Sunday 27 April 2014

One Bright Summer Morning - James Hadley Chase

चेसचा हा प्लॉट भन्नाटच आहे. लेखक कितीही आवडीचा असला तरी तो ही माणूसच आहे. एवढी पुस्तकं लिहिताना शैलीमधे तोच तोच  पणा येणारच. मग कंटाळा येऊ शकतो, पण चेसचं वेगवेगळे प्लॉट घेऊन कथा रंगतदार करणं मोठं मजेशीर आहे. श्रीमंताच्या एकुलत्या एक मुला/मुलीला पळवून न्यायचं आणि बदल्यात काही रक्कम मागायची हा काही फार नाविन्यपूर्ण प्लॉट नाही.  पण चेस गंमत आणतो.  (अमजदचा 'इन्कार' मस्तच होता). गुन्हेगारी आणि प्रेम करणं यात एक साम्यं आहे. अपयशाची उदाहरणं जास्तं असतानाही कुणी रयत्नं  करणं मात्रं सोडत नाही.
 
बिग जिम क्रामर : माजी डॉन, आता तो रिटायर झालाय. परफेक्ट प्लानर. तो पोलिसच्या एकदाही हातात सापडलेला नाही. त्याला पकडणं एफ.बी.आय.चं अर्धवट राहिलेलं स्वप्नं आहे. चाळीस लाख डॉलर त्यानी बाजूला  काढले आहेत. बायकोबरोबर सुखवस्तू जीवन जगतोय. पैशाची ताकद मोठी असते. वरच्या थरात वावरत तो एका उच्चभ्रू माणसाचं जीवन जगतोय. मस्तं बंगला, दिमतीला पॉश गाड्या, नोकर चाकर, गोल्फ अशा  सगळ्या पैशांनी विकत घेता येणा-या साधनांनी तो आता आदरणीय वगैरे पण झालेला आहे. त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा एके दिवशी सकाळी डोक्यात गोळी मारून घेतो आणि तो रस्त्यावर  येतो. आपल्या चाळीस लाख डॉलरला चुना लागलेला आहे हे त्याला समजतं. आयुष्याच्या संध्याकाळी आहे ते स्टेटस टिकवण्यासाठी त्याला पैसा गरजेचा  आहे. तो मिळवण्यासाठी त्याच्यापुढे बंद केलेल्या  इतिहासाची पाने परत एकदा नव्यानी लिहिणे एवढाच मार्ग शिल्लक आहे. 
 
मो झेगेट्टी : बिग जिम चा एकेकाळचा सहाय्यक. त्याला स्वतःचा मेंदू नाही पण आखून दिलेला प्लान अंमलात आणायचा ह्यात तो माहीर आहे तो ही आता वयस्कं आहे. त्यानी सहा वर्ष तुरुंगात  घालवली आहेत आणि त्याचा धसकाही घेतलेला आहे. एका हॉटेलमधे तो फालतू वेटरचं काम करत अपमानित  जिणं जगतोय. एकेकाळी ब्रोथेल चालवणारी त्याची आई आता मरणापासून फार लांब नाही. त्यानी बॉसला सहा-सात वर्षात पाहिलेलंही नाही. आणि एक दिवस त्याला फोन येतो. काम आहे, लवकर ये. तुझा वाटा अडीच लाख  डॉलर. जेलमधे खाल्लेला मार अजून त्याच्या अंगावर शहारे आणतो पण एवढी रक्कम असेल तर  आयुष्यं दानाला लावायला तो तयार होतो. काय व्हायचं ते एकदाच होऊन जाऊ दे. झालोच यशस्वी तर उर्वरित आयुष्यं सुखात जाईल नाहीतर या लाचार जगण्यातून सुटका तरी होईल. 
 
झेल्डा वायली : अब्जाधीशाची मुर्ख मुलगी. तिला पळवल्यावर तिचा बाप चाळीस लाख डॉलर देणार याची बिग जिमला खात्री आहे.
 
चिता आणि रीफ क्रेन : जुळी आहेत ही बहिण भावंडं. वाटमारी, जगण्यासाठी शक्यं तेवढी वाईट कामं करण्यात कुठलाही कमीपणा न वाटणारी. पण त्यांची आत्तापर्यंतची मजल फार मोठी नाहीये. दोघांमधे एक  विचित्रं नातं आहे. एकमेकांना ते ओळखून आहेत, एकमेकांवर निरातिशय प्रेमही आहे. संकटाची चाहूल दोघांना पटकन लागते. त्यांचं नातं फक्तं 'बहिण भावाचं' नाही. झेल्डाला उचलण्यासाठी या दोघांची निवड मो  झेगेट्टीनी केलीये. त्यासाठी त्यांना दहा हजार डॉलर मिळणार आहेत. हक्कं भावना, हव्यास, अचानक घडणा-या घटनांनी यश मिळणार नाही याचं दु:खं आणि चं.गों.नी त्यांच्या चारोळीत म्हटलंय तसं 'निघत नाही म्हटल्यावर पतंग फाडायला निघतात', तशी आलेली अपरिहार्यता यांच्या नशिबी आहे.              
 
व्हिक्टर डरमॉट : प्रथितयश नाट्यलेखक. नवीन नाटक लिहिण्यासाठी तो, त्याची बायको आणि लहान मुलगा एकांतवासात गेल्यासारखे आजूबाजूला अजिबात वर्दळ  नसलेल्या घरामधे रहायला गेलेत. या माणसाचा वरच्या स्टोरीशी काहीही संबंध नाही. (इथे चेस वेगळा ठरतो). बिग जिमच्या वतीने पैसे घेण्यासाठी आणि आणून देण्यासाठी त्याची निवड झाली आहे. त्याची बायको आणि मुलगा ओलिस  असल्यामुळे त्याला पर्याय नाहीये.       
 
सगळ्यात कलाटणीचा भाग आहे तो जबर आहे. मुर्ख झेल्डा रिफच्या प्रेमात पडलीये. ती लग्नाला पण तयार आहे. चेसला हव्या असलेल्या क्षणी त्याची स्पेशल माशी शिंकते आणि सगळं कसं पत्त्याच्या  बंगल्यासारखं कोसळतं. झेल्डा लग्नं करते? बिग जिम, मो, क्रेन ट्विन्स ला पैसे मिळतात? वाचा म्हणजे समजेल. :)
 
जयंत विद्वांस  
 

No comments:

Post a Comment