Sunday 27 April 2014

लल्याची पत्रं (८) …. 'जिंदगी के सफर में'

लल्यास…... 

काही गाणी ना काळाच्या पलीकडची असतात बघ. चित्रपटात ती कधी येतात, कशाशी रिलेटेड आहेत हे नसेल माहित तरी ऐकताना काही  फरक पडत नाही. स्वत:चं एक वेगळं अस्तित्व, एक वेगळी ओळख  असते त्यांची. 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम…' असच  एक गाणं आहे बघ. 'आप की कसम' मधलं, आर. डी. आनंद बक्षी, किशोरचं. जे.ओमप्रकाशचा पहिला चित्रपट हा. यानंतर त्यानी सगळे  सिनेमे 'अ' नी सुरवात असलेलेच काढले. अर्पण, आखिर क्यो, अगर तुम ना होते, आशा इ.इ. त्याचे सगळेच सिनेमे एकाच पठडीतले.  प्रेमाचा त्रिकोण, एकीचा/एकाचा त्याग, उदात्त प्रेम, ओठांवर खेळतील अशी गाणी, माफक  मारामारी, फार क्रूर नसलेला व्हिलन, वगैरे वगैरे असा ठरलेला  साचा सगळीकडे. राकेश रोशनचा सासरा हा, जावई फक्तं 'के' नी सिनेमे काढतो एवढंच. एकता कपूरचा मात्रं कुणीही नाही तो.  :P  
आनंद बक्षी या माणसाचं मला मोठं कोडं आहे. तो 'अच्छा तो हम चलते है' अशी बोलगाणी पण लिहितो, यमक जुळवायला दुसरं काहीही न  सुचल्यामुळे नाईलाजानं कुठलाही संबंध, अर्थ नसलेली ' ठेसनसे गाडी जब  छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है' (म्हणजे नेमकं काय  होतं गाडीचं ते तोच एक जाणे) अशी निरर्थक ओळ लिहितो, पण तो 'चिंगारी कोई भडके' ही लिहितो  (त्याच्या वहीत सापडलेली एक  अप्रकाशित जुनी कविता, जी आर.डी.च्या  हट्टामुळे सिनेमात घेतली) आणि 'जिंदगी के सफर में गुजर जाते है' पण लिहितो.

रेल्वेत खिडकीशी बसलेला दाढीतला राजेश खन्ना नैराश्यं आणतो इतके सुरेख शब्द आणि चाल आहे. पार्श्वभूमीवर वाजणारी गाणी अशीच अंगावर येतात काहीवेळेस. तत्वज्ञान अवघड नसतं जेंव्हा ते सोप्प्या शब्दात सांगितलं जातं. आनंद बक्षींनी तेच केलंय. 'जिस मकाम से एक बर गुजर गये तो गुजर गये, मग त्याबद्दल दु:ख करा, करू नका, जे निसटलं एकदा ते निसटलच.'फिर नही आते' ही ओळ ठसवण्यासाठीच रिपीट असणार बहुतेक. काय जीवघेणं अवघड लिहिलंय साध्या शब्दात. एकदा कोमेजलं फूल की मग काही करा, पाणी घाला, जोपासा, काळजी घ्या, काही काही  उपयोग नाही. काचेला तडा, चुरगाळलेला कागद, कोमेजलेलं फूल आणि गेलेलं आयुष्यं बदलता नाही येत. विशिष्ठ माणसाला पर्याय नसतो गं आयुष्यात. मग कित्ती का येईनात आयुष्यात.    


दुस-या कडव्यात तर भरूनच येतं.  संशयानी पछाडलेल्या आणि त्यामुळे आयुष्याची माती केलेल्या माणसाचं कळवळून सांगणं आहे ते. तुमच्या जवळचं कुणी जात असेल तर उठा, थांबवा त्याला. राग,प्रतिष्ठा, अहं याच्या बेड्या इतक्या दणकट असतात ना की हात, पाय, जीभ जड होतात. पुढे होऊन, हाक मारून थांबवणं नाही होत. तेंव्हाचा त्या कोसळक्षणाचा एक अनुच्चारित शब्द, एक  राहून गेलेला स्पर्श याला पर्याय नाही. नंतर तुम्ही माफिनाम्याचे ग्रंथ लिहिलेत तरी काही काही उपयोग होत नाही. पाठमो-या व्यक्तीचे 'थांब' ऐकण्यासाठी आसुसले कान डोळ्यांसमोर नसल्यामुळे दिसत नसावेत.

दिवस आणि रात्रं, काळाचे चाक त्याच्या त्याच्या वेगात धावतच बघ. आपल्या मन:स्थिती प्रमाणे त्याचा वेग आपल्याला कमी जास्तं वाटतो. कधी क्षणात युगं सरतात तर कधी युगं सरली तरी क्षणभर वाटतात. रागाचे, द्वेषाचे, संशयाचे पडदे डोळ्यांवर आले की समोरचं दृश्यं आपण ठरवलंय, आपल्याला वाटतंय तसंच दिसतं. उलगडा होतो तोपर्यंत मुठीतून वाळू निसटावी तसं आयुष्यं, माणसं ओघळून जातात. एकाकी, मग ते चुकीनी, नशिबानी किंवा नाईलाजानी असेल, आयुष्याला ओढ नसते. दिवस, रात्रं, तारीख, वेळ, क्रम असला काय नसला काय किंवा चुकला काय, फरक नाही पडत. पश्चातापानी पाप धुतलं जात असेल, खंत, शल्यं मात्रं अजूनच टोकदार होतात. धड जगूही देत नाहीत, मरूही देत नाही.


बदलापूरचं गावदेवीचं देऊळ आणि कल्याणहून कसारा कर्जतचे फुटणारे फाटे या गाण्यात दिसतात. त्या गावदेवीच्या नितांत शांत देवळात मी अनेकदा बसलेलो आहे. इतकी वर्षं झाली हे गाणं ऐकलं की गावदेवीचं देऊळ आठवतं. कित्त्येक वर्षात गेलेलो नाही तिथे. पण एकदा जाईन, बसेन, काय सांगावं माझ्या डोळ्यासमोर बांधकामांच्या आड अदृश्यं झालेल्या रेल्वे लाईनवर धावणा-या रेल्वेच्या डब्यात खिडकीत बसलेला विमनस्कं, दाढीतला राजेश खन्ना दिसेल. त्याचे आटलेले अश्रू कदाचित माझ्या डोळ्यातून सांडतील. :(
चल, पुढच्या गाण्यापर्यंत बाय.

https://www.youtube.com/watch?v=Fr-r5NAhOZo

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment