातावरण बदलतं (इंदिरा गांधी गेल्या तेंव्हाचं मला अजून आठवतं). मळभ होतंच, कुणीतरी बातमी आणली की किल्लारीला भूकंप झाला. तेवढ्यात लाईटही गेले. वेळेत काम करण्याचा आणि क्याल्क्युलेटर न वापरण्याचा आनंद त्यादिवशी मी सगळ्यात जास्ती घेतला. बँकेत अंधार. आकडे दिसेनात क्याल्क्युलेटरचे, फ्यासिट मशिन एकंच. हातानी बेरजा करण्याची सवय नाही, पब्लिक पागल नुसतं, मेणबत्त्या लावून सेव्हिंग, लोन, सीसीची व्याजं काढणं चालू झालं. मी आणि ऑफिसर मस्तं खुर्च्यात बसून गंमत बघत होतो. त्यांचा माझ्यावर जीव होता. माझा सी.आर.पण त्यांनी मला दाखवला होता. चांगला होता सगळा. 'म्यानेजर होशील तू चारेक वर्षात, ग्रिप आहे तुला' असं म्हणाले होते. सगळ्यांना आणि माझ्या त्या दोस्तीणीला बाय करून निघालो. ती पण मला भेटलेली नाही आजतागायत त्यानंतर. असो!

नंतर वर्षभर संचालकाला फोन झाले, करतो म्हणायचे नेक्स्ट मिटिंगला. शेवटी त्यांनी सांगितलं कंटाळून 'आम्ही नाही घेत कुणाला (?), असलं काही तर सांगेन'. जात आडवी आली असावी असा अंदाज होता. नंतर पुरोगामी ज्यांचा वारसा सांगतात त्या त्रयीपैकी जातपात न मानणा-या एका राजाच्या नावानी असलेल्या बँकेत एकानी जायला सांगितलं होतं इंटरव्ह्यूला. त्यांनी आधी बायोडेटा देऊन कौतुक करून ठेवलं होतं. मी रीतसर फोन करून गेलो. म्यानेजर सरळमार्गी असावा. एकतर माझी आडनावावरून जात ब- याच जणांना कळत नाही. दाढी वरून कुणी कुणी मला ईदच्या शुभेच्छासुद्धा दिल्यात, कुणाला विद्वांस हे नाव आहे असंही वाटलंय. एक जण मला यूपीचा समजून माझ्याशी कायम हिंदीत बोलायचा आणि मी मराठीत. तर तिथे एका ओळीचा इंटरव्ह्यू झाला फक्तं. अतिशय शरमून त्यांनी विचारलं, 'विद्वांस म्हणजे कोण तुम्ही?' मी सांगितलं. 'फोनवर विचारणं बरं दिसणार नाही म्हणून तुम्हांला या भेटायला म्हणालो होतो, आम्ही घेत नाही 'तुम्हांला', आमची अघोषीत पॉलिसी आहे ती, सॉरी'. 

त्या सज्जन माणसाची कुचंबणा मी समजू शकतो. पाल्हाळ तसाही मला मुळातच आवडत नाही. मोजकं आणि मुद्देसूद असलं की अर्थ पटकन कळतो. मी म्हणालो तसं Truth is a shortcut, त्यांनी तोच तर शॉर्टकट वापरला. 

जयंत विद्वांस      

Truth is a shortcut... (२)

अकरावी उरकल्यानंतर बारावीचे दोन महिने झाले असतील आणि मी रस्टनला गेलो 'टर्नर' अप्रेंटीस म्हणून. 'मशिनिस्ट' म्हणून घेतलं आणि नंतर 'टर्नर' सांगितल्यामुळे माझा मूड गेलाच होता नाहीतरी. अर्थात मशिनिस्ट होऊन मी काही फार मोठे दिवे नसते लावले पण दु:खी व्हायला कारण लागतं माणसाला काहीतरी. माणूस आधी कारण शोधतो मग त्याप्रमाणे दु:खाची क्वांटीटी ठरवतो. तिथे तीन वर्ष गेली. थेअरी, गणित वगैरे मला भन्नाट मार्क्स पडायचे. आयसोमेट्रिक ड्रोईंग मी ए डबलप्लस ग्रेडचं काढायचो. आम्हांला अत्यंत खत्रूड व्ही.पी.जोशी म्हणून ट्रेनिंग ऑफिसर होते. शिव्या देणे, घाणेरड (म्हणजे आमच्या लेव्हलचं) बोलणं, आम्हांला एखादा शब्दं समजेपर्यंत पुढची दोन वाक्यं फाडफाड इंग्रजीत बोलणं असली कामे ते करायचे. एकतर कानडी हेल भाषेला आणि हातात सतत शिग्रेट. आम्हांला गुरुवारी एटीएसएसला थेअरीला जावं लागायचं. ते ही तिथे यायचे. साठीच्या आसपास असतील. तिथली पंचेचाळीशीची क्लार्क आणि त्यांचं झेंगट आहे असं लोक म्हणायचे आणि खात्री होईल असं ते वागायचे पण. 


त्यांना दोन असिस्टंट, साळवी आणि कोकाटे. कोकाटेंना लॉगटेबल पाठ होतं पण त्याचं टेक्निक त्यांनी शेवटपर्यंत कुणाला सांगितलं नाही. तर अशी तीन वर्ष संपली. थेअरीचा प्रॉब्लेम नव्हताच. प्र्याक्टीकल औंध आय.टी.आय.ला होतं. तिथली मशिन्स कशी दिव्यं आहेत हे सिनिअर लोकांनी सांगितलं होतं. तरीपण आम्ही जीवावर उदार होऊन पोचलो. आमच्या इथून तीनचार प्रकारची टूल्स धार लावून, सेंटर ड्रिल नविन करकरीत नेलंच होतं. सकाळी आठला गेलो होतो सगळे. आमचे नंबर पाडून झाले. रात्री तीनच्या आसपास माझी परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलं. निम्मी पोरं सेटिंग लावायच्या मागे, ड्रोईंग घ्यायचं आणि बाहेरून जॉब करून आणायचा आणि मास्तरला पैसे द्यायचे. मला आर्थिक दृष्ट्या शक्यं नव्हतं आणि मी ते करणारही नव्हतो. काहीजण दारू प्यायला गेले रात्री पेपर म्हणून. 



एवढी भिकार परीक्षा मी आजवर दिलेली नाही. दिवसभर तिथे आम्ही सगळे बसून होतो. घरी जा आणि रात्री या यावर कुणी ठाम सांगेना. रात्री तीन साडेतीन आमचा लास्ट लॉट आला. मी ड्रोईंग, एमेसचा बार, त्यांनी दिलेलं एक दळीद्री टूल घेऊन मशिनपाशी आलो. जॉब सिंपल होता.पण मशिन बघून मी नापास होणार हे कन्फर्म झालं. त्याचे जॉ कितीही टाईट केले तरी जॉब पकडायचे नाहीत, 'की' नुसती फिरायची. तो कसाबसा पकडला आणि टूल लावलं तर ते सेन्टरच्या खाली. प्याकिंग पट्ट्या शोधायला अर्धा तास गेला. जो तो ज्याच्या त्याच्या जॉबच्या मागे. टूलपोस्ट गदागदा हलायचं. फेसकट काढतानाच टूल उडालं. मग परत तोच सगळा खेळ. मग सेंटर ड्रिल मारायला घेतलं तर ते एक्सेंट्रिक जात होतं. तरीही कसबसं ड्रिल मारून जॉब बाहेर काढला आणि टर्निंगला लावला. मशिनला फौंडेशनच नव्हतं. एक एमेमच्या कटला ते हलायचं. दोन इंचावर गेलो असेन, मशिन हललं आणि जॉब निसटला, टूल उडालं. मी मशिन बंद करून शांत उभा राहिलो. पहाटे साडेपाचला परत सगळा खेळ करायची माझी मानसिक तयारीच नव्हती. 



एकाचं मशिन एचएमटीचं होतं. त्याचा जॉब होत आला होता पण त्याच्याकडे दुस-यानी नंबर लावला होता. त्याचा होणार कधी आणि माझा लावणार कधी. सातला मास्तर आला आणि हाकारा झाला जॉब सबमिट करायचा. सगळ्यात पहिला तो दळीद्री रॉड आणि तुटलेलं टूल त्याच्या पुढ्यात टाकलं आणि मी निघालो. मला बोलावून त्यानी विचारलं, 'काय झोपला होता का रात्रभर'. एक तर राग आलेला त्यात झोप आणि उद्विग्नता. म्हटलं 'नाही, #* घालत होतो रात्रंभर'. 'काय मस्ती आली का रे, नापास तर होणारच आहेस पण परत बसलास तरी इथंच यायचंय परीक्षेला'. 'बसलो तर प्रश्नं येईल ना हा, तुम्ही जॉब करून दाखवा त्या मशिनवर, पैसे घेतलेत तरी जमणार नाही'. मी आपलं घरी आल्या आल्या सांगून टाकलं मी नापास होणार आहे ते. थेअरी आणि इतर विषयात ७५ टक्केच्या आसपास होते मला. ८८ साली मी तो नापास रिझल्ट आणायला पण गेलो नाही. तरीही मी फिनोलेक्स केबलला दोन महिने रिझल्ट लागायचाय म्हणून नोकरीही केली. 



नापास झालो तेच बरं झालं. तो माझा प्रांत नव्हताच. उगाच पास झालो असतो तर त्यात नोकरी करावी लागली असती आणि कुचंबणा वाढली असती. तरीही मी काही काळ पुढे तो उद्योग केला. मग महाजनांच्या 'स्वाध्याय'ला आर्ट्सला गेलो सहा महिने पण यात काही चरितार्थ चालणार नाही हे लक्षात आलं. काय करावं हा गहन प्रश्नं होता मग डायरेक्ट बारावी कॉमर्स. अकरावी न केल्यामुळे मला नियम माहित नव्हते अकाउंटिंगचे. एफवायला नियम माहीत नाही असं सांगितल्यामुळे उद्धटपणा केल्यामुळे मला बाहेर काढलं होतं. मग मी गेलोच नाही दोन वर्ष कॉलेजला. अजूनही मला ते नियम माहित नाहीत. त्यामुळे मला जर्नल एन्ट्र्या यायच्या नाहीत, त्यामुळे मी बारावीला बारा मार्कांचा 'बिल ऑफ एक्स्चेंज' सोडवलाच नाही तरीपण मला ८५/८८ पडले होते. चुकून ते आलं असतं तर ९७ पण पडले असते. पोरं म्हणायची, मग तुला येतं कसं, नियम माहित नाही तर. मी सांगितलेलं त्यांना पटणार नाही म्हणून कधी सांगितलं नाही. 



जे उरावर आहे ते देणं, ते डाव्या हाताला, ते देण्यासाठी जे विकता येईल ती मालमत्ता, ती उजव्या हाताला. एवढं समजलं की झालं. तिचा समतोल ढासळला की धंदा बुडीत एवढं निश्चित. दुस-यानी कमावलेल्या आणि खर्च केलेल्या पैशाचा हिशोब ठेवण्याचा बदल्यात पैसे घेणे एवढाच माझा त्याचा अर्थ आहे. 'वर'च्या चार्टर्डनी आपलं अकौंट राईट ऑफ करेपर्यंत इथली येणी आणि देणी यांचा मेळ घालता आला म्हणजे झालं. लोकांना फक्तं आकडे दिसतील, ते आले कसे त्यातलं खरं खोटं आपल्यालाच माहित. :)   


जयंत विद्वांस       

Tuesday, 7 June 2016

Truth is a shortcut...

