Friday 14 June 2013

मला सांगतायेत...

मला सांगतायेत (१) . . . . . 

टेकडी चढताना तिनी आधारासाठी 
हातात धरलेला हात, 
सपाटीवर आल्यावर पण तसाच
सोबतीसाठी हातात घेतलेला हात 
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

देवळात गेल्यावर तिच ते 
सहज खेटून उभ रहाण 
हात जोडून, डोळे मिटून,
आमच्यासाठी मागणं 
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

बाईकवर थोड अंतर राखणं 
पहिल्या वळणावर, जसा 
काही रस्त्याचाच दोष, असं 
दाखवत अंतर मिटवणं  
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

अंतर संपल्याची हळहळ, मग
अंतर वाढल्याची जाणीव आणि
मानेला मोरपीस फिरवत तिचं
घराच्या अलीकडे उतरणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 

कोप-यावर वळतानाचं तिचं
खोटं हसून रडवेलं बघणं  
घरापर्यंत मी येणार नाही
माहित असून मागे बघणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
******
 
मला सांगतायेत (२) . . . . . 
 
अजून किती दिवस रे असं?
तिचा उत्तर माहित असलेला प्रश्नं
खेकसू नकोस, मी विचारणार रोज
असं  म्हणत हसत कुशीत शिरणं 
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
एकटे (?) असताना काय म्हणणार?
तिचं  धिटाईनी लाजत विचारणं
मुक्याची भाषा छान म्हटल्यावर
तिचा लाजाळूसारखं मिटून जाणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
ए, आपलं घर छोटं की मोठं?
उद्याचा आनंद डोळ्यात तरळणं
एक मुलगा आणि एक मुलगी
म्हणत तिचं ते हरखून जाणं
काल परवाचीच तर गोष्ट  . . . . 
 
लगेच काय करायचाय व्याप
म्हटल्यावर फुरंगटून जाणं 
बरं, करू दिवसरात्र प्रयत्न  
म्हटल्यावर डोळे मोठे करून बघणं  
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 

चल निघायला हवं, पाऊस येईल
नाईलाजानी तिचं वास्तवात शिरणं
उठताना मुद्दाम सहेतूक बघत   
खरच निघूयात? अन खट्याळ हसणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
******
 
मला सांगतायेत (३) . . . . . 
 
दाटून आलेलं आभाळ आणि
वा-यानी तिच्या बटांशी खेळणं
पावसाचा पहिला थेंब अंगावर नी
तिचं ते रोमांचित शहारणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
कानाला ओलसर लागतंय तो
पावसाचा थेंब की तिचा ओठ?
अंगावर काटा आणतोय तो
वारा की तिचा मधाळ स्पर्श?
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
गार वा-यानी नी पावसानी तिला
आणि तिनी मला घट्ट मिठी मारणं
भिजलेला निखारा कवेत घेऊन
माझं ते झाडाखाली संयम पाळणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
अंधारून आलय रे फार म्हणत  
तिचं अंधाराचं गैरफायदा(?) घेणं
कधी थांबणार रे पाऊस म्हणत
तिचं अजूनच थरथरत बिलगणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
रस्त्यात आहे गाडी कडेला घेतो
असं म्हणत माझं तिथून निघणं  
जसं काही मला दिसावं म्हणून
तेंव्हाच विजेचं चमकणं नी कोसळणं
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 
 
******
 
मला सांगतायेत (अंतिम) . . . . . 

तिच्या अंगाचा फक्तं
मलाच येणारा वास,
अजून  नाकात कसा
अत्तरासारखा घुटमळतोय  
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 

तिच्या लगबगीतून
बाहेर पडणारा स्वरमेळ,
अजून कानात कसा
पैंजणासारखा रुणझुणतोय  
काल परवाचीच तर गोष्ट . . . . 

पण पावसाला मात्रं मी फार घाबरतो
पाऊस थांबला की मला निघायला हवं 
यापुढे पावसात बाहेर भेटायचच नाही
तिला लक्षात ठेवून आज सांगायलाच हवं  
 
आणि हे सगळे मला सांगतात 
तिला जाऊन बरीच वर्ष झाली म्हणे
वेडे कुठचे, घाबरट आहे हो ती  
झाडाखाली ती एकटी कशी थांबेल?
 
मला सांगतायेत . . . . . .   

-- जयंत विद्वांस
 
(आसमां के तारे अक्सर पूछा करते है,
क्या तुम्हे अब भी इंतजार ही उसके लौट आनेका?
और दिल मुस्कुराके कहता है
मुझे तो अब भी "यकीन नही उसके जानेका" - या चार शब्दावरून सुचलं.)
 
 

1 comment: