Tuesday, 12 February 2013

कपाट.....

काल ब-याच दिवसांनी घर आवरलं
काय काय सापडलं तिच्या कपाटात

साखरपुड्याची घडीवर विरलेली साडी
लग्नातला घडी विस्कटलेला मोरपिशी शालू
लग्नाआधीचा तिचा हडकुळा फोटो आणि
इतिहास झालेला लग्नाचा फुगलेला अल्बम

काहीच न लिहिलेली एक कुमारी डायरी
पानांमधे ठेवलेल्या दहाच्या को-या नोटा
एक गणपतीचा आणि एक आमचा फोटो
आणि दोन्हीकडच्या एकेक लग्नंपत्रिका

उलट सुलट टाक्यात गुंतलेल्या थंडगार सुया
अर्धवट राहिलेला स्वेटर आणि गुंता झालेले,
उब संपलेले लोकरीचे रंगीत गुंडे आणि
गुंडाळून ठेवलेलं भरतकामाचं घर

दागिन्यांच्या रिकाम्या मखमली पिशवीत
काळ्या पडलेल्या काही वस्तू, दोन वेढण्या
एक चाफ्याचं फूल, एक छल्ला, एक पोत
आणि एक बिन झाकणाचा रिकामा करंडा

वरच्या सोनेरी पाकिटाएवढच् पिवळं पडलेलं
मी पाठवलेलं पहिलं वहिलं पत्रं,
एक संपूर्ण चार्तुमास, एक अकरावा अध्याय
एक सुवर्ण भिशी योजनेची जाहिरात

आता तिचे भिंतींवर, वस्तूंवर, माझ्या अंगावर
रेंगाळणारे स्पर्श आवरले की झालं सगळं
म्हणजे मग काही काही उरणार नाही मागे

ब-याच दिवसांनी आवरतोय ना घर, त्यामुळे धांदल
ती गेल्यानंतर पहिल्यांदाच्.....

जयंत विद्वांस

वाळूचं घड्याळ...

(Click the image)

Monday, 28 January 2013

ती - ९


ती - ८


ती - ७


ती - ६


ती - ५


ती - ४


ती - ३


ती - २


ती - १


Friday, 12 October 2012

काही खरं नाही.....

सारखं सारखं असं समोरून जाणं बरं नाही 
सारखं सारखं असं चोरून बघणं बरं नाही 
मनाचं काय सांगावं, त्याचं काही खरं नाही 
सारखं सारखं असं नटणं मुरडणं बरं नाही 
वय सत्रात मदन गात्रात काही खरं नाही 
सारखं सारखं असं बटांशी खेळणं बरं नाही 
कापूरदेह त्यात अंगात वसंत काही खरं नाही
सारखं सारखं असं सतत भुलवणं बरं नाही 
चालीला लय, कळीचं वय काही खरं नाही 
सारखं सारखं असं जलद उमलणं बरं नाही 

जयंत विद्वांस

Saturday, 7 July 2012

मठ्ठं....
ती मला नेहमी प्रेमानं(?) मठ्ठं म्हणते
(मला फार राग येतो)
कालचीच् गोष्टं, मी तिला म्हणालो
मी काय होउ?

डोळ्यातलं काजळ की पायातलं पायल्,
ओठावरचा तीळ की कानातला लोलक,
गालावरचं लाल लाल सफरचंद की
नाकातला हिरा की गळ्यातला तन्मणी,
तुझा नाजूक हातातला सेंटेड हातरूमाल,
गो-यापान हातावर बाजूबंद होउ की
मखमली कमरेवर कमरबंध होउ?

ती हसून म्हणाली, येडं ते येडच् शेवटी.
(मला फार राग येतो)
अरे खुळ्या, छान प्रिंटेड वायल तरी
व्हायचस्, नखशिखांत लपेटलं असतं.

मठ्ठं तो मठ्ठंच्......
जयंत विद्वांस

Tuesday, 3 July 2012


कधी वाटते........

कधी वाटते पक्षी व्हावे
उंच आकाशी मस्त उडावे
कधी वाटते होउन मासा
खोल सागरी तळा धुंडावे

कधी वाटते फूल व्हावे
केशी किंवा पायी वहावे
कधी वाटते होउन वारा
मनोवेगाने जगी फिरावे

कधी वाटते आस्तिक व्हावे
मुखी नाम त्याचे रंगावे
कधी वाटते होउन नास्तिक
दांभिकतेचे बुरखे फाडावे

कधी वाटते माणूस व्हावे
मनासारखे काही जगावे
कधी वाटते होउन अंकुर
मातीतून पुन्हा उगवावे

जयंत विद्वांस