Tuesday, 4 November 2014

लल्याची पत्रं (१८) …. 'तेरे बिना जिंदगीसे'

लल्याची पत्रं (१८) …. 'तेरे बिना जिंदगीसे'
लल्यास,
कुणावाचून आयुष्यं थांबेल, संपेल एवढं कुणाला आयुष्यात स्थान देऊ नये बघ. हे म्हणणं फार सोपं आहे. असं ठरवून काहीही करता येत नाही. बादलीत निळीचा पहिला थेंब पडतो आणि सगळ्या पाण्याचा रंग बदलून जातो ना तशी एखादी व्यक्ती आयुष्यात येते आणि मग आपलं अस्तित्वं तिच्याशिवाय अपुरं वाटायला लागतं. अहंकार, तत्वं, अधिकाराची भावना, ध्येयं, आकांक्षा, स्वप्नं अशा अनेक गोष्टींपायी फारकत होते. प्रत्येकजण आपापल्या जागी योग्यं वाटतो पण एकटेपण, अपुरेपण पायातला काटा निघावा पण आत राहिलेला बारीक कण सलत रहावा तसं टोचण्या देत रहातं.
आयुष्याच्या संध्याकाळी चुका उमगतात, त्यावेळेस त्या मान्यं केल्या काय न केल्या काय, निसटलेलं, हरवलेलं डोळ्यांपुढे तरळतं. आयुष्यं तसंही जगता आलंच असतं की, ते ही फार वाईट नव्हतं खरंतर, असं वाटून जातं. आयुष्याचा जमाखर्च मांडताना तारांबळ उडते. काही गोष्टींसाठी मनाच्या कागदावर केलेल्या तरतुदी आठवतात. राहून गेलं त्या अंमलात आणणं ही भावना विषण्णं करते. We regret more for what we miss than what we had already lost.
गुलझार हे सगळं मोजक्या जीवघेण्या शब्दात 'तेरे बिना जिंदगीसे' मधे मांडतो. मुळात 'आंधी'ची तिन्ही गाणी रत्नं आहेत. इस मोडसे जाते है, तुम आ गये हो आणि हे (चौथं विस्मरणात टाकण्यासारखं म्हणून तीन). ज्यावेळेला मनातलं बोलायचं असतं पण बोलता येत नाही अशावेळी माणसं वेगळंच बोलतात. गुलझारनी गाण्याच्या मधे संजीवकुमार, सुचित्रा सेनचं गद्य असंच लिहिलंय. संजीवकुमारच्या खालच्या पट्टीतल्या आवाजाला सुचित्रा सेनचा गहिवरलेला आवाज वरचढ ठरतो. "वैसे तो अमावस पन्ध्रह दिनकी होती है, लेकिन इस बार बहोत लंबी थी", नौ बरस लंबी थी ना?" त्यानंतर बोलणं खुंटलेल्या अवस्थेला सावरून घ्यायला "जी में आता है…" चालू होतं. ते संपतं आणि तिथून किशोर तेरे बिना… उचलतो. अशीच जादू त्यानी  सलामे इश्कंला… केली होती आणि गाणं खाऊन टाकलं होतं.
मागे तुला म्हटल्याप्रमाणे काही गाण्यांना तो वेगळा, राखलेला आवाज लावतो किंवा लागत असावा. शेवटचं कडवं तसंच आहे. इतक्या दिवसांनी भेटलेली ती, खूप काही बोलायचंय, ऐकायचंय. हताशपणाचा कळस लिहिलंय गुलझारनी. तू म्हणशील तर आज चंद्रास्त होणारच नाही, कालचक्र थांबवून ही रात्र फ्रिज करू, चिरंतन करू. एका रात्रीची तर गोष्टं पण आयुष्यंच शिल्लक नाही. गालिब म्हणतो. "हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले". अशीच भावना होते गाणं ऐकून. सकाळ झाली की दोघे दुरावणार. अबोल शल्यं, सल, रुखरुख, दाटलेले, साठलेले गहिवर पाचोळ्यासारखे असेच मनात तळाशी दबून पडणार आणि त्याची फौसिल्स झाली की ती उकरून काढून गुलझार अशी गाणी लिहिणार.
गाण्याचं इंट्रो, इंटरल्यूड म्हणजे शब्दरहित कडवीच ती. "ये जो फुलोंके बेले नजर आते है ना…. इसे दिनके वक्त देखना चाहिये" हे वाक्यं दिवसाच म्हटलंय हा एक त्यातला गमतीचा भाग. रात्रीच्या शुटिंगला लागणारी फिल्म संपली असल्यामुळे ते पिक्चरायीझ करून घेतलं आणि बदलायचं राहून गेलं असं वाचलंय मी. पण ते कुणाच्या लक्षात येणार नाही इतकं गाणं श्रवणीयं आहे. आर.डी., लता (आशा पण), किशोर, गुलझार, अस्वस्थ आत्मे, अशी गाणी करतात आणि त्यांचा त्रास आपल्याकडे सरकवतात, बाकी काही नाही.
चल पुढच्या गाण्यापर्यंत कोई शिकवा नहीं आणि तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं.

जयंत विद्वांस

तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
तेरे बिना..

काश ऐसा हो, तेरे क़दमों से चुन के मंजिल चलें और कहीं, दूर कहीं
तुम गर साथ हो, मंजिलों की कमी तो नहीं
तेरे बिना..

जी
में आता है, तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहें, रोते रहें
तेरी भी आँखों में आंसुओं की नमी तो नहीं
तेरे बिना...

