Saturday, 13 July 2013

करू पहातो…



करू पहातो…

सागर अथांग आहे
ओंजळीत पकडू पहातो
ईश्वर अचाट आहे
प्रार्थनेने पटवू पहातो...

सौंदर्य अप्राप्य आहे
वासनेने जखडू पहातो 
वासना मोकाट आहे 
डोळ्यांनीही शमवू पहातो...

अज्ञान अमाप आहे
वासरात मिसळू पहातो   
निकाल ठरला आहे
अंधारात निसटू पहातो...

लाचारी अटळ आहे
अहंकार दबवू पहातो
व्रुद्धत्वं सामोरे आहे  
आरशाला फसवू पहातो...

--जयंत विद्वांस

(प्रेरणा या मेसेज मधून मिळाली
 The Ocean his HUGE but we get as much water as our HANDS can hold
God's blessings r INFINITE But we get as much as our BELIEF can accept. :) )

Friday, 12 July 2013

जीव की प्राण ......




जीव की प्राण....

प्राण सिकंद, कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता धडकी भरवणारा खलनायक. प्रेमनाथ, शक्ती कपूर, कादरखान सारखा त्याचा खलनायक आचरट,  विकृत, ओंगळ  कधीच नव्हता. जो काय हलकटपणा दाखवायचाय त्यासाठी  चेहरा, डोळे, एखादी लकब, छद्मी हसण पुरायचं त्याला. उपकारच्या मलंगचाचा नंतर तो पालटला आणि चरित्रं भूमिकांमध्ये स्थिरावला. गुलशन ग्रोवर आत्ता आला, प्राणने गेटप आणि वेगवेगळे हावभाव खूप आधी आणले. खलनायकी ज्या जोशात करायचा तशाच सहृदय भूनिका पण तेवढ्याच ताकदीने करायचा.
 

काही चित्रपट प्राण करता लक्षात राहिलेत माझ्या, मजबूर मधला घायाळ मायकेल, मधुमती मधला दिलीपकुमार आणि जयंत पुढे तेवढ्याच ठामपणे उभा रहाणारा उग्रनारायण, अमर अकबर अंथोनी मधला किशनलाल, उपकार मधला मलंग चाचा, डॉन मधला दोरीवर चालणारा लंगडा सर्कसपटू, ब्रम्हचारीत तर तो मला शम्मी पेक्षा पण जास्तं आवडला होता. जंजीरचा उल्लेख वेगळा करावा लागेल, अमिताभचं नवखेपण जाणवत त्यात, पण प्राणनी कुठेही कुरघोडी केलेली नाही. त्याचा दिलेर शेरखान केवळ अविस्मरणीय. जॉनी मेरा नाम मधे देव आनंदचा बिछ्डलेला भाऊ होता तो. शेवटच्या मारामारीच्या देव आनंद बरोबरच्या अत्यंत हास्यास्पद प्रसंगात प्राण भाव खावून गेलाय. अशोकुमार बरोबरचे नर्म विनोदी विक्टोरिया नं.२०३, राजा और राणा, जंगल मे मंगल मधला रिटायर्ड कर्नल, परिचय मधला कडक आजोबा, अंधा कानून मधला अंथोनी, लाखो मे एक मधला मेहमूदला सांभाळून घेणारा शेरसिंग, शराबी मधला हताश श्रीमंत बाप, बॉबी मधला पैशाची मस्ती असलेला बाप.

धर्माच्या कव्वालीनंतर त्यालाही गाणी मिळू लागली. मुळात तो एक अत्यंत सहृदयी, सज्जन माणूस पण मिळेल ती भूमिका तो उत्तम वठवायचा, तो गरीब वाटायचा, श्रीमंत पण, क्रूर, मग्रूर वाटायचा तसाच दयाळू पण, खुनशी, घातकी वाटायचा तेवढाच दिलदार पण, हेच त्याचं वैशिष्ठ्य म्हणाव लागेल, समोर दिग्गज असो नाहीतर नवखा, आपलं  काम करताना  कुरघोड्या वगैरे करण्याच्या फंदात पडायची  त्याला जरूरच नव्हती, त्यासाठी त्याचा  सशक्त अभिनय पुरेसा होता. खलनायकी प्रभावी होण्यासाठी वास्तवात पण तसच वागायला हवं  असला उच्च गैरसमज त्याच्याकडे नव्हता. पडद्यावरच्या प्रतिमेची भरपाई केल्यासारखा तो वास्तवात सज्जन होता. दुसरं खणखणीत उदाहरण म्हणजे स्व.अमरिश पुरी.  पडद्यावर आणि वास्तवात दोन्हीकडे त्यानं स्वत:चा आब शेवट पर्यंत राखला हे मात्रं मानायलाच हवं.
      

प्राणनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, कुठल्याही आई बापानी आपल्या मुलाचं नाव कौतुकानी प्राण ठेवल्याचं ऐकिवात नाही इतका त्याचा खलनायक जबरदस्त होता. मुलगा सुनील सिकंदला हिरो करण्यासाठी त्यानी एक पिक्चरही काढला होता पण तो चालला नाही. खलनायकाचा मुलगा ना, बापाची दुष्कीर्ती आड आली असावी. दादासाहेब फाळके पुरस्कार बहुतेक ती व्यक्ती मरायला टेकल्याशिवाय द्यायचा नाही असा कदाचित नियम असावा. त्या मानानी  प्राणला लवकर दिला असच म्हणावं लागेल.

लोकांना सिनेमा पहाताना टायटल मोठ्यांदा वाचायची फार हौस असते, सगळी नावं संपली की AND PRAN असं वाचायची सवय झाली होती, आता ती ही कन्फर्म संपली.


--जयंत विद्वांस 


काल केंव्हातरी…

(Click the image)

Wednesday, 26 June 2013

ने.....

 
                                                          (Click the image)

Saturday, 22 June 2013

पहिली रात्रं (U/A) . . . . . . (पहिली रात्रं (U) चा सिक्वेल)

पहिली रात्रं  (U/A) . . . . . . 
(पहिली रात्रं  (U) चा  सिक्वेल)


त्या लालचुटूक पाळ्या 
सोनेरी लव कोवळी  
ते लसलसते ओठ 
श्वासही वरती खाली 

फुगीर लोभस खांदा 
मखमली सोनकांती 
नितळ पाठीवरती
डुलते नागीण काळी

त्रिताल घुमतो अंगी
पाठमोरी होते जेंव्हा 
सतार दिडदा दिडदा
स्पर्शाळून जाते तेंव्हा  

ओढून घेता जवळी
लाजाळू पाने मिटली
दीप मालविण्यासाठी
नक्षत्रं रती उठली

अंगाला भिडले अंग
लाजपदर गळाले
अणुरेणू तप्तं झाला
काळाचे भान सुटले 

क्षण  निसटून जाई 
थोपविणे नाही हाती 
करू प्रयत्न नव्याने
आता उत्तर रात्री  

-- जयंत विद्वांस 

(सिक्वेल : पहिली रात्रं (A) स्ट्रीक्टली इनबॉक्स मधे) :P

पहिली रात्रं (U) . . . . .

पहिली रात्रं (U) . . . . .
ए, तुला काय काय आठवतं?
वाचलं होतं तसा काटा बिटा,
हसू नको, आहे लक्षात
थंडी इतकी होती, अंगभर कपडे
प्रवासात खेटून बसलो पण 
स्वेटरला स्वेटर लागून 
काटा काय येणार डोंबल.
हॉटेल मधे स्थिरावल्यावर
तू खरंखुरं लाजलीस बिजलीस
आले रे चेंज करून म्हणत तू
गुलाबी साडी वगैरे नेसून आलीस
पण कुडकुडत, दात वाजवत
माझंच चुकलं, (ते नेहमीचंच म्हणा)
जवळ घेऊन पण थंडी तशीच म्हणून
खूप अक्कल ना, ते दाखवायला
दोन स्कॉच ऑन द रॉक्स
तुलाही वाटलं, करूयात ट्राय
अर्ध्या तासात तू समाधिस्थ
मी भक्तासारखा पायापाशी बसून
मलाही लागली म्हणा झोप नंतर
अरे, उठवायचं नाहीस का? म्हणत 
तू मला गदागदा हलवलस 
लोक उगाच 'पहिल्या रात्रीची' वर्णनं करतात
नंतरचा दिवस आपण 'सत्कारणी' लावला 
सांगू? नको? बरं नाही सांगत पण
सगळ्यांनीच असं केलं तर कसं  चालेल
'पहिल्या रात्री' एवढाच 
'पहिला दिवस' पण भन्नाट असतो
हे कसं कळेल?
--जयंत विद्वांस
(सिक्वेल काढूयात काय? :P ) 
 

Friday, 14 June 2013

आधी ते सांगा. . . . .

आधी ते सांगा. . . . .
 
लोक म्हणतात एवढे पावसाळे
आम्ही काही उगाच नाही पाहिले
पण नुसतेच पाहिलेत, त्यात
भिजलात किती? ते सांगा
 
पावसात म्हणे चिखल फार
तो काय धुवाल हो पाण्यानी
विकारांचा बरबटलेला चिखल
तो कशानी धुता? ते सांगा
 
बाहेरच्या पावसाचं काय सांगताय
रेनकोट घालता येतो की
पण आतून रडता तेंव्हा कुठला
रेनकोट घालता? ते सांगा
 
दोघच असता तेंव्हा पाऊस छान
तुमच्या खांद्यावर तिची मान
पावसाचा एरवी राग म्हणून तिला 
दूर लोटता की जवळ घेता? ते सांगा  
 
--जयंत विद्वांस

मला सांगतायेत...

मला सांगतायेत (१) . . . . . 

टेकडी चढताना तिनी आधारासाठी 
हातात धरलेला हात, 
सपाटीवर आल्यावर पण तसाच
सोबतीसाठी हातात घेतलेला हात 
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

देवळात गेल्यावर तिच ते 
सहज खेटून उभ रहाण 
हात जोडून, डोळे मिटून,
आमच्यासाठी मागणं 
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

बाईकवर थोड अंतर राखणं 
पहिल्या वळणावर, जसा 
काही रस्त्याचाच दोष, असं 
दाखवत अंतर मिटवणं  
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

अंतर संपल्याची हळहळ, मग
अंतर वाढल्याची जाणीव आणि
मानेला मोरपीस फिरवत तिचं
घराच्या अलीकडे उतरणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

कोप-यावर वळतानाचं तिचं
खोटं हसून रडवेलं बघणं  
घरापर्यंत मी येणार नाही
माहित असून मागे बघणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
******
 
मला सांगतायेत (२) . . . . . 
 
अजून किती दिवस रे असं?
तिचा उत्तर माहित असलेला प्रश्नं
खेकसू नकोस, मी विचारणार रोज
असं  म्हणत हसत कुशीत शिरणं 
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
एकटे (?) असताना काय म्हणणार?
तिचं  धिटाईनी लाजत विचारणं
मुक्याची भाषा छान म्हटल्यावर
तिचा लाजाळूसारखं मिटून जाणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
ए, आपलं घर छोटं की मोठं?
उद्याचा आनंद डोळ्यात तरळणं
एक मुलगा आणि एक मुलगी
म्हणत तिचं ते हरखून जाणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
लगेच काय करायचाय व्याप
म्हटल्यावर फुरंगटून जाणं 
बरं, करू दिवसरात्र प्रयत्न  
म्हटल्यावर डोळे मोठे करून बघणं  
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 

चल निघायला हवं, पाऊस येईल
नाईलाजानी तिचं वास्तवात शिरणं
उठताना मुद्दाम सहेतूक बघत   
खरच निघूयात? अन खट्याळ हसणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
******
 
मला सांगतायेत (३) . . . . . 
 
दाटून आलेलं आभाळ आणि
वा-यानी तिच्या बटांशी खेळणं
पावसाचा पहिला थेंब अंगावर नी
तिचं ते रोमांचित शहारणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
कानाला ओलसर लागतंय तो
पावसाचा थेंब की तिचा ओठ?
अंगावर काटा आणतोय तो
वारा की तिचा मधाळ स्पर्श?
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
गार वा-यानी नी पावसानी तिला
आणि तिनी मला घट्ट मिठी मारणं
भिजलेला निखारा कवेत घेऊन
माझं ते झाडाखाली संयम पाळणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
अंधारून आलय रे फार म्हणत  
तिचं अंधाराचं गैरफायदा(?) घेणं
कधी थांबणार रे पाऊस म्हणत
तिचं अजूनच थरथरत बिलगणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
रस्त्यात आहे गाडी कडेला घेतो
असं म्हणत माझं तिथून निघणं  
जसं काही मला दिसावं म्हणून
तेंव्हाच विजेचं चमकणं नी कोसळणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
******
 
मला सांगतायेत (अंतिम) . . . . . 

तिच्या अंगाचा फक्तं
मलाच येणारा वास,
अजून  नाकात कसा
अत्तरासारखा घुटमळतोय  
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 

तिच्या लगबगीतून
बाहेर पडणारा स्वरमेळ,
अजून कानात कसा
पैंजणासारखा रुणझुणतोय  
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 

पण पावसाला मात्रं मी फार घाबरतो
पाऊस थांबला की मला निघायला हवं 
यापुढे पावसात बाहेर भेटायचच नाही
तिला लक्षात ठेवून आज सांगायलाच हवं  
 
आणि हे सगळे मला सांगतात 
तिला जाऊन बरीच वर्ष झाली म्हणे
वेडे कुठचे, घाबरट आहे हो ती  
झाडाखाली ती एकटी कशी थांबेल?
 
मला सांगतायेत . . . . . .   

-- जयंत विद्वांस
 
(आसमां के तारे अक्सर पूछा करते है,
क्या तुम्हे अब भी इंतजार ही उसके लौट आनेका?
और दिल मुस्कुराके कहता है
मुझे तो अब भी "यकीन नही उसके जानेका" - या चार शब्दावरून सुचलं.)