Thursday, 16 July 2015

सु.ब.क. .....

का जगतोय अजून आपण? कधी संपणार हे सगळं? गेली पंचवीस वर्ष हा प्रश्नं सुभाषला रोज पडायचा आणि उत्तर न सापडल्याने परत पडण्यासाठी उद्यावर जायचा. सुभाष बळवंत कवठेकर. लहानपणापासून मी त्याला ओळखतोय. माझ्याच वयाचा तो. एकाच वर्गात, कॉलेजात आम्ही शिकलो. कॉलेजमध्ये त्याला त्याच्या आद्याक्षरांवरून 'सुबक' नाव पडलं. टोपणनाव सोडलं तर आयुष्यात कसलाच सुबकपणा नव्हता त्याच्या. कसलंही ओढ नसलेलं आयुष्यं जगला आणि जगतोय. त्याच्या जगण्याला 'जगतोय' म्हणणं सुद्धा क्लेशकारक आहे, ओढतोय, ढकलतोय म्हणायला हवं. 

आम्ही एकाच वाड्यात रहायचो. त्याचे वडील बँकेत शिपाई होते. नोकरीची शेवटची साताठ वर्ष शिल्लक असताना त्यांनी तेंव्हा गावाबाहेर असलेल्या बिबवेवाडीला ब्लॉक घेतला आणि आम्ही दूर झालो. पण कॉलेजात आम्ही भेटायचो रोज. सुभाष होता मात्रं हरहुन्नरी. कॉलेजात असताना त्याच्याइतके व्याप कुणालाच नसायचे. तो साहित्यं, नाटक, टेबल टेनिस या आणि अशा अनेक समित्यांचा प्रमुख असायचा. साडेपाच फुटाची उंची, किडकिडीत शरीरयष्टीमुळे अजूनच उंच वाटायची, तेंव्हाच विरळ होत चाललेले आणि त्यामुळे वारा असो न असो, भुरभुरणारे केस, हडकुळेपणा झाकण्यासाठी घातलेले ढगळ कपडे (ज्यानी तो अजूनच विचित्रं दिसायचा), खांद्याला कायम समाजवाद्यांसारखी एक शबनम आणि रोजच्यारोज केलेल्या दाढीमुळे गुळगुळीत दिसणारा चेहरा असा सगळा अवतार होता. 

मी कॉमर्सला आणि तो आर्ट्सला होता. त्यात त्यानी जर्मन घेतलेली सेकंड ल्यांग्वेज आणि मेन सब्जेक्ट इंग्लिश लिटरेचर. त्याला एमेएमेड करायचं होतं आणि नंतर प्राध्यापकी. पण तो इंग्लिश मात्रं झकास बोलायचा, आम्हांला बोलायला भाग पाडायचा, तेंव्हा आम्ही त्याची खूप टर उडवायचो पण तो सराव करत राहिला आणि मराठीत विचार करून ट्रान्सलेटेड इंग्लिश नाही बोलायचा तो, जे बोलायचा ते अस्खलित इंग्लिश, आम्ही तिथेच राहिलो त्या बाबतीत, शब्दं शोधणारे, क्रियापद चुकणारे आणि शेवटी हिंदीवर मग मराठीवर येणारे. सुभाषमधे अनेक गुण होते. तो बासरी, हार्मोनियम सुंदर वाजवायचा, ती ही कुठेही न शिकता. बासरी फुंकताना जे काय त्याचे गाल फुगीर दिसायचे तेवढेच.

आम्ही दोघंही ग्राज्यूएट झालो आणि वाटा वेगळ्या झाल्या. मी वशिल्यानी बँकेत लागलो आणि त्यानी एमएला प्रवेश घेतला. भेटीगाठी कमी झाल्या. एखाद्याच्या आयुष्यात अमुक एक गोष्टी का घडतात याला काहीही उत्तर नाही. एमएचं पहिलं वर्ष अर्ध झालं होत नी त्याचे वडील रिटायर्ड झाले. पीएफ, ग्राच्यूईटी कर्जात वळती झाली, तरी पाच पन्नास हजार कर्ज शिल्लक होतं म्हणून ज्या काय किडूकमिडूक एफड्या होत्या त्याच बँकेत त्याच्यावर तुळशीपत्र ठेवून ते मिटवून टाकलं. याला नोकरी करणं गरजेचं होतं आता, पेन्शन अशी कितीशी येणार. तरी सुभाष सायकलवर जायचा सगळीकडे, व्यसन कुठलंच नव्हतं, त्यामुळे तो ही खर्च नाही, त्यानी मग चहा पण सोडला. पहिलं वर्ष झालं आणि त्याचे वडील गेले. आईही आता थकली होती त्याची. सुभाष एकतर उशिरा झालेलं अपत्यं होतं त्यामुळे तो एकटाच होता. हा जेमतेम एकवीस बावीस आणि आई पासष्ठीची. 

साडेसाती साडेसात वर्ष असते असा समज आहे. सुभाषला बाविसाव्व्या वर्षी लागली ती आजतागायत आहे. त्यानी एका फाईव्ह स्टार हॉटेलमधे संध्याकाळी पार्ट टाईम जायला सुरवात केली. इंग्लिशचा त्याला झालेला हा एकमेव फायदा. त्यात त्याच्या आईला प्यारालीसीस झाला आणि सुभाषच्या शिक्षणाला आणि आयुष्याला पण. हॉस्पिटलखर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा होता. लोक मदत तरी किती करणार. त्याच हॉटेलने त्याला एकरकमी ते पैसे दिले, एवढाच काय तो दिलासा. आईला वरचेवर फ़िजिओथेरपीला न्यावं लागायचं त्यामुळे याने कायमची नाईट शिफ्ट घेतली. करन्सी एक्स्चेंजचं जबाबदारीचं काम याच्याकडे होतं. त्यामुळे संध्याकाळी सहाला जायचा ते सकाळी निघायला त्याला आठ व्हायचे. 

हा हा म्हणता बारा वर्ष अशीच गेली. दिवसभर आईचं करून, थोडी झोप घेऊन तो हॉटेलात निघायचा. कुणाकडे जाणं येणं नाही, हौस मौज नाही, सगळं कसं साचल्यासारखं झालं होतं. आयुष्याचं डबकं झालं पार त्याच्या. कसली हालचाल नाही, नुसतं शेवाळं. तुटपुंजा पगार, आजारी आई, सततची आर्थिक विवंचना, कर्ज, वाढतं वय, कायमची नाईट शिफ्ट या सगळ्यानी सुभाषचा 'पा' झालाय पार. तो पस्तिशीत असताना आई गेली आणि तो सुटला. सगळी उमेद संपली होती, प्राध्यापकी नाही आणि काही नाही. कसबसं त्यानी एमए पूर्ण केलं होतं एवढंच. लग्नाचा विचार करायला त्याला कधी उसंतच मिळाली नाही आणि आता विचार करायची त्याची इच्छाही नव्हती.         

परवाच त्याला भेटलो ब-याच महिन्यांनी. दोघांनाही सुट्टी होती, चारपाच तास बसलो होतो गप्पा मारत निवांत. माझ्याच वयाचा असूनही आपण एक वयस्कं माणसाशी बोलतोय असं वाटत होतं. दोघंही आता चाळीशी ओलांडून पन्नाशीकडे धावतोय. तो खूप मनापासून बोलला, मनातलं बोलला. म्हणाला, ' मी का जगतोय माझं मलाच कळत नाही. रहायला स्वत:चं घर आहे एवढाच आनंद आहे बघ आयुष्यात. मला कुठलं व्यसन नाही. ना बायको न पोरबाळ, न नातेवाईक, न फार मित्रं. मला कुणाकडे जायला वेळ नव्हताच कधी, माझ्याकडे कोण येणार मग. जागरणानी चष्मा सोडयाच्या बाटलीच्या काचेचा झालाय, त्यामुळे वाचन होत नाही. अरे कित्त्येक वर्षात मी नाटक, सिनेमा सोड साधा घरी आल्यावर टीव्ही पाहिलेला नाहीये. तो चालू आहे का बंद ते ही बघावं लागेल. वर्तमानपत्रं एवढंच वाचन शिल्लक राहिलंय.'

'तुला सांगतो, काय काय स्वप्नं होती रे माझी. मला सूट घालून फर्ड इंग्लिश बोलायचं, शिकवायचं होतं. एकदा सगळ्यांना म्हणजे कुटुंबाला घेऊन इंग्लंडला जाऊन शेक्सपिअरचं थडगं बघायचं होतं. त्याच्या नाटकांवर मला पीएचडी करायची होती. आई रडायची रे सारखी. मी जिवंत आहे म्हणून तूला जगता येत नाही म्हणायची. पण मला उलट वाटायचं नेहमी. आपल्यामुळे याचं आयुष्यं नासतंय याचं तिला वाटणारं दु:खं माझ्या दु:खापेक्षा मोठं होतं. ती सतत ती सल घेऊन जगली शेवटचा काळ. ती  गेल्यावर मी रडलो नाही कारण तिची त्या शल्यंयुक्तं जगण्यातून सुटका झाली याचा आनंद मोठा होता मला. घर कसलं रे पाठ टेकायला येतो इथे. इथे येण्याचा आनंद होत नाही मला, उलट कामावर जायचा होतो. इथे कोण वाट बघतंय, तिथे पाच मिनिट उशीर झाला तर निदान लोक विचारतात तरी, बरं वाटतं तेवढंच', डोळे मिचकावत तो म्हणाला. 

'आउटडेटेड झालो रे मी, एकंच काम करत राहिलो. नवीन काही शिकता आलं नाही. आता काळ पुढे गेला. इंग्लिश बोलणारी, फटफटा कॉम्प्युटर चालवणारी तरुण मुलं मुली ढिगानी आलीत रे आता. मी सोडली नोकरी तर त्यांचं काही अडणार नाहीये. प्रामाणिकपणा आणि सुट्टी नाही याच गुणांपोटी मी आहे अजून तिथे. काय गंमत असते बघ, मी कुठे जाणार आहे सोडून म्हणून ते निर्धास्तं आहेत आणि त्यामुळे मी ही. सुट्टी घेऊन करू काय, कुठे जाणार, सवयंच नाही रे कधी. जाग्रण, शारीरिक, मानसिक उपासमार आता डोकं वर काढतीये पण. हल्ली थकल्यासारखं होतं लगेच. अजून चार एक वर्ष करेन नोकरी. फंड, ग्राच्युईटी, सेव्हिंग सगळं धरून वीस एक लाख होतील, या ब्लॉकचे येतील पंचवीस. पन्नास धर अंदाजे चार वर्षांनी. आहे कोण रडायला मागे माझ्या. परवा एका वृद्धाश्रमाची जाहिरात वाचलीये. महिना पंधरा हजार घेतात. तेंव्हा वीस घेतील कदाचित. नऊ टक्के व्याज धर, तरी साडेचार लाख येतील वर्षाला, यांना दोनचाळीस गेले तरी दोनेक उरतील आजारपण, औषधासाठी. मेल्यावर सगळे पैसे त्यांना आणि अनेक आश्रमांना देऊन टाकेन. इंग्लंडला जाऊयात? मी काढतो तुझं तिकीट पण एकदा शेक्सपिअरच्या थडग्याजवळ बसून येउयात, सुखाने मरेन बघ'. 