आज दहावीचे रिझल्ट लागले. हल्ली सत्तर टक्क्यांच्या आसपास मार्क्स मिळालेले नाराज वगैरे असतात. मी ८३ ला दहावी झालो तेंव्हा सत्तरच्यावर मार्क्स म्हणजे शंखपुष्पीच्या जाहिरातीला घेतील एवढा हुशार माणूस. मला ६५.३३ होते आणि बारावीला ६५.८६. डॉट पलीकडचे टक्के वाढले हे ही नसे थोडके. पण या सगळ्यात सहा वर्ष गेली.

डिएमईला गेलो साता-याला तर फी, हॉस्टेल, क्लास खर्चाचा अंदाज घेऊन डोळे पांढरे झाले होते. पुण्यात परत येईस्तोवर वर्ग चालू झाले होते. विमलाबाई गरवारे मध्ये ओळख होती बाबांची, केळकरकाका म्हणाले, काय करायचंय तुला, म्हटलं सायन्स. जा बस समोरच्या वर्गात. खरंतर कुठली साईड घ्यावी ही अक्कल नव्हती आणि सांगायलाही कुणी नव्हतं. फिजिक्स, हा अध्यात्मापेक्षा गहन विषय आहे. एकवेळ मी ध्यान, अध्यात्म, योग यात प्राविण्य मिळवेन पण फिजिक्स मध्ये या जन्मात शक्य नाही.

पहिल्या दुस-या चाचणीत कसाबसा तरलो. सहामहीला कित्तीही सोपा पेपर असता तरी मी नापासच झालो असतो इतका मी हुशार होतो. ज्युनिअर कॉलेजला प्रगतीपुस्तक होतं अकरावीला. मी कॉलेजात ओळख असल्यामुळे रीतसर नावात लावतो त्या मधल्या नावाची सही घ्यायची ठरवलं. अत्यंत गुणी अभ्यासू अशी ख्रिस्तपूर्व ८४ काळात माझी ओळख होती. कुठलेही फार कष्ट न घेता मी ती पुढे पुसली. बाबा थबकले, 'तुझी बाई चुकली काय रे, फिजिक्स मध्ये तीन काय लिहिलेत शंभरपैकी'. 'तेवढेच आहेत, पाच गाळलेल्या जागा सोडवल्या होत्या, तीन बरोबर आल्या, अजून किती देणार त्या तरी'. त्यानंतर सही करायची वेळ मी त्यांच्यावर येऊच दिली नाही.

थुंकी उडवत बोलणा-या जोशी बाईंनी अत्यंत उपहासात्मक (कुजकं म्हणतात त्याला) शब्दात सगळ्या वर्गाला ऐकू जाईल असं हलक्या आवाजात सांगितलं, 'आडनाव काय, मार्क काय, निदान एकशे पाच तरी कर बेरीज म्हणजे वर्ष तरी सुटेल हे'. चिडून उठेन वगैरे शक्य नव्हतं. उगाच अशक्यं पैजा मी घेत नाही. मला काय येत नाही हे मला लहानपणापासून कळतं.

तिस-या चाचणीला एकच धडा फिजिक्सचा. मी वर्गात हायेस्ट, सत्तावीस तीसपैकी. बाईंनी टेबलापाशी उभा करून पद्मश्री दिल्यासारखं कौतुक वगैरे केलं. खरे हुशार, अभ्यासू लोक आयुष्यातून उठले असते, साला एवढा अभ्यास करून हा पहिला येणार असेल तर रस्त्यावर बसून पंक्चर काढलेल्या ब-या असले विचार त्यांच्या डोक्यात तरळायला लागले असणार. मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं, 'मला त्या धड्यातली एकही ओळ येत नाही, तुम्ही म्हणालात एकशेपाचचं बघ म्हणून त्या धड्याची गाईडची पानं माझ्या खिशातच होती.' 

जोशीबाई दयाळू म्हणून वाचलो. ती आयुष्यातली पहिली आणि शेवटची कॉपी. लाज वाटायला लावणारं यश कसं असतं ते कळलं. नंतर बरेच उद्योग झाले. त्यावर परत कधीतरी. पण तेंव्हापासून दोन वाक्यं मी कोरून ठेवलीयेत मनात 'Truth is a shortcut' आणि 'Justifying the fault doubles it'. चुकलं ते चुकलं, नाही जमत ते नाही जमत.

आपलं अपयश आपण बोंबलून सांगितलं की लोकांचा आपल्याला चघळण्यातला इंट्रेस्ट संपतो. लपवायला गेलात की लोक मागे लागतात. यश कुणीही सांगेल, अपयश पण यश मिळाल्यासारखं सांगता यायला हवं. ;)

जयंत विद्वांस

नमूने (४)…

काही माणसं इथे धाडण्याआधी त्यांच्यातला विशिष्ठ अवगुण चेक करून पाठवायची सिस्टीम असावी वर, काही उगाच न्यून राहिलं तर विचित्रं दिसेल म्हणून किंवा उगाच आपल्यावर यायला नको म्हणून थोडा अंश वाढवत असेल तिथला डिसप्याचचा (देव) माणूस आणि मग रवाना करत असावा. भोगलेले वाईट प्रसंग, कटू आठवणी, आधीच्या ओढग्रस्तीची परिस्थिती या वा इतर कारणांमुळे आलेला कंजूसपणा मी समजू शकतो. काही जातीत तो अंगभूत असतो. खरंतर पैसा, वेळ ही उधळायची गोष्टं नाही पण आपण दोन्ही उद्याचा विचार न करता उधळत असतो आणि उतारवयात हतबल होतो. काटकसर आणि उधळेपण ही दोन्ही टोकं आजूबाजूला दिसतात. पण अती काटकसर म्हणजे कंजूसपणा. काटकसरच्या नावाखाली जगण्याला कसर लागल्यासारखे लोक वागतात.

माझ्या पाहण्यातला हा नमुना विलक्षण आहे. सतत शेजा-यांवर लक्ष ठेवणे, त्यांनी काय नविन आणलं (आणलं असल्यास कुठून, केवढ्याला, आपल्या पेक्षा स्वस्तं की महाग, रोख की कर्ज काढून हे पोटउद्योग), त्यांच्यात भांडणं, वाद चालू आहेत का?, कर्ज आहे का, असल्यास किती, त्यांच्या मुलामुलींच्या काही भानगडी चालू आहेत का (असल्यास त्याचे पाठपुरावे, पुरावा जमा करणे, चाचपणी करून अधिक माहिती मिळवणे, पसरवणे हे पोटउद्योग), लोकांचे पगार किती, त्यांनी शर्ट जरी नवीन घातला की 'आज काय वाढदिवस का?, तुमचं काय बाबा भारी काम आहे', बाहेर निघताना सापडला कुणी सहकुटुंब तर 'कुठे? गावाला का? कसे जाणार, कधी परत? अशा चौकश्या. स्वत: जगप्रदक्षिणा करून आला तरी कळणार नाही.रक्तात असावं लागतं ते. कदाचित हे सगळं अतिशयोक्त वाटेल पण पुढे जे सांगणार आहे ते खोटं वाटण्याची जास्ती शक्यता आहे.

माणूस खाऊन पिऊन सुखी आहे. जमिनीवरचं ग्राउंड प्लस वन घर आहे. खालच्या दोन्ही रूम भाड्यानी आहेत. एक फ्ल्याट आहे तो भाड्यानी आहे. घरात नवरा बायको मिळून येणारा पगार लाखाच्या आसपास आहे, घराचे हप्ते केवळ आयकर भरायला नको म्हणून आहेत, पन्नासेक हजाराची एफडी दरमहा करत असावेत. येणा-या भाड्यावर घर चालतंय. गावाकडून ज्वारी आणि इतर धान्यं येतंय. आईला पेंशन आहे, त्याच पैशातून ती शेती बघते म्हणजे तिकडेही खर्च नाही. लग्नाच्या जोड्या वरूनच जमतात हे मात्रं इथे अचूक आहे अगदी. बायको थोडा तरी खर्च करू शकेल पण हा मात्रं खरा चिकट आहे. बायकोला एलटीए असतानाही इतर खर्च नको म्हणून साताठ वर्ष हा कुठेही गेला नव्हता, बायको जातायेता गरम भांड्यातला पॉपकॉर्न लाजेल अशा स्पीडनी त्याला बोलत असते त्यावरून विषय निघाला की. त्याच्यासारखं वागायला आपल्याला या जन्मी शक्यं नाही. मी कायम त्याच्याकडे एक मानसिक रुग्ण म्हणूनच बघत आलोय.

त्यानी पेरू, नारळ, आंबा, डाळींब, पपई अशी प्रत्येकी एक झाडं लावलीयेत. फळ धरली की कामावर जायच्या आधी तो ती मोजतो (हो, हे खरंय) आणि संध्याकाळी आल्यावर परत मोजतो. आंबा मोठा झाल्यामुळे त्याला किती दु:खं होत असेल आणि त्यानी बोराचं लावलं नाही याबद्दल मला होणारा आनंद एकाच दर्जाचे किंवा मापाचे आहेत. बरं समजा दिसला एखादा पेरू कमी तर कुणाला धरणार आहे. चोरी केली तर माणूस एक नेत नाही. भाडेकरूला सबमिटर लावलाय. बरं रीडिंग x सहा रुपये असा पठाणी रेट आहे. म्हणजे त्यानी जास्ती वापरलं तरी याचा फायदाच आहे. तरीही हा संध्याकाळी आल्यावर मेन आणी सबमीटरचं रिडिंग उड्या मारून चेक करतो. किती वाढत असेल असं चोवीस तासात? मेंदू फालतू आकडे लक्षात ठेवण्यात किती खर्ची टाकावा म्हणतो माणसानी. मी कुठल्याही लहान मुलाला माझ्या गाडीवरून चक्कर मारतो. त्यानी नविन टू व्हिलर घेतली होती. ते चौघं कायम बायकोच्या स्कुटीवरूनच बाहेर जायचे पण. मला मोठं आश्चर्य वाटायचं. तिचा जीव किती, माणसं किती.

त्याच्या बायकोनी सांगितलं, त्यांची गाडी खराब होते म्हणून ते नेत नाहीत ती गाडी. लोकाच्या सोडा, स्वत:च्या मुलाला त्यानी चक्कर मारलेली नाही त्या गाडीवरून. टाकीजवळचा भाग खराब होतो, मुलं काही न काही हातात घेऊन आपटतात त्यामुळे गाडी खराब होते. त्याच्या आईला डॉक्टरनी भांडभर गार दूध प्यायला सांगितलं होतं काही दिवस. तुझ्या आजारामुळे माझा खर्च वाढतोय म्हणून तो तिच्याकडून अर्ध्या लिटरचे पैसे घ्यायचा. एका भांड्यात अर्धा लिटर बसतं का? आणि जीभ कशी रेटते हे पैसे मागायला? त्याचा भाऊ पलीकडेच सोसायटीत रहातो. तो जरा मागे आहे आर्थिक बाबतीत. आई त्याच्याकडे जाऊन आली की हा भावाला एकटा गाठून चौकशी करतो आईनी काही पैसे दिले का? मग आईला चक्कर मारायला घेऊन जातो, तिच्याकडून माहिती काढतो, नसतील दिले तर हा दु:खी होतो कारण तेवढेच मला पण हवेत हे कसं बोलणार? वर्षाच्या पेंशनचा हिशोब घेतो तो, कुठे खर्च केले ते. त्याचा पुतण्या आलेला दिवाळीच्या दिवशी. तो निघाल्यावर 'थांब रे, फटाके वाजवून जा' म्हणत त्याला थांबवला. लहानच तो, थांबला. लवंगीच्या दोन तीन माळा, प्रत्येकी एक फुलबाजी पाकीट, झाड, चक्रं या कर्णानी त्याला भेट दिलं. हसू फुटलं मला. देऊ नको ना, ऐपत नसती तर गोष्टं वेगळी पण असून द्यायला पण दानत लागते, हेच खरं.

