Sunday, 24 February 2013

अशी होते पहाट...


अशी होते पहाट...

तू केसांमधून हात फिरवताना 
तुझ्या कुशीतच् मला झोप लागावी
झोपला वाटतं म्हणून 
पांघरूण नीट करायला जरा हालचाल करावीस्
आणि माझी झोप चाळवावी

मग तू मला अजूनच् कुशीत घ्यावस्, 
तुझ्या साईच्या स्पर्शानं
सर्वांगावर चांदण्याची दुलई पांघरावी 
आणि मी अतृप्तं मनानं
तुला अजूनच बिलगावं

तुझ्या नादमंजूळ स्मितानी 
पाव्याचा अलवार स्वर माझ्या कानात शिरावा
आणि तुला माझ्या मिठीत शिरताना पाहून चंद्रही लाजावा

सुखाच्या ग्लानीत तू मला कवटाळावस्
आणि तुझ्या मंद हालचालीतल्या नादानंही 
पाखरांनी हर्षानं चिवचिवाट करावा आणि 
आज बराच् उशीर झाला की काय असं म्हणत् 
पूर्वेला उषेनं लगबगीनं वर यावं

गवाक्षातल्या कवडश्यांवर तू नाराज होउन 
सकाळ लवकर झाली म्हणावस्
आणि त्या किरणांनी तुझ्या लालचुटूक पाळ्यात 
लाजत लाजत सागावं....

‘आम्ही काय करणार? तूच हालचाल केलीस्
आणि मग पहाट झाली’

--जयंत विद्वांस



मुलगी झाली (गेली) हो....


मुलगी झाली (गेली) हो....

काय मिळाले खुडून कळी ही
जी अजून उमलली नाही
विनाकारणे गर्भी आली
जन्माआधी मृत्यूची घाई

स्वप्नं किती मी होती पाहिली
आठवणीने भिजते चोळी
काय कुणाचा गुन्हा मी केला
प्रश्नं विचारी एक आई

दुडूदुडू वाजे पाउल तिचे
सत्यं वाटती भास मनाचे
सांगा कुणाला दुःखं बोलू
कुणासाठी गाउ अंगाई

पदरी माझ्या दुःखं उरावे
हाल मनाचे कुणी जाणावे
सांग कोण हया पृथ्वीवरी
अपत्यंवियोगे रडली नाही

जयंत विद्वांस



तहान.....


तहान.....

घोट, दोन घोट अश्रूच् पितो आता
पाण्याची तहान आता लागणार नाही

आता कुठलच् दुःख्खं एवढं मोठं नाही,
जे मला खूप रडवेल
आज एखादंही नसेल नशिबी, तर
रडल्याशिवाय रहाणार नाही

माझा कुणावरच राग नाही
असलाच् तर स्वतःवरच् असेल
पावसाशिवाय भिजून घेईन
अश्रू आज पुसणार नाही

खूप काही राहून गेलय
कशाकशाचा उल्लेख करणार
जमलं तर जगून घेईन पण
मरण आता मागणार नाही

--जयंत विद्वांस


तिची पत्रं.....

(Click the image)

सांगत जाउ फुलाफुलाला


सांगत जाउ फुलाफुलाला...

काल अचानक स्वप्नी आला
चुंबीत वदला हळू गालाला
उठ प्रिये ही रात्रं नशिली
सांगत जाउ फुलाफुलाला

दचकून बाई मी गं उठले
पदराचे मग भान कुठले?
खुदकन का तो गाली हसला?
सांगत जाउ फुलाफुलाला

शरमेनी मी डोळे मिटले
शब्दावाचून ओठही हलले
सरकन काटा अंगी फुलला
सांगत जाउ फुलाफुलाला

घेउन मजला कवेत अलगद
कानी सांगे अपुले हितगुज
रागाचा तो बहर निवळला
सांगत जाउ फुलाफुलाला

हिरवाळीवरी मजे पहुडलो
लटके लटके उगा भांडलो
होता एकला चंद्र साक्षीला
सांगत जाउ फुलाफुलाला


--जयंत विद्वांस

उणे राहीले


उणे राहीले

डोळ्यात माझे प्रतिबिंब पाहता
स्मित तुझ्या गाली फुलले
हलके तुजला मिठीत घेता
लाजाळूचे पान मिटले

बोलायाचे किती होते
नजरेने ते सारे कळले
स्पर्श सगळं सांगत होता
शब्दाने जे उणे राहीले

वाट पहाणे अवघड होते
प्रचितीने मलाही कळले
अश्रू सगळं सांगत होता
स्पर्शाने जे उणे राहीले

विरहाने का प्रेम वाढते
वेलीला का झाड बिलगले
आवेग तुझा सांगत होता
अश्रूंनी जे उणे राहीले

--जयंत विद्वांस

सुख…


(Click the image)