मला काही अप्रूप नाही शेक्सपिअरच्या थडग्याचं पण जाउन येईन म्हणतो त्याच्या बरोबर. कधी कधी वाटतं, क्षुल्लक संकटांनी, अडचणींनी संसाराचा व्याप नकोसा होतो आपल्याला, सगळं व्यर्थ वाटतं पण सुखाच्या कणभर शिडकाव्यानी परत जगावंसं वाटतं. कुठल्यातरी सुखाच्या अपेक्षेनी जगत रहातो आपण, मुलाबाळांच्या आनंदात हरवतो, वाढलेल्या वयाच्या जाणीवेनी खंतावतो पण निदान रोज काहीतरी घडतं आयुष्यात. सुभाषचं जगणं काय जगणं नाही. त्याच्याकडे पाहिल्यावर आपलं आयुष्यं खूप सुखाचं वाटू लागतं.

पन्नाशीतच वृद्धाश्रमात जाणारा नव्हे नाईलाजानी जाणारा सुभाष. त्याचं त्यानंतरचं आयुष्यं तरी 'सुबक' जावो, अजून काय म्हणणार.   

--जयंत विद्वांस 

(मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला माणूस आलेला. बीए (इंग्लिश), जर्मन, रशियन यायचं, फ्ल्यूट, हार्मोनियम वाजवायचा, चेस च्याम्पिअन होता कोलेजमधे, ट्रान्सलेटरचं काम केलेलं आणि हॉटेलला नोकरी - गेली वीस वर्ष नाईट शिफ्ट, कारणं हीच जवळपास, राहतं घर आहे, पंचेचाळीशीचा तो माणूस अजून आठवतो मला. पाठ दुखते, डोळे चुरचुरतात म्हणाला हल्ली, त्यांनी जॉब सोडा सांगितलंय नाईट नको असेल तर. मी शिकेन म्हणाला अकौन्टस. आपण खूप सुखी आहोत.)   
 
 
  

Tuesday, 14 July 2015

गल्लीच्या कोप-याला……

गल्लीच्या कोप-याला…… (स्वैरानुवाद)

गल्लीच्या कोप-याला आपला दोस्त रहातो
एवढ्या मोठ्या शहराला थांबणं माहित नाही
दिवस आठवडे महिने सुळकन सटकून गेले
कळायच्या आत वर्ष पण संपलं
पण मी काय भडव्याचं तोंड नाही पाहिलं
आयुष्यं म्हणजे सालं ऊर फुटायची शर्यत
त्याला माहितीये माझा तो किती लंगोट आहे ते
तरुण होतो तेंव्हा तो माझ्या नाहीतर मी त्याच्या
घरात पडलेलो असायचो
आता आम्ही दोघांना खाजवायला वेळ नाही
यशाच्या मृगजळामागे धावण्याचा खेळ सगळा
दमलोय, तरी खेळतोय अजून दोघंही
उद्या, उद्या नक्की, मी बाळ्याला फोन लावणार
'आहेस का खपलास' विचारणार, तो म्हणेल,
'तुला पोचवून मगच जाणार'
'उद्या' आला आणि 'उद्या'चा 'काल' ही झाला 
गल्लीतल्या कोप-यावर खरंतर पण
चंद्राएवढ्या अंतरावर गेल्यासारखा झालाय
'पक्याचा फोन आला'
'बाळ्या गेला सकाळी'
माझ्या लायकीप्रमाणेच मला मिळालं
माझ्या बरोबरच जाणारं चिरंतन दु:खं मिळालं
 
गल्लीच्या कोप-याला आपला दोस्त रहातो
सॉरी, …. "रहायचा"

--जयंत विद्वांस


---------------------------------------------------------------------
Around the Corner
            ---- by Charles Hanson Towne

Around the corner I have a friend,
In this great city that has no end;
Yet the days go by, and weeks rush on,
And before I know it a year is gone,
And I never see my old friend's face,
For Life is a swift and terrible race.
He knows I like him just as well,
As in the days when I rang his bell,
And he rang mine. We were younger then,
And now we are busy, tired men:
Tired with playing a foolish game,
Tired with trying to make a name.
"To-morrow," I say, "I will call on Jim
"Just to show that I'm thinking of him."
But to-morrow comes -- and to-morrow goes,
And distance between us grows and grows.
Around the corner -- yet miles away,...
"Here's a telegram sir,..."
                              
  "Jim died today."
And that's what we get, and deserve in the end:
Around the corner, a vanished friend.

 

ऋणी.....

व्यसन कुठलंही वाईटच जर ते प्रमाणाबाहेर असेल तर. शेक्सपिअर म्हणाला होता नावात काय आहे? खरंय, स्कॉचच्या नावात काही नसतं. शिवास काय ब्ल्याक डॉग काय. स्कॉच ती स्कॉचच. बाई सुंदर ती सुंदरच, सांगा ना नावात काय आहे तिच्या. 

मस्तं शनिवार आहे. सोनसळी रंगाची, पारदर्शक कारभार असल्यासारखी आरपार सगळं दाखवणारी एक पेर उंचीची स्कॉच कटग्लास मधे घ्यावी. जातीच्या सौंदर्याला मेकपची गरज नसते तद्वत चार हिमनग त्यात टाकावेत. थंडगार पाणी त्यात ओतावं. मूळचा गोरा रंग उन्हात रापून मस्तं खरपूस तांबूस दिसतो पण इथे उलटा प्रकार आहे. गडद टोपाझ कलर थोडा डायल्यूट होतो आणि लिंबकांतीची बाई पावसात भिजल्यावर आकर्षक दिसते तशी अंगावर थंडीचा शहारा घेतलेली स्कॉच दिसते. 

भूतलवरची आपल्याला आवडणारी अप्सरा आणि स्कॉच यात साम्यं काय? दोघींना फापटपसारा लागत नाही सुंदर दिसण्यासाठी, दोघींच्या नुसत्या कल्पनेनी पण सुख होतं, दोघींकडे नुसतं बघत बसण्यात पण मजा आहे, दोघींचा आस्वाद हळूहळू घेण्यासारखं दुसरं सुख नाही, दोघींची चव ओठाला लागली की जीवघेणी असते,  दोघींच्या सहवासात सगळ्याचा विसर पडतो.

जड झालेल्या डोक्यात अपुरी, कधीही पुर्ण न होणारी स्वप्नं पुर्णत्वाकडे जात असतात. आवडीचा चेहरा डोळ्यात डोळे घालून बघत असतो, मौनातलं संभाषण स्पर्शातून चालू होतं, न बोलता होणारा तो मनातला संवाद सांगता न येण्यासारखा. पापण्या अर्ध्या उघडमिट करतात आणि ती म्हणते, नको जागू उगाच, ये. निष्पाप बाळाच्या मनोवस्थेत तिच्या कुशीत शिरावं आणि सगळं विसरून झोपी जावं.

सुख म्हणजे दु:खाचा विसर नव्हे तर त्या क्षणी आपण सुखी आहोत एवढीच भावना असणे म्हणजे सुख.
स्कॉटलंडर्स मी तुमचा ऋणी आहे.

--जयंत विद्वांस 

वन्स अपॉन अ टाईम (२०).....

निसर्गत्त लाभलेली साडेसहा फुटाची उंची, पोकर खेळताना लागतो तसा शांत, धीरगंभीर चेहरा, भुवया उंचावून बघायची सवय असलेला मितभाषी आग्यावेताळ म्हणजे कोर्टनी वाल्श. त्यांचे थ्री डब्ल्यूज होते तसे दोन 'सी' होते कर्टली अम्ब्रोज आणि कोर्टनी वाल्श. विंडीजचा सुवर्णकाळ संपताना आलेले हे दोन शेवटचे दिग्गज. त्यांना अजून एक जोडगोळीची सोबत असती तर विंडीजचा सुवर्णकाळ निश्चितच लांबला असता. त्या अर्थाने ते आणि लारा दुर्दैवी. हूपर, चंदरपाल, सरवान, कफी, बिशप, कमिन्स बंधू एकावेळी सगळे चमकले असं क्वचित झालं. 

आधी लेगस्पिन टाकणारा वाल्श नंतर स्पीडकडे वळला ते बरंच झालं. त्यामुळे त्याचा लेगकटर खतरा होता. होल्डिंगसारखा डोक्याने गोलंदाजी करणारा माणूस. शांत चेह-यामुळे तो अजूनच फसवा वाटायचा. अम्ब्रोज दिसायलाच मुळात उग्रं होता त्यामुळे त्याची भीती वाटायचीच पण वाल्श एकदम मध्यमवर्गीय माणूस दिसायचा. शिव्यागाळी, टोमणे, स्लेजिंगची गरज नव्हतीच दोघांनाही. उनका पेसही सबकुछ बोलता था. कपिलदेव पेक्षा सतरा टेस्ट कमी खेळून त्यानी त्याचा रेकोर्ड मोडला होता. फलंदाज म्हणून मात्रं तो विनोदी प्रकार होता. त्यातली दोन रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. त्रेचाळीस वेळा शून्यावर आउट आणि एकसष्ठ वेळा नाबाद. टेस्ट मधे ९३६ आणि वनडे मधल्या ३२१ धावा मिसहिट, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए अशाच असणार. 

विंडीजचे प्लेअर दिसायला गोरेगोमटे नसतील, फलंदाजाला चेंडू लागला, रक्तं आलं की नाचतील, खुनशी आनंद मानतील पण ते दिलदार मात्रं होते. गावस्करच्या पहिल्या सिरीजनंतर त्याच्यावर गाणं तयार करायचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे. ते रडीचा डाव खेळत नाहीत, रेकॉर्ड करता खेळत नाहीत, मजा घेतात. मला वाल्श स्मरणात आहे तो त्याच्या खिलाडूपणासाठी. सत्याऐंशीच्या वर्ल्डकपला वाल्शनी वेस्ट इंडीजला बाहेर काढलं. चेंडू टाकायच्या आधी क्रीज सोडून पुढे येणा-या सलीम जफरला त्यानी थांबून वार्निंग दिली पण आउट केलं नाही. त्यानी तसं केलं असतं तर ते सेमीत गेले असते. पण त्यानी तसं केलं नाही. 

माणूस जन्मत: कितीही दणकट असला तरी त्याला तो फिटनेस जपावा लागतो. टेस्ट मधे ५०००+ ओव्हर टाकणारे चौघे आहेत फक्तं. मुरली (चेंडू ४४०३९, विकेट्स ८००), शेन वार्न (चेंडू ४०७०४, विकेट्स ७०८), अनिल कुंबळे (चेंडू ४०८५०, विकेट्स ६१९) आणि वाल्श (चेंडू ३००१९, विकेट्स ५१९) (ग्लेन म्याग्रथ सव्वाशे ओव्हर कमी  - चेंडू २९२४८, विकेट्स ५६३). तीन स्पिनर आहेत त्यातले. तरी यात वनडे चेंडू आणि विकेट्स यात नाहीत. इतकी वर्ष सलग फीट राहणं खायचं काम नाही.

काळानुसार सगळंच बदलत असतं. खेळ कसा त्यातून सुटेल. पण खेळ 'खेळ' या भावनेतून खेळणं कमी झालंय, जो तो जिंकण्यासाठी खेळतोय. ट्वेंटीट्वेंटी, वनडेच्या समालोचनात सांगतात ना It doesn't matter how they come, how many is important तेच आता जिंकण्याच्या बाबतीत झालंय. आफळेबुवा त्यांच्या कीर्तनात किस्सा सांगायचे. एका माणसानी दुस-या माणसाशी पैज लावली ५० लोटे दुध पिण्याची. पहिला माणूस गायब झाला म्हणून दुसरा बघायला गेला की हा अचानक काय गायब झाला, काही अघोरी उपाय करतोय की काय जिंकण्यासाठी? तर पहिला पठ्ठा दुध पीत होता, म्हणाला, 'बघतोय, किती पिता येतंय ते'. हरण्याचं दु:ख नाही, स्वत:ची लायकी चेक करायची ती लोकं. 

