Wednesday 30 April 2014

Have A Nice Night - James Hadley Chase

चेस हा मोठा विचित्रं माणूस आहे. काहीवेळेस नाईलाजानी वाईट काम करणा-या माणसाबद्दल पण तो तुमचं चांगलं मत तयार करतो. दुस-या बाजूला परिस्थितीच्या रेट्याने, चुकीच्या माणसावर  आंधळं प्रेम केल्यामुळे वाईट काम करणा-या माणसाबद्दल तो राग आणि कणव युक्तं भावना निर्माण करतो. नेहमीप्रमाणे Have A Nice Night चा जीव लहानच आहे पण घडणा-या घटनांचा वेग अफाट  आहे. कुणीही चांगली स्टारकास्ट घ्यावी आणि सरळ शुटिंगला सुरवात करावी अशी पटकथाच त्यानी लिहिली आहे. प्रत्येक पात्रं त्यानी इतकं सुरेख रेखाटलंय की फक्तं योग्यं कलाकार निवडायचाय. 

फक्तं लक्षाधीश, अब्जाधिश लोक ज्या 'स्प्यानीश बे हॉटेल' मधे उतरतात तिथे सगळं हे घडतं. श्रीमंतीचं, हिऱ्यांचं, दागिन्यांचं ओंगळवाणं प्रदर्शन करणारे, पैशांनी मस्तवाल झालेले '(खूप) आहे रे' वर्गातले श्रीमंत आणि दुस-या बाजूला '(काहीच) नाही रे' वर्गातले रोजच्या जगण्यासाठी लढणारे गरीब यांच्यातलं युद्धं न संपणारं आहे.  पण शेवटी पैसा महत्वाचा असतो. त्यानी खूप गोष्टी विकत घेता येतात, आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने घटना घडवता येतात. 

मेक्सिकोच्या धनाढ्याचा मुलगा विल्बरटन आणि त्याची बायको मारिया हनिमूनसाठी तिथे उतरलेत. अंगावर वडिलांनी दिलेले जवळपास १ कोटी डॉलर्सचे हि-याचे दागिने घालून मिरवण्याची तिला हौस आहे. लोकांना दागिने बघून वाटणारा हेवा तिला हवाहवासा आहे. हॉटेलच्या सेफमधे अजून चाळीस-पन्नास लाख डॉलर्सचे दागिने आहेत ते वेगळेच. ज्वेल थिफ Hadin आणि त्याचा प्लान अंमलात आणणारा विश्वासू सहकारी Lu Bradey यांची मागची चोरी फसलेली आहे. त्यांना मोठा हात मारणं आता गरजेचं आहे. लू ची प्रेयसी Magie पण आता सामील आहे. स्फोटक शरीर आणि कुणालाही त्याच्या सहाय्यानी जाळ्यात ओढू शकणारी. ती एक सहृदयी वेश्या आहे. त्यांच्या सोबत आहे एक्स-मिलिटरीमन माईक बनियान, जो शुटिंग एक्सपर्ट आहे. त्याला कॅन्सर झालाय आणि फक्तं सहा महिन्यांचं आयुष्यं हातात आहे. त्याच्या मतिमंद मुलीसाठी त्याला पन्नास हजार डॉलर्स हवेत जी अजून फारफार तर पंधरा वर्ष जगू शकते. त्या हॉस्पिटलचा पुढच्या पंधरा वर्षासाठीचा तो खर्च आहे. 

दुस-या बाजूला अजून एक टोळकं आहे. ज्यांचा चोरी हा हेतू नाही. पण घडणा-या घटना त्यांना भाग पडतात. त्याच हॉटेल मधे साफसफाईचं काम करणारी क्युबातून स्थलांतरित झालेली अनिता, परत  क्यूबात जाण्याची नुसतीच स्वप्नं बघणारा, काहीही कामधंदा न करणारा  तिचा  नवरा पेड्रो, त्याला पिस्तूल देवून चोरी करायला फूस लावणारा त्याचा क्यूबन मित्र फ्यूएन्तस आणि  क्यूबन लोकांचा म्होरक्या म्यनुएल. भाडं गोळा करणा-या माणसाकडून ते पैसे चोरताना त्या माणसाचा पेड्रो कडून खून होतो आणि त्याला पकडताना इंस्पेक्टर लेपस्की कडून त्याला गोळी लागते. तो हॉस्पिटलमधे बेशुध्द अवस्थेत  आहे. त्याला शुद्धीवर आल्यावर पोलीसांपासून वाचवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार. पेड्रोवर जिवापाड प्रेम करणारी अनिता, नाईलाजानी म्यनुएलच्या आश्रयाला गेलेला फ्यूएन्तस आणि म्होरक्या म्यनुएल एकत्रं येतात. 

विल्बरटन जोडप्याला ओलिस धरून पन्नास लाख डॉलर्स खंडणी मागायची, पेड्रोला बोटीवर घेऊन क्यूबाला जायचं असा त्यांचा प्लान आहे.  पैशांपैकी चाळीस म्यनुएलला आणि दहा फ्यूएन्तसला, अनिताला फक्तं पेड्रो हवाय. दोन्ही टोळकी एकाच दिवशी एकाच वेळी त्यांचा प्लान अंमलात आणतात. मग नेहमीप्रमाणे चेसची माशी शिंकते आणि घटना घडतात. कोण होतं यशस्वी? अनिता की Hadin? कोण जगतं, कोण मरतं, कोण अपयशी,  कोण यशाचं धनी होतं? त्यासाठी पुस्तकंच वाचावं लागणार. :)


जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment