Saturday 10 January 2015

लल्याची पत्रं (१९) ..... नाच रे मोरा .....

प्रिय लल्यास,

तुला 'नाच रे मोरा' ऐकलयेस का? हा प्रश्नं विचारून मी माझा मूर्खपणा सिद्ध करणार नाही. काऊ चिऊची गोष्टं, इथे इथे बस रे काऊ, आईचं पत्रं हरवलं, लपाछपी, स्ट्याचू आणि 'नाच रे मोरा' याशिवाय आपल्या  बालपणाच्या सुरस कथा पूर्ण नाही होऊ शकत. त्रेपन्न सालचं गाणं आहे. एकसष्ठी झाली त्याची. खूप लहानपणी पाहिलेला 'देवबाप्पा' मी 'अलका'ला. विवेक, चित्रा आणि मेधा गुप्ते एवढी नावं आणि हे गाणं एवढंच लक्षात आहे. माझ्या माहितीत तरी हा चित्रपट सीडी, क्यासेट स्वरुपात उपलब्ध नाही, थिएटरलाही लागत नाही. पुण्यात नागनाथ पारापाशी एकजण प्रायव्हेट शो करतो पंधराशे रुपयात अशी ऐकीव माहिती आहे. दिग्दर्शक राम गबाले, विवेक, गदिमा, पुलं सगळे काळाच्या पडद्याआड गेले. मेधा गुप्ते बद्दल माहिती नाही, ती सुद्धा आजी/पणजी असेल आता. आशाताई आणि चित्रा नवाथे अजून आहेत.

या गाण्या एवढी व्हर्जन्स मी दुसऱ्या गाण्याची ऐकलेली नाहीत. लहान मुलांच्या क्यासेट, डीव्हीडीज, अनिमेटेड, इन्स्ट्रुमेंटल आणि असंख्य नविन शिकणा-या गायिका हे गाणं म्हणण्याची हौस भागवून घेतात. पण भोसलेबाईंच्या आवाजात पहिल्या 'नाच'ला जो आर्जव आहे तो कानात एवढा रुतून बसलाय ना की दुसरं कुणी म्हणू लागलं की त्याच्या गळ्यात तो लडीवाळपणा शोधण्याची वाईट सवय लागलीये. आजवर फार  सापडला नाही हा भाग वेगळा. आता रंगीत मोर दिसतो, नाचणा-या, सुंदर रंगीत कपडे घातलेल्या प-या दिसतात पण मेधा गुप्तेचा कृष्णधवल गोडवा आठवतोच.जमून येतात काही गोष्टी हेच खरं. विसुभाऊ बापट त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमात हे गाणं उलटं म्हणतात, मजा येते ऐकायला - 'चना रे रामो, च्याम्ब्याआ तनाव, चना रे रामो, चना…… म्हणून बघ एकदा संपूर्ण गाणं तसं, धमाल येते.   

बालहट्ट पुरवणं जेवढं अवघड असतं ना तेवढंच त्यांच्यासाठी, त्यांच्या वयाला शोभेल, त्यांचं वाटेल अशा भाषेत साधं, सहजसुंदर लिहिणं फार अवघड असतं असं मला वाटतं. आजकालच्या सिरियल्समधे हा हास्यास्पद प्रकार तुला बघायला मिळेल. एकतर ती मुलं वयापेक्षा जास्त किंमतीचे सुविचार बोलतात किंवा वयाला न शोभेल असं लाडं लाडं तरी बोलतात, एक मात्रं आहे अगदी समंजस वगैरे दिसतात ही पोरं किंवा वाटतात. खरंतर त्याच्यासाठी त्या वयात, भूमिकेत शिरणारा कवी/लेखक हवा. गदिमांबद्दल मी काय बोलावं? मनात मूल जपलेला माणूस (पुलंनी त्यांच्यावर लिहिलेलं वाच). 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान…. ' त्यांचंच. मला त्यांची ही दोन्ही गाणी जाम आवडतात.   

असो! जोपर्यंत मराठी/इंग्रजी बालवाड्यातून ग्यादरिंगमधे विविध गुणदर्शन कार्यक्रम जिवंत आहे, होईल तोपर्यंत त्यात 'नाच रे मोरा' वर पार्श्वभागावर खोटी मोरपिसं लावून ती चिमुकली देखणी पोरं डान्स करणारच आणि जोपर्यंत पुण्यात गणेशोत्सव चालू आहे, नातुबागेला लायटिंग करतील तोवर 'नाच रे मोरा' तिथे वाजणारच हे निश्चित (मग इतर भाषिक जबरा ऱ्हिदमची गाणी किती का वाजेनात). चल, पुढच्या पत्रापर्यंत बाय. 

--जयंत विद्वांस
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...
झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
थेंब थेंब तळयात नाचती रे टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ..... 
 
 
 

No comments:

Post a Comment