Wednesday 2 April 2014

लल्याची पत्रं (४) ….

लल्याची पत्रं (४) ….
 
लल्यास….
 
गाण्यांवर लिहायचं ठरवलं ना की मोठा गोंधळ उडतो बघ. जे आधी सुचलंय त्यावर लिहिता लिहिता मधेच दुसरंच आठवतं बघ. आत्ता पण तसंच झालं 'ए भाय, जर देखके चलो' वर लिहिणार होतो तर 'मंझिले अपनी जगह' इन्स्ट्रुमेंटल लागलं. परवाच्या 'छू कर मेरे मनको' चंच त्रिकूट परत. अमिताभ, किशोर आणि गीतकार अंजान, संगीतकार फक्तं चेंज, बप्पी लाहिरी.
 
बप्पी लाहिरी हा काही फार गुणी, ओरिजिनल म्हणावा असा संगीतकार नाही पण काही गाणी मात्रं त्यानं छान दिलीत. हे त्यातलच एक. बाकी तो अन्नू मलिक वंशाचा मूळ पुरुष. इंग्लिश गाण्यांचा चालींचा मूळ अनू'वादक' असं खरं तर म्हणायला हवं त्याला. 'चलते चलते' च्या टायटल सॉंग नंतर तो झळकला. त्याचं तिसरं कडवं फार लागत नाही, टी.व्ही, रेडीओ वर, मिळालं कुठे तर ऐक, 'अलविदा तो अंत है, अंत किसने देखा…'. मुद्दा हा की किशोरनी अत्यंत तरल लावलाय आवाज तिस-या कडव्याला. कितीही भिकार गाणं असलं तरी किशोर मनापासून गायचा बप्पीची गाणी, कारण एकच.  बप्पी त्याचा भाचा आहे. (पण बप्पी साला टिकून आहे अजून, 'उलाला, उलाला', 'शोला  या है बिजुरिया'चा गायक म्हणून.) तसाच तरल आवाज किशोरने या ही गाण्याला लावलाय. दारुड्यावर चित्रपट कथा काय असू शकते खरं तर पण अमिताभ आणि गाण्यांमुळे चित्रपट तुफान चालला (आणि हो ओमप्रकाशचा 'मुन्शीजी पण कारणीभूत. मनमोहन देसाई गमतीनी प्रकाश मेहराला म्हणाला होता, शराबी 'शराबी' निकालता है, मर्द 'मर्द'  निकालता है. मनमोहन देसाईनी तरीही आत्महत्या केली हा भाग वेगळा.) असो!       
   
मद्यपी अमिताभच्या जगण्याची दोनच कारणं आहेत एक मुन्शीजी आणि एक जयाप्रदा. त्यामुळे तो या दोन बाबतीत फार हळवा आहे. किशोरचा आवाज काही तलत सारखा कापरा वगैरे नाही पण या गाण्यात  त्यानी जो काही स्वर लावलाय ना तो ऐकत रहावा असा आहे. 'कश्तिया साहिल पे अक्सर डूबती हैं प्यार की; नंतरचा म्युझिक पिस मात्रं अगदी लक्षात राहिलाय. रेडीओला रात्री ते  'बेला के  फूल' लागायचं  बघ, माझा मामा ते ऐकूनच झोपायचा. निरव शांततेत अंधारात ही अशी गाणी फार मनाला भिडतात असा माझा अनुभव आहे.  
 
काही प्रश्नांची उत्तरे सोप्पी असतात, काही अवघड असतात, काही शोधावी लागतात पण या गाण्यात प्रश्नं हताश करणारे आहेत. पावलं साथ देत नाहीत तर काय उपाय असू शकेल? पहिल्या कडव्यात तर मी अंजानच्या प्रेमातच पडलोय. आशा निराशेचा खेळ काय मस्तं मांडलाय त्यानी. बुडत्याला काडीचा आधार, दूर कुठेतरी आशेचा किरण आणि बुडणा-या माणसाला जर कुठे हुरूप येतोय तर तो सर्वव्यापी अंगावर वीज पाडतोय, काय करावं बरं माणसानी? अज्ञात शक्तीशी लढतानाचा हताशपणा क्लेशदायक आहे.
दुस-या कडव्यात पण हताशपणाच आहे. प्रेम करायचा गंभीर गुन्हा केलाच आहे मी, मला शिक्षा व्हायलाच पाहिजे, हे जग, माझी प्रेमिका पत्थरदिल आहेत, दगडाला कधी पाझर फुटतो का? मग माझी उमेद कितीही मोठ्ठी असली तरी काही कामाची नाही. सुंदर लिहिणं म्हणजे काय? तर दुस-यानी लिहिलेलं आपल्याला ते स्वत:शी, स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी साम्यं सांगणारं आहे असं  वाटणं. याचा अर्थ अंजान सुंदर लिहितो.
 
चांगलं काम केल्यावर शाब्बासकी मिळतेच असं नाही. पण या गाण्यासाठी किशोरला आणि चित्रपटासाठी बप्पीला फिल्मफ़ेअर मिळालं होतं, अंजानला मात्रं नाही. आपल्याकडे तसंही योग्य माणसाला दरवेळी बक्षिस मिळतच असं नाही. अन्नू मलिकला 'बाजीगर' साठी मिळालं होतं. परिक्षक ही जमातच महान बघ. त्यातलं 'ऐ मेरे हमसफर' एल.पी.च्या 'मि.एक्स इन बॉम्बे' मधल्या 'खूबसूरत हसीना, जानेजां जानेमनची' कार्बन होती. बहुतेक परीक्षक लोकांनी ओरिजिनल गाणंच ऐकलं नसावं.
 
चल पुढच्या पत्रापर्यंत बाय. तोपर्यंत 'तुम अपनी जगह, मैं अपनी जगह'. :)
 
जयंत विद्वांस 
 
 

No comments:

Post a Comment