तरी त्याला व्यसन काही नाही, लागूच शकत नाही, तिथे पैसे खर्च होतात. पण ही माणसं पैसा मात्रं चांगला राखून असतात. पण उपभोग कधी घेणार? वरून मिसकॉल आला की संपलं सगळं. उद्या त्यानी मृत्युपत्र जरी करून ठेवलं ना तरी अनेकदा तो ते बदलेल याची खात्री आहे. अंत्यविधीच्या खर्चाची तजवीज पण लोक करतात म्हणे त्यात. तो बंबफोड/चंदन/डिझेल/विद्युतदाहिनी असे ऑप्शन ठेवेल आणि पुढे लिहील कुणी तयार असल्यास चंदन चालेल अन्यथा या पैशात जमेल त्या प्रकारे विधी उरकावा. अवघड आहे. सूड घ्यायला परवा कुणीतरी तुमच्या झाडावरून दोन पपया घेऊन पळून जाताना दिसलं एवढं म्हणायचं म्हणजे तो दोन दिवस हैराण होईल, आपण चकटफू गंमतीचा आनंद घ्यायचा, वर चौकशी करायची आठवडाभर, 'कळलं का कुणी नेल्या ते?' :P  

जयंत विद्वांस    

मार्टका स्मार्ट…

महागाई कितीही वाढली तरी सगळी हॉटेल्स, ढाबे, मल्टीप्लेक्स, मॉल्स, शोरूम्स, ज्वेलर्स, सुपर मार्केट कुठल्याही तारखेला बिनगर्दीची दिसणार नाहीत. डिस्काउंट, अमक्यावर अमकं फ्री, याचे एवढे नग घेतले तर त्याचे एवढे नग निम्म्या किंमतीत. स्वकमाईनी घेतलेल्या गोष्टींपेक्षा फुकट मिळालेल्या वस्तूंचा आनंद सगळ्यात जास्ती असतो आपल्याला. सगळ्या ऑफर्स ठराविक दिवसांकरीता असतात त्यामुळे 'हाच तो क्षण, हीच ती संधी' अशी परिस्थिती असते. तरी तिथे घ्या नाsss ही, छान आहे असा कुणी लाडिक वगैरे आग्रह करत नाहीत, आपल्याला हवं असेल ते घ्या आणि निघा, पन्नास किलो बासमती एकावेळी घेतलात म्हणून तिथला माणूस/बाईमाणूस तुमच्याकडे 'अजी म्यां श्रीमंत पाहिला' वगैरे भावनेने अजिबात बघणार नाही उलट रिकाम्या झालेल्या जागी त्या पिशव्या घाईच्या वेळेत लावणं आलं म्हणून रागानीच बघेल एक वेळ, बघितलं तर.  

माणसांचे नमुने बघायला मात्रं मजा येते तिथे.  आपण काही आर्थिकदृष्ट्या कमी नाही असा आव चेह-यावर आणलेले तिथे जास्ती असतात. नविन क्रेडीट कार्ड मिळालेले, आयटीमधले, नविन लग्नं झालेले, मैत्रिणीला, होणा-या बायकोला इंप्रेस करायला घेऊन आलेले, पहिल्यांदाच मॉलमधे आलेले ओळखू येतात. सामान खरेदीला आला आहात तर पिशवी बरोबर घेऊन येण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे हे मला कळलेलं नाहीये. बरं, तसंही ती पिशवी बाहेर जमा करायची असते किंवा तिच्या मुसक्या बांधून ती आपल्या हातात असते पण हे सगळे नविन लोक तिथे पैसे देऊन प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन फालतू पैसे घालवत असतात. पिशवी हवीये का विचारल्यावर नको म्हणणा-या माणसाकडे (म्हणजे माझ्याकडे) लोक आणि तिथले सेल्समन अतीव तुच्छतेने किंवा दयार्द नजरेने बघतात. आयत्यावेळी एखादी वस्तू आठवली आणि घ्यावी लागली तर पिशवी घेणं समजू शकतो. तिथला तीस टक्के सेल्स हा न लागणा-या, फारश्या आवश्यक नसलेल्या, ज्यावाचून लगेच फार अडणार नाही गोष्टींचा होतो असं माझं मत आहे. 

क्वांटिटी डज म्याटर. एकतर तिथे सगळ्या वस्तू विपुल प्रमाणात असतात त्यामुळे सगळीकडे सुबत्ता आहे, आता कुठलीही अडचण नाही, स्वस्ताई आली असं वाटत असावं. आकर्षक प्याकिंग, स्कीम, डिस्काउंटचे बोर्ड जागोजागी टांगलेले असतात, झगझगीत दिव्यांमुळे सगळ्या वस्तू काय प्लास्टिकचे मरतुकडे मग्गे सुद्धा खतरा दिसतात. मुलांचा हट्ट हे सगळ्यात भंपक विधान आहे. हट्ट केल्यावर एकदा घ्या फारतर पण त्याला पटवून देऊ शकता की हे आपल्याला गरजेचं नाही. यांनाच घ्यायचं असतं पण मुलांच्या नावावर खपवतात. एका माणसाची ट्रोली बघून मी आणि मुलगी एकमेकांकडे बघून हसू लागलो होतो. खालचा मजला बिस्किटस, टोस्टच्या पाकिटांनी पूर्ण भरला होता, वरती कॉर्न फ्लेक्स, बोर्नव्हीटा, कॉम्प्लान मटेरियल, हलदीरामचे फरसाण, मूगडाळ, शेव यांचे जंबो पुडे आणि त्या 'बिग'च्या ऑरेंज आणि कोलाच्या अवाढव्यं पाच सहा बाटल्या. दोन तीन हजारांचा ऐवज असेल. काय ऐटीत उभा होता तो माणूस बिलिंग करताना.  झाल्यावर त्यानी रक्कम चार जणांना ऐकू जावी या हेतूनी उच्चारली. डेबिट/क्रेडिटकार्ड चालतं सगळीकडे आता तरीही कार्ड देऊ की क्याश असं उगाचंच विचारात पाकिटातील नोटा झळकवून झाल्या. फाटक्या शर्टाचा एखादा गरीब माणूस वगैरे दिसला आजूबाजूला तर त्याचंही बिल भरून टाकू अशा आविर्भावात तो सगळीकडे नजर फिरवत होता. मी शर्ट फाडायलाच घेतला होता पण त्याचं बिल झालं म्हणून शर्ट वाचला माझा.   

लोक काय नी काय घेत असतात तिथे. न ऐकलेल्या ब्रांडच्या अनंत वस्तू तिथे असतात. भावाची घासाघीस नाही, क्वालिटीबद्दल माहित नाही तरीही घेतात. रस्त्यावरून घेतलं की तिथे मात्रं वीस रुपयाच्या वस्तूकरता कचाकचा भांडतील, इथे खराब लागल्यावर कोणसुद्धा उभं करत नाही तुम्हांला. पायपुसणी करायच्या लायकीचे बर्मुडे असतात तिथे. एक दिवाळीत मी बिग बझारला एकाबरोबर गेलो होतो. दोनवर एक शर्ट फ्री. फ्री चा मरू दे, पहीले दोन सुद्धा निवडता आले नाहीत अर्धा तास, इतका भिक्कार माल. तिथल्या प्यांटी तिथे आहेत म्हणून त्या नविन आहेत असं मी मानून घेतो. तुळशीबागेत कोप-याकोप-याला मिळणारी झबली, होजिअरी, पायपुसणी तिथे लेबल्ड रेट्सला विकली जातात. नुकतंच लग्नं झालेलं एक खेडवळ जोडपं होतं. दोन उश्या, दोन अंडरप्यांट, एक गाऊन, एक जीन, एक बेडशीट, एक मॉप, दोन प्लास्टिकच्या बादल्या असे चित्रंविचित्रं मटेरीअल घेऊन उभं होतं. बिलाचा आकडा त्याच्या डोळ्यापुढे नाचताना दिसत होता, बायको मात्रं जाम खुश होती त्याची. पहिल्यांदाच पाहिलेल्याच समजू शकतो पण अमक्याकडे आहे म्हणून माझ्याकडे पण आहे याला अंत नाही. 

खोट्या मोठेपणापायी लोक अव्वाच्या सव्वा खर्च करतात मग दुष्टचक्रात अडकतात. कार्डाची देणी थकतात, मग त्याचे हप्ते होतात, आजचं कर्ज वर्षभर लांबवलं जातं. मूळ वस्तूंवर मिळालेली एकूण सूट आणि कार्डावर भरलेलं व्याज याचा हिशोब कुणी करत नाही. घेतोय ते गरजेचं आहे? हा प्रश्नं विचारता आला पाहिजे स्वत:ला. उद्याचं सुख आज पदरात पाडून घेतोय आणि हप्ते भरताना त्याचा उपभोग राहून जातोय. आपलं निम्मं आयुष्यं माझ्या मते आपण काय असायला हवं होतं हे स्वप्नं बघण्यात आणि उरलेलं ते तसं आहे याचा आभास निर्माण करण्यात जातं. आपण आपल्याला आहोत तसे स्विकारू शकलो तर निम्मे त्रास कमी होतात. मी आजतागायत फक्तं एमआरपीपेक्षा कमी किंमत आहे ते तिथून आणत आलोय. काय घ्यायचंय ते जातानाच ठरलेलं असतं. त्यामुळे फालतू वेळ जात नाही. उगाच खर्च होत नाही, अनावश्यक गोष्टी घेतल्या जात नाहीत, क्रेडीट कार्ड नाही (कुणी देत नाही म्हणून आणि मिळालं तरी घेणार नाही कारण मोह लवकर होतो) त्यामुळे आपोआप खिसा बघूनच घेतलं जातं. अनोळखी माणसाचं माझ्याबद्दल काय मत होतंय याची काळजी मी करत नाही.  

हातावर पोट असलेले लोक जसे रोजचं आणून खातात तसे लोक आट्याच्या पिशव्या, तेलाची पुडकी, अंगी न लागणारी बेकरी प्रॉडक्टस, बादल्याभरून वर्षाकाठी कोल्ड्रिंक्स तिथून आणून पितात. उधारी होत नाही हे मान्यं पण अ-गरजेच्या वस्तू आपण किती घेतोय हे कळत नाही. साठवण गहू, तांदूळ, डाळ याची करायचे आधी. गव्हाला एरंडेल आणि तांदळाला बोरिक पावडर लावायचा उद्योग असायचा. तांदुळात मायाळू चिकट ते फडफडीत तुसडा अशी होत गेलेली स्थित्यंतरं कळायची. परिस्थिती काही येऊ दे, वीसेक पाहुणा अचानक जेवायला आला तर जेवण तरी नक्की देता येईल याची खात्री होती. आता साठवण आणि आठवण शून्यं. 

मार्ट में जाओ, स्मार्ट बनो या न बनो, फालतूका पैसा उडानेका सिख लो! 

जयंत विद्वांस

लाजायचं काय त्यात?…

पहिला पाऊस. कुणाला आवडत नाही? ज्याच्या नाकाचे वॉशर लगेच बाद होऊन गळती सुरु होते, ज्याला लगेच कणकण येते त्याला किंवा अरसिक माणसाला पहिला काय कुठलाच पाऊस आवडत नाही. काय काय करावसं वाटतं तुला पहिला पाऊस आला की?

चिंब भिजावं, हात पसरून गिरक्या घ्याव्यात, कुणी बघत नाहीयेना ते बघून साठलेल्या पाण्यात उडी मारावी, पाणी उडवावं, जोरात ओरडावं, अंगाची काहिली संपल्याचा आनंद गढूळ पाण्यात का होईना पण बसून साठलेल्या पाण्यावर थपाथपा हात मारून व्यक्तं करावा, आपल्यासारखाच अजून असा वेडेपणा कोण कोण करतंय ते बघावं, थंडपणा आतल्या हाडापर्यंत मुरावा इतकं भिजावं, डोळे लाल होईपर्यंत पाऊस तोंडावर घ्यावा, अस आणि अजून खूप काय काय वाटतं ना तुला? पण यात गैर काही नाहीये, लाजण्यासारखं तर अजिबात काही नाहीये यात.

पावसाळ्यात प्रत्येक बेडकाला असंच वाटतं, लाजायचं काय त्यात?

जयंत विद्वांस

नमूने (३)…

माणूस अप्रिय असण्याची अनेक कारणं असतात. पण माणूस वयस्कं झाला की त्याच्या वागण्यानी, अती बोलण्यानी, नाक खुपसण्यानी, सल्ले लादण्यानी तो अप्रिय होतो. काळबदल स्विकारता येत नाही. मुळात आपल्यामुळे दुस-याला त्रास होतोय ही भावना हवी म्हणजे त्रास झाला आणि नाईलाज असेल तरी कुणी काही बोलत नाही. पण हेकटपणा, विक्षिप्तपणा, त-हेवाईकपणा, संतापी स्वभाव यामुळे स्वत:ला आणि दुस-याला त्रास देतात. कसला सूड असतो काय माहित. स्वकर्तुत्व शून्यं असलं तरी केवळ जन्म दिलाय या आमरण उपकारासाठी परतफेड हवी असते. माझ्या एका मित्राचे वडील होते असे (तेच ते 'एक घोट आहे अजून' पोस्ट मधले).

पंचाहत्तरीचे असतील ते तेंव्हा साधारण. तर्कट माणूस. अटलबिहारी ते मरायच्या आधी पंतप्रधान व्हावेत अशी त्यांची इच्छा, सगळे काँग्रेसी यांचे शत्रू त्यामुळे. अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळेस ते नव्हते. स्वत:ला सोयीस्कर पडेल तेवढ्या हिंदुत्वावर ते फक्तं बोलू शकायचे. मला नाटकी माणसांचा पहिल्यापासून तिटकारा आहे. कुटुंबाचं पालनपोषण, जबाबदारी या गोष्टी कधी काळजीच्या वाटल्या नाहीत पण धर्म, संस्कार, समाजातला घसरत चाललेला आचार विचार यावर पांडित्य झाडायचे. एक सत्यनारायण सांगायला गेले की चारपाच तास तिथेच. पूजा सोडून अवांतर इतकं बोलणार की पूजेला बसलेला माणूस कंटाळेल, तो माणूस यांना परत बोलावणार नाही याची हमी. किती बोलायचं, काय आणि कधी बोलायचं नाही याचं तारतम्यं शून्यं.

माझ्याशी कमी बोलायचे ते कारण माझ्या मुर्ख विधानांना ते खोडून काढू शकायचे नाहीत. एकदा मी सापडलो त्यांना. चित्रपटातील गाणी, अंग उघडकीला आणणारे कपडे, स्वैराचार यानी कसं पाप वाढतंय पृथ्वीवर याबद्दल सांगू लागले. पाप वाढतंय, दहावा अवतार जवळच आहे आता वगैरे. मी सरळ साधा माणूस, चेहरा कोरा ठेवून मी मुर्खासारखं म्हणजे माझ्यासारखंच बोलू शकतो. म्हटलं. "पण ते वाईट आहे तर तुम्ही बघताच कशाला? ते पाप आहे हे कुणी ठरवलं? आपल्या धर्मात पापावर प्रायश्चित्त किंवा इतर उपायांनी तोडगा निघू शकतो, तर यावर कुठला आर्थिक किंवा जप वगैरे उपाय आहे? समजा गंगेत अंगभर कपडे घालून त्या हिरोईनी उभ्या राहिल्या वर्षातून चार दिवस तर त्या पापातून मुक्तं होतील की न्यूमोनिया होऊन मुक्तं होतील जगातून? ती त्यांना शिक्षा झाली असं समजायचं की मोक्ष मिळाला म्हणायचं? समजा आपण पाप खूप केलं तर अवतार लवकर होईल आणि धर्माची स्थापना होऊन उरलेल्या लोकांना समाधानी आयुष्यं जगता येईल, हा विचार का नाही? अवतार लवकर होण्यासाठी केलेली मदत हे पाप होईल का की देव प्रसन्न होऊन वर देईल?" 'तुला अक्कल नाहीये म्हणून चेष्टा करतोयेस. भ**, अडाण** आहेस तू' वगैरे फुलं टाकून त्यांनी विषय बंद केला.

डिसेंबर एक्क्याण्णव सालची गोष्टं आहे म्हणजे पच्चीस साल पहिले की बात है! घरी ते आणि त्यांचा मुलगा फक्तं. तो दोन ठिकाणी काम करून यायचा नऊच्या पुढे रात्री. त्याच्या मावशीच्या मुलाचं लग्नं होतं वसईला. तिच्या घरातलं शेवटचं लग्नं. तेंव्हा यांना जलोदर झाला होता. पोट भोपळ्यासारखं. दर पंधरा मिनिटांनी लघवीची भावना व्हायची मात्रं धोतरात लघवीला झालेली पण कळायची नाही. सतत धोतरं ओली असायची, मग कंड सुटायची. पथ्यं होती, कसं नेणार यांना. मोठा भाऊ आणि त्याचं कुटुंब एशियाडनी जाणार होतं. दर पंधरा मिनिटाला एसटी कोण थांबवेल यांच्याकरता? त्यामुळे यांना न्यायचं नाही असं दोघा भावांचं ठरलं. तेंव्हा एक दोन एसट्या असतील वसईला, तो सकाळीच गेला. म्हाता-याला तारीख लक्षात, ते घरात वाट बघतायेत, मोठा कधी न्यायला येतोय याची. पाचच्या सुमारास त्यांच्या लक्षात आलं, आपल्याला हॉर्स लावून तो गेला हे. त्यांनी एका पिशवीत कपडे भरले आणि ते निघाले स्वारगेटला. शेजारची बाई मला बोलवायला आली घरी. मी कसबसं समजावून त्यांना घरी आणलं. 

मोबाईल कुठले त्यावेळेस. दुस-या नोकरीवर तो सहाला जायचा. एक बूथवर थांबून डॉट ५.५५ ला फोन केला आणि स्टोरी सांगितली त्याला. तो इंस्ट्रक्टर होता. त्याच्याकडे परीक्षा होत्या. नऊला आल्यावर नेतो म्हणून सांग म्हणाला. मी साडेसहा ते आठ बसून त्यांच्याकडे शिव्या ऐकत. नाटक सगळं व्यवस्थित. कपडे भरून येतो म्हटलं. नऊ पाचला हे आमच्या दारात, मुलाला आणि मला शिव्या, तुम्ही फसवताय मला. म्हटलं, 'डेक्कनवरून पाच मिनिटात सायकलवर येतं का कुणी, तुम्ही येउन दाखवा रिक्षेनी, तो करतोय तर तुम्हांला हे सुचतय, जा स्वारगेटला जायचं असेल तर, उगाच धमक्या कशाला देताय'. मग घरी गेले. तो साडेनऊला आला. यथेच्छ शिव्यागाळी झाली त्याला. तो माझ्याकडे आला, म्हणाला ट्याक्सीनी जाऊ, तू चल माझ्याबरोबर. वसईला कसं जायचं माहित नाही दोघांनाही. स्टेशनला येउन, मधे थांबायला लागलं तर कटकट नको म्हणून, स्पेशल ट्याक्सी केली दादर पर्यंत. त्यानी ज्ञान वाटलं. सकाळी पहिली लोकल पकडा पाचची, गर्दी नाही काही नाही, आरामात जाल. हे मस्तं मागे आरामात डोकं ठेवून झोपले दादरपर्यंत. साडेतीनच्या आसपास दादरला पोचलो आम्ही. दिडेक तास थांबलो की लोकल. म्हातारा ताजातवाना भांडायला. इथून ट्याक्सी करा म्हणाला वसईला. त्याला कुणी तयार होईना.

मग दहिसरला आलो ट्याक्सीने तिथून रिक्षा ठरवली वसईला. थंडी मरणाची. रिक्षाचा दिवा म्हणजे मेणबत्ती. रिक्षात मागे आम्ही तिघे आणि ड्रायव्हर धरून पुढे तिघे. पेपरला नाव येणार उद्या असं वाटायचं मला खड्डा आला की. साडेसहा-सातच्या सुमारास पोचलो वसईत. लोकलनी लवकर गेलो असतो. लग्नघरी दरवाजा वाजवला आणि यांनी ज्येष्ठ पुत्राची सगळ्यांसमोर वस्त्रं काढायला सुरवात केली. घृणा वाटली. केवळ वय आणि नातं यामुळे दोन्ही मुलं गप्पं होती, नाहीतर कुणीही रागाने हात उचलेल अशी वर्तणूक होती. लग्नं लावून आम्ही दुपारीच निघालो ट्रेननी. ती ब्याद येताना मोठ्याच्या गळ्यात मारली त्यानी. तो एसटीनी कुठलाही त्रास न होता घेऊन आला हे त्याचं नशीब. आपल्यामुळे दुस-याला त्रास होतोय हे न कळायला काय लहान होते का? उपभोग घ्यायचा नाही, घेऊ द्यायचा नाही अशी काहीतर विकृत मनोवृत्ती. त्यांची बजाजमध्ये एफडी होती वीस हजाराची. त्यांना एकट्यालाच माहित असलेली. ते गेल्यावर तीनेक वर्षांनी कपाट साफ करताना सापडली. वारस नेमलेला नव्हता. पैसे बिनव्याजी पडून तिथे. सक्सेशन, सगळ्यांच्या एनोस्या देईपर्यंत परत मिळायला वर्ष गेलं. व्याज नाहीच. काय मिळालं? न स्वत:ला, न मुलाबाळांना.