हे दोन 'सी' तसेच जिगरबाज होते. इंग्लंडमधे इंग्लंड विरुद्ध सामना चालू होता. विंडीज हरणार हे कन्फर्म होतं. बहुतेक रिची रिचर्डसन कप्तान होता. चौथ्या दिवशीच डावानी हरायची नामुष्की समोर होती. अतीव करुणेतून उत्तम विनोद, उपहास निर्माण होत असावा. रिचर्डसननी अम्ब्रोसला विचारलं, कितीचा लिड मिळाला तर आपण इंग्लंडला हरवू शकू? ब्याट्समन बीट झाल्यावर क्वचित त्याच्याकडे बघून तो "वाचलास लेका" अशा अर्थाचं स्मित करायचा. अम्ब्रोसनी एकंच शब्दं सांगितला "शंभर". संपताना १०५ चा लिड देऊन विंडीज संघ बाद झाला. सकाळी लंचच्या आत इंग्लंड जिंकणार हे शेंबड पोर सांगू शकलं असतं. जे घडलं ते अविश्वसनियं होतं. इंग्लंड सर्वबाद ९५. अम्ब्रोस पाच वाल्श पाच. अंगावर बोलिंग न करता. भन्नाट वेग आणि इंग्लंडचा स्विंग यांनी वापरला. याला म्हणतात जिगर, स्वत:च्या कर्तुत्वावरचा आत्मविश्वास. 

शोले मधे धर्मेंद्र गुंडांच्या संख्ये बाबत म्हणतो 'मै कुछ ज्यादा तो नही बोल गया', अमिताभ म्हणतो 'अभी बोल ही दिया ही तो ठीक है, देख लेंगे'. विंडीजचे जय वीरूच ते.  

--जयंत विद्वांस 

Friday, 3 July 2015

पेरू…

पेरू…

पंधरा पैसे तिकीट होतं बसचं तेंव्हा भिकारदास ते पर्वती दर्शन. दोघांचे तीस पैसे व्हायचे. दोन निरागस पोरं तुम्हांला सांगतो, एक सातवीला, एक पाचवीला . शनिवारी एक प्लान असायचा त्या दोघांचा. ते आणि अजून दोघं तिघं, चालत यायचं घरी, बस मिळाली नाही, निघताना लेट झाला, खेळत होतो अशी कित्त्येक कारणं तोंडपाठ होती, खपून जायची उशीर झाला तरी, मुळात कुणी विचारायचं नाही. तसंही पंधरा वीस मिनिटात पोचायचे ते चालत. 

सारसबागेपाशी टोपली घेऊन बसणा-या म्हातारबाबाकडे साईझ लहान असेल तर पाच पैशाला एक आणि मोठा असेल तर दहा पैशाला एक पेरू मिळायचा. (तेंव्हाचा लहान पेरू पण आत्ताच्या मधल्या साईझ एवढा असायचा आणि मोठ्ठा म्हणजे खरंच मोठ्ठा). आधी मागच्या नवलोबाच्या देवळात नळाला तोंड लावून ढसाढसा पाणी प्यायचं, तोंड पुसलंच पाहिजे असं काही नव्हतंच तेंव्हा. हात पुसायला खाकी चड्डी मळखाऊ रंगाला जागायची आणि बाही होतीच की तोंड पुसायला, शनिवार म्हणून गेल्यावर धुवायला तर टाकायचाय शर्ट. मग म्हातारबाबाकडे घासाघीस करून म्याक्झिमम साईझचा पेरू पदरात पाडून कापून घ्यायचा, चिक्कार तिखट मीठ घालून परत हातावर वेगळं घ्यायचं. पेरू खात खात घर कधी यायचं कळायचंच नाही. तोंडावरून हात फिरवून झाले की पुरावा गायब, दोघं साळसूद घरात. 

एकदा नेहमीप्रमाणे प्लान पार पडला. दोघं खुश. दुपारी वडिल घरी आले जेवायला. जेवताना लवांकुशांची चौकशी झाली. बापाला माया फार. 'काय रे, आज चालत आलात का उन्हाचे?' 'तत्पर माउली म्हणाली. 'छे बसनी आलेत.' लवांकुशांचे चेहरे बघण्यालायक झाले होते. हातातला घास हातात, तोंडातला तोंडात आणि डबल जेवतील इतका मोठा खड्डा पोटात पडलेला. दोघांचे चिमुकले मेंदू 'यांना कसं कळलं, 'बसनी आलो'ची थाप कंटिन्यू ठेवावी का?, कितपत कानफटतील?' असल्या गहन प्रश्नांची उत्तरं शोधण्यात दंग झाले. तेवढ्यात एक पचकलाच 'बसनीच आलो'. 

दशरथ राजानी जेवढ्या प्रेमानी रामलक्ष्मणाकडे पाहिलं नसेल एवढ्या प्रेमानी त्यांनी दोघांकडे बघितलं. 'तुम्ही चालत आलात, सारसबागेपाशी रस्त्याचं काम चालू आहे आणि तुमच्या दोघांच्या चपलेला डांबर आहे. काय केलंत पैशाचं?' 'पेरू खाल्ले'  हे म्हणताना जो नाजूक, अस्पष्टं आवाज आला ना तसा काढायला स्किल लागतं बघा, तुम्हांला सांगतो. 'अरे मग खोटं कशाला बोलायचं, सांगायचं की पेरू खाल्ले म्हणून'. 'हो, घाबरून नाही सांगितलं, परत नाही असं करणार' हा आवाज मात्रं थोडा बोर्नव्हिटा खाल्यासारखा ताकदवान होता. 

तुम्हांला सांगतो, दोघंही आता मोठे झालेत, बाप झालेत. खिशात नोटा वाढल्या, किंमत कमी झाली. रणरणत्या उन्हात रस्त्याच्या कामावर ते उभं राहून बघण्यात पण मजा होती, डांबराचा वास मस्तं यायचा, दारात अंगण करतात तसा तो खर टाकलेला रस्ता रोलर फिरल्यावर कसा बेसनाच्या लाडवासारखा गुळगुळीत व्हायचा. त्यातला मोठा परवा भेटला, म्हटलं आठवतंय का रे? म्हणाला, हो तर, सगळं आठवतंय. पण ती मजा गेली बघ, कित्त्येक वर्षात रस्त्याचं काम चालू असताना डांबराचा वास घ्यायला थांबलो नाहीये, रस्त्यात उकिडवा बसून कल्हई लावतात ते तासंतास पाहिलं नाहीये, पेरू साले फ्रूट स्टालला आले, एखादा म्हातारबाबा दिसत नाही, हा घेऊ का तो घेऊ असं होत नाही, कुठलाही आरडाओरडा न करता तो पांढ-या मिशात कौतुकानी हसायचा तसा हसत नाही, 'अरं पोरा, दोन्हीबी सारख्येच हाईत, घे कंचा बी' म्हणत नाही'. 

'तुला सांगतो, मी वाट बघतोय, असंच रस्त्याचं काम चालू असावं, माझी पोरगी म्हणेल "बसनी आले". जेवण झालं की मी बाहेर जाईन आणि शिग घेऊन डांबर खरडता खरडता तिला हाक मारेन. सगळी पापं धुतली जातील बघ' 

जयंत विद्वांस


हवी….

हवी…. 

शीड फाटलंय, क्षितिजावर वादळ, वल्ह्यालाही चीर

बोट बुडणार आहेच पण सरळ करायला हवी



कागदावर लाख, हातात राख पण उसना दिमाख 

बोंब होण्याआधी दिवाळखोरी जाहीर करायला हवी



श्वासात ती, नसानसात ती, वळणावर पाठमोरी ती

तिच्याशिवाय जगण्याची आता सवय करायला हवी

जयंत विद्वांस

Tuesday, 16 June 2015

मेहेंदळे बाई.....

डॉ.सौ.अपर्णा अशोक मेहेंदळे, एम.बी.बी.एस.ही पाटी मी अनेक वर्ष वाचत आलोय. जुन्या घरातून बाहेर पडलं की जाताना डाव्या हाताला ती दिसायची. डॉ.सौ.हे फक्तं पाटीपुरतं. बाकी सगळ्यांच्या त्या मेहेंदळेबाई होत्या. १९७८ ते जवळजवळ २००३, पंचवीस वर्ष आम्ही, आमच्याकडे येणारे नातेवाईक यांनी त्यांची औषधं आणि बोलणी खाल्ली. ती पाटी काढली असती तरी चालली असती इतक्या त्या प्रसिद्ध होत्या. अतिशय स्पष्टवक्त्या आणि अचूक निदान असलेल्या. नऊ म्हणजे नऊला त्या यायच्या आणि संध्याकाळी पाचला. रस्त्यात कुणी पेशंट भेटला तरच काय तो उशीर. लोक थांबलेले असायचे याची जाणीव चालण्यात दिसायची. 

साडेपाच फुटाच्या आसपासची उंची. थोड्याश्या स्थूल, चष्मा, गो-यापान आणि देखण्या होत्या. निम्मे आजार स्टेथो न लावताच कळायचे त्यांना. उगाचच बाहेरची औषध लिहून देणे हा प्रकार नव्हताच. एमार कडून आलेले स्याम्पल्स त्या गरजूला फ्री द्यायच्या. बाकी जी काय गोळ्या औषधं असतील ती त्यांच्याकडची. त्यामुळे बाहेर बसलेल्यांकडे बाटली असायचीच. त्यांनी रंगीत पाणी दिलं असतं तरी लोक ते पिऊन विश्वासावर बरे झाले असते. टेस्ट प्रकार कधीच नव्हता. प्रत्येकाची आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थिती त्यांना माहित होती त्यामुळे आजार नेमका कशामुळे हे त्यांना चटकन कळत असावं, वर्षानुवर्ष आमचं आणि एकूणच पर्वती दर्शनचं उधारीखातं त्यांच्याकडे होतं. अगदीच खूप पैसे साठले तर त्या आठवण करायच्या, नाहीतर पैशाची आठवण त्यांनी कुणाला केलेली मी ऐकली नाही. त्यांच्यासमोर कुणाला खोटं बोलताच यायचं नाही. सोज्वळपणा, न बोलता केलेला चांगुलपणा जास्ती भेदक असतो. 

आई त्यांच्याकडे सवाष्णं म्हणून जेवायला जायची वर्षातून एकदा. दवाखाना संपला की दुपारी कार्यक्रम असायचा तो. तिथली ट्रीटमेंट वेगळी असायची. एक पदर खोचून स्वागत करणारी गृहिणी. एकदा मी कामावर दांडी मारून त्यांच्याकडे सर्टिफिकेट आणायला गेलो होतो. 'काय झालंय रे तुला, खोटं  बोलतोयेस, आज देते, पुढच्यावेळेला मिळणार नाही', म्हणाल्या. मी त्यांच्याकडून घेतलेलं ते एकमेव सर्टिफिकेट असेल. लग्नं झाल्यावर आमचे पैसे आम्ही द्यायचे म्हणाल्या. आता त्यांनी दवाखाना बंद करून पण चार पाच वर्षे झाली असतील. त्याआधी दोनेक वर्ष त्या फक्तं संध्याकाळी यायच्या. दोन्ही मुलं डॉक्टर झालीत त्यांची. मुलगी अमेरिकेला असते आणि मुलगा ऑर्थोपेडीक आहे. त्यामुळे कितीतरी वर्षात त्यांची भेट नाही.  

नऊ दहा वर्ष झाली, माझ्या चेह-याचा उजवा भाग थोडा प्यारलाईझ झाल्यासारखा वाटला. जाम टेंशन आलं होतं, आधीच बाकी सगळी परिस्थिती बिकट होती. कामावर जवळच्याच हॉस्पिटलमधे गेलो तर म्हणे बीपी वाढलाय, दाखल व्हा. बाकी टेस्ट करायला लागतील. घरी जाऊन येतो म्हटलं. पैसे नव्हतेच एवढे. पण काही वेळेला बुद्धी साथ देते. संध्याकाळी सुटल्यावर मेहेंदळेबाईंच्याकडे गेलो. काय होतंय ते विचारलं, तीन वाक्यात निदान झालं, "१) डायरेक्ट पंख्याच्या वा-यात झोपला होतास? नाही. २) खिडकीत बसून प्रवास करताना गार वारं लागलं? नाही. ३) नागीण झाली होती? हो". एक चिट्ठी लिहून दिली. शॉक घे पंधरा दिवस, होईल बरं.

फ्यामिली डॉक्टर हा नातेवाईक असलेली आमची पिढी नशिबवान म्हणायची. आता सगळं फास्ट झालंय. मेडिकल स्टोअर मधून लोक डायरेक्ट औषधं घ्यायला लागले. उगाच ताप आला म्हणून गेलो तर बाई एकाच दिवसाचे औषध द्यायच्या. 'लगेच घेऊ नकोस, अगदीच वाढला ताप तर घे, अरे ताप बाहेर नको का पडायला, वर्षातून एकदा येउन जायला हवाच ताप'. आता असलं काही कानावर पडत नाही. जेम्स सारख्या वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या आणि महागडी औषधं लिहून मिळतात. आजार बरा होतोय, रोग वाढतोय. 

एकदा जाऊन येईन आता. इतकी वर्ष त्यांनी आम्हांला विचारलं, आता मी विचारेन, "ब-या आहात ना?"

--जयंत विद्वांस

Friday, 12 June 2015

पी.एल. …….

मोठा माणूस. कर्तुत्वानी, दातृत्वानी, बुद्धीनी. अनुकरण करावा असा. अनुकरण मुद्दाम म्हणतोय कारण कॉपी करायला धारिष्ट्यं हवं, कुवत हवी आणि असली समजा तरी कातडं किती काळ पांघरणार, कोल्हेकुई समजतेच आज ना उद्या. पुलंचा सगळ्यात मोठा मला भावलेला गुण काय असेल तर खुदकन हसू आणणारा विनोद आणि टचकन पाणी आणणारं साधं सरळ वाक्यं किंवा शब्दं. त्यांनी खूप पण वाचनीय लिहिलंय पण फक्त 'व्यक्ती आणि वल्ली' जरी त्यांनी लिहिलं असतं तरी ते थोर म्हणूनच गणले गेले असते इतकं सुंदर लिहिलंय त्यांनी. 

माणूस नजरेसमोर उभा राहील असं वर्णन कसं करायचं हे मी त्यांच्याकडून शिकलो, किंबहुना जी काही सत्यं/काल्पनिक व्यक्तिचित्रं आजवर लिहिली ती त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच. कॉपी शक्यं नाही त्यामुळे केली नाही पण शैली मात्रं असेल काही तर ती त्यांचीच. त्यांच्या काल्पनिक माणसांचं एखादं वाक्यं सुद्धा त्यांना आणि त्या पात्राला अजरामर करून गेलं. अजूनही 'ही गेल्यापासून दारचा आंबा मोहरला नाही' या वाक्याला पाणी येतंच, हरितातात्यांवरच्या लेखात 'पाठीला डोळे फुटावेत…' हा परिच्छेद वाचताना आवंढा येतोच, 'बटाट्याची चाळ' कालबाह्य झालं असेल कदाचित पण त्याचं शेवटचं चिंतन मात्रं चटका लावून जातं.  

दुसरा मोठा गुण म्हणजे कौतुक. चांगल्याचं जाहीर कौतुक करायचं, प्रस्तावना लिहायची आणि त्या माणसाला उभा करायचा. 'रामनगरी'मधे प्रत्येक प्रयोगाला राम नगरकर त्यांच्या ऋणाचा उल्लेख करायचे, मच्छिंद्र कांबळीचं 'वस्त्रहरण' फ्लॉप होतं आल्या आल्या, पुलंनी उचलून धरलं त्यानंतर मागे वळून पहायची गरज पडली नाही त्या नाटकाला. मूळ नाटक, पुस्तक सुंदर असणारच हे मान्यं पण प्रथितयश माणसाची थाप पडली की त्याचा प्रवास लवकर आणि विनासायास होतो. 

पुलंच्या लिखाणात तुम्हाला व्हिलन दिसणार नाही. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. वाईट दिसणार नाही, पहाणार नाही, ऐकणार नाही, सांगणार नाही. स्वत:च्या दु:खाचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात, लेखात मला सापडलेला नाही. त्यांची पहिली बायको लग्नाच्या दुस-या दिवशी गेली. निपुत्रिक होते. पण कुठेही कडवट सूर, उल्लेख नाही. पण बरं झालं ते निपुत्रिक राहिले. त्या वारसाची तुलनाहत्या झाली नाही त्यामुळे (अभिषेक बच्चन, रोहन गावसकर बघा - जिंदगीभर अमक्या तमक्याचा मुलगा हीच ओळख नशिबात). जे काही होतं ते पुलंबरोबर संपलं.

कधी विषण्णता आली, एकटं वाटलं, निरस वाटलं की मी पुलं हातात घेतो, हसतो, रडतो, रमतो, बाकी सगळं विसरतो आणि रिफ्रेश होतो. कुठल्याही पानापासून सुरवात करा, अडचण नाही. कधीही बघायला शोले, गणपतीत वाजायला नाच रे मोरा, मुंगडा मुंगडा आणि एकांतात/गर्दीत वाचायला पुलं, यांना पर्याय नाही. अजूनही पुलं दुकानात खपतात. पंधरा वर्षात नवीन काहीही आलं नसतानाही, अजून काय पाहिजे. पुलं म्हणालेत म्हणून मला वुडहाउस वाचायचाय. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला मिळाला होता वुडहाउस हैदोस लेव्हलच्या मासिकाशेजारी. मी कर्मदरिद्री, घेतला नाही तेंव्हा. आता घेईन आणि मरायच्या आधी वाचेन एवढं निश्चित. 

पुलंच्या अंत्यंयात्रेला मी गेलो नाही कारण मला तिथे हमसाहमशी रडता आलं नसतं. घरी टीव्ही वर दाखवत होते, जेवत असताना मला अनावर रडू आलं. त्या माणसानी आयुष्यं सुंदर केलं हे निश्चित. अजूनही तीच तीच पुस्तकं वाचताना खुदकन हसू येतं, कधी डोळे पाणावतात, हुंदका येतो, गलबलायला होतं.शेवटचा श्वास घ्यायच्या आधी इंद्रिये शाबूत ठेव एवढीच मागणी आहे देवाकडे, रात्री झोपताना 'व्यक्ती आणि वल्ली', गणगोत, गुण गाईन आवडी', 'साठवण' किंवा कुठलंही वाचून आनंदात झोपावं आणि सकाळी जाग येउच नये. असं झालंच तर फक्तं हस-या चेह-यानी जाण्याचा योग येईल. :) 

--जयंत विद्वांस
 
 

Monday, 8 June 2015

वन्स अपॉन अ टाईम (१९).....

रिचर्डस, जयसूर्या, अरविंदा डिसिल्व्हा, सेहवाग, मार्क ग्रेटब्याच, कालुवितरणा, श्रीकांत, अतुल बेदाडे, रियाझ पूनावाला अशी उतरती कळा आठवण्याचं कारण म्याड म्याक्स डिसिल्वा. सगळे तडाखेबंद फलंदाज होते. बंडखोर सगळे. धुवायचं एवढंच माहित यांना. अजूनही माणसं राहिलीत या यादीत खरंतर. तसेही हिटर, पिंच हिटर असतात प्रत्येक टीम मधे. डिसिल्व्हा आला तेंव्हा रियाझ पूनावालाच होता. प्रत्येक बॉलला चौकार मारण्याची इच्छा असलेला. पण चुकतो तो डिसिल्व्हा आणि परत परत चुकतो तो श्रीकांत, पूनावाला, बेदाडे आणि तत्सम मंडळी. रिचर्डस या सगळ्यांचा बाप होता, बेदरकार, बिनधास्त आणि खेळाची मजा घेणारा. ते उपजत लागतं, पेंशनची सोय, रेकॉर्ड बुक मधलं स्थान वगैरे महत्वाच्या गोष्टींकडे या माणसांचं लक्ष नसतं. मला वाटलं मी केलं, परिणाम होतील ते होतील (हे विधान अतुल बेदाडे, रियाझ पूनावाला या आणि अशा इतर मंडळींसाठी लागू नाही). 

टी-ट्वेंटी आत्ता आली. रिचर्डस, डिसिल्व्हा, सेहवाग आधीपासून हेच खेळत होते. टी-ट्वेंटीमधे फिल्डिंग रेस्ट्रीक्शन असताना कुणीही तुडवेल हे लोक टेस्ट, वनडेला पण असंच धुवायचे. अर्थात शेवटी नशिबात असावं लागतं. ग्रेटब्याच सेम तुडवायचा पण न्यूझीलंड वर्ल्डकप जिंकू शकलं नाही डिसिल्व्हा नशीबवान. ते टीम जबराटच होती लंकेची. जयसूर्या, कालुवितरणा, अरविंदा डिसिल्व्हा, रणतुंगा, अटापटटू, महानामा, गुरुसिंघे, तिलकरत्ने, धर्मसेना, मुरली, वकारचा डुप्लिकेट पुष्पकुमारा. रणतुंगाची आयडिया भन्नाट होती. तुम्ही हाणा बिनधास्त, औत आउट झालात तरी चालेल पण पंधरा ओव्हर संपताना मला बोर्डावर शंभर हवेत. एवढासा देश आहे पण वर्ल्डकप नेला आणि दोनदा उपविजेते आहेत. रणतुंगाचे श्रम आहेत ते. समाजवादी संघ नसल्यामुळे सगळ्यांनी त्याचं ऐकलं हे महत्वाचं. 

एक तर अष्टपैलू भरपूर. रणतुंगा, डिसिल्व्हा, जयसूर्या दहा ओव्हर पूर्ण करण्याच्या लायकीचे गोलंदाजही होते. फलंदाजीतलं अपयश ते भरून काढायचे. अतिशय फ्लेक्झी टीम होती ती. आपल्याला सेमी फायनलाला त्यांनी लायकी दाखवली. पहिल्या दोन ओव्हरमधे अहिरावण महिरावण आउट झाले होते. श्रीनाथचा चेहरा सुद्धा कधी नव्हे ते हसरा झाला होता १-१, २-१ असताना डिसिल्व्हा आला आणि त्याने म्याच शांतपणाने काढून नेली. कुंबळेला मारलेले कव्हरड्राईव्ह शालीन होते. आपला एक्का निष्प्रभ म्हटल्यावर बाकी सगळ्यांनी माना टाकल्या. २५१ केल्या त्यांनी, आपण १२०. डिसिल्व्हा ६६ आणि एक विकेट तेंडूलकर ६५ आणि दोन विकेट, बाकी फरक उरलेला स्कोअरबोर्ड वाचला की कळेल. पेशवे पडले की आपल्याकडे बाकीच्यांनी गर्भगळीत होण्याचा प्रघात पूर्वीपासूनचा आहे. 

