Saturday 24 January 2015

वेंधळा…

साल एक्याण्णव. तीच ती मसाला डोसा आणि सवाई पोस्ट मधली. डेक्कनला भेटूयात म्हणाली. तेंव्हा लायसन काढलेलं नव्हतं. वडिलांची लुना होती, ती किती वजन खेचणार त्यामुळे तिला गाडीवरून फिरवायच्या भानगडीत मी पडायचो नाही. मी फेदरवेट होतो पण ती गुटगुटीत होती. अर्थात तेंव्हा सहवास मिळतोय याचाच आनंद इतका होता की गाडीवरून कुठे जात नाही याची खंत वगैरे वाटायची नाही. डेक्कन थिएटरच्या बाजूला जे रोड पार्किंग आहे तिथे गाडी लावायची आणि चालत जेएम रोडला फिरायचो आम्ही. 

तर त्यादिवशी गाडी लावली आणि ती आल्यावर निघालो, फिरून झालं मग पूनमला गेलो नेहमीप्रमाणे, तिथे तानाजी वेटर आमच्या ओळखीचा होता. कितीही तास बसलं तरी कटकट वगैरे करायचा नाही. ती बसनी यायची आणि मग जाताना मी तिला घराच्या अलीकडे सोडायचो. तर आम्ही लुना शोधायला सुरवात केली. गाडी गायब. एक तर तिथे पार्किंग कायम फुल्ल असायचं. कुणीतरी चावटपणा करून गाडी हलवली का ते पण बघून झालं. इथे माझ्या अंगाला घाम सुटायची पाळी आलेली. गाडी चोरीला गेली म्हणून पुढची कम्प्लेंटची सगळी दिव्यं करावी लागणार त्याचं टेन्शन आलेलं. एक तर घरी फोन पण नव्हता. माझ्याकडे लायसन नाही. म्हणजे आता घरी जावून बाबांना स्टोरी सांगून रिक्षेनी त्यांना कागदपत्रं, लायसन घेऊन डेक्कन पोलिस चौकीला यावं लागणार, मग कम्प्लेंट, हे राम. परत उद्यापासून ते कामावर कसे जाणार ही चिंता. 

माझे तीनेक टाके उसवल्याचा इफेक्ट चेह-यावर आला असणार, ती म्हणाली 'आपण एक राउंड मारून बघुयात का? कुणीतरी मुद्दाम दुसरीकडे लावली असेल, लुनाचं लॉक काय कुणीही काढतं'. या वाक्यानी माझा अजून एक टाका उसवला हे तिच्या गावीही नव्हतं. आता दाभण नाही चालणार, मशिनवरच फाटलेली शिवावी लागणार असं वाटू लागलं. तिच्या (?) समाधानासाठी आम्ही गरवारे ओव्हरब्रीज वरून गुडलककडे निघालो. हा राउंड निरर्थक आहे हे मला माहित होतं. तरीपण निघालो. गुडलक कॉर्नरवरून परत डेक्कन थिएटरकडे. बर तिथे मधे पार्किंग नव्हतं. मग ती म्हणाली, रोड क्रॉस करून पलीकडे चेक करू नाही मिळाली तर मग कम्प्लेंट एवढाच मार्ग. 

क्रॉस करतानाच मला भरून आलं. गाडी समोर होती. ती म्हणाली, 'ती बघ गाडी समोर आहे. "कुणी आणली असेल बरं इथे?" असं म्हणालास तर इथेच बुक्का घालीन. मला खात्री होती तू मुर्खासारखी दुसरीकडे लावली असणार.' तर झालं असं होतं की गुडलकला चौकात पोलिस उभा असल्याने मी दिसेल तिथे गाडी लावून चालत गेलेलो, ते तिच्या बरोबर गप्पांमधे रमल्यामुळे विसरलो. त्यावेळी असं हरपून जायला व्हायचं खरं, आता विसरायला होतं. वेंधळेपणात एवढाच काय तो फरक.

जयंत विद्वांस        

No comments:

Post a Comment