रोज साईचं दही आणि ताक पण हवं असायचं त्यांना. एक लिटर दुधात रोज किती साय पडणार अशी. आल्यागेल्याला सांगायचे, मुलगा आणि मुलगी चोरून खातात मी नसताना. हे दिवसभर घरात, कधी खाणार चोरून. ऐकणारा गप्पं बसायचा. संस्कार ना आपल्यावर, मोठ्या माणसांना उलट बोलू नये. पोसायची ताकद नाही एकालाही, मुलं मात्रं सहा, तेंव्हा कुठे गेली होती अक्कल? का वागतात माणसं अशी? आपल्या जाण्यानी कुणाला तरी बरं वाटेल, आपल्याला लोक कंटाळलेत, आपलं काहीतरी चुकतंय याची जाणीव इतर बाबतीतल्या पांडित्यामुळे का होत नाही? कसला सूड उगवतात आपल्याच मुलाबाळांवर? भोग त्यांचे नसतात, त्यांची ही कौतुकं निमुटपणे सहन करणा-या लोकांचे असतात.

जयंत विद्वांस

खिडकी…

डोकावून बघणे ही उत्सुकता माणसाला जन्मजात असते मग ते दुस-याच्या आयुष्यात असेल किंवा बाहेर काय आहे हे बघणे असेल. अध्यात्मं ही फार मोठी गोष्टं आहे, माझ्या बुद्धीला झेपणार नाही ते मी करत नाही पण अध्यात्मं हेच सांगतं, आधी आत बघा, शोधा. आतल्या गोष्टी फार त्रासाच्या असतील तर कोण आत बघणार, सद्सदविवेकबुद्धीची टोचणी फार टोकदार असते त्यामुळे माणूस अंतर्मुख होत नसावा, त्यापेक्षा बाहेर बघणं जास्ती सोपं, मनाला दिलासा देणारं असतं, हवं तेवढंच बघता येतं, नकोय त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. खिडकी… खिडकीचा सगळ्यात जास्ती वापर त्यासाठीच होतो - डोकावून बघणे. प्रत्येक गोष्टीचा वापर वय, आकलन शक्ती, ज्ञानाप्रमाणे बदलतो.

लहानपण देगा देवा म्हणतात ते उगाच नाही. लहान मुल खिडकीत उभं केलं की तासंतास बाहेर बघतं. कुठलाही पूर्वग्रह नसल्यामुळे ते प्रत्येक गोष्टं आश्चर्यानी बघतं. दोन चिमण्यांचा खेळ बघण्यात सुद्धा त्याला मजा असते. रहदारी, चित्रंविचित्रं आकाराच्या गाड्या, त्यांचे आवाज असतात. कधी निरभ्रं, कधी कापूस सांडलेलं तर कधी काळवंडलेलं आभाळ असतं. ढगांचे आकार कधी हत्ती असतात, कधी पक्षी असतो, तर कधी निराकार  उगाचच 'कुठली बरं ओळखीची आकृती आहे' असं वाटायला लावणार असतं. त्याच्या चिमुकल्या मेंदूत काय काय साठत असतं. तेंव्हा कुणीतरी कडेला बसून त्याला ते सांगायला हवं. वा-यानी हलणारे ढग, त्यांची पळापळ, पकडापकडी, रेंगाळलेपण बघण्यात पण मजा असते. मावळतीचा रंग, अफवा ज्या झटक्यात पसरते, तसा आकाशभर पसरतो त्याचं वर्णन त्याला करता येणार नाही पण ते रंगकाम डोळ्यात निश्चित साठतं. सकाळी आईला, बाबाला अच्छा करताना तो त्याच खिडकीत रडवेला उभा रहातो तर बाबाच्या, आईच्या गाडीचा आलेला आवाज ऐकून तो तेवढाच हसरा चेहरा करून संध्याकाळी त्याच खिडकीत बघायला धावतो. एवढ्याश्या चौकोनातून दिसणारे त्याच्या आवडीचे चेहरे त्याला इतर कुठल्याही चित्रापेक्षा सुंदर दिसतात. शाळा सुटायची वाट बघणारी, खिडकीतून आपल्या माणसाला पालकांच्या गर्दीत शोधणारी मुलं काय गोड दिसतात. बावरलेपण, अधीरता, डोळ्यांना घातलेला बांध, ते पुढे आलेले ओठ, डोळ्यात सशाचे भाव आणि एकमेकाला बाजूला सारून बघण्याची घाई मोठी विलोभनीय असते. वर्गात जाताना मुलं कधीच सरळ जाणार नाहीत. आपला वर्ग येईपर्यंत लागणा-या प्रत्येक वर्गाच्या खिडकीतून बघणारच ते. आता शाळा सुधारल्या आणि तास चालू असताना मागच्या खिडकीतून पळ काढायची मजा गेली.

आता ग्रिल्स आली, स्लायडिंग विंडोज आल्या, आतून खिट्ट्या लावायचे लाकडी दरवाजे दुर्मिळ झाले. विशिष्ठ नक्षी दाखविणा-या रंगीत काचा बसवलेल्या खिडक्या आता दिसत नाहीत. बंद खिडकी म्हणजे शून्यं मजा. अर्ध्या खिडकीतून दिसणारा आपल्याला हवा असलेला चेहरा ओझरता दिसला की जो आनंद व्हायचा तो शब्दात कसा सांगणार. खालून ओळखीची शीळ आल्यावर मान बाहेर काढून 'आलो रे' म्हणायला, पहिल्या विसरलेली वस्तू जिने चढून जाण्यापेक्षा खाली झेलायला, पावसाचे तुषार ओंजळीत धरायला, लाईट आपलेच गेलेत की सगळ्यांचे हे बघायला, पाणी, पोळीचे तुकडे ठेवल्यावर घाबरत घाबरत येणा-या चिमण्या तुकडा उचलून ससाण्याच्या वेगाने जातात ते बघायला खिडकी सोपी पडते. 

हिंदी चित्रपटात कशावर गाणं करतील सांगता येत नाही. 'तेरे घरके सामने' मध्ये 'तू कहा ये बता' गाण्यात देवानंदला वेडावणारी खिडकीतली नूतन, 'पडोसन'मध्ये समोरच्या खिडकीतला चंद्राचा तुकडा सायराबानू, 'मैं तुलसी तेरे आंगन की' मधलं 'ये खिडकी जो बंद रहती है', 'जॉनी मेरा नाम' मध्ये असंख्य खिडक्या दारं असलेलं ' पलभर के लिये कोई हमे प्यार कर ले', 'माया मेमसाब'मध्ये पडद्याआडून शाहरुखला खिडकीतून बघणारी दीपा साही, 'शोले'मधे जय विरु स्टामीना चेकिंगच्या फायटिंगला खिडक्या फोडून बाहेर येणारी ठाकूरची माणसं, 'बर्फी'मधे खिडकीतून रणबीरला पहाणारी एलेना डिक्रूज, ज्याकीच्यानच्या सिनेमात त्यानी पळताना एकच खिडकीचा दरवाजा उघडून मागच्याला तोंडावर आपटवणे आणि आल्फ्रेड हिचकॉकचा त्या खिडकीतून बघणा-या जेम्स स्टुअर्टसारखा आपल्यालाही खुर्चीत खिळवून ठेवणारा 'रिअर विंडो'. आपल्याकडे असे थ्रिलर्स फार येत नाहीत. नाही म्हणायला त्या 'मेरे हमदम मेरे दोस्त'मध्ये मात्रं असा सस्पेन्स होता. पास होणा-या दोन ट्रेन्स आणि पलीकडच्या ट्रेनमध्ये होणारा खून या ट्रेनमधली बाई खिडकीतून बघते.

संगणकाच्या आत शिरायला आडनाव 'गेट्स' असलं तरी त्यानी दिलेली 'विंडोज' खिडकी नसेल तर चुकल्यासारखं वाटेल. 'हे घ्यायचंय आपल्याला', 'मला काय मस्तं दिसेल ना हे', 'कधी घेणार मी हे, या जन्मात तरी वाटत नाही' असे विचार मनात आणून पण नजरेला सुखावणारं 'विंडो शॉपिंग' आहे. प्रत्येकाला प्रवासात खिडकी हवी असते. मग ट्रेन, एसटी, कार, विमान काहीही असो. वारा तोंडावर येणारी विंडो सीट मिळाल्याचा आनंद म्हणजे काय हे मुंबईला लोकलनी रोज जाणा -या माणसाला जास्ती माहित. आता सिनेमाची तिकीट ऑनलाईन बुक होतात पण त्यात खालच्या अर्धगोलातून पैसे देऊन वरच्या गोलाकार खिडकीतून 'दोन बाल्कनी, कॉर्नर सीट' सांगून किंवा 'हाउसफ़ुल्ल'चा बोर्ड सतत लागलेल्या चित्रपटाची, भले पहिल्या रांगेतील असतील, पण तिकीटं मिळाल्यावर झालेला तो आनंदी चेहरा त्या खिडकीसमोरून हलतो तेंव्हा जगज्जेत्या सिकंदरसारखा असायचा.

एसटी, रेल्वे रिझर्व्हेशंस, सरकारी देणी द्यायच्या खिडक्या, पोस्ट, बँका, पासपोर्ट ऑफिस इथल्या खिडक्यातून कमाल अपमान, हाड्तुड झाल्याशिवाय त्या खिडकी मागच्या पदाच्या ताकदीची किंमत आपल्याला कळत नाही असा त्यांचा समज आहे, तो दूर करण्यासाठी तिथे जाणं प्रत्येकाला गरजेचं आहे. तिथून काम झाल्यावर पुढे सरताना 'सुटलो' ही अक्षरं चेह-यावर उमटतात. गर्दी नसलेली एकमेव सरकारी खिडकी म्हणजे मयताचा पास मिळतो ती. तिथे स्वत:करीता कधीच जावं लागत नाही एवढा एकंच दिलासा. एकांतवासात ठेवलेल्या कैद्याला ज्या चौकोनातून जेवण आत ढकललं जातं ती खिडकी उघडल्याचा आवाज सुद्धा किती मधुर लागत असेल कानाला. माणसांची लगबग, कसला का होईना आवाज, आत येणारी झुळूक, बाहेरचा गंध किंवा दुर्गंध त्या पोकळीतून त्याला क्षणभर का होईना पण येतो.

पोट जाळण्यासाठी, चेहरा दाखवणारी, इशारे करणारी पण खिडकीच असते. रंगरंगोटी केलेले चेहरे इशारे करतात, सौदा पटला की काही घटका खिडकी बंद होते. शृंगार नसलेला यांत्रिक भोग झाला की थोड्या वेळाने खिडकी परत उघडते. परत थकेपर्यंत प्रयत्नं चालू. खिडकीमागचे चेहरे सुरकुतले जातात, त्यांच्या जागी नवी फौज येते. तिथून बसायची सुटका रोगांनी किंवा मरण आलं तरंच. तिथल्या म्हाता-या खिडक्यांना कुणी विचारत नाही, त्या बंद असल्या काय किंवा उघडल्या काय. तिथली खिडकी तरुण हवी.