बाकी रेकॉर्ड काय वगैरे मारू देत, नसतीलही कदाचित त्याच्या नावावर फार पण शहाण्णवची फायनल मात्र या माणसानी एकहाती खेळली. नुसती जिद्द असून चालत नाही, मोक्याच्या क्षणी कर्तुत्व सिद्ध करावं लागतं, म्याड म्याक्सनी ते केलं. पहिल्यांदा बॉलिंग आली म्हणून त्यांनी माती खाल्ली नाही. अरविंदानी ४४ मध्ये तीन विकेट घेतल्या. दोन झेल घेतले आणि नंतर नाबाद १०७ काढल्या. म्याग्रा, राफेल, वार्न , फ्लेमिंग असे सरस गोलंदाज होते. इसको कहते है कर दिखाना. आता असं वेड बघायला मिळत नाही. संघात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नं भरपूर असतात पण खांद्यावर द्रोणागिरी आणणारा हनुमान विरळ, दुर्मिळ झालाय. रावणाच्या लंकेतला त्यांना संजीवनी, प्रतिष्ठा देणारा हा हनुमान मात्रं लक्षात राहिलाय, एवढं खरं.    

--जयंत विद्वांस

Wednesday, 3 June 2015

लल्याची पत्रं (२१) …'ये क्या हुआ …'

लल्यास…… 

सेट म्याक्सच्या कृपेने वरचेवर जुने सिनेमे बघण्याचे योग येतात. परवाच 'अमर प्रेम' परत बघितला. खरंतर मला तो सिनेमा जीव टाकावा एवढा आवडत नाही कारण लहान नंदू ते मोठा नंदू यातला काळ मिसिंग आहे म्हणून असेल आणि शर्मिला टागोर फार काळ सहन होत नाही हा एक भाग. खन्नाचं पात्रं वरवरचं वाटतं मला तरी. त्याचा घरातला प्रॉब्लेम फार झटपट मांडलाय. तरीपण मी तो बघतो कारण आरडी, किशोर, आनंद बक्षीसाठी. एकाचढ एक गाणी आहेत. एसडीच्या आवाजातलं एक डोलीमे बिठायके, लताची दोन रैना बीती जाये आणि बडा नटखट है रे, किशोरची तीन चिंगारी कोई भडके, कुछ तो लोग कहेंगे आणि ये क्या हुआ. किशोरची तीनही गाणी अजरामर आहेत. आनंद बक्षीच्या वहीत पडलेली कविता ' चिंगारी कोई भडके' आरडीनी हट्टानी घेतली आणि तिला फिल्मफेअर मिळालं. 

चिंगारी आणि कुछ तो लोग कहेंगे वर नंतर कधी तरी लिहीन पण आज 'ये क्या हुआ …' वर. धोतर घालून झिंगणारा ओम प्रकाश आणि राजेश खन्ना. शर्मिलानी एन्ट्री नाकारल्यावर निराश झालेला राजेश खन्ना. घटना घडून जाते तेंव्हा आपण त्या धक्क्यात असतो. काळ गेला की किंवा सावरल्यावर आपण त्याची कारणं शोधतो. कुणावर तरी खापर फोडायला मिळालं तर उत्तमच नाहीतर कुणी मिळालं तर नशीब हाताशी असतंच. बरं तुम्ही त्याला नावं ठेवा, दोष द्या, त्या बिचा-याची काहीही तक्रार नाही. ज्याच्या बाबतीत घटना घडते किंवा धक्का बसतो त्यालाच अनेक प्रश्न पडलेले असतात, काय झालं, कसं झालं, केंव्हा झालं, का झालं असे प्रश्न विचारून बाकीच्यांनी त्याला हैराण करू नये खरंतर. आपण जे विचारतो तेच आनंद बक्षीनी लिहिलंय. पण संवादाला चाल लावावी आरडीनीच. 
 
 

मन जेवढं हळवं असतं ना त्याच्या उलट ते नेहमी लिहितं बघ. ते धक्क्याचं विश्लेषण करतं आपल्यापुरतं आणि मग बाहेर वेगळंच दाखवते की आपल्याला काहीही फरक पडलेला नाही किंवा स्वसमाधानासाठी ते कारणमीमांसा देतं. तरीही अर्थात घाव किती खोलवर पोचलाय ते कळतंच म्हणा. जब हुआ, तब हुआ छोडो, ये ना सोचो ही बेफिकिरी सांगायला फक्तं. एकांतात जाऊन खपल्या काढायच्या आणि कुरतडत बसायचं, फक्तं ते दाखवायचं नसतं. प्रत्येक कडव्यात मनाचं समाधान करून घेतलंय बघ. काचेचं खेळणं, तुटणारच की, त्याची कशाला तक्रार हवीये, हे फक्तं म्हणायला झालं. पण मग ते तुकडे मात्रं टाकायचे नाहीत, जपून ठेवायचे मखमली आवरणात कितीही टोचले तरी.   

स्वप्नंच ते, तुटणारच की. तीन मिनिटाच्या वर कुठलंही स्वप्नं नसतं असं मी वाचलंय. त्यामुळे त्याला क्षणभंगुरत्वाचा शाप आहेच. जे घडत नाही ते पण घडावंसं वाटतं त्याचं स्वप्नं होतं. पाहिलेली स्वप्नं वेगळी, त्याकरता माणूस जिद्दीही होतो पण स्वप्नवत म्हणजे सगळं सुखकारक चाललेलं असताना मधेच भंगलं की मग प्रश्नं पडतो, जे अनुभवलं ते सत्यं की स्वप्नं? मग परत एकदा समाधान, स्वप्नंच ते, चिरकाल कसं असणार, तुटणारच की ते कधी ना कधी, आंब्याची शेवटची रसाळ फोड खाताना, तुला गाडीत बसवून निघताना मला जे सुख संपल्याचं दुखं होतं तेच इथेही आहे. घटना अटळ होती हे ही समाधानच एक प्रकारचं. बदनामी होणार होतीच, झाली. आता कशाला त्याची खंत, जो हुआ सो हुआ, छोडो यार, ये ना सोचो. माणूस एकदा बदनाम झाला की त्यासारखं सुख नाही बघ. उगाच कुणाला घाबरायला लागत नाही, बंधनं नाहीत. कोण काय म्हणेल ही चिंता नाही. पण या सगळ्याची किंमत मोठी असते फ़ार. 

धृवपदातल्या प्रत्येक 'हुआ' नंतर जी बासरी वाजते त्याला तोड नाही बघ. कडव्यातल्या शेवटच्या 'हुआ'ला किशोरचा 'ह' ऐकण्यासारखा, करुण हसतो तो. असाच 'ह' ऐकायचा असेल तर 'फंटूश' मधल्या 'दुखी मन मेरे' मधलं 'पत्थर के दिल मोम न होंगे' मधला ऐक. त्याचं 'गाडी  रही है' मधल्या 'जानेके बाद आते है याद, "बिछडे" हुए वो मेले' मधील "बिछडे" ऐक. गो-यापान कपाळावर छोटासा लाल कुंकवाचा ठिपका कसा चेहरा सुंदर करून जातो तसं किशोर करतो बघ. एखाद्या अक्षराला, शब्दाला असं काही अत्तर लावून जातो की जीव जावा आपला. 

चल, आता पुढच्या पत्रापर्यंत ऐका हे गाणं. 

--जयंत विद्वांस 
   
  
ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ
क्यों हुआ, जब हुआ, तब हुआ
छोडो, ये ना सोचो

हम क्यों शिकवा करे झूठा
क्या हुआ जो दिल टूटा
शीशे का खिलौना था
कुछ ना कुछ तो होना था, हुआ

हमने जो देखा था, सुना था
क्या बताये वो क्या था
सपना सलोना था
ख़तम तो होना था, हुआ

ऐ दिल, चल पीकर झूमे
इन्ही गलियों में घूमे
यहाँ तुझे खोना था
बदनाम होना था, हुआ
 
(आनंद बक्षी, आरडी, किशोर, अमर प्रेम)
 
 
 https://www.youtube.com/watch?v=saApSghVCOU
 

Wednesday, 27 May 2015

जनाकाका…….

त्याचं पूर्ण नाव जनार्दन विनायक जोशी. पण सगळा वाडा त्याला जनाकाकाच म्हणायचा म्हणून वाड्यात जन्माला आलेलं पोरसुद्धा बोलता येऊ लागलं की त्याला ए जनाकाका असंच म्हणायचं. कुणाच्याही नात्यातला नसलेला पण सगळ्या वाड्याचा नातेवाईक, असा होता तो. वाड्यातली प्रत्येक घरातली माणसं सोडा त्यांचे सगळे नातेवाईक पण जनाकाकाला माहित होते आणि त्यांना हा चक्रम माणूस माहित होता.

घारे डोळे, दणकट शरीरयष्टी, पाच फुटाची उंची, हातात सतत पिशवी, त्यात असंख्य पेपर (शब्दकोडं नसेल तर तो पेपर भिकार), विडी बंडल, दोन तीन माचिस (संपलेल्या पण असायच्या एक दोन, आपण फेकू लागलो की चिडायचा 'राहू दे रे खायला मागतायेत का तुला, पावसात उपयोगी येतात सादळल्या बाकीच्या की'), प्यांट राजकपूर सारखी कधी लांडी तर कधी चप्पल झाकेपर्यंत, शर्टला इस्त्री वगैरे भानगड बापजन्मात नाही, दोरीवरचा वाळलेला शर्ट अंगात घालणे इतकी सोपी क्रिया, झालर लावल्यासारखे केस आणि मधे अगदी सागरगोट्यासारखं तुळतुळीत डोकं, मानेभोवती कायम उपरणं कापून त्याचे केलेले मोठ्ठाले रुमाल, उजव्या हातात एचएमटीचं घड्याळ, भुवयांच्या मधे लावलेलं बोटभर उंचीचं लालगंध आणि तोंडात विडी नाहीतर शिव्या.  

एकेकाळी वाड्याला भलामोठा दरवाजा होता, दिंडी दरवाजा पण होता. तिथून आत शिरल्यावर डाव्या बाजूला कट्ट्यावर एक दहा बाय दहाची कोंदट, अंधारी खोली होती, ती जनाकाकाची. तो त्याला मठी म्हणायचा. माझा बालपणाचा बराच काळ त्या मठीत गेलाय. त्याच्या खोलीला कुलूप नसायचंच कधी. कुणीही कधीही जाऊ शकायचं उघडून. आम्हां मुलांना भारी वाटायचा तो प्रकार. 'अरे नेणार काय चोरून? रद्दी?' म्हणायचा तो. एक भिंतीच्या कडेला खरोखर असंख्य पेपर आणि जुनी मासिकं आणि असंख्य पुस्तकं ढिगानी पण व्यवस्थित लावलेली असायची. रसरंग, रविवारची जत्रा, स्पोर्ट्स्टार, फिल्मफ़ेअर, स्क्रीनचे अंक, विचित्रं विश्वं, किशोर, आनंद, चांदोबा डेट वाईज लावलेले असायचे, कुणी त्यात रस दाखवला, माहिती मागितली की जनाकाका फुलायचा. मग एकदम स्पेशल ट्रीटमेंट त्याला. तो स्वत: चहा करणार मग त्याच्यासाठी. कडू, कमी साखरेचा काढाच तो पण नावं ठेवलीत तर पुढच्या वेळेला थेंब सुद्धा मिळणार नाही, तुमच्या समोर तो एकटा पीत बसेल. 

अप्पा बळवंतला एका पुस्तकाच्या दुकानात तो काम करायचा. नवाला दहा मिनिट आधी तो तिथे हजार असायचा आणि पाच वाजले की दुकानाला आग लागू दे मी थांबायचो नाही असं म्हणत निघायचा. आजारी पडला तरच सुट्टी, उशीर नाही, अफरातफर नाही, वाचनाचा प्रचंड नाद असून कामाच्या वेळेत वाचणार नाही, निम्मा पगार तिथून पुस्तकं, मासिकं विकत घेण्यातच संपायचा. साताठ मिनिटात जेवायचा तो. मालक असल्या फटकळ माणसाला एक शब्दं बोलायचे नाहीत कारण जनाकाकामुळे येणारं गि-हाईक जास्ती असायचं. पुस्तकाचं नाव काढायची खोटी तो बरोब्बर काढायचा, संपलेला स्टोक त्याला पाठ असायचा, मग गि-हाईकासमोर तो श्रद्धापूर्वक मंत्र म्हणावेत तशी त्या प्रकाशनाची आई बहिण काढायचा. नविन पुस्तकं आली की कुणाला कोणतं आवडतं हे त्याला पाठ असायचा, हातोहात संपवायचा तो. येताना तो कोपरकरबुवांकडे जायचा. ते किर्तन शिकवायचे. विद्यार्थ्यांसाठी पूर्वरंग, उत्तररंग ते त्यांच्या अक्षरात लिहून काढायचे ते हा मोत्यासारख्या अक्षरात लिहून द्यायचा, नसेल काही काम तर तडक घरी. बरं, हे सगळं काम फुकट, कधी काळी अडचण आली तर वर्षाकाठी पन्नास शंभर मागणार. 

मी थोडा मोठा झाल्यावर त्याला म्हणालो होतो, 'अरे, फुकट कशाला करतोस, किंमत रहात नाही'. तो म्हणाला. 'अरे त्या कोपरकरचं अक्षर बघ एकदा, ते विद्यार्थी जीव देतील लकडीपुलावरून. गंमत जाऊ दे रे पण कोपरकर ती कला जिवंत ठेवतोय, आपल्याला जमेल तेवढं आपण करावं, माझे वडील कीर्तन करायचे वर्षातून दोनदा बोरवाडीस उत्सवात, माणूस जागचा हलायचा नाही, एकपात्री करायचे रे अक्षरश:. मला पण हौस होती पण नाही जमलं बघ. अजून पन्नास वर्षांनी कीर्तनकार राहील का बघ आणि असलाच चुकून एखादा तर ओंकारेश्वराला कीर्तन करायला सांग, माझ्या आत्म्याला शांती लाभेल'. जनाकाका सहसा उलगडायचा नाही पण गावची आठवण झाली की एकदम शांत व्हायचा. जूनच्या सुरवातीला वाड्यातल्या सगळ्या मुलांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून त्यावर स्केचपेननी सुबक नावं टाकून द्यायचा तो. अर्थात सगळ्या वाड्याची वह्या पुस्तकं तो त्याच्या दुकानातूनच आणायचा. हातात देताना म्हणायचा 'रांडेच्यानो टिकवा नीट वर्षभर, बाप घाम गाळून पैसा आणतोय, मटक्याच्या अड्ड्यावरून नाही. कव्हर निघालं किंवा पानं दुमडलेली दिसली ना तर ढुंगणं जांभळी करेन फोडून'. पुस्तकाची अवहेलना, हेळसांड त्याला सहन व्हायची नाही. तळमळून म्हणायचा, 'वाचावं रे सतत काहीतरी, वाया जात नाही. टे-या उडवून नाचताय ट ला ठ जोडलेल्या गाण्यांवर, ते उपयोगाला नाही यायचं'. मी पाचवीला गेल्यावर मला त्यानी रेन मार्टिन आणि विरकर डिक्शनरी दिली होती. माझ्याकडून पाचशे इंग्लिश शब्दं पाठ करून घेतलेले त्यानी सुट्टीत.      

जनाकाका रांगोळ्या सुरेख काढायचा. पण ते ठिपके प्रकरण नाही जमायचं त्याला. सहा बाय सहा फुट मिनिमम साईझ. हनुमान, मोर, रामपंचायतन, देखावा, शिवाजी किंवा फ्री ह्यांड जे सुचेल ते, आधी खडूनी काढून घ्यायचा मग रंग भरायचा. कणभर रंग बाहेर गेला खडूच्या की मागून त्या मुलाचा/मुलीचा उद्धार व्हायचा. मुलगा असेल तर 'भोसडीच्या ते केस मागे घे, हात सारखा सारखा भांग पाडताना कसा फिरतो तसा स्मूथ फिरू दे ' आणि मुलगी असेल तर 'ताराराणी, दमलात का आपण? विश्रांती घ्या हवं तर, माझा मोर उद्या नाचला तरी चालेल'. एकही पोर दुर्मुखायचं नाही, त्याच्या शिव्या खाण्यात पण मजा होती. गणेश विसर्जनाला वाड्याच्या मधल्या भागात सगळ्यांची पंगत बसायची, फुटपट्टीनी काढल्यासारख्या सरळ रेषेत तो चार बोट नाचवत रांगोळी काढायचा. उदबत्ती लावायला बटाट्याचे काप सुद्धा आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारात कापायचा. त्याच्या अंगात कला उपजत होती. 

माझ्या लॉगटेबल वर चिकटवायला गावसकर त्यानी राज्यं दान दिल्याच्या अविर्भावात दिला होता. 'हवं तर अख्खा पेपर घे, पण तो फाडू नकोस. काहीतरी हरवल्यासारखे वाटत रहाते मग तो कापलेला तुकडा दिसला की'. काहीवेळेस तो संध्याकाळचा दिवा न लावताच खुर्चीत बसायचा. समोरच्या स्टुलावर पाय ठेवून कडेच्या छोट्या स्टुलावर टेप ठेवायचा आणि नाट्यसंगीत लावायचा. तान, हरकत जितकी जोरकस तितका विडीचा झुरका दमदार. खोली निकोटीनच्या वासानी भरायची अगदी पण हा तासंतास बसायचा गाणी ऐकत. एकदा मी विचारलं तीच तीच गाणी ऐकून कंटाळा कसा येत नाही तुला? तो म्हणाला. ' गाणी नाहीयेत रे ही, आठवणी आहेत. ऐपत नसताना वडिलांनी आणला होता हा टेप, कुणी आलं मुंबईहून की गाण्याच्या क्यासेट आणायला सांगायचे. वद जाऊ कुणाला शरण… ऐकलंयेस? आई फार सुंदर म्हणायची. जेवणं झाली की बाबा तिला अधून मधून म्हणायला लावायचे आणि कौतुकानी तिच्याकडे बघत बसायचे. बाबांचा आवाज ही गोड. मर्मबंधातली ठेव ही…. अप्रतिम म्हणायचे. गाणं संपलं की डोळे टिपायचे. क्यासेट मधल्या गाण्यांचा क्रम, हरकती सगळं तेच आहे पण हे सगळं मी परत परत अनुभवतो'.

गावाला त्याचं कुणीही नव्हतं आता. पोटासाठी पुण्यात आला आणि इथलाच झाला. तुटपुंजा पगार, आजारी आई वडील यामुळे त्यानी लग्नं केलंच नव्हतं. त्याला सगळा स्वयंपाक यायचा. तल्लख बुद्धी, तिरकस भाषा, अफाट वाचन, दुस-याला चांगलं सांगण्याची तळमळ आणि स्वच्छ चारित्र्यं अशा सगळ्या गुणावगुणांसकट तो वाड्याचा झाला होता. वाड्याचा रखवालदारच तो. मधलं अंगण रोज सकाळी झाडून काढताना पुटपुटल्यासारखे मनाचे श्लोक म्हणायचा. माझे बाबा त्याला कोकणी रामदास म्हणायचे. सुट्टीत रात्री जागवायचा पोरात पोर होऊन. कोडी घालायचा, भसाड्या आवाजात मराठी न ऐकलेली गाणी, श्लोक म्हणायचा. कदाचित त्याचं हरवलेलं बालपण शोधायचा. केवळ शालेय शिक्षण नसलेला हा तल्लख ब्रम्हचारी आम्हांला काय काय देऊन गेला याची यादी नाही करता येणार. वाचा, ज्ञान मिळवा, वाया जाणार नाही हे सांगतानाची त्याची तळमळ आता कुणात दिसत नाही.  

वयं वाढत गेली. वाटा बदलत गेल्या. वाडा आणि माणसं म्हातारी झाली, काही संपली, काही दुसरीकडे गेली, जनाकाका आहे तिथेच आहे. आम्हीही वाडा सोडला, कोथरूड वरून हल्ली गावात येणं होत नाही फार. परवा वाड्याच्या मालकांनी बोलावलं होतं, वाडा बिल्डरला द्यायचा म्हणून मिटिंग होती. वाड्यात ब-याच वर्षांनी गेलो. मिटिंग झाली. जनाकाकाही होता. 'घर घेऊन करू काय? मला पैसे द्या. माझ्यासाठी नकोत, अनाथ विद्यार्थी गृहाला देणगी द्या तेवढ्या रकमेची ग्रंथालयासाठी. माझी भाजी भाकरीची तजवीज मी केलीये.' वाड्याच्या मालकांचा मुलगा आला होता मिटींगला. त्याच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव होते. सगळं असून सुद्धा वाटा मागायला आलेलो आम्ही जनाकाका पुढे पार खुजे ठरलो. 

निघताना त्याच्या घरात गेलो. डोक्याचा पार सागरगोटा झालेला. ह्यांगरला लावतात तसा शर्ट दिसत होता त्याच्या अंगावर. बस म्हणाला. 'सिगरेट असेल तर दे, विडीनी त्रास होतो'. मी सिगरेट दिली. 'कसा आहेस'? 'आहे अजून, एवढंच. आता वाचन होत नाही. डोळ्यातून पाणी येतं चष्मा लावून पण. ऐकूही थोडं कमी येतं. पण ऐकतो गाणी, टेप बंद झाला तरी कळत नाही पण माझ्या कानात ती वाजत असतात. वाचतोस की नाही काही रोज? का फक्तं पेपर हेच वाचन? वाचत जावं रे रोज चार ओळी तरी. माझं आयुष्यं संपत आलंय, शेवटची पानं राहिलीत. मला वाटलं संपेल लवकर पण खंड दिसतोय बहुतेक. असो! येत जा रे अधून मधून, तेवढंच बरं वाटतं. जूनला ये, पोरांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं घालून देतो, सकाळचेच या, जेवा आणि जा दुपारी.' मला हुंदका आवरला नाही. माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाला, 'अरे, रडतोस कशाला. तुला माया आहे म्हणून ये म्हटलं. आता तुमची ती ई-बुक की काय आली एकदा शाळेत की कशाला कव्हरं लागतील मग. काळाचा महिमा. असो! येत जा, उलथलोय की नाही ते कळणार कसे नाहीतर तुला?' 

मी उठून पाया पडलो आणि येतो रे म्हणून निघालो आणि नात्यागोत्याच्या नसलेल्या माझ्या काकासाठी वाड्याबाहेर येउन हमसाहमशी रडलो फक्तं. 