तुम
जो कह दो तो, आज की रात चाँद डूबेगा नहीं रात को रोक लो,
रात की बात है, और ज़िन्दगी बाकी तो नहीं
तेरे बिना..

(आंधी (१९७५), आर.डी.बर्मन, गुलज़ार, किशोर कुमार, लता मंगेशकर)


Monday, 3 November 2014

लल्याची पत्रं (१७)…. बाबुल मोरा……

लल्याची पत्रं (१७)…. बाबुल मोरा……

खूप दिवसांनी पत्रं बघ. मधे वेळच झाला नाही. सैगलच्या गाण्यांची एक क्यासेट माझ्याकडे आहे (जी हेडफोन घालून ऐकावी लागते नाहीतर इतरांकडून मारहाण होण्याची शक्यता असते). मोजकीच गाणी आहेत त्यात पण त्यातली तीन मला जर जास्तच आवडतात - गम दिये मुस्तकील, नुक्तचिं है गमे दिल आणि सगळ्यात आवडतं बाबुल मोरा. उर्दू शब्दांचा अर्थ कळो न कळो, सैगल दु:खं दहा एच.पी.च्या मोटारला होज पाईप लावल्यासारखं ओततो.

मुकेश, हेमंतकुमार, सैगल किंवा कुठलेही जुने गायक यांच्याबद्दल चेष्टेनी बोलणं खूप सोप्पं असतं. त्यांच्या मर्यादा काय, बेसूर कुठे कुठे झालेत वगैरे माहिती अभ्यासू(?) लोकांच्या तोंडपाठ असते. १९३८ सालच्या स्ट्रीट सिंगर मधलं गाणं आहे हे. संगीतकार रायचंद बोराल. शहात्तर वर्ष झाली, गाणं टिकून आहे. पुस्तकात बघून बनवलेली रेसिपी नाहीये ती. चिमूटभर, चवीपुरतं, हातात घेऊन नजरेने किती टाकायचं याचा अंदाज घेऊन टाकलेल्या सुगरणीच्या हातची रेसिपी आहे. आजी म्हणायची, स्वयंपाक बनवणा-याचा स्वभाव त्याच्या जेवणात उतरतो म्हणून बाहेरचं खाऊ नये. मीठ मोहरीला चिकटून वात्सल्यं सोबत येत असावं. असो!

जिव्हारी लागलं ना की प्रतिकात्मक काय कुठलंच लिहिताना शब्दं शोधावे लागत नाहीत बघ. लखनौचा नवाब वाजिद अली शहाला इंग्रजांनी कोलकत्याला हाकललं आणि शेवटपर्यंत तो तिथेच राहिला. लखनौ त्याचं माहेर आणि कोलकता सासर. नुसतं ऐकताना वाटेल बिदाईचं गाणं आहे. मागे आई बाप, डोली मधे पोरगी हमसून हमसून रडत असणार. असलं काहीही नाही. हकालपट्टी झालेल्या राजाचे मूक अश्रू आहेत, रडगाणं नाही. सावरकरांना 'ने मजसी ने…' लिहिताना जे वाटलं तेच इथेही आहे. काय असतं खरं तर जिथे जन्माला आलो त्या मातीत जीव अडकण्यासारखं? नेमकं कुणालाच नाही सांगता येणार. गड्या, आपला गाव बरा, हे मात्रं सत्यं आहे. मला वाटतं बालपणच्या निरागस, दुर्गुण रहित मनावर जो ठसा उमटतो ना तो पुसला जात नाही. निखळ आनंदाचे सहज, विनासायास भोगलेले क्षण मनात रुतत असावेत. एखाद्याचं बालपण जन्मभूमीत कटू जरी गेलं तरी ओढ रहातेच. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ते काय खोटं नाही.

भीमसेन जोशी, जगजीत सिंह यांचंही मी ऐकलंय हे गाणं पण सैगल का मजा उसमें नही. कदाचित पहिला ठसा म्हणूनही असेल. थोर गायक मल्लिकार्जुन मन्सूर म्हणाले होते या गाण्याबद्दल "सैगलनी अजून चांगल्या पद्धतीनी म्हटलं असतं हे गाणं खरंतर". मोठी माणसं निर्विष, मत्सररहीत बोलतात बघ. चुका काढायच्या कामासाठी आजूबाजूल अर्धी हळकुंड खूप आहेत. आपण चांगलं ते बघायचं, ऐकायचं. 

मला एक प्रश्नं कायम पडतो, तुम्हां मुलींचं काय होत असेल उंबरा ओलांडताना?. वीस बावीस वर्ष बागडलेल्या घरात क्षणार्धात परक्या, पारख्या होता तुम्ही. पाहुण्या होता तुम्ही. हे फक्तं स्त्रीलाच जमू शकतं. बघ ना वाजिद अली सुद्धा किती सल घेऊन जगला ते. म्हणून मला तर कायम वाटतं बापाला हे तुटणं कळण्यासाठी मुलगी व्हावी. क्षणार्धात नाळ तुटते आणि मग जिवंत आहे तोवर त्याच्या मनात चिळकांड्या चालू. हव्याहव्याश्या वाटणा-या ओल्या जखमाच या, सुकलीये वाटलं तर खपली काढायची, परत ताजी. 

चल पुढच्या पत्रापर्यंत ये संग छूटो न जाए.

जयंत विद्वांस

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...


आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...


(फिल्म : स्ट्रीट सिंगर, संगीतकार रायचंद बोराल, गायक : कुंदनलाल सैगल, गीत : वाजीद अली शाह)