निर्जीव वस्तूशी सुद्धा माणसाचं नातं असतं कारण त्या नात्यात पलीकडून काही त्रास नसतो, आपण सांगेल ते ऐकलं जातं, ते चूक आहे किंवा कितीवेळा तेच तेच असली उत्तरं पलीकडून येत नाहीत त्यामुळे हे एकतर्फी नातं दृढ होत असावं. आपल्याला एक जागी बसायला भरपूर वेळ लहान असताना आणि वय झाल्यावर मिळतो. मधला सगळा काळ फक्तं खिडकीतून डोकावण्याचा. लहान असताना उत्सुकता असते. म्हातारपणी कसलीही ओढ नसते. पुलंनी त्यांच्या आजोबांवर लिहिलंय 'ऋग्वेदी' मध्ये. त्यात ते 'येणा-या निरोपाची वाट बघण्यासाठी खिडकीत बसतो' अशा अर्थाचं म्हणालेत. आयुष्याची काय किंवा दिवसाची काय, संध्याकाळ कातरच तशीही. थकल्या भागल्या देहाला विश्रांतीची गरज असते.

उतारवयात काय बघत असावीत माणसं खिडकीत बसून? शून्यात बघितल्यासारखी बसतात. गतायुष्याचा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकत असावा. बायोस्कोपमध्ये तोंड खुपसून बघावं तसं त्या खिडकीतून बघताना तो समोर चालू असावा. याच खिडकीतून त्यांनी कायमसाठी जाणारी, कधीच मागे वळून न बघणारी, परत न येणारी माणसं बघितली. त्यांच्या आठवणी, चेहरे डोळ्यासमोर दिसत असावेत. खिडकीच्या अलीकडचं एकलेपण सुसह्य नसतं, पल्याड गेलेल्या माणसांची आठवण येते. मनात अजूनही मरणाची भीती असतेच तरी पण खिडकीत बसून काय बघत असतील? मरणाच्या भीतीपेक्षा जगण्याचा कंटाळा ताकदवान आहे. कशाची वाट पहात असतील मग? निरोपाची. म्हणून तिथे रोज बसायचं असतं. निरोप आपला असेल तर उगाच चुकामुक नको, राजाचं फर्मान मान तुकवून स्वत: घ्यायचं असतं, म्हणून थांबायचं तिथे.  

तात्पर्य, खिडकी 'बघण्यासाठी' नसतेच मुळी, 'वाट' बघण्यासाठी असते.

जयंत विद्वांस

एक घोट आहे अजून…

काळ बदलला. गरिबीच्या व्याख्या बदलल्या. गरीब असण्याची आता लाज वाटायला लागली. याचा अर्थ पहिल्यांदा नव्हती का? होती, पण गरिबी ही अवस्था आहे, यातून पार पडू अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असायची, स्वाभिमान जपलेला असायचा, लाचारी केवळ आणि फक्तं केवळ नाईलाजापोटी करावी लागायची. वाममार्गाला जाऊन गरीबी दूर करण्याचे प्रयत्नं नसायचे, कष्ट, नशीब आणि देव ही भरोश्याची त्रिसूत्री होती. पापभिरूपणा गरीबाकडेच असायचा शक्यतो. आता गरीब असलो तरी दाखवायचं नाही यासाठी माणसं कर्जबाजारी व्हायला लागली. गरिबाला काय किंवा मध्यमवर्गाला काय, कर्ज घेऊन खर्च करणे म्हणजे माथ्यावरून पायथ्याकडे निघालेला उतारावरचा दगड आणि कर्जफेड म्हणजे पायथ्यापासून मुद्दल आणि व्याजाचे दोन दगड परत माथ्यावर ढकलत नेणे असं असतं. 

चाळीत रहायचो तेंव्हाची गोष्टं. इनमिन चार ब्राम्हण कुटुंब सगळ्या चाळी मिळून. आमच्या पाठीमागे एक कुटुंब रहायचं त्यातलं. वृद्धत्वाकडे धावणारं जोडपं, दोन मुलं, चार मुली, त्यातल्या एकीनी पळून जाऊन लग्नं केलं होतं, त्या दिवसापासून ती कधीच परत सुद्धा आली नव्हती. प्रत्येक वेळी वासना हे कारण नसतं, दोनवेळचं जेवण हे की कारण असू शकतं. एकारांती आडनावाला साजेसा तापटपणा अंगात ओतप्रोत भरलेला. इसम इंदोर की ग्वाल्हेर संस्थानात खाजगीत होते कधी काळी. संस्थानं बुडाली, खालसा झाली. मालकाची मस्ती, अहंकार सेवकांकडेही आलेला. नोकरी नाही. अधूनमधून भिक्षुकी, सकाळी दुधाची लाईन मुलं टाकायची. पण एक मीटर कापड आणि चौघांना शर्ट शिवा, कापड राहिलं तर एक छोटी पिशवी चालेल अशी रिक्वायरमेंट, कसं होणार? दारिद्र्याचं पण एक वातावरण असतं, सगळ्या गोष्टींवर एक अदृश्य लेप दिल्यासारखं ते चिकटलेलं असतं. दिवस काय कुणाचे रहात नाहीत. मोठा मुलगा बँकेत लागला (आता रिटायर्ड पण झाला), मुलींची लग्नं झाली पण **ची आई अजून माझ्या लक्षात आहे.

नित्यनियमाने आई दर शुक्रवारी कुणाची तरी ओटी भरायची. ओळख झाल्यावर त्या यायला लागल्या ते त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत, मग त्यांची मोठी सून यायची बरेच वर्ष. ओटीचे तांदूळ असे कितीसे असणार, दोन तीन ओंजळी फारफार तर. एकदा त्या म्हणाल्या तुमचे तांदूळ मी वेगळ्या डब्यात ठेवते, सणासुदीला भात करायला उपयोगी पडतात, चव जात नाही जिभेवरून त्याची. तेंव्हा सुरती कोलम असायचा आमच्याकडे. कसंतरीच झालं ऐकून. विक्षिप्त तापट नवरा, कायम ओढ्ग्रस्तीची परिस्थिती, त्यात आजारपण. साडेचार फुटाच्या आसपास उंची, बारीक इतक्या की वेताला कापड गुंडाळलय असं वाटेल, मागे कायम बोटभर वेणी, ओटीला येताना कायम हातात पिशवी. त्यांच्या नजरेत 'नाही रे' वर्गाच्या असतो तसा हेवा कधीच दिसला नाही मला. आपण काही बोललो आणि नाही कुणाला आवडलं तर अडचणीचं ठरू शकतं म्हणून गरीबी अबोल होत असावी. फार कमी बोलायच्या त्या.

मला बाळदमा होता दहाव्या वर्षापर्यंत साधारण. मी म्हणालो बोलताबोलता एकदा, मला आता दम लागत नाही. त्या पटकन म्हणाल्या, 'विषयसुद्धा काढू नकोस, बरा झालाय ना, मग मनातसुद्धा आणू नकोस'. त्यांना दमा होता. थंडीचे चार महिने त्या रात्री कॉटवर बसून असायच्या. कफ निघायचा नाही, दम लागायचा, आडवं झालं की श्वास थांबल्यासारखं व्हायचं म्हणून खोकत किंवा श्वास गोळा करत रात्रंभर बसून रहायच्या. अशी अनेक वर्ष त्यांनी काढली होती. कुठले भोग असतात माहित नाही पण अशा माणसांना देव पुरवणी आयुष्यं लिहित असावा कपाळावर. आयुष्याचा प्रवास सिंगल मीटर गेज लाईनवरच्या पॅसेंजरसारखा हळू आणि न संपणारा. न पाहिलेल्या देवाच्या आशेवर आणि या जन्मातलं चांगुलपण पुढच्या जन्मात कामाला येईल असल्या न पटणा-या विचारांवर अनेक आयुष्यं जगत राहिली फक्तं त्या काळी. काहीच अनुकूल घडत नसताना कधीतरी चांगलं होईल, घडेल ही आशा जगायला भाग पाडत असावी.

माझी आर्या किंवा कुठलीही लहान मुलं हल्ली दूध पिताना कटकट करतात, आईबापांवर मेहेरबानी करतात. एक शेवटचा घोट त्यांनी शिल्लक ठेवायचा आणि आपण आरडाओरडा केला की राग आल्यासारखं दाखवून तो नाईलाजानी त्यांनी प्यायचा हा ड्रामा बरीच वर्ष चालतो. चूक त्यांची नाही, त्यांनी कित्त्येक गोष्टी पाहिलेल्या नाहीत म्हणून आपण त्या सांगायला हव्यात. आता पिशवीतून दूध येतं. तेंव्हा सकाळी किंवा दुपारी केंद्रावर जाऊन बाटल्या आणाव्या लागायच्या. त्यांची मुलं त्याची लाईन टाकायची. व्याप होता तो. लोक बाटल्या धुवून न देता तसेच द्यायचे. दुस-याची बोलणी घेणा-याला खावी लागायची. एकानीच अनेक घेतल्या की मागचं पब्लिक आरडा ओरड करतं, वेळ जातो म्हणून दोघांनी रांगेत उभं राहून त्या बाटल्या घ्यायच्या. त्या सगळ्या बाटल्या घरी आणायच्या. त्याच्यावर अतिशय नाजूक सील असायचं, एक निळ्या आणि एक तांबड्या रंगाचं असायचं. ती जमवून त्याचेही खेळ व्हायचे त्याबद्दल परत कधीतरी. तर त्या बाटल्यांना वरच्या बाजूल रिंग असायची ज्यावर ते सील फीट बसायचं.

स्किलफुली ते सील जरा काढायचं आणि त्या साधारण तीन एमेम उंच आणि एक इंची डायमीटर रिंग मध्ये जेवढं दूध असेल तेवढं पातेल्यात घ्यायचं, सील परत बसवायचं म्हणजे रिंगच्या भागात दूध नाही हे कळायचं नाही. 'जळो जिणे लाजिरवाणे' असं वाटतं अगदी, आठवलं की. ते वापरून सगळ्यांना सकाळचा चहा मिळायचा. कुणी याला चोरी म्हणत असेल तर असा विचार करणं सुद्धा पाप आहे मी म्हणेन. कसलं आलंय पाप नी पुण्यं. आता ती पिढी हयात नाही, संपत आली पण त्यांना रात्री शांत झोप लागायची, हसतमुख असायचे, संसार झाले, मुलबाळं रांगेला लागली पण त्यांच्या आयुष्यात कायम उन्हात उभे राहिल्यामुळे सुखाचा कवडसा क्वचितच पडला. माणसानी स्वत:चे किंवा दुस-याचे असतील तरी आधीचे दिवस विसरू नयेत. सतत त्याच आठवणी काढून टिपंही गाळू नयेत पण आपण मस्तवालपणे वागत असू तर मात्रं पाय जमिनीवर रहाण्यासाठी कुठेतरी आयुष्याच्या पुस्तकाची आरंभाची जीर्ण पानं परत वाचावीत.

जेंव्हा मी ओरडतो आर्याला की  'एक घोट आहे अजून, टाकायचा नाही, पी सगळं' तेंव्हा माझ्या डोक्यात त्या दुधाची किंमत किती, हे नसतं तर डोळ्यासमोर **ची आई असते. त्यांना कळत नसेल तर 'खाऊन माजा पण टाकून माजू नका' हे आपणच सांगायला पाहिजे, सांगायलाच पाहिजे. 