--जयंत विद्वांस

Monday, 25 May 2015

दो बिघा जमीन.....

शंभू महातो, त्याची बायको पारो (निरुपा रॉय) आणि मुलगा कन्हैया एवढं कुटुंब. गावाच्या जमीनदाराचं (मुराद) कर्ज असतं त्याच्यावर. त्याला त्याच्या जागेवर मिल काढायची आहे पण नेमकी मध्यात शंभू महातोची जमीन आहे. शंभूनी त्याच्याकडून पैसे उसने घेतले आहेत त्यामुळे तो ती जागा आपल्याला देईल याची त्याला खात्री आहे. शंभूच्या जगण्याचा एकमेव सहारा ती जमीन आहे. मुराद त्याला उद्याच्या उद्या पैसे परत दे नाहीतर जमिनीचा लिलाव करेन म्हणतो. बरं हिशोबानी कर्ज किती, तर एकूण रुपये ६५ फक्तं. शंभू घरातल्या वस्तू, बायकोचं कानातलं विकून ६५ रुपये गोळा करतो आणि त्याच्याकडे जातो. फुगवलेली रक्कम असते २३५ रुपये. कोर्टात ती रक्कम तीन महिन्यात फेडण्याची सवलत त्याला दिली जाते. शंभू आणि त्याच्या बरोबर हट्टानी, फसवून आलेला त्याचा मुलगा कन्हैय्या कलकत्त्याला जातात. रिक्षा चालवून पैसे गोळा करायचे आणि जमीन वाचवायची यासाठी.

शंभू नझीर हुसेनची रिक्षा चालवतो, हमाली करतो, त्याचा मुलगा जगदीप बरोबर बूट पॉलिश करतो. तिसरा महिना संपत आलाय. जास्तीत जास्ती पैसे गोळा करण्यासाठी तो पैशेवाल्याच्या हौसेसाठी रिक्षाची रेस लावतो, त्यात चाक निघतं आणि त्याला अपघात होतो. बापाची हालत बघून कन्हैया पाकीटमारी करतो. इकडे काही वार्ता नाही म्हणून काळजीत पडलेली पारो कलकत्त्याला येते. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्नं होतो. तिथून पळताना ती गाडीखाली येते आणि  तिला दवाखान्यात नेण्यासाठी कडेनी जाणारी रिक्षा नेमकी शंभूचीच असते (मनमोहन देसाईला नावं ठेऊ नका आतातरी). कन्हैय्या इकडे पैसे चोरतो. आईला दवाखान्यात बघून त्याला वाटतं चोरीबद्दल देवानी शिक्षा दिली म्हणून तो ते पैसे फाडून टाकतो. शंभूची सगळी पुंजी पारोवर खर्च होते. इकडे गावात त्याच्या जमिनीचा लिलाव होतो. तिघे गावाकडे येतात आणि स्वत:च्याच जमिनीवर परके होतात. तिथली मुठभर माती घेणा-या वेड्या शंभूला रखवालदार मनाई करतो. जगण्यासाठी जगाच्या पाठीवर ते दिशाहीन निघतात आणि चित्रपट संपतो.

साधारण २/३ एकर म्हणजे दोन बिघे. साधारण ६२ वर्ष झाली या सिनेमाला. तेंव्हाही जागेला किंमत होती आणि आजही आहे. आता जागा बळकावण्याची पद्धत बदलली , एवढाच काय तो फरक. ४८ च्या बायसिकल थिव्हज वरून प्रेरित होऊन हा सिनेमा काढला असं वाचलंय, पण तो मी काही पाहिलेला नाही. Top 25 Must See Bollywood Films मधे दो बिघा जमीन आहे. अर्थात त्यात दिलंय म्हणून मी तो पाहिलेला नाही, न कळत्या वयात तो मी टी.व्ही.वर पाहिला होता. उर फुटस्तोवर रिक्षा चालवणारा माणूस म्हणजे अजय उर्फ परिक्षित सहानीचा बाप बलराज सहानी, इंग्लिश साहित्यात मास्टर आणि हिंदी साहित्यात पदवी घेतलेला एक उच्च शिक्षित माणूस आहे असं बघताना एका कळत्या माणसानी सांगितलं. तेंव्हा अभिनय वगैरे म्हणजे काय हे कळायचं वय नव्हतं. पण एवढं शिकून पण रिक्षा चालवतो म्हणजे हा माणूस फार भारी आहे हे मत कायम झालं. पुढे वक्त मधला 'ऐ, मेरी जोहराजबी' गाणारा, काबुलीवालामधे रडवणारा बलराज सहानी, कठपुतली मधे सुबीरसेनच्या आवाजात पियानोवर बसून 'मंझील वोही है प्यार की' म्हणणारा, सीमा मधला खुर्चीत बसून 'तू प्यार का सागर है' म्हणणाता बलराज सहानी आवडत गेला.
 मागच्या वर्षी मी एका च्यानलवर हा चित्रपट बघितला. डिप्रेशन आल्यासारखं झालं. आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी सांगतात त्या बदलल्या पाहिजेत. चांगल्याचं चांगलं होतं, देव संकटात मदत करतो वगैरे बदलायला हवं सगळं असं वाटून गेलं. सगळी पात्रं अभिनयानी जिवंत केली, ते त्या भूमिका जगले वगैरे सगळं नाही आठवलं मला हा चित्रपट बघताना. पैसे गोळा करण्यासाठी राब राब राबणारा, मुलगा आजारी पडल्यावर चिंताक्रांत झालेला, आपल्याच जमिनीकडे सर्वस्वं हरवल्यासारखा बघणारा बलराज सहानी आपला कुणीतरी जवळचा वाटून गेला. पैशाकडेच पैसा जातो हेच खरं. सगळीकडे कंपन्या काढून खायला उगवण्यासाठी जमीन उरणार नाही अशी भीती वाटते. मिडास राजाची गोष्टं खरी होईल कदाचित. हात लावाल तिथे सोनं लागेल पण सोन्याचा घास कदाचित मिळणार नाही.   

हरियाला सावन ढोल बजात आया, आजा री आ निंदिया आणि धरती कहे पुकारके ही तिन्ही गाणी मला आवडतात यातली. अपनी कहानी छोड जा,  चुनरी सम्हाल गोरी आणि ए भाय चं शेवटचं कडवं (आणि अर्थात अशी अनेक गाणी) मन्नाडेनीच म्हणावीत.  'धरती कहे पुकार के, बीज बिछा ले प्यार के, मौसम बिता जाय' या गाण्यातला आशावाद आता साहित्य म्हणून उरलाय किंवा त्या अर्थानीच वाचायचा. कसला आलाय पापभिरूपणा असं वाटणं आता दृढ होत चाललंय. आतापर्यंतच आयुष्यं पापपुण्याच्या, समाजाच्या, संस्काराच्या भीतीनी स्वत:च्या इच्छेप्रमाणे मला किंवा अजून कुणाला जगता आलंय? आयुष्यं सरायची वेळ आली तरी राहून गेलेल्याची यादी खूप मोठी रहाते आणि मग एखाद्या क्षणी आपणच बाळगलेल्या तत्वांचा आपल्याला राग येतो. हताशपणा वाढतो, चीड येते पण काहीही करू शकत नाही याची जास्ती चीड येते. धनदांडग्याच्या मनाप्रमाणे वागायचं किंवा मग धनदांडगे व्हायचं एवढेच दोन पर्याय उरतात. दो बिघा… अस्वस्थ करतो. निरुपा रॉय, बलराज सहानी, त्याचा बाप, कन्हैया यांच्या घरावर, चेह-यावर, कपड्यांवर चिकटलेली ती गरिबी, लाचारी नकोशी वाटते. 

ते तिघं परत जातात तेंव्हा ह्या ओळीनी मात्रं पाणी आलं डोळ्यात. 'अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस ओर तू फिर आये ना आय'. जिथे जन्माला आलो तिथून बेघर व्हायचं २३५ रुपयांसाठी? परत दिसेल ती भूमी की मेले असतील असेच कुठेतरी अज्ञातात? जगले असतील भिका-यासारखे खूप वर्ष सचोटीने की जगले असतील मनाप्रमाणे अल्पकाळासाठी जग वाईट म्हणतात त्या मार्गाला लागून? कोण कुठला शंभू महातो, मेला काय, जगाला काय, नाहीसा झाला काय, कोण नोंद ठेवणार? असे असंख्य महातो जगाच्या पाठीवर चरफडत असणार, उध्वस्त होत असतील, मातीवर प्रेम करताना माती होत असतील, जाना देव. रोज थोडं थोडं मरायचं आणि मरेपर्यंत त्याला जगणं म्हणायचं, थूत असल्या जिंदगी वर.

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१८).....

स्थानिक मैदानावर तो बॉलिंग करत होता रस्त्यावरून इम्रानखान नियाझी चालला होता गाडीतून. त्यानी त्या पोराचा पेस बघितला आणि त्याला तिथून डायरेक्ट टीममधे घेतला. पाकिस्तानकडे जलद गोलंदाज कायम भन्नाट असायचे. सिकंदर बख्त, सर्फराज नवाझ, स्वत: इम्रान, वकार, थोटा अझीम हफीज, शोएब अख्तर आणि असे अनेक. वेस्टइंडीज कडे थ्री डब्ल्यूज् होते वारेल, विक्स, वालकाट तसे हे पाकचे टू डब्ल्यूज् - वकार युनुस आणि वसिम अक्रम. आमचा एक मित्रं बेक्कार युनुस आणि वसिम चक्रम म्हणायचा त्यांना. प्रेमापोटी दिलेली शिवी जास्ती प्रेमळ असते. धर्म, देश, राजकारण बाजूला ठेऊन आपण क्रिकेट बघितलं तर धमाल असते. स्विंगचे हे दोन बादशाह अफाट होते.

माणसाला मधेच चक्कर येउन तो जसा पडतो ना तसा त्यांचा स्विंग होता. 'अगं बाई, भाजी घ्यायची राहिलीच की' असं म्हणत भाजीवाला दिसल्यावर बायका जशा हात, इंडिकेटर न दाखवता गाडी वळवतात आणि मागच्या पब्लिकच्या कपाळात घालवतात तसा यांचा स्विंग विचार बदलल्यासारखा लेन बदलायचा. मग जी काय तारांबळ उडायची ती प्रेक्षणीय असायची. गावसकर म्हणायचा चेंडूची लकाकी आणि बॉलरचा हात यावर लक्ष ठेवायचं की काय पडणार त्याचा अंदाज येतो. अरे बाबा, तू ग्रेट होतास, बाकीच्यांनी काय करायचं? हाताकडे, लकाकीकडे लक्ष देई पर्यंत चेंडू पोचतोय इथे. मग गणेशोत्सव चालू व्हायचा, फुल लेझीम, फुगड्या, बसफुगड्या, लोळपाटणी, सगळे खेळ.

अक्रम दोन्ही स्विंग करायचा, बास होतं की एवढं खरंतर. स्पीड होता पण ऐकायचं म्हणून नाही. गरीब माणूस जसा प्यांट जुनी झाली की तिची बर्मुडा करतो, पायांच्या कापडात पिशव्या करतो आणि बर्मुडा लाजलावणी झाली की तिचं पायपुसणं करतो तसा हा अत्यंत गरीब आणि काटकसरी माणूस. मूळ सर्फराज नवाझनी शोधून काढलेला (गावसकर परवा म्हणाला, खरं तर त्याच्या सन्मानार्थ त्या स्विंगचं वर्णन करताना 'ही इज सर्फरायझिंग द बॉल' असं म्हटलं पाहिजे) रिव्हर्स स्विंग यानी प्रचलित केला, वापरला आणि गावभर शिकवला. डेथ ओव्हर मधे अक्रमच्या तोडीचा कुणीच नव्हता, नसणार. याचा यॉर्कर माफिया लोक जसे गद्दाराला किंवा दुश्मन पार्टीला शिक्षा देताना, कबूल करून घेताना बोटं कापतात, हातोडीनी बोटं ठेचतात तसा हा पायाची बोटं ठेचून फलंदाजाचा पायीस्तेखान करायचा. एकतर दोन्ही स्विंग, त्यात हा डावखुरा म्हणजे बाहेर जाणारा चेंडू आधीच खतरा, त्यात तो पक्ष बदलून आत आला तर काठीचा आवाज, नडग्यांना आयोडेक्स, नाहीतर भन्नाट बूटचेप्या यॉर्कर. गप सिंगल काढावी आणि समोर जावून उभं रहावं. काय मजा बघायचीये ती तिथून बघावी. 

म्याचफिक्सिंग, राजकारण, दुही अशा अनेक गोष्टींचा ताण आला आणि त्याला ऐन तिशीत मधुमेह झाला. पण त्याचं भांडवल न करता तो जोमानी फिट राहिला आणि खेळत राहिला. वन डे आणि टेस्ट दोन्हीत प्रत्येकी चारशेच्यावर विकेट घेणा-यात फक्तं तो आणि मुरली आहेत. हल्ली तो भारतातच जास्ती असतो. त्याची बायको २००९ ला चेन्नईला गेली. कोलकाता नाईट रायडर्सचा तो कोच आहे. तो उत्तम समालोचन करतो. अति बोलत नाही पण बौद्धिक बोलतो. कुणी शमीसारखा नवखा विचारायला गेला काही तर तो नेटमधे जाऊन मार्गदर्शन करतो. आकडेवारी काय आज लक्षात राहील ती मागे पडेल काळाच्या ओघात. फलंदाज बीट झाल्यावर कमरेवर हात ठेऊन त्याच्याकडे मिस्किल पहाणारा घामाघूम अक्रम लक्षात राहील. बाकी देश अन जात काय करायचीये. माणूस चांगला आहे, मग झालं तर.

--जयंत विद्वांस

वन्स अपॉन अ टाईम (१७).....

निखळ कौतुक ऐकायला नशिबात लागतं. 'याचा चेंडू आत्ता वळेल मग वळेल याला कंटाळून फलंदाज आउट होतो. शेवटचा कधी वळलेला रे? याला लेग स्पिनर का म्हणतात? मुनाफ पटेलचा स्पीड एवढाच आहे की' असे आणि इतर अनेक कुत्सित टोमणे त्यानी ऐकले आणि कानामागे टाकले. मुळात तो मिडीयम पेस टाकायचा (उंची ६' २") आणि कोर्टनी वाल्श (उंची ६' ६") लेगस्पिन टाकायचा. दोघांच्या कोचला सुबुद्धी सुचली आणि त्यांनी खांदेपालट केला. म्हणून वाल्शच लेगकटर खतरा होता आणि याचा गुगली.

मला वेस्ट इंडीज विरुद्धची एका कपची फायनल आठवतीये. त्यानी १२ मधे सहा घेतलेल्या. अम्ब्रोजला बोल्ड काढलेलाबॉल भन्नाट स्पीडचा यॉर्कर होता, कुणीही आउट झालं असतं. तो जिगरबाज होता, न कंटाळता गोलंदाजी करायचा. त्यानी एका डावात काढलेल्या दहा विकेट मी पाहिल्यात. खतरा बॉलिंग होती. जबडा फ्र्याक्चर असतानाही तो खेळायला उतरला होता वेस्टइंडीजमधे आणि तो सामना आपण वाचवला होता. भारतात त्याच्या सोबतीने अजूनही काही लोक पैसे कमवून गेले सॉरी टेस्ट खेळून गेले (राजू, फेकी राजेश चौहान) कारण टेस्ट आपण भाराभर जिंकायचो इथे. वार्नच्या स्पिनची दहशत होती तशी याच्या स्पीडची आणि गुगलीची. भल्याभल्यांना मी स्टंप समोर माती खाताना बघितलंय, प्लम एलबी. कुणाच्या नशिबात काय रेकॉर्ड असेल सांगता येत नाही. चामिंडा वाझनी ९६ टेस्टनंतर शतक काढलं होतं यानी ११८ सामने घेतले शतक काढायला. भारताचा कप्तान झालेला तो एकमेव लेगस्पिनर आहे.

भारतातर्फे खेळलेल्या काही सभ्य लोकांपैकी हा एक होता. तो, लक्ष्मण, सचिन, द्रविड, गांगुली एकावेळी खेळले हा मात्रं अत्यंत सुंदर योग होता भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला. अत्यंत सभ्यं, आल तेंव्हा चष्मा लावणारा, अभ्यासू, कमी बोलणारा, अथक मेहनती माणूस होता तो. शेवटपर्यंत तसाच राहिला तो, चष्मा गेला फक्तं, लेन्स आल्या एवढाच काय तो फरक. एक उत्तम माणूस, चारित्र्यसंपन्न खेळाडू म्हणून तो कायम लक्षात राहिला. त्यानी जिंकायची सवय लावली, म्याच विनिंग बोलर, विकेट टेकिंग बॉलर ब-याच कालावधीनंतर लाभला होता. तो बी.ई.(मेक्यानिकल) आहे. आधीची एक मुलगी असलेल्या मुलीशी त्यानी लग्नं केलंय. केरळमधल्या कुंबळा गावात त्याच्या नावाचा रोड आहे.

नका का त्याचा चेंडू वळेना. शिस्तं आणि अचूकता याच्या जोरावर त्यानी टेस्ट/वनडे/फर्स्टक्लास मधे अनुक्रमे ६१९/३३७/११३६ विकेट्स घेतल्यात. त्यानी एकूण ४०८५० चेंडू टाकलेत टेस्ट मधे (मुरलीधरन ४४०३९), खायचं काम नाही महाराजा. चेंडू वळत नाही तर ही परिस्थिती, वळला असता पंचेचाळीस अंशात तर? रिझल्ट बघा रे, तीन नंबरला आहे तो, चेंडू वळत नाही म्हणे….

--जयंत विद्वांस

Wednesday, 20 May 2015

गझलरंग.....

कालच्या गझलरंगला गेलो होतो. आपल्याला ज्यातलं फार कळत नाही तिथेही मी जातो. कानावर पडून कधी काळी काही समजेल या आशेने जातो. त्यांचे चार पाच कार्यक्रम बघितलेत मी. कविता, गझल हा माझा प्रांत नाही, लिहिण्याचा सोडाच, फार समजण्याचाही नाही.
आधी कोकणी गझलगायन झालं. भाषा फार समजत नसली तरी आधी मराठीत कोकणी गझलेचा भावार्थ सांगितल्यामुळे समजायला सोप्या गेल्या. राधा भावे त्यांच्या काप-या आवाजात गझल छानच वाचतात, त्यांची अस्तुरीची गझलही सुंदर होती. एक तबला, एक हार्मोनियम आणि दोन गायक पण मैफिलीची मजा देऊन गेले. खणखणीत आवाज होते दोन्ही नाईक मंडळींचे आणि चालीही ऐकताना सोप्या वाटणा-या पण म्हणायला अवघड होत्या. त्यानंतर नेहमीचा कार्यक्रम सुरु झाला.

अण्णा वैराळकर! कार्यक्रम वेळेत सुरु करणारा आणि संपवणारा विरळ माणूस. अण्णांनी त्यांचा जीव गझलवरून वैराळून टाकलाय. अण्णा रमाकांत आचरेकर आहेत. भुछत्रासारखे उगवणारे आणि लवकर नाहीसे होणारे तेंडूलकर ते बाळगत नाहीत. नवीन चेहरे स्टेजवर नेतात. त्यांचं कौतुक करतात, सांभाळून घेतात, पाय जमिनीवर राहू द्यात तर आकाश गाठाल असा स्पष्टं इशारा ते स्टेजवरून देतात. समान व्यसनी, समान शील, समवयस्कं लोकांशी मैत्री लवकर होते असं म्हणतात. अण्णांना वय आड येत नाही. फेसबुकावर चांगले लिहिणारे ते शोधतात, त्यांना मंचावर आणतात. क्रिकेटमधे पदार्पणाच्या सामन्यात त्या खेळाडूला जेष्ठ खेळाडूच्या हस्ते मानाची टोपी देतात. अण्णांनी अनेकांना अशा टोप्या (पदार्पणाच्या) घातल्यात. दर्दी रसिकांच्या पुढे गझला सादर करणं काही खायचं काम नाही पण आजची तरुण पोरं हे सगळं आरामशीरपणे करतात.

भालचंद्र भूतकर आणि मनोज दसुरी हे काल पहिल्यांदाच मंचावर आले होते. दोघांनीही आत्मविश्वासपूर्ण वाचलं. भूतकर तर सराईत माणूस वाटला मला. हच का छोटा रिचार्ज सुशांत खुसराळे. वयाला, वजनाला  न शोभणा-या पण झेपणा-या वजनदार शेरांनी तो धमाल उडवून देतो. कौस्तुभ आठल्येनी पण त्याच्या वजनाप्रमाणेच वजनदार शेर आणि गझल पेश केल्या. पूजा फाटे आणि स्वाती शुक्लं पण 'दाद'णीय गझला सादर करून गेल्या. 

सदानंद बेन्द्रें म्हणजे जेष्ठ माणूस. 'आन - मेन अॅट वर्क' मधला तो मनोज तिवारी जसा नमस्कार करतो तसा हा दाद स्विकारताना करतो. गंभीर मुद्रेने सूचक शेर लिहितो, वाचतो आणि पिंगट डोळ्यांनी मजा बघत असतो. दराडे मास्तरांची शेराची दुसरी ओळ इतरांपेक्षा जास्ती भेदक असते (शेर म्हटल्यावर ती असायलाच हवी) आणि तो ती पोचवतोही उत्तम. तो अनुभवाची गझल लिहितो, शब्दांचे नुसते पिसारे नसतात तर प्रत्येक शेराला तो अर्थांची अनेक अस्तरं लावून आणतो. सुधीर मुळीक हा डेल स्टेन आहे. त्याचा म्हणून एक खास ढंग आहे गझल वाचण्याचा. पहिली ओळ टिपेला नेली की दुसरी तो हळुवार वाचतो. त्याला कागद फार लागत नाही. सगळं पाठ असतं आणि स्टेनच्या स्पीडनी तो गझल आणि शेर आपल्या अंगावर सोडतो. पहिला यॉर्कर कुठे पचवतोय तर तो लेट आउटस्विंग टाकतो. त्यामुळे आपण चेंडू अंगावर घेणं हे जास्ती सोपं काम आहे. 

एकूण हा कार्यक्रम नेहमीच रंजक असतो. समोर बसलेल्या मनीषा नाईक, सुप्रिया, ममता सपकाळ अशा गझलकारा दुस-याला पण दाद देतात आणि एकूणच अण्णांनी जमवलेली सगळी माणसं लोभापोटी येतात आणि एका अनौपचारिक आनंद देतात. अण्णा आणि त्यांच्या टीमला अनेकानेक शुभेच्छा. 

--जयंत विद्वांस