हमको पता है


हमको पता है

ये बालोंलो छूती महकी हवाएं
हलकेसे बरसती सावनकी बूंदे  
तुम्हे अच्छी लगती है, ये हमको पता हैं ।।

वो पिपलका पेड, वो कोयलकी कूक
हरियाली बागोमें सोनोकी धूप
तुम्हे अच्छी लगती है, ये हमको पता हैं ।।

वो मौसम सुहाना, निकटमें हो सैय्या
नदीके किनारे वो लहराती नैय्या
तुम्हे अच्छी लगती है, ये हमको पता हैं ।।

वो चांदनी राते, वो जंगलका सफर
मौसमपे सारे तेरी खुशीकी नजर
तुम्हे अच्छी लगती है, ये हमको पता हैं ।।

--जयंत विद्वांस


कत्लं


कत्लं

दर्दे दिलसे जब आह निकली तो लगा,
न जाने अब जिंदगी कैसे कटेगी

अब लग रहा है, ये भी कोई गम है
बेहोशी के लिए बहुत कम है

बात कुछ ऐसी हुई, जान जानेके लिए
जहर खाया और उसकी आदत हो गई

बाते हुई थी, चर्चे हुए थे
मकामपे पहुंचने के वादे हुए थे

अब ना वो बात है, ना वो वादे है
बस, बेवफाई के उनकी चर्चे है

क्या नजाकत थी, क्या अंदाज था
आखोके ऐनेमें सिर्फ मेरा अक्स था

हद-ए-जमाल थे वो, और शायद
इसलिए हम काबिल-ए-कत्लं थे

--जयंत विद्वांस

दिल्लगी


दिल्लगी 

जिंदगी को कुछ ज्यादा ही
करीब से देखा हैं 
इन्सान को इस दुनिया में
कभी कभी पाया हैं ||

गर्म हवा, सुलगती रातें 
खयालो में हजारो बातें 
एक बडे से पेड के नीचे
कभी धूप को भी पाया हैं ||

लंबी कतारे, मायूस चेहरें 
हर खुशी पे गम के पहरे
एक दिये की रोशनी में
कभी अंधेरा भी पाया हैं ||

शमशान में जलती चिताएं
बाजार में बिकती वफाएं
एक मंदिर के दरवाजे पे
कभी शैतान को भी पाया हैं ||

--जयंत विद्वांस


काटेभरल्या वाटेवरूनी…..


काटेभरल्या वाटेवरूनी…..

काटेभरल्या वाटेवरूनी
मी एकटा चालतो आहे
अश्रूभरल्या हया डोळ्यांनी
मी तुला गे पाहतो आहे….

क्षितीजावरती झाड वाकलेले
माझे कलेवर तिथे टांगलेले
मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे

मरणात माझ्या आहे का सुटका
की नशिबाचा घडा आहे फुटका
मी हजार तुकडे मोजतो आहे

--जयंत विद्वांस


वाट पहातो...


वाट पहातो...

डोहाच्या शांतकिनारी
आंब्याच्या झाडाखाली
रोज तुझी मी वाट पहातो

पाण्यामधे पाय सोडता
पाण्यावरी तरंग उठतो
बुडबुडा आशेचा फुटतो
रोज तुझी मी वाट पहातो

पक्ष्यांना मी साद घालतो
कोकिळेला सूर मागतो
आठवणींचे गीत गातो
रोज तुझी मी वाट पहातो

पश्चिमेला सूर्य कलतो
भावनांना बांध घालतो
तरी अश्रूंचा पूर येतो
रोज तुझी मी वाट पहातो

--जयंत विद्वांस


मला आठवतं....


मला आठवतं....

मला आठवतं तुझं माझ्या दारावरून जाणं
उगाचच कुठल्याना कुठल्या कारणानं
मला आठवतं तुझं माझ्या घरी येणं
उगाचच कुठल्याना कुठल्या कारणानं

मला आठवतं, ती चांदणी रात्रं,
पानाफुलांना लगडलेलं चांदणं
मला आठवतं, तुझं ते मधाळ हसणं
उगाचच कुठल्याना कुठल्या कारणानं

मला आठवतं, ती निरव शांतता,
तो चांदण्याचा आपल्यावरचा पहारा
मला आठवतं, तुझं ते चेहरा लपवणं
उगाचच कुठल्याना कुठल्या कारणानं

मला आठवतं, तुझी ती खटयाळ बट,
डोळ्यात लाज आणि गालावर लाली
मला आठवतं, तुझं ते मान वळवून लाजणं
उगाचच कुठल्याना कुठल्या कारणानं

मला आठवतं, तुझं ते पदराशी खेळणं
अंगठयाने तुझं ते जमीन उकरणं
मला आठवतं, तुझं ते माझ्या जवळ येणं
उगाचच कुठल्याना कुठल्या कारणानं

---जयंत विद्वांस