Sunday 6 April 2014

लल्याची पत्रं (५) - सैंय्या झूठों का बड़ा सरताज निकला

लल्याची पत्रं (५) ….
 
लल्यास,
 
वारुळातून मुंग्या निघाव्यात ना तशी गाणी येतात बघ समोर लिहायचं म्हटलं की. सगळ्याच गाण्यांवर फार काही लिहिता बोलता येत नाही पण काही असतातच अविस्मरणीयं. काहीवेळेस ती ज्या चित्रपटात असतात तो चित्रपट आपण पाहिलेलाही नसतो, काही वेळेस पाहिलेला असतो पण काहीही आठवत नाही ती गाणी सोडून. सचिन, बिंदिया गोस्वामीचा 'कॉलेज गर्ल' पाहिलाय? सुतराम शक्यता नाही पण त्यातलं किशोर, 
बप्पीचं 'प्यार मांगा है तुम्हीसे…' अनेकवेळा ऐकलं असशील. ते सोडून बाकी काहीही माहित नाही. 
 
काल एक गाणं ऐकलं. 'दो आंखे बारह हाथ' मधलं 'सैय्यां झुठो का बडा सरताज निकला… हा काय, 'संत तुकाराम', 'श्यामची आई'  काय, अवीट गोडीचे. दणकट पटकथा (ग.दि.माडगूळकर), हुकमत असलेला  दिग्दर्शक (व्ही. शांताराम), अर्थपूर्ण साधी सोप्पी गाणी आणि तितक्याच सुरेल चाली या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जन्माच्याही आधीचा हा चित्रपट आपल्याला भूरळ  घालतो. यातली सगळीच गाणी अफाट होती. थोडासा नाटकी अभिनय आहे, नाही असं नाही. संध्याचे कुठल्याही गाण्यातले डोळ्यांचे, मानेचे हावभाव पाहून मला कायम हसू फुटत आलं आहे तरीही हे गाणं मात्रं मला आवडतच.
 
हल्ली काही शब्दं गाण्यातून बादच झालेत बहुतेक. जुनं तेच चांगलं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये पण काही शब्दं कानाला गोड लागतात. उदा.सैय्या, मोरा, लई ले, सजनवा. गुलझार आणि जावेद अख्तर लिहितायेत अजून ते एक बरंच आहे नाहीतर फक्तं दिल, नींद, सीना, धडकना, चुराया आणि अर्थ माहित 
नसलेले पंजाबी शब्दं याशिवाय इतरही काही शब्दं लागतात, असतात हेच विसरायला झालंय.  
 
हल्लीच्या जत्रा पण मॉडर्न झाल्या. पहिल्यांदा खास जत्रेतच मिळणारी काही खेळणी होती. संध्याच्या 
मागे जे तडतड वाजतं ते खरं तर डोकं उठवणारं आहे पण या गाण्यात ते आधीच चिडलेल्या संध्याला वात आणत  नाही. तिच्या त्या तडतड करणा-या भूमिकेचं प्रतिकच आहे ते. मुझे छोड चला नंतर तिच्या हातातल्या वाद्यावर (माझ्या माहिती प्रमाणे त्याला 'धनुकली' म्हणतात) जे काही वाजतं ना ती त्या गाण्याची ओळख आहे. 'आ लौटके आजा मेरे मित' मधलं ते टयांव टयांव पण असंच भारी होतं बघ. इंट्रो किंवा इंटरल्यूड पीस सुद्धा पाठ असतात बघ जुन्या गाण्यांचे. बघ ना, तेरे बिना जिंदगीसे, ओ मेरे  दिल के चैन, बचना ऐ हसिनो, अरे दिवानो, ये मेरा दिल आणि नाच रे मोरा व इतर अशी कित्त्येक गाणी आहेत जी इंट्रो ऐकून सांगता येतात. असो!  
 
 
खेडवळ माणसं खरंच प्रेमळ असतात पण. आपल्याला ती भाबडी असल्यामुळे बावळट वाटतात. मागे एक पोस्ट वाचली होती मी - शेतक-याच्या मुलानी आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात ठेवल्याचं ऐकलेलं नाही. संध्याचं जेलर आदिनाथ वरचं अव्यक्तं प्रेम जसं तिच्या डोळ्यातून व्यक्तं होतं तसंच कैद्याच्या मुलांवर ते कृतीतून व्यक्त होतं. ह्या गाण्यातला लटका राग दाखवण्यासाठी शब्दं मदत करतात संध्याला. कडव्यातल्या ज्या ओळी आहेत ना त्याचं क्रियापद मला भुरळ घालतंय. व्याकरणदृष्ट्या वगैरे माहित नाहीये मला काय ते पण ते अर्धवट आहे आणि त्यामुळेच मोहक आहे असं माझं मत. वाच या ओळी आणि  सांग       
 
चल दिया जुल्मी मुझसे बहाना बना 
मेरे नन्हेसे दिलको निशाना बना  
 
'बनाके' असं असतं ना खरंतर? पण 'बना' ची मज त्यात नाही बघ. एकूणच या गाण्यातला, तो अनपॉलीश्ड असल्याने आलेला, प्रेमळ लटका राग मला मोहित करत आलेला आहे. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हे  सुद्धा भन्नाटच आहे. त्याबद्दल परत कधीतरी. चल तो पर्यंत बाय. 'चल दिया जुल्मी मुझसे बहाना बना' ह्या गाण्यातल्या शब्दांचा लगेच चपखल वापर तुला सुचणार नाही, ही अपेक्षा. :) 
 
जयंत विद्वांस

2 comments:

  1. थोडेसे या सिनेमाबद्दल आणि गाण्याबद्दल सुद्धा कुंडल जवळ च्या मुक्तिपुर् येथे असलेल्या खुल्या तुरुंगात घडलेली ही सत्य घटना .वाइड स्क्रीन फॉर्मेट वापरलेला हां पहिला भारतीय सिनेमा .सम्पूर्ण चित्रण कोल्हापूर जवळ एक शेतात केले आहे . या गाण्यात कोका नावाचे वाद्य वापरलेले आहे ते गजानन राव कर्नाड यानी वाजवले आहे .इतकेच नाही सबंध सिनेमात पार्श्वसंगीतात पण याचा उपयोग केला आहे

    ReplyDelete
  2. थोडेसे या सिनेमाबद्दल आणि गाण्याबद्दल सुद्धा कुंडल जवळ च्या मुक्तिपुर् येथे असलेल्या खुल्या तुरुंगात घडलेली ही सत्य घटना .वाइड स्क्रीन फॉर्मेट वापरलेला हां पहिला भारतीय सिनेमा .सम्पूर्ण चित्रण कोल्हापूर जवळ एक शेतात केले आहे . या गाण्यात कोका नावाचे वाद्य वापरलेले आहे ते गजानन राव कर्नाड यानी वाजवले आहे .इतकेच नाही सबंध सिनेमात पार्श्वसंगीतात पण याचा उपयोग केला आहे

    ReplyDelete