Saturday 3 January 2015

लोकमान्य - एक युगपुरुष.....

साल १९९८, स्थळ बांगलादेश, अंधार पडलेला, शेवटच्या दोन चेंडूत तीन धावा हव्या असताना सकलेनला फोर मारणारा हृषीकेश कानिटकर लक्षात राहतो पण आधी ३१४ चा पाठलाग करत तिथे पोचवणा-या सौरव गांगुलीच्या १२४ धावा विस्मरणात जातात तसंच झालं टिळकांच्या बाबतीत. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९२० साली गेलेले टिळक आणि इतर नेते विस्मृतीत गेले. पिढी बदलल्यामुळे किंवा सोयीचं असेल म्हणून स्वातंत्र्याचा इतिहास फक्तं गांधी आणि नेहरू यांच्यावर केंद्रित झाला. 

चित्रपटाचं कठोर समीक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही पण थोडं न आवडलेलं पण आहे. खरंतर असे चित्रपट मी श्रद्धेनी, भाबडेपणानी बघतो. तर चित्रपट दोन समांतर पातळीवर चालतो, आजचा तरुण - चिन्मय मांडलेकर - टिळकांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकून भारावतो आणि आजच्या काळाची टिळकांच्या आयुष्याशी सांगड घालू पहातो. जी चित्रपटात फार परिणामकारक दिसत नाही. एका भाषणानी तो एवढा बदलतो, विचार करायला लागतो हे जरा खटकेबल आहे पण फार चर्चा करण्याएवढ नाही.

मुळात चित्रपटात टिळकांच्या आयुष्यातले मोजकेच प्रसंग आलेत. आगरकर टिळकांचे वाद, जहाल अग्रलेख टिळक सांगत आहेत, कोर्ट केसेस वगैरे भाग जास्ती असता तरी चाललं असतं, गणेशोत्सव, रंडचा खून, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, आगरकरांशी वाद तुकड्या  तुकड्यांनी समोर येतात, मधेच चालू काळाशी सांधा जुळवल्यामुळे आधीच्या प्रसंगाचा इफेक्ट कमी होतो. पूर्ण टिळक दाखवले असते अडीच तास तर ते जास्तं परिणामकारक झालं असतं असं माझं मत.

चित्रपटात जुना काळ मात्रं उत्तम उभा केलाय. वेशभूषा, कंदील, जुने वाडे, शनिवारवाडा, केसरी वाडा सुंदर दाखवलंय सगळं. टिळकांची दूरदृष्टी  केवढी अफाट होती याची साक्ष देणारी वाक्यं स्मितीत करतात. १८९७ ला कोकण रेल्वेचं स्वप्नं, नोकरीकरता नको तर ज्ञानाकरिता शिका, त्याचा वापर देशासाठी करा, स्वदेशी वापरा (आत्ताही तोच नारा चालू आहे अजून) असे विचार त्यांनी शंभर वर्षापूर्वी सांगितलेत, हे कळतं. 

सुबोध भावे हा मोठा नशीबवान माणूस आहे. 'अरे, हा तर बालगंधर्व' म्हणणारे टिळक आणि ज्याला म्हणाले तो 'बालगंधर्व', त्याला दोन्ही साकार करता आले. नशिबवान हा शब्दं फक्तं रोल मिळण्याच्या दृष्टीनी मी वापरलाय. सुबोध 'टिळकांचं' चालणं आणि भेदक डोळे मात्रं दृष्टं लागण्याजोगे. वयातले फरक देहबोलीतून फार सुंदर दाखवलेत त्यानी. 'सरकारचं डोकं…' आणि 'स्वराज्यं हा माझा….' ही सुप्रसिद्ध वाक्यं म्हणताना त्याचा लागलेला आवाज आणि ते पाणीदार डोळे पहात रहावेत. बेन किंग्जलेचा गांधी जितका सुरेख तितकाच आमचा सुबोध 'टिळक'  ही सरस. आयुष्याच्या संध्याकाळी मंडालेहून परत आल्यावर पुण्यात टिळक संध्याकाळच्या वेळी कंदील घेऊन उभे राहिलेल्या प्रचंड जनसमुदायाला दर्शन देतात तो शॉट गहिवर आणतो.

बाहेरच्या जगात मोडर्न असलेले प्रेक्षक थिएटरच्या अंधारात अजूनही टिळकांच्या एन्ट्रीला, रान्डच्या खुनाला, स्वराज्यं हा माझा…. या वाक्याला टाळ्या, शिट्ट्या वाजवतात आणि चित्रपट संपल्यावर उभे राहून हात जोडतात तेंव्हा जे वाटतं ते सांगता नाही येणार. न पाहिलेला, ज्यांच्याबद्दल काही मोजकेच प्रसंग माहित असलेला हा लोकमान्यं जाऊन आता चौ-याण्णव वर्ष झाली पण तरीही तो करारी, मिशाळ माणूस शेवटी काहीतरी कालवाकालव  करून गेला.


जयंत विद्वांस  


No comments:

Post a Comment