जयंत विद्वांस

संडे सिनीअर लीग…

मिहिर भागवत, मयुरेश बुधकर, केतन तेरेदेसाई, मनोज गद्रे, मनोज गोडबोले, विनायक लिमये, नरेंद्र बापट, अविनाश रहाळकर, नितीन करमरकर, नितीन अंमलदार, चंद्रकांत खिरीड, रविंद्र उटगीकर, प्रशांत शिरोडकर, रोहित दणाणे, सुशांत पाटील, अक्षय चिपरीकर, समीर व्होरा, केदार जोगळेकर, मिलिंद धाडगे, सचिन साबणे, प्रविण देवधर, अजय मराठे, जयंत विद्वांस - आयपीएल किंवा दौ-याआधी सराव संघ निवडावा तशी ही यादी आहे. यादीतल्या नावांवरून फार सभ्य लोकं क्रिकेट खेळतात असा समज होण्याची दाट शक्यता आहे पण मैदानावर उपस्थित असणारे लोक असा समज करून घेणा-या माणसाला भिंतीशी मान दाबून मारहाण करतील अशी परिस्थिती आहे. संघ निवडताना तो समतोल असावा वगैरे प्रकार इथे दोन तीन मुद्द्यांवर संपतो. एक भांडखोर, नविन नियम जुनेच आहेत असं सांगून लादणारा, एक प्लान आखणारा, एक पिंच हिटर आणि एक खांदा निखळला तरी चालेल पण आरोप झटकून टाकावा तसा, चेंडू फलंदाजाला दिसेल की काय अशा भीतीनी जोरात टाकणारा चेंडूफेक्या हवा, संपली टीमची निवड.  
मनोज गोडबोले, डॉ.विनायक लिमये, प्रशांत शिरोडकर - यांची निवड कुठल्याही संघात केली तरी बिचा-यांची तक्रार नसते. सुंदरतेला दृष्टं लागू नये म्हणून तीट लावावी तसा प्रशांत एकदा आल्या आल्या पडून घेतो. चरणसिंघ, चंद्रशेखर यांचं सरकार जसं कधीही कोसळू शकेल असं वाटायचं तसा प्रशांत कधीही पडू शकतो. शनिवार घातवार असल्यामुळे असं होत असावं. पुण्यात काश्मीरपेक्षा जास्ती बर्फ शनिवारी रात्री ग्लासात पडतो म्हणे आणि बर्फावरून पाय घसरतोच. मनोज गोडबोले हे 'गली'तले (गल्लीतले कोण म्हणालं रे) नामवंत क्षेत्ररक्षक आहेत. उंची, जागचा हलायला लागणारा वेळ यामुळे त्यांना हातात आलेला चेंडू झेल म्हणून पकडणं क्रमप्राप्त होतं, उगाच सुटला तर आपल्यालाच पळावं लागेल किंवा नंतर आपल्यालाच फलंदाजी करायची आहे असे सुप्तं हेतूही त्यामागे असू शकतात. विनायक लिमये धुमकेतू आहेत. कधी सलग तर कधी आफ्रिदीसारखी  निवृत्ती मागे घेऊन पुनरागमन केल्यासारखे येतात. केक आणलेल्या दिवशीची त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अजून लोक विसरलेले नाहीत. त्यांनी परत फॉर्ममध्ये येण्यासाठी हा खर्चिक उपाय करून पहायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर बाद केल्यास, गोलंदाजी दिल्यास ते दोन रविवार येत नाहीत असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहे.    

रोहित दणाणे, सुशांत पाटील, अक्षय चिपरीकर - ही सगळी यंग ब्रिगेड आहे. गगनचुंबी षटकार, घणाघाती चौकार, फसवी गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि बिन ब्रेकच्या गाडीसारखा सुसाट थ्रो हे एवढं सगळं एकटा रोहित करतो. प्रविण आणि त्याची ताटातूट केल्याशिवाय सामना तुल्यबळ होत नाही. सुशांत आणि अक्षयला रोहित दम देत असावा, 'याद राखा माझ्यापेक्षा चांगलं खेळाल तर'. ते दोघे बिचारे दबलेले दिसतात त्याच्यापुढे. अलीकडे गोलंदाजांनी त्याला स्वस्तात काढलाय असं कानावर आलंय याचा अर्थ गोलंदाजीत सुधारणा झालीये की त्याचा फॉर्म गेलाय हा चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यानी घेतलेल्या झेलांमुळे त्याला दोन झेल प्रतिदिन असं बंधन घालण्याची मागणी वारंवार पुढे येत आहे. तो आउट झाल्यावर प्रतिपक्षात अमेठीची सीट जिंकल्यासारखा आनंद होतो याचा अर्थ तो सरस खेळतो असा आहे
प्रविण देवधर, मिलिंद धाडगे - इमारती पडल्यात पण कधीकाळी भरभराट होती अशी जाणीव अधूनमधून होते. मिलिंद धाडगे आता इतिहासाचं पुस्तक झालंय. त्याला पाय दिसत नाहीत असा घेर वाढलाय. एकेकाळी दमदार फलंदाजी करायचा, अचूक गोलंदाजी टाकायचा या सांगण्याच्या गोष्टी झाल्या आता. पण तरीही तो हौसेने येतो. येताना ब्रेकफास्ट आणतो. मैदानावर जाण्यात पण खेळल्याचा फील आहे बहुतेक. त्यानी लवकरात लवकर फीट होऊन घणाघात चालू केल्यास अजून सामने रंगतदार होतील. प्रविण यायचाय अजून खेळायला हा विश्वास असतो. तो बोलला की त्याची पुढची बाजू कुठली हे कळतं. -या अर्थानी तो ऑलराउंड आहे पण षटकार मारताना यातलं काही आड येत नाही. रन्स पळून काढून कशाला दमा त्यामुळे तो शॉर्टकट वापरतो. फसवे, हळुवार ऑफस्पिन पण तो टाकतो. उंच, अशक्यं झेल घेतो पण पंचवीस यार्ड पळत जाऊन झेल वगैरे स्वप्नं पण पडू शकत नाही त्याला. चेष्टेचा भाग सोडून देऊ पण दोघेही नैसर्गिक तडाखेबंद फलंदाज आहेत हे नक्की. त्यांनी फिट होऊन अजून रंगत आणावी अशी इच्छा आहे
कुणाच्या अध्यात मध्यात अशी एक जमात असते त्यात केदार जोगळेकर, आनंद कुलकर्णी, मयुरेश बुधकर, समीर व्होरा, सचिन साबणे, अविनाश रहाळकर हे लोक मोडतात. कुठलेही वाद नाहीत, चिडचिड नाही. निमूटपणे खेळतात. अविनाशचं गणित चांगलं आहे हा मुद्दा नाही, बाकीच्यांचं पण चांगलं आहे पण तो सभ्य असल्यामुळे स्कोअर, चेंडू, ओव्हर्स बरोबर मोजले जातात. त्यानी सांगितलं की बात खतम. अजय मराठे यांची बोटं मोजताना चुकतात, तो मुद्दाम करत नाही, होतं तसं. पहिलीपासून त्याचा हा प्रॉब्लेम आहे असं ऐकिवात आहे. केजरीवालसारखा तो दोनच्या फरकानी फक्तं सम विषम धावसंख्या मोजत असावा. केदार सगळ्यात जास्ती टीकास्त्र अंगावर घेणारा माणूस आहे. मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा बाणा शारीरिक नाईलाजानी आहे. अधून मधून तो नेहरू स्टेडीअमवर कोचिंग क्लासमध्ये लहानपणी मारलेला कव्हर ड्राईव्ह आठवल्यासारखा मारतो. आकाश, दत्ता मोरे हे पाहुणे कलाकार आहेत. हयातीचा दाखला द्यायला ते अधून मधून येतात

मिहिर भागवत, नितीन करमरकर सभ्य आहेत? हा प्रश्नं केवळ होकारार्थी उत्तर यावं अशा हेतूनीच विचारलेला आहे. मिहिर आहे पण तो एकटा पडला तर. स्वत:च्या जीवावर निवडून आलेले आमदार, खासदार जसे उपद्रव मूल्य बाळगून असतात तसा तो आहे. त्याला युती लागते. सहसा अंमलदार आणि रवि असला तर त्याला बहर येतो. लहानपणी राज्यं आल्यावर घरात गेलं की यायचंच नाही हा त्याचा स्वभाव बदलला आहे असं कानावर आलंय पण घरात गेलेले चेंडू सापडत नाही म्हणायचं आणि सापडल्यावर परत द्यायचेच नाहीत हे अजून चालूच आहे म्हणे. नितीन करमरकर फ्रीलान्स क्रिकेटर आहेत. ते मनात आलं की अंपायर, स्लीप फिल्डर, गोलंदाज, लगेच आउट होण्याची खात्री असलेला फलंदाज अशी कुठलीही भूमिका स्विकारतात. शक्यतो ते सगळ्यांना मान्य आहे असं त्यांचं ते गृहीत धरतात. अतिशय निष्पाप चेह-यानी ते उपहासात्मक बोलतात. किमान शब्दात कमाल अपमान करू शकतात. चुकून झालेला रनआउट, एखादा हातात बसलेला झेल वगैरे घेतला की चेहरा बघावा, साधारण दोन रविवार तरी ते ऐकावं लागतं, बाकी माणूस चांगला आहे. वापरला नाही तर आंबेल अशा भीतीनी त्यानी स्प्रे संपवला. एका ओव्हर नंतर फवारणी परवडत नाही संघाला पण त्याला तरी कोण खेळायला घेणार या वयात म्हणून कुणी बोलत नाही.     

केतन तेरेदेसाई, डॉ.मनोज गद्रे मैदानावर असल्यामुळे त्यांना ते क्रिकेट खेळतात असं म्हणायला हरकत नाही. राहूल द्रविड ही भारतीय क्रिकेटची ' वॉल' असेल तर केतन इज ' वॉल' फॉर अस. कुठेच फिल्डिंग चांगली करत नाही म्हणून तो विकेटकीपर रहातो. कुठलाही चेंडू अडवायची, झेल घ्यायची पद्धत त्याच्याकडे नाही, त्याला चेंडू लागला की अडतोच. त्याच्या पुढ्यात पडलेल्या चेंडूवर सिंगल चोरावी लागत नाही, चालत चालत होते. रागापोटी त्याला लांब ठेवलात तर तिथे चार जातात म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठा परत पहिल्या जागी करावी लागते. तयार रहाणे, थ्रो/बॉल कलेक्ट करणे, फलंदाज क्रीजच्या आत यायच्या आधी स्टंप उडवणे वगैरे क्रिया सलग करायला त्याला आवडत नाहीत. त्यानी स्टंपिंग केलं तर तो क्रीडादिन म्हणून साजरा करावा लागेल. डॉ.मनोज गद्रे वडीलधा-या माणसासारखे पोरं उपाशीपोटी खेळत नाहीत नाही याची काळजी घेतात. त्यांच्या हिंदी डायलॉग शिवाय ब्रेकफास्ट येऊ शकत नाही. अंपायर म्हणून करिअरला सुरवात करायचं त्यांच्या मनात होतं पण आक्रमक खेळाडूंच्या दडपणाला ते बळी पडल्यामुळे तो विचार सध्या त्यांनी लांबणीवर टाकलेला आहे
नितीन अंमलदार, चंद्रकांत खिरीड - ही जोडगोळी आता वयोमानामुळे खेळण्यापेक्षा बोलणं जास्ती करते. तिरंदाज खिरीड म्हणून ते ओळखले जातात. साठी गाठलेला हा तरुण माणूस लगोरी खेळतो. त्याचे दात ओठ खाल्लेला चेहरा बघून फलंदाज मागे सरकतो. गोट्या आणि गोलंदाजी यात काहीही फरक नाही. पण त्याची कुणीही केलेली चेष्टा तो हसतमुखाने स्विकारतो हा त्याचा मोठेपणा आहे. बेनिफिट सामन्यात टाकतात तशी एखादी ओव्हर तो टाकतोही. नितीन अंमलदार वेळेत उपस्थित रहातात, काळजीनी येतात, अनुपस्थिती नसतेच जवळपास इतक्या ओढीनी ते येतात. त्यांनी ठोकलेले स्टंप हे सरळ रेषेतच असतात बाकी सगळे तिरळे आहेत, सगळ्यांना आवर्जून रविवारी यायची आठवण करतात, चेंडू कुठला आणायचा वगैरे प्लानिंगचा पार्ट त्यांच्याकडे असतो. स्वत:ला सोयीस्कर नियम बनविणे, मागे आपण अशाच प्रसंगात काय बोललो होतो त्याचं त्यांना विस्मरण होतं, आत्ता ते कुठल्या पार्टीत आहेत त्यावर ते अवलंबून असतं. खांदा आणि गुडघा अशा त्यांच्या दोन्ही ठिकाणच्या हिंजेस कुरकुर करत आहेत पण ते येतात. घरी सराव करतात आणि लवकर आउट होतात अशी बातमी
नरेंद्र बापट, रविंद्र उटगीकर - दोघंही शक्यतो विरुद्ध पार्टीत असण्याची काळजी घेतात नाहीतर रविवार सुना सुना बेचव जातो. म्याच रिपोर्ट नंतर निम्मं शाब्दिक युद्धं यांचच असतं. मराठीत ज्याला कुजकं पण साहित्यिक भाषेत ज्याला उपहासात्मक असं म्हटलं जातं त्या भाषेचे शब्दंकोष दोघं मिळून लीलया लिहू शकतात. नंदूकडे पेट्रोल पंप आहे. ठिबक सिंचन पद्धतीवर त्याचा शेतक-यापेक्षा जास्ती विश्वास आहे. मुळापाशी थेंब थेंब पेट्रोल टाकण्याचा उद्योग तो थकता करतो. तो फिल्डिंगला कुठेही असला तरी कुणाला बॉलिंग, ब्याटिंग मिळाली नाही याची नोंद घेतो आणि शेकोटी पेटती रहावी याची काळजी घेत एकेक काडी पुढे सरकवतो. मनातला हेतू वेगळा असला तरी अत्यंत निरागस चेह-यानी, काळजी असल्यासारखा चेहरा करून हे तो करू शकतो. तो लॉंगऑन, मिडविकेट, स्क्वेअरलेग, डिप कव्हर कुठूनही नो, वाईड, रनाउट देऊ शकतो किंवा नाकारू शकतो. पुलंचे हरितात्या जसे इतिहास सांगताना त्यात 'हे असे आम्ही उभे आणि महाराज बघतायेत' असं म्हणून स्वत:ला गोवायचे तसं नंदू करतो. 'आम्ही (पक्षी : आयसीसी) तसा नियम केलाय' हे वाक्यं ऐकून नियमावली तयार करणारा हा थोर माणूस आपल्याला सहवासाचा लाभ देतो या कल्पनेने मी सद्गदित झालो होतो. योग्यं वेळी झेल, चेंडू सोडणे, प्रयत्नं करूनही तो कसा सुटला वगैरे अभिनय त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. त्याचा चेंडू उडतो, वेगात येतो तो त्याची उंची आणि पिचमुळे, याच्यात लपलेली 'जोरात टाकला तर कसा येईल' ही धमकी लक्षात घ्या.      
आपलं म्हणणं थकता एखाद्याच्या गळी उतरवणे, सतत तेच सांगून हळूहळू तेच सत्यं आहे असं वाटायला लावणे, धूर्तपणानी लोकं आपल्यामागे गोळा करणे आणि मी त्यांचं मत मांडतोय, माझं काही नाही त्यात असं दाखवणे, बोलून खच्ची करणे, विनोदाच्या नावाखाली टार्गेट करणे, प्लानिंग करण्याच्या नावाखाली फिल्डर हलविणे, रनाउट झाल्यास (स्वत: किंवा समोरचा) समोरच्याला फक्तं आणि फक्तं त्याचीच चूक कशी हे पटवून देणे, उगाच वेळ काढून मानसिक खच्चीकरण करणे, कुठेही उभं केलंत तरी बॉल काही माझ्याच्याने अडणार नाही कारण त्यात माझी काही चूक नाही हे दाखवणे, कमकुवत फलंदाजाचे झेल सोडणे, कधीही वेळेत येणे या सगळ्या प्याकेजला रविंद्र उटगीकर असं म्हणतात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर त्याला फोन करतात अशी अफवा होती. तो एक चांगला मध्यस्थ, निगोशिएटर मात्रं आहे. बोलण्यातल्या चतुराईनी तो मुद्दा गळी उतरवण्यात तरबेज आहे. आपल्या संघाचा कुठे दौरा असेल तर याला आधी पाठवावं. द्रुतगती गोलंदाजांची 'वेगाचे दुष्परिणाम' यावर एक दोन सेशन्स त्यानी घेतली तर आपण जिंकू शकतो. ते गोलंदाज विटकरीनी बोटं ठेचून घेतील आणि 'अहिंसो परमो धर्म:' म्हणत रविचे फोटो गळ्यात अडकवून रस्त्यानी फिरताना दिसतील.   

जयंत विद्वांस - याला कुणी बोलावलं पहिल्यांदा याचा शोध चालू आहे. अतिशय चांगला उत्तम फलंदाज, नऊ आउट झाल्यावर अकरावा नाईलाजानी खेळायला येतो तसा हा येतो. स्वत:ची चेंडूफेक स्वत:ला खेळायला लागत नसल्यामुळे तो सुखी आहे. मुळात ती फास्ट नाही, मी राउंड विकेट टाकत नाही त्यामुळे अंगाला लागायचा प्रश्नं येत नाही, लागलाय का आत्तापर्यंत कुणाला वगैरे मतं त्याची एकट्याची आहेत, कुणाचाही याला दुजोरा नाही याची त्याला खंत आहे. केतन पायानी बॉल अडवून पोचे काढायला ग्यारेजला गेला होता असं ऐकलंय. बाकी विशेष सांगण्यासारखं काही नाही. रवि नंदूच्या तालमीत मौखिक प्रशिक्षण चालू आहे एवढंच.

अजय मराठे - संघटक, उत्कृष्ठ समालोचक, खजिनदार. मुळात हा सगळा आनंदोस्तव चालू होण्यामागे अजयचा हात आहे. कुठलाही फायदा नसलेला हा उद्योग तो मनापासून करतो. चांगलं करण्याची नुसती ओढ असून भागत नाही. त्याकरिता कष्ट घेण्याची तयारी लागते. ती त्याच्याकडे आहे. तो कुणाकुणाला, जुन्या माणसांना फोन करून बोलावतो. त्यावरून चार शब्द ऐकून पण घेतो. उद्या रोहन गावसकर रस्त्यात दिसला तरी तो म्हणेल, 'रविवारी येत जा रे मोकळा असशील तर'. खेळ झाला पाहिजे एवढाच त्याचा शुद्ध हेतू त्यात आहे. पैसे गोळा करणे, चोख हिशोब ठेवणे, त्याच दिवशी पीसीवर काम करून फोटो काढून टाकणे, उसने मागत असल्यासारखे लोकांकडे लाजत पैसे मागणे, अचूक, मार्मिक, मोजकं, सर्वसमावेशक, वाचनीय, कुणीही दुखावलं जाणार नाही याची काळजी घेत, स्वत:बद्दल एकही ओळ लिहिता कसं लिहावं याचा उत्तम नमुना असलेला वृत्तांत लिहिणे वगैरे प्रकार तो हौसेने करतो. त्याचा स्वभाव त्याच्या खेळात दिसतो. उगाच हाणामारी, स्पीड असं काही नसतं. सहसा तो चिडत नाही. कुणी पैसे दिले नाहीत तर तो त्याच्याशी कधीच भांडणार नाही पण एक रन कमी करा, तो उज्वल निकमसारखा तावातावानी भांडेल. निरलसपणे अजय हे सगळं करतोय याबद्दल आम्ही सगळे त्याचे आभारी आहोत.   

एकावेळी अकरापेक्षा जास्ती खेळाडू फिल्डिंगला असतात तरी रन्स होतातच. इथल्या फिल्डिंग पोझिशन्स कदाचित क्रिकेटच्या पुस्तकात सापडणार नाहीत. वाढलेल्या वयात ते हरवलेलं लहानपण, ती भांडण, ते वाद डोक्यात तरळत असतात. त्याची पुनरावृत्ती केल्यामुळे तो काळ जगता येतो. चित्रपटात विग घालून जसा वयस्क माणसाचा तरुण काळ दाखवतात तसाच प्रकार आहे हा. पण मजा येते. कुठलीही कटुता बाळगता आपणा सगळं विसरून खेळतो. भेटणं होतं, गप्पा होतात. खेळताना, भांडताना हुद्दा, वय, आर्थिक परिस्थिती आड येत नाही. हे क्षण जेंव्हा आपण खेळू शकणार नाही तेंव्हा आठवतील. रमायला चांगल्या आठवणी तर हव्यात माणसाकडे, आपण त्या एकेक करून साठवतोय

रविवारी घरी आल्यानंतर स्पेअर्स चेकावे लागतात. दिवसभर काय पुढच्या रविवार पर्यंत पुरतं. गरम पाण्याची पिशवी, आईसपॅक बारा पर्यंत तयार ठेवायला निघतानाच सांगायचं, वेळ कमी लागतो म्हणजे. व्हॉलिनी अर्ध्या किलोच्या डब्यात यायला हवं. पंचवीस एमेम ब्रश घेऊन बसायला बरं पडेल म्हणजे. एकदा चंदनासारखा त्याचा लेप लावला की झालं. दुपारी गप पडायचं. एक ग्लेनग्रांट नाहीतर शिवास तीस एमेल पाण्यातून पेनकिलर म्हणून चालते. सुखाची झोप लागते. स्वप्नात दीपिका, अनुष्का वगैरे कुणी त्रास देत नाही. डोळ्यापुढे सकाळी पडलेला लेगकटर, बुंध्यात पडल्यावर आलेला काठीचा आवाज, उडालेल्या बेल्स, चेंडू अडवताना लाल झालेला हात, बधिर अंगठा, तिसरी पळताना गळयाजवळ पोचलेली फुफ्फुसं. काय नी काय तरळत असतं. पुढच्या रविवारचे प्लान्स तयार होत असतात. थोडा टप्पा अजून मागे हवा, राउंड विकेट आलो तर बाहेर जातो पण कटरची मजा जाते, मिडल लेगला पडून ऑफ जातो त्यासारखं दुसरं प्रेक्षणीय काही नाही. स्वप्नं बघायला काय हरकत आहे निदान

देवाकडे तसंही मी कधी काही मागत नाही पण मरेपर्यंत कुठला नं कुठला खेळ खेळण्याची ताकद रहायला पाहिजे एवढं सिंपल मागणं आहे. बाकी काय लिहू, असाच लोभ असावा, धन्यवाद.
 
जयंत विद्वांस
(यातील चेष्टेने कुणाची मन दुखावली असतील तर दुखू देत, खिल्ली उडवण्याच्या हेतूनेच ते लिहिलंय)