Monday 14 April 2014

लल्याची पत्रं (६) ….दिल आज शायर

लल्याची पत्रं (६) …. दिल आज शायर
तुला मागच्या पत्रात म्हटलं ना  तसंच अजून एक गाणं आहे. तो पिक्चर काही मी पाहिलेला नाही. पहाणारही नाही. कारण देवआनंद मला सहन होत नाही फारवेळ. तर गाणं आहे 'दिल आज शायर हैं, ग़म आज नग्मा हैं. खुर्चीत बसून अजिबात न शोभणा-या मिशा लावून ('हम दोनो' मधल्या मिशा पण विनोदीच होत्या) तो ते म्हणतो आणि पिक्चर आहे 'ग्याम्ब्लर'. त्यात अजून एक मस्तं गाणं होतं किशोरचं 'चुडी नही ये मेरा, दिल है'. त्यात जाहिदा होती, संजय दत्तची मावस की मामे बहिण. तुला त्या काळातील क्याड्बरी बघायची असेल तर त्या गाण्यात दिसेल. ती खातानाचे देवानंदचे हावभाव माझ्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत. असो!


या माणसाला गाणी मात्रं चांगली मिळाली सतत. पहिल्यांदा एस.डी. मग आर.डी., किशोरचा आवाज आणि कवी दर्जाच्या गीतकारांची सरस गाणी. मग त्याचं ते बावळट चालणं, ते लुळे हातवारे, उगाचच हसताना तो  डबल दात दाखवण्याची धडपड आणि अत्यंत विनोदी, पोट धरून हसायला लावणा-या मारामा-या (शंकेचं पूर्ण निरसन हवं असेल तर 'जॉनी मेरा नाम' मधली प्राण बरोबरची शेवटची मारामारी बघच, हसू फुटलं नाही तर शिक्षा म्हणून मी त्यानी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट पाचवेळा पाहीन) असं असूनही चित्रपट मात्रं चालायचे. कारण गाणी अफाट असायची.


तर हे नीरजचं गाणं आहे. 'शोखीये में घोला जाये, फुलोंका शबाब, उसमें फिर मिला दी जाये थोडीसी शराब, होंगा यू नशा जो तय्यार, वो प्यार है' अशी प्रेमाची भन्नाट व्याख्या करणारा तोच तो नीरज (हीच टीम सगळी, एस. डी., देवानंद, किशोर - चित्रपट प्रेमपुजारी, तरी रंगीलारे, फुलोंके रंगसे यातच आहेत. 'शोखीये में' वर परत कधीतरी). तात्पर्य, हा माणूस ओळ किती लांब होतीये, संगीतकाराला झेपेल का  वगैरे बघण्याच्या भानगडीत न पडणारा असावा. त्याचा याच गाण्याचा मुखडा बघ ना केवढा लांबसडक आहे ते. मी अर्थपूर्ण लिहिणार, मला त्रोटक बिटक आवडत नाही, ते चालीचं तुम्ही बघा काय ते असा खाक्या असावा.  अर्थात बर्मन बापलेक त्यात माहीर होते. गद्यं वाटणा-या परिच्छेदाला ते सुंदर चाल लावायचे (ऐका 'मेरा कुछ सामां, तुम्हारे पास पडा है').
   


आपण ना नुसतंच ऐकतो, कित्त्येक वेळेला अर्थ डोक्यात घुसतोच असं नाही कारण चाल चांगली असते. एके ठिकाणी 'दिल आज शायर' वर मी जे वाचलं होतं ते तुला सांगतो, मोठं गमतीशीर आहे.  रुढार्थानी हे गाणं नाही होत. कारण याचं धृवपद रिपीट होत नाही. मी उडालोच. खरंच की हे कधी लक्षातच नव्हतं आलं. मग मी ते परत ऐकलं. पहिल्या दोन ओळी झाल्या की मग आ के ज़रा देख तो, हैं प्यार हम ने किया जिस, ये प्यार कोई खिलौना नहीं हैं ही तीन कडवी सलग येतात, नो धृवपद. बरं तिन्हीची चाल एकच आहे. त्यामुळे तसं ते एकसुरी आहे कारण कडवं संपल्यानंतर चेंज म्हणून वेगळ्या चालीचं धृवपद येत नाही. तरीही ते अनेक लोकांना पाठ आहे कारण किशोर, एस.डी. नीरज यांची जादू. देवानंद नुसता बसून तिन्ही कडव्यात चालीसारखाच सेम, अजिबात न बदलणारा चेहरा ठेवलाय ती मदतच म्हणायची. 

      

कदाचित धृवपद परत येतच नाही गाण्यात अशी मजा, वेगळेपण असणारी अजून गाणी असतीलही. माहित नाही. पण एक लक्षात आलं बघ माझ्या,  एकाच गोष्टीकडे प्रत्येकाची बघण्याची नजर वेगवेगळी असू  शकते. कुणीतरी यातली गंमत शोधली, लिहिली म्हणून आपल्याला समजली. अशाच काही गमती सापडतायेत का बघ, तो पर्यंत बाय बाय. 
जयंत विद्वांस 

   

No comments:

Post a Comment