Saturday 19 April 2014

लल्याची पत्रं (७) ….


एकच गाणं दोन वेगळ्या गायकांनी म्हटलं की त्याला ट्यांडम म्हणतात. काहीवेळेस चाल वेगळी असते, शब्दं वेगळे असतातच पण मुखडा तोच. दिल धुंडता है फिर वही, अजनबी तुम जाने पहचानेसे लगते हो एकदा स्लो एकदा फास्ट. अशी बरीच आहेत. ऐ मेरे दिल कही और चल, नीले नीले अंबरपे,  छोटीसी ये दुनिया, चंदा  ओ चंदा, यादोंकी बारात चं टायटल आणि किशोर रफी मधे श्रेष्ठं कोण वादाला पूरक ठरलेलं 'तुम  बिन जाऊ कहां' (डायरेक्टर कोण माहित नाही, पण किशोरचा आवाज भारत भूषणला आहे. इस्त्रीच्या चेह-यानी तो गाणं म्हणतो आणि मातेरं करतो. त्यामुळे किशोरचं फक्तं श्रवणीयं आहे). असंच आर.डी., किशोरचं 'ओ हंसिनी…' आहे, श्रवणीयं फक्तं. असो, मी  सांगणार आहे आज तुला ते वेगळंच आहे 'रिमझिम गिरे सावन' एक लताचं एक किशोरचं.

एकतर बासू चटर्जी आणि अमिताभ हा कॉम्बो न पचणारा. पिक्चर खूप बालपणी बघितलाय त्यामुळे लक्षात नाही स्टोरी पण ही दोन्ही गाणी मात्रं संपूर्ण लक्षात आहेत. गाणं चालीला जेवढं भन्नाट आहे  तेवढंच शब्दांनीही आहे. कवी जेंव्हा गाणं लिहितो ना तेंव्हा ते अर्थपूर्ण असतंच पण नादमय ही असतं. संगीतकाराला फार धडपड करावी लागत नाही चालीत बसवण्यासाठी, ते बसतच. योगेशचं गाणं आहे हे ('आनंद'ची कविता गीतं पण त्यांचीच).  एकच माणूस स्त्री आणि पुरुषाच्या भावना मुखडा तोच ठेवून किती सुरेख मांडतोय बघ.
 

पेटीवर बसून गाणं म्हणणारा  अमिताभ आणि लाजल्याचा, लट्टू झाल्याचा वगैरे अभिनय करण्याचा प्रयत्नं करणारी ढप्पू, गायक हेमंतकुमारची सून, मौशुमी चटर्जी. अमिताभ असा निवांत बसून पेटीवर गाणं वगैरे म्हणतोय ही कल्पनाच लई भारी आहे. त्याच्या चित्रपटातल्या प्रतिमेशी साजेसे शब्दं तर आहेतच पण त्याचे कपडेही बघ किती साधे आहेत. गाणं म्हणताना एकदाही तो मौशुमीकडे बघत नाही, अत्यंत तन्मयतेने किशोरच्या आवाजाला न्याय देतो. त्याचा सज्जनपणा शब्दातून सगळं पोचवतो.  सर्वप्रथम 'पावसाचे घुंगरासारखे वाजणारे थेंब' या नादमय ओल्या कल्पनेसाठी मी इथे एक सलाम ठोकलाय. एका अनोळख्या व्यक्तिवर प्रेम  बसू पहातंय ही चारचौघात सांगण्यासारखी गोष्टं नाहीये, असं म्हणतो तो. डोळ्यांची भाषा कळायची तेंव्हा, शब्दावाचून शब्दांच्या पलीकडलं बरोब्बर पोचायचं. आता प्रेम व्हायची शक्यता आहे आणि  झालं असेल तर ते सगळ्या जगाला कळवायलाच हवं असा खाक्या आहे हल्ली. कदाचित आपणही कुणाला तरी आवडू शकतो हा आश्चर्याचा धक्का असू शकतो. :P

लतादीदी म्हणतात ते गाणं मात्रं फास्ट आहे आणि मुखड्याशी नातं सांगणा-या पावसातही आहे पण हा राजकपूर, मनोजकुमारचा अंगाला चिकटणारा पाऊस मात्रं नाही. हा नवं काहीतरी गवसल्याचा, नवं काहीतरी  अंकूरल्याचा आनंद देणारा  पाऊस आहे. योगेशनी काय संयत वर्णन केलंय पण, जबरदस्तं. हा पाऊस काय पहिल्यांदाच पडतोय का? पदर, अंग काय पहिल्यांदाच भिजलंय का? पण ही  लागलेली आग मात्रं नविन आहे. माणूस प्रेमात पडला ना की उत्तरं माहित असलेले प्रश्नं पण त्याला समोरच्याला विचारायला आवडतात. मूळ उत्तराकडे न येता कडेकडेनी सूचक बोलत जो संवाद होतो ना तो फार रोम्यान्टीक असतो.  तिनी वेड्यासारखं करायचं, बालिशपणे वागायचं, प्रश्नं विचारायचे आणि त्यानीही किती गं तू भोळी, अजाण असा चेहरा करत तिला खुश करायचं. खरं तर हा विषय रुक्ष चर्चेचा नाहीच तो अनुभवावा हे उत्तम. मौशुमी सगळा दोष मात्रं निसर्गालाच देते. यावेळचा श्रावणच वेगळा आहे. वैशाखवणवा असतो तसा हा श्रावणनिखारा आणि तिचं मन तरी काय करणार, वारा सुद्धा साथ देतोय काहीतरी नशा केल्यासारखा. छे गरीब बिचा-या मौशुमीचा काही एक दोष नाही.

मागे भक्ती बर्वेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की 'ती फुलराणी' मधे काम करताना त्यांना सतीश दुभाषींचा त्रास व्हायचा. त्यांचे संवाद झाले की ते भक्तीकडे बघायचेच नाहीत. तिची अपेक्षा की  आपल्या बोलण्याचं प्रतिबिंब समोरच्या नटाच्या/नटीच्या चेह-यावर उमटायला हवं तर ती भूमिका करण्यात मजा आहे. नंतर ते त्यांना मान्यं झालं. अमिताभ, नसीर, रेखा, स्मिता इथे सरस ठरतात. मी कोण यापेक्षा माझ्या भूमिकेची गरज काय आहे हे त्यांना कळतं. संपूर्ण गाण्यात अल्लडपणा दाखवण्याचं काम मौशुमी चोख करते आणि अमिताभ तिच्याकडे कौतुकाने बघत फक्तं तिच्याबरोबर चालतो, पळतो. उगाच आपलं काहीतरी वेगळेपण दाखवायचा प्रयत्नं वगैरे अजिबात नाही.

चल पुढच्या पत्रापर्यंत अच्छा. ते तेवढं 'चलते चलते, मेरे ये गीत'चं 'अलविदा तो अंत है' हे तिसरं कडवं मिळालं तर दे मला. 


जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment